1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....

अतुल धामनकर
गेली २०-२२ वर्षे जंगलात भटकंती करणारे श्री. अतुल धामनकर. वन्यजीव संशोधक, लेखक आणि प्रकाशचित्रकार असलेल्या धामनकरांकडे वाघ , पक्षी आणि अन्य प्राणी यांच्याबद्दलच्या माहितीचा प्रचंड खजिना आहे. त्यांनी या विषयावरची तब्बल १२ पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत.


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून.... अतुल धामनकर, चंद्रपूर

साधारणत: १९९०च्या सुमारास मी वाघांचा शास्त्रीय अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच वेळी मला वाघांचे फोटो घेण्याचीदेखील प्रबळ इच्छा होत होती. पण तेव्हा माझ्याकडे वन्यजीव प्रकाशचित्रणासाठी उपयुक्त असलेला कॅमेरा आणि लेन्स नव्हतीच. कॅमेऱ्याच्या नावाखाली माझ्याकडे होता तो याशिका कंपनीचा पॉइंट अँड शूट कॅमेरा. वास्तविक असा कॅमेरा वाईड अँगल असतो. म्हणजे त्यातून जवळ असणारी वस्तू देखील दूर दिसते. तर यात वाघाजवळ जाऊन फोटो कसा काढणार? तरीही मी वाघाचा फोटो घ्यायचाच असा ध्यास घेतला होता. त्याकरीता काहीही करायची माझी तयारी होती. जरी माझ्याकडे मोठी लेन्स नसली तरी, तरी वाघांचा अभ्यास, आणि तो कुठे सहजपणे सापडू शकेल याचा अनुभव तर नक्कीच होता.

त्यावेळी मी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भरपूर भटकंती करून वन्यजीवांचा अभ्यास करत होतो. त्यामुळे मी ठरवलं की जिथे वाघ नेहमी येतो अशा जागी आधीच जाऊन बसायचं आणि वाघ तिथे पाण्यावर आला की त्याचा फोटो टिपायचा. त्याप्रमाणे मी मार्च महिन्यात पंचधाराच्या मचाणावर जाऊन बसलो.

सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत न हलता, न बोलता मचाणावर बसलो होतो. पण त्यादिवशी तिथे वाघ आलाच नाही. पुढचे दोन दिवसही तसेच रिकामे गेले. चौथ्या दिवशी मात्र मी पहाटे मचाणावर बसलो आणि नाल्यापलीकडच्या जामूनबोडीच्या टेकडीवरून सांबराचा 'अलार्म कॉल' ऐकू आला. सांबरासारखं मोठं जनावर ओरडतंय म्हणजे वाघच इकडे येत असण्याची शक्यता होती. मी कॅमेरा हातात घट्ट धरून बसलो. पण पुढचे दोन तास काहीच घडलं नाही. अचानक पाण्याजवळ आलेला मोर मोटारीच्या भोंग्यासारखा आवाज करत उडाला. पुढच्याच क्षणी पिवळसर अंगकांतीचा भरदार पट्टे असलेला वाघ बांबूतून पुढे आला. मी कॅमेरा डोळ्याला लावला पण त्यातून वाघ दिसेनाच. तरीही मी पटापट वाघाचे फोटो टिपले. पाणी पिऊन तो वाघ परत जंगलात शिरला.


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....अतुल धामनकर, चंद्रपूर

मी आनंदाच्या आवेगातच चंद्रपूरला आलो. रोल डेव्हलप करायला टाकला. चारपाच दिवसांनी फोटो आले. प्रचंड उत्साहाने ते फोटो पाहिले पण त्यात सगळीकडे नाला, जंगल हेच दिसत होतं! वाघ दिसतच नव्हता. मी अतिशय बारकाईने पाहिले तेव्हा एका पिवळसर ठिपका दिसला. तोच माझा वाघ होता!! पण त्याला नीट बघण्यासाठी भिंगाचा उपयोग करावा लागला असता. मी वाघाच्या या अशा पहिल्यावहिल्या फोटोने खट्टू झालो.

पण पुढे माझ्याकडे निकॉन कॅमेरा आणि टॅमरॉन २००-४०० मि.मि. ची लेन्स आली. वाघांचे फोटो जास्त चांगले आणि सुस्पष्ट येऊ लागले. खरंतर वाघाचे फोटो कसे टिपायचे यात मी पारंगत झालो. पुढे ५०० मि.मि.च्या लेन्समुळे आणि डिजीटल कॅमेऱ्यामुळे तर वाघ कॅमेऱ्यात बंदिस्त करणे आणखीनच सोपे झाले. वाघांचा अभ्यास असल्याने मला वाघांचे फोटो टिपण्यात कधीच अडचण आली नाही.

वाघाचे फोटो घ्यायचे म्हणजे आधी वाघ शोधता यायला पाहिजे. त्याकरिता हरणं, पक्षी व इतर जनावरांनी दिलेले धोक्याचे इशारे समजले पाहिजेत. रस्ते, पायवाटा यांवरील वाघाच्या पाऊलखुणांवरून ते ताजे आहेत की जुने हेदेखील समजले पाहिजे. वाघाच्या मूत्राचा वास, उकीर, विष्ठेवरून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेता आला पाहिजे. त्याच बरोबर तासन तास एखाद्या जागी शांतपणे थांबून वाघ जंगलाबाहेर निघण्याची वाट बघण्याचा संयमही अतिशय गरजेचा आहे. वाघ बाहेर आल्यावर उत्तेजित न होता त्याच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करून ते कॅमेऱ्यात बंदिस्त करता यायला हवे.

आज व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांची गर्दीच उसळलेली असते. उन्हाळ्यात तर ताडोबासारख्या जंगलात वाघ दिसणं म्हणजे जवळपास ठरल्यासारखंच असतं. त्याच बरोबर आज डिजीटल कॅमेरे, चांगल्या लेन्सेसही सुलभपणे मिळू लागले आहेत. पण कितीही चांगली उपकरणं असली तरी फोटो घेणं हे शेवटी माणसाचंच काम असतं. त्यामुळे


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....अतुल धामनकर, चंद्रपूर

प्रकाशचित्रकाराच्या संयम, अभ्यास किंवा अनुभवावर चांगले किंवा वाईट फोटो मिळणं अवलंबून असतं. फक्त वाघाचा फोटो टिपणं ही आता फारशा कौशल्याची बाब उरलेली नाही. त्याऐवजी वाघाच्या हालचाली, वैशिष्ट्ये, त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या बाबी जसे शिकार, लढत , मिलन , बछड्यांची वागणूक अशा बाबींचे फोटो जास्त महत्त्वाचे ठरतात.

माझ्यासाठी तर वाघांचा शास्त्रीय अभ्यास हे एक महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मी वाघ दिसताच तो नर आहे की मादी, साधारण वय, त्याच्या अंगावरील पट्ट्यांचे वैशिष्ट्य, विशेष ओळखखुणा या बाबींवर आधी लक्ष केंद्रित करतो. नुसतेच कॅमेऱ्याची कळ दाबून भराभर फोटो घेण्याऐवजी काही वेगळे कोन, हालचाली, पट्ट्यांची रचना , चेहऱ्यावरच्या खुणांचे क्लोजअप् टिपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. या सगळ्या बाबी मला माझ्या वाघांच्या अभ्यासासाठी फार उपयोगी ठरतात. पट्ट्यांच्या रचनेवरून मी ताडोबातले वेगवेगळे वाघ नीटपणे ओळखू शकतो. त्यामुळेच मी इंग्लंडच्या 'टायगरनेशन' या संस्थेच्या वेबसाईटवर ३६ वेगवेगळ्या वाघांची सचित्र माहिती देऊ शकलो आहे.

वाघांच्या प्रकाशचित्रणासाठी मी तीन वेगवेगळ्या लेन्सेसचा वापर करतो. त्यातली माझी सगळ्यात महत्त्वाची लेन्स आहे ५००मि.मि.ची प्राइम लेन्स. ही एफ् ४.५ असल्याने कमी प्रकाश, झुडपात किंवा हालचाली करत असलेल्या वाघाचे फोटोही मला टिपता येतात. फिक्स्ड लेन्स असल्याने याचा शार्पनेस जबरदस्त आहे. त्यामुळे मला वाघांच्या चेहऱ्याचे क्लोजअप् देखील टिपता येतात. माझी दुसरी लेन्स आहे निकॉनची ५५-३००मि.मि., ही लेन्स जवळ असलेल्या वाघासाठी उत्तम आहे. शिवाय यात व्हायब्रेशन रिडक्शन असल्याने वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी ही लेन्स उपयुक्त ठरते. तिसरी लेन्स १८- १३५ मि.मि.ची असून अधिवासासह वाघ टिपण्यासाठी ही लेन्स फार उपयोगी आहे. मी नेहमी ५००मि.मि. ची लेन्स निकॉन D7000 या कॅमेऱ्याबरोबर तर इतर लेन्सेस D90 या कॅमेऱ्याबरोबर वापरतो.


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....अतुल धामनकर, चंद्रपूर

वाघांचे प्रकाशचित्रण हा मजेचा भाग असला तरी त्याच्यासाठी रणरणत्या तप्त उन्हात, पाऊसपाण्यात, कडाक्याच्या थंडीतही तासनतास भटकण्याची तयारी हवी. शेकडो-हजारो साधे फोटो टिपण्याऐवजी वाघाची एक वेगळी फ्रेम मिळणं हे मला लाख मोलाचे वाटते. कॅमेरा , लेन्स कुठलीही असली तरी त्याने काहीच फरक पडत नाही पण चिकाटी, मेहनत आणि अभ्यास मात्र हवाच.


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....अतुल धामनकर, चंद्रपूर


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....अतुल धामनकर, चंद्रपूर


वाघ: माझ्या कॅमेऱ्यातून....अतुल धामनकर, चंद्रपूर
मागील लेख पुढील लेख