1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

इस्तंबूल - एक झलक

प्रो. गजानन देवधर
डॉ. गजानन देवधर हे भौतिक शास्त्राचे प्रोफेसर आहेत. प्रवास आणि प्रकाशचित्रण हे त्यांचे छंद. हम्पी, राजस्थान, हिमाचलप्रदेश इथल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन, शिवाय शशांक गुर्जर यांच्याबरोबर केलेले लडाख आणि कोकण या विषयावरील प्रदर्शने त्यांच्या नावावर आहेत. फोटोसर्कल सोसायटीने त्यांचा फोटोग्राफी क्षेत्रातील कामगिरीसाठी विशेष गौरवही केला आहे.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

घड्याळात पाहिलं तर सकाळचे ९.४५ झाले होते. पट्टा बांधण्याची सूचना मिळाली आणि आम्ही इस्तंबूलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास सज्ज झालो.

कुठंतरी मनात शंका येऊन गेली, सगळा प्रवास व्यवस्थित होईल ना? सर्व बुकिंग नेटवरून स्वतःच करायचं धाडस केलं आहे खरं, काही गडबड तर होणार नाही ना? पण म्हटलं, परीक्षा देऊन झाली आहे, फक्त रिझल्ट बाकी आहे, बघू काय होतं ते.

विमान घिरट्या घालू लागलं, निरभ्र आकाशातून खाली इस्तंबूलच विहंगम दृश्य दिसत होतं. चांगले फोटोही मिळाले. थोड्याच वेळात दोन तीन घिरट्या घालून विमान लँड झालं. आम्ही बाहेर पडलो. बाहेरचं तापमान अपेक्षेपेक्षा जास्त होतं, सूर्यप्रकाशही चांगला होता. आम्ही आशिया ओलांडून युरोपच्या महाद्वारात आलो होतो. इस्तंबूल हे शहर ह्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. इस्तंबूल हे आशिया आणि युरोप ह्या खंडांना जोडणारं शहर आहे.

इस्तंबूलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल खूप वाचलं होतं. हा नवीन विमानतळ २०००साली कार्यान्वित झाला, परंतु त्यांची विस्तार योजना २००६ साली पूर्ण झाली आणि आता हा विमानतळ युरोपमधील एक अत्याधुनिक विमानतळ मानला जातो. वर्षाला २० कोटी प्रवासी ये - जा करू शकतील इतकी ह्याची क्षमता आहे.

इस्तंबूलच्या येसिल्कोय भागात असलेला हा विमानतळ इस्तंबूलच्या मध्यभागापासून २८ किमी अंतरावर इस्तंबूल शहराच्या युरोपीय बाजूकडे आहे.

विमानतळावर जास्त वेळ न घालवता लगेज घेऊन व इतर सोपस्कार पार पडून आम्ही अरायव्हलपाशी आलो. आम्ही backpackers ह्या एजन्सीशी नेटवरून कम्यूनिकेशन करून टॅक्सी घरूनच बूक केली होती.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

एक एक पाटी वाचत पुढे चाललो होतो, तेवढयातच “गजानन देवधर” हे नाव सापडलं आणि म्हटलं सुरूवात तरी चांगली झाली. Backpackersच्या त्या प्रतिनिधीनं आम्हाला एके ठिकाणी उभं केलं, तिथून विमानतळाचा परिसर फार सुंदर दिसत होता. ५ मिनिटांत तो ड्रायव्हरला घेऊन आला. ड्रायव्हरने आम्हाला आमच्या इस्तंबूलमधील मुक्कामासाठी सदिच्छा दिल्या. मर्सिडीस व्हॅन टॅक्सीमधून शहराकडे निघालो. गाडी लफ्फेदार वळणं घेत निघाली. रस्ते लोण्यासारखे मऊसूत होते. दुभाजकावर फुलांचे ताटवे, चौकाचौकात कारंजे, अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उतारावर छानशी हिरवळ व त्यात नक्षीदार फुलझाडे रांगोळी काढावी तशी दिसत होती. म्हटलं, सौ.ना गाडी थांबवून ती नक्षी पाहण्याची लहर येते की काय? रांगोळी काढण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग झाला असता.पण वेळेचं भान ठेवून तिनं तशी सूचना केली नसावी असं वाटलं. कारण पूर्वी आम्ही जबलपूरजवळ भेडाघाटला गेलो होतो तेव्हा तिथे काही कारागिर संगमरवराच्या मूर्ती करत होते व ते काम चालू असताना पडणारी पावडर चांगली किलोच्या वजनात डोंबिवलीपर्यंत आली होती पाण्यावरील रांगोळी काढण्यासाठी. काही नवीन दिसलं म्हणून थोडावेळ थांबणं काही विशेष नाही.

अती आखीव रेखीव असं लँडस्केप आणि त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने उभ्या राहिलेल्या चकचकीत इमारती हे काही वेळेला फारच कृत्रिम आहे असं वाटायला लागतं. अर्थात याला कारण म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील जाणीवा. हळूहळू इमारतीच्या ठेवणीत फरक पडत गेला. जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारती दिसू लागल्या. रस्त्यात गर्दी वाढू लागली. काही ठिकाणी अरुंद रस्तेही लागले.

आम्ही शहरातील गजबजलेल्या भागात आलो होतो. ऐतिहासिक इस्तंबूलची ओळख सांगणार्या वास्तू दिसू लागल्या. मशिदींचे मिनारही नजरेस पडू लागले, सकृत्दर्शनी इस्तंबूल आवडलं. बघता बघता थोड्याच वेळात ब्रेक मारून टॅक्सी थांबली आणि लक्षात आलं की आम्ही आमच्या “हॉटेल ग्रँड ओन्स”पाशी येऊन पोहोचलो.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

हॉटेलचं लाउंज फार मोठ्ठं नव्हतं. रूम दुसर्या मजल्यावर होती. आम्ही एक युरो म्हणजे २.२ टर्किश लिरा या हिशोबाने काऊंटरवर ५० युरो लीरामध्ये बदलून घेतले.

घडयाळात पाहिलं, दुपारचे १२.३० वाजले होते. Back packers ची अर्ध्या दिवसाची टूर आम्ही ठरवली होती, ती एक वाजतां सुरु होणार होती. हातात अर्धाच तास होता. आधी काहीतरी खाऊन घेऊ म्हणून आम्ही आठव्या मजल्यावर रेस्टॉरंटमध्ये गेलो. १२.४५ झाले होते. सोयीची व झटपट मिळेल अशी टोमॅटो सूप व चीज सँडवीचची ऑर्डर दिली. खायला सुरूवात केली तेवढयात खालून फोन आला की Back packers गाडी आली आहे. म्हटलं, आता घडयाळाचे काटे सांभाळायला हवेत. झटपट आवरून आम्ही बाहेर पडलो.

गाडीत बसून Back packersच्या ऑफिसपाशी आलो.ऑफिसमध्ये पेमेंट केलं. Walking tour साठी आम्ही दोघे व आमच्या बरोबर एक अमेरिकन जोडपं होतं. गाईड एक युवती होती. तिने आधी आमची चौकशी करून आम्ही कोणत्या देशातून आलो आहोत, आधी परदेश प्रवास केला आहे का, आम्ही भारतात कोठे रहातो, काय करतो, कॅमेरा कोणता आहे वगैरे माहिती विचारून घेतली. तिच्या बोलण्यावरून पाश्चिमात्यांच्या मानाने भारतातील पर्यटक बरेच कमी येतात असे जाणवले. तिला भारताची फारच कमी माहिती होती.

Back packersच्या ऑफिस पासून आम्ही चालत निघालो तशी गाईडची टेप सुरु झाली. इस्तंबूल आणि तेथील प्रेक्षणीय स्थळांची थोडीशी माहिती सांगून त्यातील आमच्या पदभ्रमणातील आमची ठिकाणे कोणती तेही सांगितले. चालता चालता आम्ही जे दिसेल त्याचे अवलोकन करत होतो. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला दूरवर मिनार दिसू लागले. पटकन मी म्हटले, अरे ही तर ” ब्लू मॉस्क ”.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

तेवढयात दुसऱ्या बाजूला लक्ष गेले.“ इज इट हगिया सोफिया?” मी विचारले.

आम्हाला तिकडेच जायचे होते. हाफ डे टूर मध्ये “हगिया सोफिया” आणि “बॅसिलिका सिस्टर्न” ही ठिकाणे आम्हाला दाखवली जाणार होती. राजवाडा आज बंद होता.

त्यानंतर ब्लू मॉस्क, ग्रँड बझार, जमलं तर स्पाईस बझार आमचे आम्हीच पाहणार होतो. ह्या सगळ्या ठिकाणांची माहिती नेटवर वाचली होती. त्याचा थोडाफार तरी उपयोग होईल अशी अशा होती.

“वुई लोकल्स कॉल इट आया सोफिया” गाईड म्हणाली. आणि आम्ही आया सोफियाच्या दिशेने निघालो. आया सोफियाला युनेस्कोने विश्व वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा दिलेला आहे. काय आहे एवढं की युनेस्कोने ह्या इमारतीला इतकं महत्त्व द्यावं?

आया सोफियाचा इतिहास खूप जुना आहे. ह्या वास्तूचं बांधकाम झालं त्याकाळी इस्तंबूलला कॉन्स्तंटीनोपल ( Constantinople) संबोधलं जाई. प्राचीन बाय्झानटीअम ( Byzantium) च्या ठिकाणी पुनर्बांधणी करून चौथ्या शतकात कोन्स्तन्तीन १ ह्याने कॉन्स्तंटीनोपल हे शहर वसवलं, आणि त्या काळीच्या तुर्कस्थान देशाच्या बायझेन्टीन साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण बनवलं.

आज ज्या ठिकाणी आया सोफिया उभी आहे त्या ठिकाणी खरं तर आधी चर्च होते.

प्रथम चर्च उभे राहिले सम्राट कोन्स्तन्तीन १ (Constantine 1) चा मुलगा सम्राट कॉन्स्टनटीउस २ याच्या काळात ३६० मध्ये. हे चर्च लाकडी छत असलेलं बॅसिलिका म्हणून बांधलं गेलं. ४०४ मध्ये सम्राट अर्कादिउस ह्याच्या विरोधात झालेल्या दंगलीत हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. त्यानंतर, ह्याच ठिकाणी ४१५ साली सम्राट थिओडोसिउस ह्याच्या राजवटीत बॅसिलिका (आया सोफिया) पुन्हा उभं राहिलं. हे दुसरं आया सोफिया


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

५३२ साली सम्राट जस्टीनीअन ह्याच्या विरोधात झालेल्या “निका बंड” नावाने झालेल्या दंगलीत आगीत पुन्हा भस्मसात झालं. सध्या दिमाखात उभी असलेली, अनेक शतके पाहिलेली,आया सोफिया ही वास्तू सम्राट जुस्तिनिअन १ (Justinian 1) ह्यांच्या प्रोत्साहनाने, ५३२ ते ५३७ या दरम्यान, त्या काळी नावाजलेल्या इसीडोर (Isidore) व अन्थेमिउस (anthemius) ह्या दोन वास्तू विशारदांच्या कल्पनेतून व देखरेखीखाली निर्माण झाली. त्यांच्या हाताखाली सतत ५ वर्षे १०० वास्तुविशारद व १०००० कुशल कामगार आया सोफियाच्या निर्मितीत गुंतलेले होते.

आया सोफिया म्हणजे लॅटीन भाषेत “Holy Wisdom”. इथं आपण जास्त खोलात न जाता असं म्हणूया की आया सोफिया हे Holy Wisdomचं तीर्थक्षेत्र होतं. मिळालेल्या माहितीनुसार ५३७ ते १२०४ ह्याकाळात ह्याचा वापर Eastern orthodox cathedral म्हणून केला गेला तर १२०४ ते १२६१ ह्या काळात ही इमारत catholic Church Cathedral म्हणून वापरली गेली. परत १२६१ ते १४५३ ह्यादरम्यान हिचा वापर Eastern orthodox cathedral म्हणून झाला. १४५३ साली सुलतान महम्मद २ ह्याने इस्तंबूलवर कब्जा मिळवल्यानंतर मात्र ह्या वास्तूचं रुपांतर मशिदीत झालं आणि १४५३ ते १९३१ ह्या काळात ही इमारत Imperial Mosque म्हणून ओळखली गेली.

आया सोफिया बघून आम्ही निघालो बॅसिलिका सिस्टर्नकडे. सिस्टर्न म्हणजे कुंड किंवा टाकी. हा झाला सिस्टर्नचा डिक्शनरीमधला अर्थ. ह्यातून एवढंच समजतं की सिस्टर्न ही पाणी साठवण्याची जागा आहे. पण ह्या अर्थातून आपल्याला बॅसिलिका सिस्टर्नचा खरा अर्थ समजू शकत नाही, काहीच अंदाज येऊ शकत नाही. गुजरातमध्ये ‘वाव’ (step well) पाहिली होती, त्यातील नक्षीकाम, शिल्पकला आणि बहुमजली देखणेपण मनात भरले होते. त्यामुळे भर वस्तीत असलेल्या सिस्टर्नबद्दल खूप कुतूहल होते.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

बॅसिलिका सिस्टर्नलाच बुडालेला महाल किंवा बुडालेला सिस्टर्न असंही म्हटलं जाई. प्राचीन काळातील, इस्तंबूलमधील (पूर्वीच्या कॉन्स्टीनटिनोपलमधील) जमिनीखाली असलेल्या शेकडो सिस्टर्नपैकी बॅसिलिका सिस्टर्न सर्वात भव्य आहे.

बायझनटाईन सम्राट जस्टीनीअन – १ च्या काळात ६ व्या शतकात बॅसिलिका सिस्टर्नची निर्मिती झाली. सिस्टर्न आया सोफियापासून खूपच जवळ आहे. आया सोफियाकडून बाहेर पडलं की सभोवताल पर्यटकांनी गजबजलेला दिसतो. थोडं नैऋत्येकडं गेलं की ट्रामचा थांबा लागतो. ट्राम अगदी अत्याधुनिक आहेत. मोह झाला तरी आज त्यातून फिरण्याचा योग नव्हता कारण आमचं वेळाचं गणित. रस्ता पार करून सोफियापासून ५०० फूटांवर आम्ही एका छोट्या दरवाज्यापाशी जाऊन पोहोचलो. तिथे उभं राहून आत काय आहे ह्याची काहीच कल्पना येत नाही. पन्नास एक पायर्या उतरून गेलो आणि अगदी अवाक् होऊन गेलो. अगणित खांब, त्यावर तोललेलं छप्पर,नयनरम्य प्रकाशयोजना... मला एकदम का कुणास ठाऊक कुठेतरी पाहिलेलं मयसभेचं चित्रच पाहतोय असं वाटलं. उतरल्याबरोबर तिथल्या वातावरणाला धक्का न लावता एका कॅफेची योजना पण केली आहे. तिथे काही कॉन्सर्ट्सपण होतात म्हणे.

ह्या सिस्टर्नच्या बांधकामासाठी त्या काळी ७००० गुलामांचा वापर करण्यात आला. हे कामही साधारण १५०० वर्षांपूर्वीचे आहे. ह्या जलाशयातून कॉन्स्तंटीनोपलच्या महालास व जवळच्या इतर ठिकाणांस पाणीपुरवठा केला जायचा. अगदी ओट्टोमनच्या विजयानंतर १४५३ साली सुद्धा जवळच असलेल्या टोपकापी ह्या महालाला इथूनच पाणीपुरवठा व्हायचा. बॅसिलिका सिस्टर्नची लांबी अंदाजे ४५३ फूट तर रुंदी २१२ फूट आहे. आणि क्षेत्रफळ आहे सुमारे १००००० चौरस फूट. तर इथे २,८००,००० घन फूट पाणी साठवता येतं. ह्याचं छत तोललं आहे ३० फूट उंचीच्या ३३६ संगमरवरी खांबांनी. खांबांच्या १२ ओळी आहेत आणि प्रत्येक ओळीत २८ खांब आहेत. प्रत्येक दोन खांबांमधील अंतर १६ फूटाचे आहे. बहुतेक खांबांचे ‘कॅपिटल्स’ हे मुख्यतः इओनिक आणि कोरिन्थिअन शैलीतील आहेत. काही खांब मात्र डोरिक शैलीत असल्याने त्यावर कोरीवकाम नाही. बॅसिलिका


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

सिस्टर्नच्या बांधकामाच्यावेळी मृत्यू पावलेल्या कामगारांना श्रद्धांजली म्हणून एका खांबावर अश्रू कोरलेले आढळतात. सिस्टर्नच्या भिंती १३ फूट जाडीच्या असून त्या विटांनी बांधलेल्या आहेत तर त्यावर जलप्रतिबंधक मोर्टारचा गिलावा आहे. छताचा भार तोलण्यासाठी फुल्यांच्या आकारातील cross vaults आणि गोल कमानींचा वापर केला आहे. सिस्टर्नच्या वायव्येस दोन खांबांच्या तळाशी चेहेरे कोरलेले दगड आहेत. त्यातील एक चेहेरा उलटा आहे तर एक आडवा. ते दोन्ही रोमन साम्राज्यातील बांधकामातील आहेत. त्याचा मूळ स्रोत ठाऊक नाही असे समजले. त्यांना ‘मेडुसा’ म्हणतात. मेडुसाची आख्यायिकाही गाईडने सांगितली.

पूर्वीच्या काळी सिस्टर्नमध्ये साठवण्यासाठी पाणी तेथून १९ किमी.अंतरावर असलेल्या बेलग्रेडच्या जंगलातील जलवितरण केंद्रातून यायचे असेही गाईडकडून समजले. सद्यस्थितीत मात्र पाणी फक्त काही फूट खोल असल्याने आपल्याला आतून फिरता येते. १८व्या शतकात सिस्टर्नची डागडुजी केली गेली. १९६८ व १९८५ साली बरीच दुरुस्ती करण्यात आली. १९८५ साली सिस्टर्नमधून ५०,००० टन गाळ काढण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे आता पाण्याची साठवण नसल्याने आपण ज्या मार्गावरून आता फिरू शकतो त्याचे कामही १९८५ साली झाले. पूर्वी त्या मार्गावरून फक्त होडयाच फिरायच्या.

१९६३ साली जेम्स बॉंडच्या “From Russia with love” ह्या चित्रपटाचे शूटिंग इथे झाले होते. १९८७ साली सिस्टर्न सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

सिस्टर्न पाहून आम्ही बाहेर पडलो. जवळच असलेल्या हिप्पोड्रोमपाशी जाऊन त्याची माहिती तिने सांगितली. गाईडच काम संपलं होतं. मी व सौ. आम्ही निघालो जवळच असलेल्या ब्ल्यू मॉस्कच्या दिशेने. इस्तंबूलमधील ऐतिहासिक सुलतान अहमद मशीद म्हणजेच लोकप्रिय ब्ल्यू मॉस्क़. मशिदीतील आतल्या निळ्या लाद्यांमुळे ह्या मशिदीला ब्ल्यू मॉस्क़ हे नाव पडलं.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

आया सोफिया प्रमाणेच खूप ऐकलं होतं ब्ल्यू मॉस्कबद्दल. त्याची भव्यता त्याचं आर्किटेक्चर ह्या बाबतीतही ही वास्तू आया सोफियाप्रमाणे अप्रतिम आहे वगैरे. आसपासचा परिसर पहात, छानसे फोटो घेत ब्ल्यू मॉस्कला पोहोचलो. मशिदीत जाताना पादत्राणे काढावी लागतात. पण ती आपल्याबरोबरच न्यावी लागतात. त्यासाठी केलेली व्यवस्था आम्हाला खूपच आवडली. आत जाताना वर्हांड्यात दोन स्टँड होते.

त्यावर पॉलीथीनच्या पिशव्यांचे रोल लावलेले होते. रोलमधून पिशवी काढून घ्यायची, त्यात बूट, चपला घालायच्या आणि आपल्याच हातात घेऊन जायच्या. दुसर्या दरवाजाने बाहेर पडल्यावर बूट घालण्यासाठी बसायला बाक आहेत. वापरलेल्या पिशव्या टाकून देण्यासाठी डस्ट बिन्स आहेत. मला ही व्यवस्था फारच आवडली. शेजारी ऐच्छिक दानपेटी ठेवलेली आहे. तिथे कोणीही पेटीत पैसे टाका असे सांगायला बसवलेले नाही.

ही मशीद हा तुर्की आणि इस्लामिक कलेतील प्रसिद्ध वास्तू नमुना आहे.आज ही मशीद इस्तंबूलमधील खूपच लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. ही राजेशाही मशीद हे टर्किश वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ह्या मशिदीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हीचे मूळ बांधकामापासून असलेले सहा मिनार. प्रख्यात आर्किटेक्ट सिनान ह्याचा विद्यार्थी असलेल्या महमद अगा ह्याने, शिनानच्या वास्तुकलेची अतिभव्यता,राजेशाहीपणा आणि नजाकत ही वैशिष्ट्ये जपत ह्या वास्तूच्या आराखड्याबरोबरच मशिदीतील अंतर्गत सजावटही अतिशय चोखंदळपणे केली आहे. ह्या मशिदीचं बांधकाम १६०६ ते १६१६ ह्या काळात झालं. मशिदीचे मुख्य प्रवेशद्वार हिप्पोड्रोमच्या बाजूने आहे. कोर्टयार्डच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना आपल्या नजरेत भरतात ते एका लयीत,एकावर एक चढत जाणारे एकूण ८ डौलदार घुमट. त्यांच्या मध्यभागी मुख्य घुमट व ६ मिनार. भव्य कोर्टयार्डच्या मध्यभागी दिसतो तो प्रतिकात्मक असा प्रक्षालन कारंजा. सभोवताली दिसतात उठावदार पोर्टिकोज. मशिदीत तीन बाजूंनी आत जाता येते. कोरीवकाम , नयनरम्य लाद्या, स्टेनग्लास ह्या सगळ्यांनी सजलेले संपन्न असे अंतर्गत सजावटीचे दिसणारे दृश्य हे बाहेरून दिसणार्या भव्यतेला अतिशय पूरक आहे.


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

मधला आणि प्रमुख घुमट आणि बाजूचे चार घुमट हे चार कॉलम्स आणि कमानी ह्यांनी तोलले आहेत. तिन्ही बाजूंच्या गॅलर्यांच्या भिंती, प्रत्येक खांब उत्कृष्ट अश्या, २०,००० हँडमेड इझनिक लाद्यांनी मढवलेले आहेत. त्यावर ५० प्रकारचे विविध नक्षीकाम आहे. लाद्यांवरील भाग आणि घुमट ह्यावर अप्रतिम असे मुख्यत्वेकरून निळ्या रंगाचे रंगकाम आहे. तसेच भव्य अशी झुंबरे व हंड्याही मशिदीची शोभा वाढवतात. जमिनीवर सर्वत्र लाल रंगाचे गालिचे अंथरलेले आहेत. हे गालिचे मशिदीच्या भव्यतेत भरच टाकतात. मिहरबच्या शेजारी मुख्य दरवाजाच्या विरुद्ध बाजूस संगमरवरात उत्कृष्ट कलाकारीने सजलेले मिनरब आहे. मुख्य घुमटाचा व्यास ७७ फुटाचा आहे तर त्याची जमिनीपासून उंची १४१ फूट आहे. घुमटाखाली असलेल्या २६० खिडक्या मशिदीला सुरेखरित्या प्रकाशित करतात. मशिदीची लांबी २३६ फूट तर रुंदी २०९ फूट आहे. आत शिरल्यावर पर्यटकांना सर्वत्र फिरता येत नाही.

रेलिंगच्या एका बाजूला उभे राहूनच अवलोकन करता येते कारण उर्वरित भाग नमाज पडण्यासाठी राखून ठेवला आहे. स्त्रियांना प्रार्थना करण्यासाठी एक भाग राखून ठेवला आहे. आत फोटो काढण्याला मज्जाव नाही. मशिदीत अनेक पर्यटक असले तरी कोठेही गोंगाट जाणवत नव्हता. मशीद निवांतपणे पाहून आम्ही बाहेर पडलो.

ब्ल्यू मॉस्क़ आणि आया सोफिया ह्या वास्तूंचा परिसर टिपिकल पर्यटन परिसर आहे. मजा येते अश्या ठिकाणी फिरताना. आम्ही एका ओपन एअर रेस्तराँमध्ये जाऊन बसलो. बराच वेळ फिरत व चालत होतो, तेंव्हा पायाला थोडी विश्रांती. एनर्जीसाठी संत्र्याचा ताजा ज्यूस घेतला. पूर्वी हाँगकाँगला बेबी आँरेंजेस पाहिली होती, आज मेगा आँरेंजेस पाहिली. संत्री खूपच छान होती, आणि तेवढाच छान होता ज्यूसर. संत्री वरून एकापाठोपाठ एक आत टाकायची.कपासारख्या एका भागातून दुसऱ्या भागात जातांना त्याचे दोन


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

भाग होतात आणि रस निघतो. सालाला धक्का न लागता.संपूर्ण पारदर्शी ज्यूसर. एक ग्लास ज्यूस ७ टर्किश लिरा. आम्हाला नंतर १ लीराला १ ग्लास संत्र्याचा ज्युस असा बोर्डही पाहायला मिळाला.

सुलतान अहमद, ज्याने ब्ल्यू मॉस्क़ बांधली, त्याची कबर ब्ल्यू मॉस्क़पासून उत्तरेला जवळच आहे. ही कबर सुलतान ओस्मान-२ ह्याने त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ १६२० मध्ये बांधली. ह्याचा वास्तुविशारदही सेदेफ्कार महमद आगा, ज्याने ब्ल्यू मॉस्क़ बांधली तोच होता. चौरस आकारातील ही इमारत पूर्ण होण्यास ३ वर्षे लागली. १७व्या शतकातील प्रसिद्ध इझनिक लाद्यांनी अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. आत राजाच्या कबरीबरोबरच राजघराण्यातील इतरांच्या कबरीही आहेत. कबरीही आकार एका बाजूस उंच होत जातो व त्या बाजूला लावलेल्या कबरीच्याच उंचीच्या खांबावर फेटा बांधलेला दिसतो. सर्वत्र स्वच्छता वाखाणण्याजोगी होती.

तिथून आम्ही बाहेर पडलो “ग्रँड बाजार” च्या दिशेने. रस्ते सुरेख. हवेत वेगळाच फ्रेशनेस जाणवत होता. त्यामुळे इतका वेळ फिरूनही थकवा अजिबात जाणवत नव्हता. रस्त्यावर कलिंगडं, मका, हिंग लावलेले पाव, असे पदार्थ विकायला होते. आम्ही कलिंगडाची डिश घेतली. अप्रतिम. एका डिशच्या किंमतीत डोंबिवलीला एक आठवडा रोज कलिंगड खाता आलं असतं.

रस्त्यातून जाताना अजून एक ओळखीची गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे आपल्याकडे दिसतो तसाच चहा घेऊन जाणारी दोन मुले. फरक इतकाच कि ही मुले पांढऱ्या स्वच्छ कपड्यात होती, तसेच टर्किश चहा होता पारदर्शी सुरेख ग्लासांमध्ये, त्यावरील झाकणेही तितकीच सुंदर. ट्रेच्या लयदार हालचाली करत तोंडाने आम्हाला आकलन न होणाऱ्या भाषेत काही गाणे म्हणत ती स्वतःचं काम एन्जॉय करताना दिसली.

रमत गमत साधारण २०-२५ मिनिटांत आम्ही ग्रँड बझारला पोहोचलो. हा बझार म्हणजे इस्तंबूलचं अजून एक वैशिष्ट्य. ह्याला दुकानांचा भूलभुलैय्या म्हणायला हरकत नाही. जर एकमेकांची चुकामूक झाली तर शोधण्याचा लपंडाव कितीवेळ चालेल काही सांगता येत नाही. ग्रँड बझार जगातील सर्वात मोठं आणि जुनं आच्छादित मार्केट आहे. इथे एकूण ६० मार्ग आणि ५००० दुकाने आहेत. दररोज साधारण २,५०,००० ते ४,००,००० खरेदीदार ह्या मार्केटला भेट देतात असं समजलं. ह्या बाजाराची ख्याती आहे इथल्या जडजवाहीर, हस्तकलेने सजलेल्या टाईल्स, गालिचे, भरतकाम, मसाले आणि अँटीक्स साठी. येथील अनेक दुकाने वस्तूंच्या प्रकाराप्रमाणे विभागली आहेत जसे जवाहीरांची दुकाने एकत्र, गालीच्यांची एकत्र ,मसाल्यांची एकत्र वगैरे. १४६१ सालापासून हा बाजार हे इस्तंबूलमधील प्रमुख व्यापारी केंद्र आहे.

लाबिरेनथीन vaults असलेल्या दोन बेझीस्तान मध्ये (म्हणजेच ओट्टोमन साम्राज्यातील आच्छादित बाजार) सर्व मार्केट सामावलेले आहे. पहिला बेझीस्तान सुलतान अहमद


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

च्या काळात १४५५ ते १४६१ या काळात बांधला गेला तर दुसरा बेझीस्तान बांधून त्याचे विस्तारीकरण १६व्या शतकात सुलतान सुलेमानच्या काळात झाले. परत १८९४ साली भूकंपानंतर त्याचे नुतनीकरण करण्यात आले. ह्या संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये दोन मशिदी, चार कारंजे तर दोन हमाम म्हणजेच स्नानगृहे आहेत.

इथे अनेक कॅफे व रेस्टॉरंट सुद्धा आहेत. बाजारात मध्यभागी उंच घुमट असलेल्या भागात पूर्वी जव्हेरी बाजार होता. आजही तिथे फर्निचर, तांब्याची कलाकुसरीची भांडी, प्रार्थनेचे अंबरचे खडे, अँटीक्स, मीनाकारी केलेली शस्त्रे, मोती जडवलेले आरसे, घड्याळे,सोन्याचांदीची जादावाची भांडी, आणि पोवळी अश्या अनेक किंमती वस्तू मिळतात. इथे खरेदी करा वा करू नका निवांतपणे फिरणे व झगमगती दुकाने पाहणे हा वेगळाच अनुभव आहे.

आम्ही आत शिरलो ते जव्हेरी बाजाराच्या दिशेने. अनेक पद्धतीने बनविलेले सोन्याचे, चांदीचे, हिर्याचे व प्लॅटिनमचे डोळे दिपवणारे दागिने पहिले. हिच्या कपाळावरील टिकली बघून आम्ही भारतीय हे सगळ्यांच्या लक्षात येत होते. मग त्या पद्धतीचे दागिने दाखवले जात. भरपूर विंडो शॉपिंग करून आम्ही ड्राय फ्रूटस व चहाच्या विभागात गेलो. तिथे आम्हाला सुकी अंजिरे पाहायला मिळाली. आपल्याकडेही ती असतातच पण तिथल्या पाव कापावा तश्या कापलेल्या सुक्या अंजिरात फोडलेला अख्खा आक्रोड मावतो. तसेच कापलेल्या खजुरात बदाम घालून खातात. जेवढया प्रकारची सुगंधी फुले असतील तेवढ्या प्रकारचे फुलं घातलेले चहाचे प्रकार सगळ्या चहाच्या दुकानात होते. एका दुकानात आम्ही सँपल म्हणून टर्किश डिलाईट ही मिठाई टेस्ट केली. थोडी फार ड्रायफ्रुट्सची खरेदी करून आम्ही पुढे गेलो तो तुर्कस्थानची खासियत असलेल्या गालिचाचे दुकान दिसले. मी दुकानदाराला बकलावा ही मिठाई मिळणाऱ्या ‘गुल्लूगुल्लू’ ह्या दुकानाचा पत्ता विचारला. तो म्हणाला, आधी आमच्या दुकानात या, इथले गालिचे पहा, घेतलेच पाहिजेत असे नाही, मग मी तुम्हाला बकलावा मिळणार्या दुकानाचा पत्ता सांगेन. म्हटले चला, त्या निमित्ताने टर्किश गालिचे पाहता येतील. आम्ही आत शिरलो. तिथे नमाज पाडण्यासाठी असलेल्या ३ फूट लांबी रुंदीच्या गालिच्याची किमत होती ३० हजार रुपये. तेवढयाच आकाराचा ४ हजाराचा गालीचाही होता. अनेक गालिचे त्यांनी आम्हाला दाखवले. विविध गालिचे पाहून झाल्यावर त्याने आम्हाला गुल्लूगुल्लू दुकानाचा पत्ता सांगितला.

आम्ही त्याप्रमाणे आम्ही बझारच्या जवळच असलेल्या गुल्लुगुल्लू ह्या बकालावाच्या दुकानात पोहोचलो. त्याने आम्हाला बसायला सांगितले. दुकानाच्या बाहेरच शामियान्यामध्ये बसण्याची सोय होती. बाजूच्या रेलींगलाच मेनू कार्ड्स बांधून ठेवली होती. आम्हाला ते दुकान पाहायचे होते आणि तिथला बकलावा चाखायचा होता कारण बकलावा या मिठाईचा तुर्कस्थानातील इतिहास गुल्लूगुल्लू ह्या नावापासूनच सुरु होतो. ६ फूट उंचीचे टापटीप पोशाखातले एक गृहस्थ ऑर्डर घेण्यासाठी आले. ते त्या दुकानाचे मालक की नोकर समजत नव्हते. सफाईदार इंग्रजीमध्ये त्यांनी ऑर्डर घेतली. हे दुकान १९४९ साली सुरु झाले. इथल्या बाकालाव्याच्या क्वालिटीबद्धल खूप ऐकले होते. प्लेट मधून बकलावा आला. तो खायला चमचे कपड्याने पुसत पुसत न देता त्याने ते विमानात देतात त्याप्रमाणे कागदी पिशवीतून दिले, आणि विचारले आर यू फ्रॉम इंडिया? त्याने


इस्तंबूल - एक झलक प्रो. गजानन देवधर, ठाणे

मग माझ्याकडे काही भारतीय नोटा आहेत का विचारले. नेमकी माझ्याकडे तेंव्हा फक्त नाणी होती. त्याने अनेक देश्यांच्या नोटा जमा केल्या होत्या. बकलावा खरोखरच त्याच्या प्रसिद्धीला जागणारा होता. चला इथली ड्राय फ्रूटस खाल्ली, टर्किश डिलाईटची चव पाहिली. टेस्टी व कॅलरीयुक्त बकलावा खाल्ला. दिवसही संपत आला होता, GPS च्या मदतीने आम्ही रस्ते न्याहाळत, स्ट्रीट फोटोग्राफी करत हॉटेलवर येऊन पोहोचलो. डिनरसाठी आम्ही टेरेसवर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. गर्दी फारशी नव्हती. एक जपानी जोडपे दिसत होते. एका बाजूला समुद्र व जहाजे दिसत होती तर दुसर्या बाजूला प्रकाशात न्हाऊन निघालेली सुलतान अहमद मशीद. समुद्रावरून येणारा वारा आल्हाददायक वाटत होता.

इंग्लिश बोलणारा वेटर आला. त्याने ऑर्डर घेण्याच्या आधी टेरेसवरून फिरून सर्व परिसर दाखवला. व्हेज सूप म्हणून आम्ही टोमॅटो सूपच ऑर्डर केले. सूप आले व त्या बरोबर ब्रेड बास्केटही. वेटरने टोमॅटो सूप न आणतां दुसरेच कोणते तरी सूप आणले.

माझ्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह बघून तो म्हणाला हे सूप पण व्हेज आहे नाही आवडले तर टोमॅटो सूप आणून देतो. ते होते राईस सूप, लोकल स्पेशल सूप. चव पाहिली. भाताची पेजचं ती. लोकल मसाले होते. चव छान लागली. दुसरी डिश होती ऑमलेट वुईथ टोमॅटो- टोमॅटो ऑमलेट नाही. त्या बरोबर ग्रीन सलाड. जेवण होईपर्यंत थंडी चांगलीच वाढली होती.

टर्किश लोक इतरांशी फारसे बोलत नाहीत असे वाटले. कदाचित भाषेचा अडसर येत असावा. इंग्लिश सगळ्यांना येत नाही. आपल्याला अनेक शब्द मात्र समजतात. जसे फारशी ओली असेल तर ‘दिक्कत’ असा बोर्ड असतो तर काही टूर ऑपरेटर्सच्या दुकानाबाहेर जे लिहिले होते त्यात दुनिया असा शब्द होता. भाषा ऐकायला छान वाटली. टर्किश लोक उंचेपुरे व युरोपिअन स्टाईलकडे झुकलेले. गाड्या सर्व प्रकारच्या. पोलिसांच्या गाड्या टोयोटाच्या हायब्रीड प्रायस. कॅब विविध प्रकारच्या. आम्ही फिरलो त्या सर्व भागात तरी भिकारी कोठेही दिसले नाहीत. संध्याकाळी फिरतांना एके ठिकाणी रस्त्यात एक मुलगा क्लॅरोनेट वाजवत बसला होता. शेजारी बाऊल ठेवले होते. हवे तर बिदागी द्या. रस्त्यात कोठेही हॉर्नचा आवाज येत नाही.

दुसरे दिवशी पहाटे ५.१० ला टॅक्सी येणार होती. सामान आवरूनच झोपलो. पहाटे बरोबर ५.१० ला रिसेप्शनमधून फोन आला. टॅक्सी हजर होती. परतीचा प्रवास अतातुर्क विमानतळाकडे. ५.२५ ला बाहेर पडलो. सगळे ट्राफिक सिग्नल चालू होते व सगळ्या गाड्या इमानेइतबारे सिग्नल पाळतही होत्या. शहर एकूण छान वाटले. मनात येऊन गेले, किमान आठ ते दहा दिवस इथे रहायला हवे म्हणजे इस्तंबूलला थोडातरी न्याय देता येईल. असो! हमने “गागर मे सागर” भरनेकी कोशिश की ये भी कुछ कम नही.मागील लेख पुढील लेख