1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

पहिला धडा

सतविन्दर सिंह भामरा
इंजिनिअरीग आणि मॅन्युफॅक्चरीगचा व्यवसाय असलेल्या सतविंदरसिंह भामरा यांनी वयाच्या 12 व्या वर्षापासून प्रकाशचित्रणाला सुरुवात केली. पुढे स्टुडिओमध्ये 6 आणि रंगीत प्रकाशचित्रणाचे 3 वर्षे शिक्षण घेतले. निसर्ग, वन्यजीव आणि व्यक्तीचित्र प्रकाशचित्रणाची आवड असलेल्या भामरा यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय प्रकाशचित्रणाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषीके मिळवली आहेत.


अनुवाद - स्वप्नाली मठकर


पहिला धडा सतविन्दर सिंह भामरा, ठाणे

त्यादिवशी मला अतिशय आनंद झाला होता. खरंतर नुसता 'आनंद झाला होता' या तीन शब्दांत व्यक्तच करता येणार नाही असे काहीसे झाले होते. त्यादिवशी माझ्या बाबांनी मला 'याशिका टिएलआर' हा कॅमेरा बक्षीस म्हणून दिला होता. याशिका टिएलआर हा त्यावेळेचा सर्वात चांगला आणि स्टुडियोत वापरला जाणारा, मोठमोठ्या प्रकाशचित्रकारांकडून नावाजला गेलेला असा कॅमेरा होता. मी १९७४ साली दहावी पास झालो आणि बाबांनी मला हे अनपेक्षित बक्षीस दिले. एरवी कठोर आणि कडक शिस्तीच्या वाटणार्‍या माझ्या बाबांकडून असे काही बक्षीस मिळणे हा खूप मोठा धक्काच होता माझ्यासाठी. मी स्वत:हून कधीच बाबांकडे कॅमेरा मागू शकलो नसतो.

मागच्या चार वर्षात त्यांनी कधीही मी शाळेतून परतल्यावर काय करतो याची चौकशी केली नव्हती. पण त्यादिवशी माझ्या लक्षात आलं की जरी ते काही बोलत नसले तरीही मी काय करतो, कुठे जातो याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. ते किती समजूतदार, प्रेमळ आहेत आणि त्यांना माझ्याविषयी किती आपुलकी आहे हे तेव्हा मला जाणवलं.

साधारण सातवीमध्ये असताना मला प्रकाशचित्रणाचा छंद जडला तो आजतागायत. त्यावयातल्या माझ्या बाकीच्या मित्रांसारखाच मीही संध्याकाळी बाहेर पडे. मात्र मी खेळायला न जाता एका स्टुडियोमध्ये प्रकाशचित्रण शिकायला जात असे. तिथे बराच वेळ घालवून अगदी संध्याकाळी उशीरा घरी परतत असे. माझ्या घरातल्या कोणालाच हे माहित नव्हतं, निदान मलातरी तेव्हा तसंच वाटत होतं.

त्याकाळात बहुतेक नवशिके प्रकाशचित्रकार असे कुठल्यातरी स्टुडियोत काम करून, कोणा मोठ्या प्रकाशचित्रकाराच्या हाताखाली राहून प्रकाशचित्रण शिकून घेत. फोटोग्राफी शिकवणार्‍या संस्था किंवा शाळा फारशा नव्हत्याच आणि असल्या तरी खूप कमी लोक तिथे जाऊन शिकत. मी ही असाच एका


पहिला धडा सतविन्दर सिंह भामरा, ठाणे

स्टुडियोमध्ये जायचो आणि प्रकाशचित्रणाची तत्त्व समजून घेण्यासाठी 'लर्न फोटोग्राफी' हे कोडॅकचे एक पुस्तक वापरायचो. या पुस्तकात खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले होते, त्यामुळे ते वाचून वाचून मला बर्‍याच गोष्टी शिकता आल्या. मी जे करत होतो ते आणि पुस्तकात लिहिलेले यांचा मेळ घालत बरेच प्रयोग करून पहाता आले. मी त्यावेळच्या मोठ्या प्रकाशचित्रकारांनी काढलेली चित्र पाहत होतो, त्यात त्यांनी वापरलेली तत्त्व समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्या सगळ्यात मला व्यक्तीचित्रण करणार्‍या प्रकाशचित्रकारांचं काम फार भावलं. मी पाहिलेल्या बहुतेक सगळ्याच व्यक्तिचित्रणामध्ये छायाप्रकाशाचा खेळ आणि त्वचेचा पोत या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या.

या मोठ्या प्रकाशचित्रकारांच्या कामाने प्रभावित होऊन मीही व्यक्तिचित्रण करताना तसाच पोत, तसाच टोन आणायचा प्रयत्न करू लागलो. पण अनेक प्रयत्नांनंतरही मला काही त्यात यश येत नव्हते. आणि त्यामुळेच उत्कृष्ठ व्यक्तीचित्रण करता येणे हे माझ्यासाठी एक महत्त्वाचे ध्येय बनले. मी सतत प्रयत्न करत होतो पण कधी एक्स्पोजर चुकायचे, कधी प्रकाश बरोबर नसायचा तर कधी त्वचेचा पोत हवा तसा यायचा नाही. हळूहळू उत्तम व्यक्तीचित्रण करणे हे मला अधिकाधिक महत्त्वाचे वाटायला लागले.

एक दिवस दुपारी माझी आजी खिडकीजवळ बसली होती. त्या खिडकीच्या प्रकाशात काळाने तिच्या चेहर्‍यावर कोरलेली रेष न् रेष स्पष्ट दिसत होती. याआधी मी अशा प्रकाशयोजनेचा विचारच केला नव्हता. खिडकीतून आत येणार्‍या तिरप्या प्रकाशाने तिच्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्या अगदी स्पष्ट दिसत होत्या. अशा प्रकारच्या प्रकाशयोजनेचा, छायाप्रकाशाच्या खेळाचा शोध लागणे हे माझ्या फाईन आर्ट फोटोग्राफीच्या शिक्षणासाठी एक मैलाचा दगड ठरले.

आता मला धीर धरवेना. मी कॅमेर्‍यासाठी १२० रोल फिल्म आणली. तेव्हाचा जमाना अर्थातच कृष्णधवल प्रकाशचित्रणाचा होता. या रोल मध्ये १२ फोटो घेता यायचे. फिल्म आणल्यावर मी माझ्या आजीला त्या खिडकीजवळ पुन्हा बसवले. आणि चार विविध कोनातून तिचे फोटो काढले. तेव्हा माझ्या कॅमेर्‍यात लाईट मीटर नव्हता आणि वेगळा लाईट मीटरही नव्हता. जसे डोक्यात होते तसेच फोटो यावे म्हणून मी ब्रॅकेटींग केले जेणेकरून एकतरी एक्स्पोजर बरोबर येईल. नंतर लगेच ती फिल्म डेवलप केली. यावेळी निगेटिव्ह तरी चांगल्या वाटत होत्या पण प्रिण्ट करून बघितल्याशिवाय नक्की काय ते कळणार नव्हतं. त्याकाळात प्रिण्ट हाताने बनवाव्या लागत. अंधार्‍या, लाल बल्ब


पहिला धडा सतविन्दर सिंह भामरा, ठाणे

लावलेल्या डार्करूम मध्ये ट्रेमध्ये सोल्युशन घालून त्या प्रिण्ट काढाव्या लागत. त्या रिकाम्या कागदावर हळूहळू चित्र उमटत जाताना पाहायचं जे थ्रिल आहे ते आजच्या ऑटोमेटीक मशिन्स मध्ये अनुभवता येत नाही. प्रिण्ट डेवलप व्हायला सुरुवात केल्यावर जसजसं अस्पष्ट, धुसर चित्र कागदावर दिसायला लागलं तसतसं मला धडधडायला लागलं. आत अगदी मनातून वाटत होतं की यावेळेस फोटो नक्की बरोबर येणार तरीही थोडी धाकधूक वाटायला लागली. पण नाही! फोटो पूर्ण प्रिण्ट झाला आणि मला जाणवलं की येस्स! आपण जिंकलोय. जसे हवे तस्सेच तपशील, तसाच पोत आणि तशीच टोनल रेंज फोटोत मिळाली आहे.

हे फोटोग्राफ पाहून माझ्या गुरूंनीही मला शाबासकी दिली. माझा आनंद घरच्यांबरोबर वाटून घेण्यासाठी मी धावतच घरी आलो. माझ्या आजीला सुद्धा ते फोटो बघायची घाई झाली होती. मी अगदी अभिमानाने ते फोटो तिच्यासमोर ठेवले आणि तिच्याकडून होणार्‍या कौतुकाची वाट पहात थांबलो. पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी वेगळंच घडलं! ते फोटो पहाताक्षणीच तिला अजिबात आवडले नाहीत. वैतागून ते फोटो फेकून देत म्हणाली 'मी इतकी म्हातारी दिसते की काय?' ती खूपच दु:खी झाली. अनवधानाने मी माझ्याच कलेच्या नादात तिला दुखावलं होतं, तिला त्रास दिला होता.

त्या क्षणी मला जाणवलं की ज्या प्रत्येक गोष्टीचा मी फोटो काढतो ती गोष्टं, तो विषय सुंदर दिसणं अतिशय गरजेचे आहे. कला ही सदैव आनंद देणारी असली पाहिजे. तुमच्या कलाकृतीकडे बघून यातना होण्याऐवजी एखाद्या सुंदर गोष्टीला बघितल्याचा आनंद मिळायला हवा. खरंतर देवाची प्रत्येक निर्मितीही सुंदरच असते. मात्र एक कलाकार म्हणून मला ते सौंदर्य पाहण्याची दृष्टी असली पाहीजे. त्यादिवशी माझ्या प्रकाशचित्रणाच्या वाटेवरचा पहिला पण अतिशय महत्त्वाचा धडा मी शिकलो होतो.


पहिला धडा सतविन्दर सिंह भामरा, ठाणे


पहिला धडा सतविन्दर सिंह भामरा, ठाणे
मागील लेख पुढील लेख