1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

जंगलातले दिवस.....

युवराज गुर्जर
सुमारे 25 वर्ष विविध जंगलात भटकंती करणारे श्री. युवराज गुर्जर वाइल्डलाईफ आणि नेचर फोटोग्राफर आहेत. मायक्रो फोटोग्राफी आणि इन्सेक्ट फोटोग्राफी हे त्यांचे महत्वाचे विषय. विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भारतातर्फे त्यांच्या फोटोंची निवड. विविध पुस्तके, फिल्ड गाईड्स, वेबसाईट्स अशा ठिकाणी त्यांचे फोटेंचा वापर. त्याशिवाय अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके. फुलपाखरांची माहिती देणारे मराठी पुस्तक, मराठी ब्लॉग आणि विविध प्रकाशनांमध्ये अनेक लेख त्यांच्या नावावर आहेत.


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

आज आख्ख्या जगात पश्चिम घाटातील जैवविविधतेचे कौतुक होत आहे. याच कारणाकरता नॉर्मन मायर्स यांनी पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असणाऱ्या २५ स्थानांमधे उच्च दर्जा दिला. आज पश्चिम घाट किंवा सह्याद्री हा जगातील जैवविविधता असलेल्या स्थानांपैकी 'हॉट स्पॉट' याच नावाने वाखाणला जातो. या पश्चिम घाटाचा पसारा गुजराथमधील सातपुडा पर्वतरांगा, पश्चिमेला महाराष्ट्र, गोवा तिथून खाली दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडू इथपर्यंत पसरला आहे. याची व्याप्ती जवळपास १६०००० चौ.कि.मी. आहे आणि या इथे आपल्याला सस्तन प्राण्यांच्या १४० जाती, पक्ष्यांच्या ५१० जाती, सरिसृपांच्या २६० जाती, उभयचरांच्या १८० जाती आणि झाडांच्या ५०००हून अधिक जाती सापडतात. इथे दरवर्षी नवीन नवीन जातींची नोंद होत असते. कित्येक जाती या तद्दन स्थानिक असल्यामुळे जगातच काय पण भारतातसुद्धा इतर कुठेही दिसू शकत नाहित. इथे घालवलेला प्रत्येक दिवस आणि रात्र ही नेहेमीच काहीतरी वेगवेगळा अनुभव देऊन जाते. अश्या या जैविक श्रीमंतीने सजलेल्या या जंगलातले माझे काही अनुभव.

एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले. कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघितले तेव्हा जाणवले, की ते एक फुलपाखरू नसून दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंक मधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता. बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहित झाले आणि त्यांनी सांगितले, की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

गणला जातो. याशिवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरित स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी प्रकाशचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी शंभरएक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थेमधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावर पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात, तर मादी पुढे अंडी घालून लगेच मरते. या काळात अळी असताना त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरावर चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते. त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला. पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजूनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच्या आसपास, बागांमधेही अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात. ही सर्व माहिती माझ्यासाठी नविन होती. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती परदेशात आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर "छान किती दिसते" हे १९९४ मधे पुस्तक लिहिले. बहुतेक ते खास फुलपाखरांवर लिहिलेले पहिलेच मराठी पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव अशाप्रकारचा मराठी ब्लॉग आहे.


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

काही वर्षांपूर्वी भारतातल्या माझ्यासारख्या फुलपाखरेवेड्यांनी एकत्र येउन "बटरफ्लाय इंडीया" हा याहूचा ई-ग्रुप सुरू केला. देशाच्या वेगवेगळ्या भागात रहाणाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी केलेले काम, जमवलेली माहिती, केलेला अभ्यास, काढलेली छायाचित्रे यांची एकमेकांत देवाणघेवाण करायची हाच या ई-ग्रुपचा मूळ उद्देश होता. अशीच माहितीची देवाणघेवाण करताना दोन वर्षे सरून गेली आणि इतके दिवस जे आम्ही फक्त ई-मेलवर भेटत होतो ते प्रत्यक्ष भेटण्याची कल्पना पुढे आली. अशाच एका "बटरफ्लाय मीट"ला अरालमच्या जंगलात जायचा योग आला. केरळमधील सर्वात उत्तरेला असणारे हे लहान जंगल १९८४ मधे अभयारण्य म्हणून घोषित झाले. केरळमधले जंगल असल्यामुळे अर्थातच ते हिरवेगार आणि घनदाट होते.

दक्षिणेमधील जंगलात पायी फिरायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. दुपारी उशीरा पोहोचलो, तरीही आम्ही जंगलाला एक धावती भेट दिली. पण दाट जंगलामुळे आणि एकंदरच अंधार लवकर पडल्यामुळे थोड्याच वेळात आम्ही परत फिरलो. माझे लक्ष अचानक माझ्या पायाकडे गेले आणि मोठाच धक्का बसला. माझा डावा पाय संपूर्ण रक्तबंबाळ झाला होता. भळाभळा रक्त वाहत होते, दक्षिणेतील घनदाट जंगलातील कुप्रसिद्ध 'जळू'ने तिचे काम केलेहोते. काळजी्पूर्वक इतर ठिकाणी तपासल्यावर अजून ३/४ जळवा काढून टाकल्या. पण पुढे त्या जखमेतून दीड तासतरी रक्त वाहत होते. आता या जंगलात कसे फिरायचे आणि मन विचलित न होता मनसोक्त प्रकाशचित्रे कशी काढायची हा मोठाच प्रश्न होता. सकाळी आम्ही रहात होतो त्या जागेसमोरच कोणीतरी आम्हाला अतिशय दुर्मिळ आणि पटकन न दिसणाऱ्या 'सिलोन फ्रॉगमाउथ' या पक्ष्यांची जोडी दाखवली. ती जोडी एवढ्या जवळ आणि शांत बसली होती, की त्यांचे प्रकाशचित्रण सहज आणि मनाजोगते करता आले. त्यानंतर आम्ही "मीन मुट्टी" या सदाहरित जंगलाच्या भागात गेलो. 'मीन मुट्टी' याचा अर्थ


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

माश्यांना उलट जायला वाव नसलेला पाण्याचा प्रवाह. हा एक मोठा झकास धबधबा होता. याच्या वाटेवरच आम्हाला दुर्मिळ 'लायन टेल्ड मॅकाक' या माकडांचा मोठा कळप दिसला. पण जंगल अतिशय दाट असल्यामुळे आणि त्यांना आमची चाहूल लागल्यावर ती पटापट पुढच्या झाडांवर उड्या मारत निघून गेली. त्या वाटेवरच आम्हाला 'कोचीन केन टर्टल' हे दुर्मिळ कासव दिसले. या कासवाच्या जातीची प्रथमच या जंगलात आम्ही नोंद केली होती. बटरफ्लाय मीट संपता संपता कोणीतरी शेजारच्या गावातून एक पकडलेला अजगर जंगलात सोडण्यासाठी आणला. त्या अजगराने एक मोठी मांजर गिळली होती आणि त्याचे पोट एखाद्या फुटबॉलप्रमाणे तट्ट फुगले होते. त्याला सोडण्याकरता आम्ही परत थोडेसे आत जंगलात गेलो. तिथून परत येताना एका झाडाच्या खोडावर मला भलाथोरला ८ इंची 'यलो थाय टारांटूला' कोळी दिसला. परत त्याला बघायला आणि प्रकाशचित्रे काढायला सगळ्यांची झुंबड उडाली. या दक्षिणेतील जंगलात फिरताना दरवेळेस असेच नवनविन अनुभव येतात.

गोव्याचे बोंडला हे अगदी लहानसे, पण अतिशय सुंदर अभयारण्य अनेक पक्षी, प्राणी, फुलपाखरांकरता प्रसिद्ध आहे. मी रात्रीचा प्रवास करून पहाटे गोव्याला पोहोचलो आणि तिथून बोंडला इथे गेलो. तिथल्या कॅंटीन मधे सकाळी चहा/नाश्ता करायला गेलो असताना तिथल्या वेटरने आमचे मोठे कॅमेर/लेन्सेस बघून आम्हाला निसर्गप्रेमी म्हणून सहज ओळखले. आमचा नाश्ता सुरू असतानाच तो धावत धावत सांगत आला, की बाहेर एक 'जायंट स्क्विरल' अगदी जवळ आली आहे. ही 'जायंट स्क्विरल' म्हणजे शेकरू आपल्या महाराष्ट्राची राज्य-प्राणी म्हणून मानांकित आहे. आतापर्यंत भिमाशंकर, माथेरान, फणसाड इथे हे शेकरू अनेक वेळा बघितले होते, पण अतिशय लाजाळू आणि चपळ असल्यामुळे तिचे प्रकाशचित्रण काही शक्य झाले नव्हते. आता मात्र ती शेकरू अगदी झाडाच्या खालच्या फांदीवर बसून आरामात कोवळी पाने खात होती. ती इतक्या खाली आली होती, की अगदी 'आय लेव्हल' फोटोग्राफी शक्य झाली असती.


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

त्यातसुद्धा नवलाची बाब अशी, की ही शेकरू भलतीच धीट दिसत होती. आता आमच्या कॅमेरावर आम्ही मॅक्रो लेन्स लावल्यामुळे आम्हाला तिच्या अगदी जवळ जाउन प्रकाशचित्र काढावे लागणार होते आणि परत खोलीवर जाऊन झूम लेन्स आणणे शक्य नव्हते. पण नशीबाने मात्र ती शेकरू भलतीच धीट असल्यामुळे चक्क मॅक्रो लेन्सने मी तिचे प्रकाशचित्रण करू शकलो.

जगातल्या सर्व देखण्या पतंगांची यादी केली, तर त्यात आपल्या भारतातल्या 'मून मॉथ' याचा क्रमांक नक्कीच बराच वरती येईल. दिसायला अतिशय सुंदर असणारा हा पतंग भलामोठा म्हणजे अगदी ५ इंचांएवढा असतो. अतिशय तलम, मखमली पिस्ता रंगाचे हिरवट असे यांचे पंख असतात. त्या पंखांची वरची कडा गडद किरमिजी रंगाची असते, तर खालच्या पंखांची टोके एखाद्या शेपटीसारखी लांब आणि वळलेली असतात. पंखांच्या मधे एक पारदर्शक खिडकीसारखे गोलाकार छिद्र भासते. ही नक्षी चंद्राच्या कलेसारखी दिसते. म्हणूनच हा 'मून' मॉथ. यांचे शरीर जाडजूड, केसाळ आणि पांढरेशुभ्र असते. पाय आणि तोंडाचा भाग गडद किरमिजी रंगाचा असतो. ह्यांच्या स्पृशासुद्धा मोठ्या, कंगव्यासारख्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. पंखांवरची गुलबट, पिवळसर झाक एकदम मनोहारी भासते. मी गोव्याच्या तांबडी सुर्ला या भागातील जंगलात भटकत असताना मला हा पतंग एका झाडामागे दडलेला सापडला. नंतर एका ठिकाणी मला कोषातून बाहेर येणाऱ्या या पतंगाचे प्रकाशचित्रण करता आले. जमिनीपासून जेमतेम एका फुटाच्या अंतरावर गवताच्या पात्यांच्या आधाराने ते मून मॉथ बसले होते. बाजूलाच त्याचा रिकामा, अर्धवट गुंडाळलेला कोष दिसत होता. एखाद्या कापसाच्या बोंडासारखे त्याचे पांढरेशुभ्र शरीर आणि त्यावर पिवळसर, गुलाबी, लाल कडा असलेले पंख अतिशय सुंदर दिसत होते. जवळपास दोन तासांच्या अंतराने त्याचे पंख पूर्ण प्रसरण पावले. डोळ्यासमोर त्याचे पंख पूर्ण विस्तार होताना बघणे म्हणजे शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखे दृश्य होते.


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

आपल्याकडे फार कमी पक्षी निशाचर आहेत आणि त्यात फक्त घुबडांविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते. थोडाफार घुबडासारखाच दिसणारा आणि त्याचाच भाऊबंद म्हणजे रातवा. हे नाईटजार अथवा रातवे निशाचर पक्षी आहेत आणि ते सहसा अगदी पहाटे अथवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर आकाशात घिरट्या घालताना दिसतात. साधारणत: दिसण्यापेक्षा याचा आवाजच आपल्याला आधी ऐकू येतो. या पक्ष्याच्या सवयी आणि आजुबाजुच्या परिसराशी समरूप होणारे रंग हे त्याच्या 'न दिसणे' या गुणधर्माला कारणीभूत ठरतात. फणसाडच्या जंगलामधे मी रात्री रातवा शोधायला बाहेर पडलो होतो. रात्र बरीच झाल्यामुळे आकाशात कोणीच दिसत नव्हते. बराच पुढे गेल्यावर मात्र मला आत झाडीमधे त्याचे आवाज यायला लागले. आवाजाच्या दिशेने मी पुढे सरकलो आणि कुठल्या झाडावर रातवा बसला आहे का ते बघायला लागलो. आवाजाचा मागोवा काढत काढत शेवटी एका झाडाच्या उंच टोकावर मला एक रातवा दिसला, पण पटकन तो तिथून उडून गेला. आता त्यांचा आवाज सुद्धा येत नव्हता. परत फिरायच्या आधी परत एकदा आजूबाजूला टॉर्च मारावा म्हणून मी आजूबाजूला टॉर्च फिरवला, आणि समोरच दाट झाडीमधे जमिनीवर मला त्याचे गडद लालभडक डोळे चमकताना दिसले. त्या रातव्याच्या अगदी ५/६ फुटांएवढ्या अंतरावर मी पोहोचलो आणि टॉर्चच्या प्रकाशात बघतो तर काय? समोर रातव्याची मादी बसली होती आणि तिच्या पोटाखाली तिची २ अगदी लहान पिल्ले डोकावत होती. रातव्यांना शोधण्याचे माझे काम तर पूर्ण झाले होते आणि 'बोनस' म्हणून त्यांची दोन पिल्लेसुद्धा मिळाली होती.

झाडांच्या काही जातींत परागीभवनाचे काम एकदम वैशिष्ट्यपूर्ण असते. अशीच एक खास दुर्मिळ जात म्हणजे सेरोपेजीया किंवा कंदीलपुष्प. आज जगभरात या वनस्पतीच्या २३५ जाती आहेत आणि त्यातील अंदाजे ४० जाती भारतात सापडतात. यांमधल्या कित्येक जाती या फक्त सह्याद्रीमधे म्हणजेच पश्चिम घाटातच सापडतात. यांचा आकार वेगवेगळा असला, तरी यांची खासियत असते ती यांच्या फुलामधे. कंदीलपुष्प हे नावाप्रमाणेच दिवाळीतल्या एखाद्या आकाशकंदिलासारखे भासते. या फुलाचा आकार म्हणजे


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

फुलाच्या तळाशी, देठाभोवती फुगीर लंबगोल, त्यातून वर जाणारी अरूंद नळी आणि सर्वात वर पाच खिडक्या असलेला नक्षीदार कळस. लिनस या शास्त्रज्ञाप्रमाणे याचे सेरोपेजीया हे नाव 'फाउंट्न ऑफ वॅक्स' (केरोस म्हणजे वॅक्स आणि पेगे म्हणजे फाउंट्न) असे आहे. इतर फुलांसारखी ही फुले काही खास रंगीबेरंगी नसतात. साधारणत: फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असतो आणि त्यावर लाल, जांभळे ठिपके आणी रेघांची नक्षी असते. यांचा रंग आकर्षक नसला, तरी त्यांची रचना मात्र नक्कीच आपल्याला थक्क करणारी असते. ही जात कीटकभक्षी नसली, तरी ती कीटकांना परागीभवन होईपर्यंत त्यांच्या पिंजऱ्यात जखडून मात्र ठेवते. या फुलांना विचित्र, कुजका वास असतो आणि त्यावर सूक्ष्म केस असतात. यामुळे त्यांच्यावर सडक्या मांसावर ज्या माश्या आकर्षित होतात त्याच माश्या आकर्षित होतात. फुलांच्या पाकळ्यांवर बाहेरच्या बाजूला आपल्या नळीवर उतरण्याची जागा आणि पुढे कुठे जायचे ते दाखवणारे ठिपके किंवा रेघा असतात. या दिशादर्शक ठिपक्यांप्रमाणे त्या माश्या आत जायला लागतात. मेणचट आणि उग्र वास त्यांना अजून अजून आत शिरायला प्रवृत्त करतो. आतल्या नळीच्या घसरगुंडीवर खालच्या बाजूने वळलेले राठ केस असतात. त्यांना दाबत दाबत ती माशी आत शिरते आणि थेट जिथे पुंकेसर, परागकण आहेत तिथे पोहोचते. आता फुलाच्या अगदी आत शिरलेली माशी राठ केसांमुळे उलटी परत जाऊ शकत नाही. फुलाच्या मध्यभागी पुं आणि स्त्री केसरांच्या जागी अवतीभोवतीच्या अर्धपारदर्शक खिडक्यांतून प्रकाश येत असतो. त्यामुळे ती माशी तिथेच घोटाळत रहाते आणि तिच्या या हालचालीमुळे त्या फुलाचे परागीभवन सहज शक्य होते. हे परागीभवन झाल्यावरच ते फूल, जे पूर्वी ताठ उभे असायचे, ते मलूल होऊन उलटे लटकते आणि त्याच्या आतले राठ केस सुद्धा मऊ होतात. या मऊ झालेल्या केसांमुळे आणि फूल उलटे झाल्यामुळे आत अडकलेल्या माशीला बाहेर पडायला मार्ग मिळतो आणि ती बाहेर उडून दुसऱ्या फुलाकडे जाते. परागीभवनाची एवढी क्लिष्ट प्रक्रिया असल्यामुळे आणि त्यांना विशिष्ट जातीच्या आणि आकाराच्या माश्याच लागत असल्यामुळे ही वनस्पती अतिशय दुर्मिळ झालेली आहे. याच बरोबर या वनस्पतीचा जमिनीतला कंद मुंगुसासारख्या प्राण्यांनी, आदिवासींनी उकरून काढल्यामुळे यांचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. अर्थातच दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे यांचे प्रकाशचित्रण करणे म्हणजे एक मोठे


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे

'challenge' असतो. या वनस्पतीला शोधणे, त्यात ती त्यावेळी फुललेली असणे हे खूप महत्वाचे असते. कास, महाबळेश्वर या ठिकाणी यांच्या काही जाती आहेत, त्या खास शोधायला, प्रकाशचित्रण करायला गेलो. त्या सापडल्यावर त्यांचे वैशिष्ट्य कळले. त्यांना कुठे शोधायचे, त्यांना हवामान कसे लागते, जमिन कशी लागते हे कळले. त्यानंतर तर काही जाती अगदी मुंबईतसुद्धा सापडल्या. त्यांच्या फुलांचे प्रकाशचित्रण करायला कठीण अश्या कड्यांवर कसरत करत गेलो. पण त्यानंतर जी प्रकाशचित्रे मिळाली त्याचा आनंद काही न्याराच होता.

पश्चिम घाटात फिरताना अश्या अनेक गंमतीजमती दिसतात आणि त्यांचे प्रकाशचित्रण करता येते. पण सध्या पर्यट्कांचे प्रचंड लोंढे इथे जंगलांमधे फिरताना दिसतात. नेचर ट्रेल्स हे सध्याचे 'फॅड' झालेले आहे. इथे फिरताना किंवा प्रकाशचित्रण करताना या जागांचे, तिथल्या प्राणी, पक्ष्यांचे संवर्धन करायचासुद्धा प्रयत्न आपल्याला करायला हवा. इथला नितांतसुंदर निसर्ग बघायला, त्यातले वेगवेगळे आकर्षक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती बघायला आपण कुठल्याही जंगलात जाऊ शकतो, मात्र त्यावेळी कुठलीही घाण तिथे केली जाणार नाही, प्लॅस्टीक, थर्माकोलच्या पिशव्या, ग्लास टाकले जाणार नाहीत ह्याची काळजी आपण आपलीच घेतली पाहिजे. कारण पुढच्या पिढीकरता हा निसर्गाचा ठेवा आपण नाही जपला, तर कोण जपेल?


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे


जंगलातले दिवस.....युवराज गुर्जर, ठाणे


मागील लेख पुढील लेख