1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

विहंगम - मुलाखत

गोपाळ बोधे
सुप्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे हे त्यांच्या हवाई छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. एक संकल्पना घेऊन त्याविषयानुसार हवाई छायाचित्रण करणारे बोधे हे पहिले छायाचित्रकार. दीपगृहे, मंदिरे, किल्ले असे अनेक विषय घेऊन त्यांनी त्यावर काम केले आहे. सुमारे पन्नासहून अधिक वर्षे फोटोग्राफीच्या क्षेत्रात असणारे गोपाळ बोधे हे उत्कृष्ठ फोटोग्राफर असण्याबरोबरच टेक्नोसॅव्ही आहेत.


मुलाखत - स्वप्नाली मठकर


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

'गोपाळ बोधे यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. तू त्यांच्याशी फोनवर बोलून पुढच्या आठवड्यातला एखादा दिवस ठरव' असे प्रविण देशपांडे यांनी सांगितले. मी फोन करून वेळ ठरवली आणि जायचे नक्की केले. आदल्या दिवशी रात्री प्रवीणचा फोन 'उद्या नक्की जायचेय ना? मग तू त्यांना कन्फर्मेशन कॉल दिला नाहीस का?' मला वाटलं होतं, की तारीख, वेळ ठरवली. ती नक्कीच आहे मग आता पुन्हा कॉल करून डिस्टर्ब कशाला करायचे. दुसऱ्या दिवशी प्रवीण आणि मी बोधे सरांना भेटायला त्यांच्या मित्राच्या ऑफीसमध्ये गेलो आणि बोधेसरांनीही नेमका हाच पहिला प्रश्न विचारला 'तू कन्फर्मेशनसाठी फोन नाही केलास?' तेव्हाच त्यांच्या शिस्तप्रिय बाण्याची चुणूक जाणवली. आम्ही गेलो ते आमोणकरांचे ऑफिस होते. त्यामुळे आमोणकर यांच्याशीही आमची भेट झाली, थोड्या गप्पा मारल्या. आणि मग आम्ही मुलाखतीकडे वळलो.

मी नेहेमीच्या पद्धतीप्रमाणे काही प्रश्न लिहून घेऊन गेले होते. त्याप्रमाणे काही विचारायला सुरुवात करायच्या आधीच बोधेसर म्हणाले की 'तू आधी तुझे सगळे प्रश्न वाच. मग मी एकत्रच सगळ्याबद्दल बोलतो, तू एक-एक प्रश्न विचारू नकोस.' ही पद्धत मला नवीनच होती. तरी मी एकदा सगळेच प्रश्न मोठ्याने वाचून दाखवले आणि मग सरांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचे बोलणे त्यांच्याच शब्दात वाचूया.

"मी वयाच्या दहाव्या वर्षी फोटोग्राफीच्या स्टुडियोमध्ये काम करायला लागलो. तेव्हा हौसेखातर वगैरे काम करणं शक्य नव्हतं, पोटापाण्याची गरज म्हणूनच मी तिथे काम करत होतो. ही नोकरी कशी करायची? तर, सकाळी मालकाच्या घरी झाडलोट करण्यापासून पाणी भरण्यापर्यंत सगळी कामे करायची. दुपारी स्टुडियोत काम करायचे आणि मग रात्री रात्रशाळेत शिकायचे. एकदा दुपारच्या वेळेस एक सरदार कपल स्टुडियोमध्ये फोटो काढून घ्यायला आले. त्यावेळी नेमके स्टुडियोचे मालक जेवत होते. त्यामुळे त्यांनी मला फोटो काढायला सांगितले. हा माझ्या आयुष्यातला मी काढलेला पहिलावहिला फोटो!


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

त्यावेळी १२० फिल्मसाईजचे कॅमेरे होते आणि डेकोपॅन नावाची फिल्म मिळायची. स्टुडियोत काम करत असल्याने कॅमेरा कसा वापरायचा याची बेसिक माहिती होती. हे वापरून मी हळुहळू शिकायला सुरुवात केली. कॅमेरा भाड्याने घेऊन मी काही लग्नाची कामे घ्यायला लागलो. त्या काळात घरातली कोणी व्यक्ती मृत्यू पावल्यावर तिचा फोटो घरात लावायची पद्धत होती. पण तेव्हा छायाचित्रण इतके सहज उपलब्ध नसल्याने आधीच काढून ठेवलेले फोटो नसायचे. मग कोणाचा मृत्यू झाला, की त्याचा फोटो घेत असत. त्यानंतर आर्टिस्टकडून फोटोवर काम करून तो जिवंत माणसासारखा दिसेल असे बदल करत. तेव्हा असे फोटो घ्यायला कोणी तयार होत नसे. मी मात्र स्मशानात जाऊनही हे फोटो घेत असे. तेव्हा सांगली गावात असे फोटो काढून देणारा मी एकटा फोटोग्राफर होतो. मी माझं प्रोफेशन म्हणून हे सगळे मान्य केले आणि फोटो काढायला लागलो. हे म्हणजे लोकांची त्या काळातली फोटोची गरज भागवण्याचं काम होतं.

फिल्म-डेवलपमेण्टसाठी आम्ही चक्क ते सोल्यूशन चाखून बघायचो. चाखून कुठल्या प्रकारची फिल्म आहे ते ठरवून त्याप्रमाणे डेवलप केले जायचे. एकदाच फक्त मी ते चाखून पाहिले नाही आणि मोठी चूक केली. त्यामुळे एका माणसाच्या लग्नातले फोटो खराब झाले. आज इतक्या वर्षांनीसुद्धा तो मला त्याबद्दल बोलून दाखवतो. ही खरच खूप मोठी चूक होती. पण अशा चुकांमुळे खूप काही धडेही मिळाले.

फोटोग्राफीला आणि फोटोग्राफरला मान्यता प्राप्त करून द्यायची म्हणजे काहीतरी करायला हवं होतं. काय केलं म्हणजे स्टेटस वाढेल? असा विचार आला. पूर्वी लग्नकार्यात फोटो काढायला जाताना कॅमेरा, इतर साहित्याची मोठी बॅग बरोबर असायची. आधी माझे सामान मलाच उचलून न्यावं लागायचं. नंतर जसे मला पैसे मिळायला लागले, तसा मी बसने जायचो. अजून जास्त पैसे मिळायला लागले, तसा एक स्टॉप अलिकडे उतरून मग टॅक्सीने जायचो. नंतर स्वत:ची स्कूटर घेतली, कार घेतली. आजही स्वत:ची कॅमेरा-बॅग मी उचलत नाही. बॅग उचलायला वेगळा माणूस असतोच असतो. फोटोग्राफर हा ही एक मोठा माणूस असतो त्यानेही बाराती बनून जावे असे मला वाटते. नाहीतर पायात


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

स्लीपर, डोक्याला उलटी टोपी अशा कशातरी अवतारात लग्नाला जाणारे फोटोग्राफरही आहेत. लोकांनी फोटोग्राफरलाही मानसन्मान द्यायला हवा असं मला नेहेमीच वाटतं.

पुढे नौदलाची 'फोटोग्राफर पाहिजे' अशी जाहिरात माझ्या बघण्यात आली. त्यासाठी मी अर्ज केला आणि सुदैवाने माझी निवडही झाली. नौदलासाठी विविध फोटो काढण्याचे काम माझं असायचं. मला त्या काळात वन्यजीव छायाचित्रणही आवडायला लागलं होतं. रणथंबोरला आठ-दहा वेळा, भरतपूरला तब्बल २९ वेळा जाऊन आलो. भारतातली बरीचशी जंगलं पालथी घातली. जंगलात असे फिरून आले, की मस्त वाटतं. ही जंगलं काय सांगतात आपल्याला? तर, तुम्ही आम्ही, प्रत्येक माणसानेच जंगलात फिरायला हवे. जंगलातली ही कलरस्कीम आहे, ती शिकण्यासारखी आहे. ती कंपन्यांनी बनवलेली कलरस्कीम नाही, तर निसर्गाने बनवलेली स्कीम आहे. लाल रंगीत फुले, हिरवी पाने, निळे आकाश हे कॉम्बिनेशन तुम्ही आम्ही ठरवलेले नाही, तर निसर्गाने ठरवलेले आहे. जेव्हा सरडा रंग बदलतो, आजूबाजूच्या वातावरणात लपून जातो, कॅमोफ्लोज होतो, तो कसा होणार हे निसर्गाने ठरवलेले आहे. यासाठीच प्रत्येकाने निसर्गाचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही व्यवसायाने कुणीही असा, जंगल तुम्हाला नेहेमीच काहीतरी शिकवेल. जंगल तुमचा गुरु आहे, गाईड आहे. आजही मला कधी वेळ मिळाला, की मी जंगलात जातो. रिटायरमेंटनंतर मी जेव्हा पहिल्यांदा व्हॅली ऑफ फ्लॉवरला गेलो, तेव्हाही ही फुलं दरवर्षी इथेच फुलतात का, पुन्हा ही जागा शोधण्यासाठी कसे जिपिएस मार्किंग करायचे, याबद्दल विचार केला. माझ्या नौदलातल्या अनुभवामुळे मला जिपिएस मार्किंग वगैरे करण्याची सवय होती. त्यामुळे आता व्हॅली ऑफ फ्लॉवरचे जिपिएस मार्किंग झालेले आहे. फोटोग्राफी आणि जंगलं यांचे कॉम्बिनेशन असेच महत्वपूर्ण आहे.

आता कलर फोटोग्राफी तशी फारशी अप्रूपाची राहिली नाही. मात्र जर तुम्हाला कलर शिकायचे असतील, तर ग्रे स्केल मात्र शिकायलाच पाहीजे. ग्रे म्हणजे १८% ग्रे. हा १८% ग्रे कसा आला? तर निसर्गातूनच! संपूर्ण समुद्र ढवळायचा, त्यातून जो ग्रे रंग मिळेल तो १८% ग्रे. हे १८% ग्रे म्हणजे कलर फोटोग्राफीचे अंतरंग आहे. कुठलाही एक्स्पोजर मीटर


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

याच बेसिक तत्वावर चालतो. अगदी हँडहेल्ड एक्स्पोजर मीटर असूदेत किंवा बिल्ट इन एक्स्पोजर मीटर असूदेत, तो १८% ग्रे या तत्त्वावरच चालतो. जो १८% ग्रेला परफेक्ट एक्स्पोजर करतो, त्याला फोटोग्राफी आणि रंग कळले. फिल्मवर लग्नाचे फोटो काढले, की ते वेगवेगळ्या लॅबमध्ये डेवलपमेंट / प्रिंटींगसाठी नेले जातात. तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रंग मिळतात. पण लोकांना त्याचे फारसे काही वाटत नाही. कारण प्रत्येकजण स्वत:चा फोटो दिसला, की खूश असतो. मग भले तो फोटो कशाही रंगाचा असेनात का. त्यामुळेच आजकाल लोकांना रंग शिकवण्याची वेळ आलीये असे मला वाटते. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, की ज्याला कलर फोटोग्राफी शिकायची आहे, लग्नाचे फोटो काढायचेत, त्याने रंग शिकून घेतलेच पाहिजेत. ते जर नवीन पिढीला शिकवता नाही आले, तर आमच्यासारख्या सिनियर लोकांचा काही उपयोग नाही.

जगात सगळीकडे छायाचित्रणाच्या माध्यमातूनच डॉक्युमेंटेशन केले जाते. जिथे व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनला महत्व आहे, तिथे खूप काही होऊ शकतं. इतिहास जपला जाऊ शकतो. मात्र आपल्या देशात व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनला अजिबातच महत्व नाही. उदा. आपलं लग्न होतं, मुलं, त्यांचे बारसे, मुंज, शिक्षण, इतर महत्वाचे प्रसंग या सगळ्याचे फोटो हे डॉक्युमेंटेशनच आहे. वय झाल्यावर मी तरुणपणी काय केलं, कसा दिसत होतो, मुलं कशी दिसत होती हे आपण पहातो. तसंच आमचा देश कसा दिसत होता, आता कसा दिसतो याची नोंद करून ठेवणे हे व्हिज्युअल माध्यमाचेच काम आहे. हे करून ठेवले नाही, तर आपलेच मोठे नुकसान होणार आहे. एरियल छायाचित्रण या व्हिज्युअल डॉक्युमेंटेशनसाठी अतिशय महत्वाची कामगिरी बजावते. पण आपल्या देशामध्ये याबद्दल फार उदासीनता आहे. आपले नियम, रुल्स, रेग्युलेशन फार कठीण आहेत. सिक्रसीच्या नावाखाली हे डॉक्युमेंटेशन केले जात नाही. पण जगात सिक्रेट असे काहीच नाही असे मला वाटते. माझे गुरु श्री.विलास भेंडे हे मला नेहेमी सांगायचे "हे बघ, जो दुसऱ्याला दाखवत नाही, त्याला स्वत:लाच काही येत नसतं." आपल्याला काय येतं ते दुसऱ्याला दाखवलंच पाहिजे.


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

एरियल डॉक्युमेंटेशनची परदेशात अनेक पुस्तके आहेत. एखाद्या जागेचे पाच वर्षांनी, दहा वर्षांनी, वीस वर्षांनी विविध फोटो घेऊन ठेवले जातात. त्या फोटोतून ती जागा कशी डेवलप होते ते दाखवले जाते. टोरांटो मध्ये 'सास्कातून' नावाचे एक गाव आहे. तिथे एका मॉलमध्ये मी गेलो होतो. तिथे ते गाव १०० वर्षापूर्वी कसे दिसत होते याचे प्रदर्शन भरवलेले होते. हे असे आपल्या देशात होत नाही हेच दुर्दैव आहे. फोटोग्राफी हा अतिशय पॉवरफुल असा लोकांचे डोळे उघडे करणारा मिडीया आहे. मला एका मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता, की आपल्या देशातली 'प्लेसेस ऑफ वरशिप' आणि परदेशातली 'प्लेसेस ऑफ वरशिप' यात काय फरक आहे? भारतात प्रत्येक ठिकाणची देवळांची शैली वेगळी आहे. तामिळनाडूमध्ये गेलात, तर तिथली देवळे वेगळी, महाराष्ट्रातली देवळे वेगळी, गुजरात मधली वेगळी. हे फक्त आपल्या देशातच होऊ शकतं, बाकी कुठे नाही. कारण आपल्याकडे भाषा, धर्म यात विविधता आहे. त्यांच्याकडेही थोडाफार फरक आहे, पण चर्च म्हटलं, की तोच क्रॉस असतो. तसे इथे होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणचे देवही वेगळे. या वेगवेगळ्या शैली मी एरियल छायाचित्रण करून दाखवू शकलो.

एरियल छायाचित्रणामुळेच त्सुनामीपूर्वीचा आणि आधीचा अंदमान निकोबार मी बघू, दाखवू शकलो. भारतातल्या समुद्रात असणारे विविध लाईट हाऊस म्हणजे द्वीपगृह मी पाहू आणि त्यांची नोंद करू शकलो. त्याचे पुस्तकही आहे. लक्षद्वीपवरचे पुस्तक आहे. भारतात टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीने याप्रकारचे फोटो खूप उपयोगी ठरतात. गोवा राज्याच्या टुरिझमसाठी कॉफी टेबल बुक बनवले, अनेक फोटो काढले. त्यामुळे गोवा टुरिझम १२%नी वाढला असा त्यांचा अभ्यास सांगतो. पण मला नुसतेच देवळांचे फोटो काढायचे नाहीत. त्या देवळांची शैली, त्यातली कला काय आहे, आपली संस्कृती काय, वारसा काय आहे, षोडशोपचारे पूजा कशी केली जाते हे सगळं जगापुढे आणायचे आहे. नुसते देवाचे फोटो काढून न थांबता मनुष्य मूर्तीपूजेकडे कसा वळला, भारतातली मंदिर-संकल्पना कशी आहे, तिचा विस्तार कसा झाला याचाही अभ्यास करून लोकांपुढे


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

आणायचे आहे. थोडक्यात सांगायचं, तर मला भारतीय संस्कृती व्हिज्युअल मिडीयाच्या माध्यमातून जगापुढे मांडायची आहे.

एरियल छायाचित्रणाला मी चक्क बैलगाडी म्हणतो. कारण हेलीकॉप्टर मध्ये व्हायब्रेशन खूप असतात. त्यामुळे मला पाठीचे दुखणेही सुरु झाले आहे. इथे स्पीड असतो ६०नॉटिकल माईल्स. म्हणजे एअर स्पीड ताशी २००किमी पेक्षा जास्त. इतक्या स्पीडमध्ये जाताना फोटो काढावे लागतात. एखादी फ्रेम मिस झाली, तरी लगेच वळून पुन्हा जाऊन काढता येत नाही. अँगल्स चुकू नयेत म्हणून कंपास वगैरे वापरून काळजी घ्यावी लागते. शिवाय असे हवेतून फोटो काढताना माझ्या जीवाला काही बरेवाईट झालेच, तर सरकार जबाबदार नाही असे हमीपत्रही मला लिहून द्यावे लागते!

माझ्या डोक्यात एरियल फोटोग्राफीची कल्पना कशी आली याची एक वेगळीच कथा आहे. तेव्हा मी नौदलात कामाला होतो. एकदा कोणालातरी रिसीव करायला जायचे होते आणि आम्हाला निघायला उशीर झाला. सहसा आम्ही किनाऱ्यावरून किंवा समुद्री भागावरूनच हेलीकॉप्टर उडवतो. पण त्यादिवशी उशीर झालेला असल्याने पायलटने जमिनीच्या भागावरून हेलीकॉप्टर नेण्याचे ठरवले. जेव्हा आम्ही गेट-वे-ऑफ-इंडिया वरून फ्लाय करत होतो, तेव्हा माझ्या हातात कॅमेरा होता आणि त्यात एकच फ्रेम शिल्लक होती. गेट-वेवरून जाताना मी ती फ्रेम गेट-वे-ऑफ-इंडियाचा फोटो काढायला वापरली. तो फोटो डेवलप केल्यावर मी तो ऑथोरिटीजना दाखवला. हाच तो गेट-वे-ऑफ-इंडियाचे तीन घुमट दाखवणारा सुप्रसिद्ध फोटो. या फोटोमुळे मला एरियल फोटोग्राफीत अजून बरेच काही करता येईल याची जाणीव झाली. आणि इतके मोठे प्रूफ दाखवल्यावर मला पुढेही परवानगी वगैरे घ्यायला त्याचा फायदा झाला. तशी एरियल फोटोग्राफी बऱ्याच जणांनी केली, पण मी थीम घेऊन काम केलं. अशा प्रकारची थीम-बेस्ड एरियल फोटोग्राफी इतर कुणी केली नव्हती. मी पुस्तके करण्याकडे वळलो, कारण व्हिडियो बघायला तुम्हाला वेळ काढून बसावं लागतं, पण फोटोचा अल्बम सहज लगेच चाळून होतो. तसंच कॉफी-टेबल पुस्तकेही सहज पाहून होतात. ही पुस्तके रेकॉर्डला रहातात. त्यांच्यामुळे डॉक्युमेंटेशन होते. ती लायब्ररीत जतन केली जातात.


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

आता किल्ल्यांबद्दल. महाराष्ट्रातले किल्ले इतके मोडकळीस का आले आणि त्याच वेळेस राजस्थानचे किल्ले इतके व्यवस्थित कसे राहिले याचा अभ्यास केला, तर लक्षात येईल, की आपल्या इथे लढाया खूप झाल्या. तितक्या त्या राजस्थानमध्ये झाल्या नाहीत. पण तरीही मला वाटतं, की हे किल्ले म्हणजे भारताचे फिक्स डिपॉझिट आहेत. बँकेतल्या ठेवीप्रमाणे ते सांभाळले पाहिजेत. हे काम कोणाचं? तर, तुमचं आमचं. हा आपलाच ठेवा आहे आणि आपणच त्याचे जतन करायला हवे. सरकार याबाबत काही करेल असे मला वाटत नाही. सरकारकडे पॉवर असूनही काही करत नाही याचा मला अनुभव आहे. तुमच्या-आमच्यासारख्या संस्थांनी, गिरीमित्रांनी एकत्र यायचं आणि हे काम करायचं. ही कामाची गरज व्हिज्युअल माध्यमातून लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. मी ‘किल्ले’ या विषयावर पुस्तक केलं, त्या फोटोंचे प्रदर्शन भरवले. साधारण एक लाख लोकांनी त्याला भेट दिली. राजस्थानमध्ये एक कल्पना मांडली होती, की हे किल्ले एखाद्या संस्थेला/ इंडस्ट्रीला दत्तक द्यायचे. त्या किल्ल्याची डागडुजी, संवर्धन त्या संस्थेने करायचे. आपल्याकडेही ही कल्पना राबवण्यासाठी २००७ मध्ये ऑर्डर निघाली आहे. पण तेव्हापासून आज २०१३ पर्यंत इतक्या वर्षात आपण काहीच करू शकत नाही. कारण याला कोणी संस्था / इंडस्ट्री पुढे येत नाही. किल्ल्यांमध्ये पैसे टाकणे त्यांना उपयोगाचे वाटत नाही. यासाठी सरकारने थोडा पुढाकार घेऊन एखाद्या इंडस्ट्रीला काही टक्के टॅक्समाफी वगैरे देऊन हे किल्ले संवर्धन करायला सांगायला हवे. असा पैशाचा फायदा दिसला, तर नक्कीच कोणीतरी पुढे येतील. किंवा मग पॅरिसमध्ये त्यांनी केलं, तसे काहीतरी करायला हवे. तिथे त्यानी एक तृतीयांश किल्ले प्रायवेट कंपन्यांना विकले. आणि आलेल्या पैशातून उरलेल्या दोन तृतीयांश किल्ल्यांचा विकास, संवर्धन केले. पण किल्ल्यांसाठी इतका विचार करायची आपली मानसिकता नाहीये. किल्ले कशाकरिता जतन करायचे हेच अजून लोकांना उमजत नाहीये. आपण इतिहासावर जगतो हेच या लोकांना अजून कळत नाहीये.


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

हे किल्ले दत्तक देताना त्यांचा बाजार मांडू नका, त्याना किल्ल्यासारखेच जपा हे नियम दत्तक देताना करता येण्यासारखे आहेत. काही ट्रस्ट नळदुर्ग दत्तक घ्यायला तयार आहे. त्यांना मी सांगितलंय, की त्या किल्ल्याचं डिस्नेलँड बनवू नका. पूर्वीच्या काळातला अनुभव लोकांना देता येईल असे काहीतरी करा. मेण्या पालखीतून नेणे किंवा बैलगाडीत बसून जाणे अशी काही आकर्षणे ठेवता येतील. हे करताना किल्ल्याच्या आतमध्ये जी जागा आहे तिथे काही गाडलं जात नाहीये ना याची खात्री करा. थर्मल इमेजिंग करून किल्ल्याचा आतला भाग बघा आणि त्याचे जतन करा. थर्मल इमेजिंगमधून बऱ्याच दडलेल्या, गाडल्या गेलेल्या वस्तू शोधता येतात, धबधब्याची खोली मोजता येते आणि अजूनही बरेच उपयोग आहेत. हे इमेजिंगही मी करतो. पण तो फार मोठा आणि वेगळाच विषय आहे. जो कोणी किल्ला दत्तक घेईल त्याला काही अटी घालाव्या लागतीलच. पहिली अट म्हणजे किल्ल्याची मालकी सरकारची राहील. दुसरे म्हणजे शास्त्रीय पद्धतीने आर्किटेक्टचा सल्ला घेऊनच ते सांगतील तसेच संवर्धन, डागडुजी करायची. आणि महत्वाचे म्हणजे त्याचे डिस्नेलँड करू नका. किल्ल्याचा इतिहास आणि पावित्र्य दोन्ही जपा."

गेले सुमारे पन्नासहून अधिक वर्षे फोटोग्राफीच्या क्षेत्रात असणारे गोपाळ बोधे हे उत्कृष्ठ फोटोग्राफर असण्याबरोबरच टेक्नोसॅव्ही आहेत. सध्या त्यांच्याकडे असलेल्या दीड लाख निगेटिव्हज् स्कॅन करण्याचे प्रोजेक्ट चालू आहे. हे प्रोजेक्ट पाचएक वर्षं चालेल असा त्यांचा अंदाज आहे. या सगळ्या निगेटिव्हज् कालांतराने खराब होतात. त्या आत्ताच डिजिटाईज करून ठेवल्या, तर पुढे वापरता येतील अशी दूरदृष्टी त्यामागे आहे. त्याशिवाय ते एक सॉफ्टवेअर सिस्टीम बनवून घेत आहेत, ज्यायोगे हवी असलेली इमेज केवळ तीस सेकंदात सापडू शकेल. ते स्वत:ला कलाकार किंवा आर्टिस्ट म्हणून घेत नाहीत. त्यांच्या मते त्यांचे महत्वाचे काम म्हणजे डॉक्युमेंटेशन. ते म्हणतात "मी फोटोग्राफरला फोटोग्राफर कधीच म्हणत नाही. 'वी आर इमेज मेकर्स' आपण इमेज तयार करतो. म्हणुन आपण चित्र निर्माते आहोत." त्यांचे हे विचार ऐकून आणि त्यांच्या चित्रातले


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई

कंपोझिशन, रंग इत्यादी बघून ते एक उत्कृष्ठ कलाकार आणि इमेज मेकर आहेत याविषयी दुमत होणार नाही. आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही शिकण्यासाठी, त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी देशाला आणखी व्हिज्युअल डॉक्युमेण्टेशन करणारे लोक हवेत, असे त्यांना मनापासून वाटते.


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई


विहंगम - मुलाखत गोपाळ बोधे, मुंबई















मागील लेख पुढील लेख