1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

माझी टेबलटॉप फोटोगीरी

मिलिंद देशमुख, नाशिक
मिलिंद देशमुख सुमारे २५ वर्षे प्रकाशचित्रण व्यवसायात असून व्यक्तिचित्रण या विषयात त्यांचा हातखंडा आहे. केकी मूस फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणी इतर स्पर्धांमधेही त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. तसेच त्यांच्या प्रकाशचित्रांची प्रदर्शनेही भरवली आहेत.


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

गेली पंचवीस वर्षं स्टुडिओ व फंक्शन फोटोग्राफी करत असतांना, माझा काही चित्रकार मित्रांशी संबंध आला व नकळत माझ्यात क्रिएटीव्ह व आर्टीस्टीक फोटोग्राफी शिरली. सुरूवातीला ताडामाडाच्या झाडांसोबत सूर्यास्ताचा फोटो, फुलझाडे, ओहळे, नदी, धबधबे, डोंगर दऱ्यातून झाडांच्या खोडांवरच्या अमूर्त आकारांना टिपत मी कधी अमूर्त फोटोग्राफीवर स्थिरावलो, ते माझे मलाच कळले नाही. छायाप्रकाश दिसायला लागला. अर्थात लाईट्स आणि शॅडोचा खेळ जमायला लागला. त्या सोबत खेळता येऊ लागले. पिक्टोरियल फोटोग्राफीचा अर्थ कळला. प्रकाश आपल्याला दिसतो, पण तो वाचता आला पाहिजे. सपाट पृष्ठभागावरसुध्दा छायाप्रकाशाने खूप चांगला पिक्टोरियल फोटोग्राफ मिळू शकतो.

चित्रकार व फोटोग्राफरर्स यांची प्रदर्शने बघायची आवड असल्याने जिथे कुठे प्रदर्शने बघायची संधी असेल ते मी बघायचो. असेच एकदा कुठेतरी वस्तू मांडून केलेले फोटोग्राफ बघण्यात आले. मला वाटते, ते मी जहांगीर आर्ट गॅलरीत बघितले. त्या प्रकाराला टेबलटॉप फोटोग्राफी म्हणतात असं कळलं. तेव्हापासून या प्रकारात काहीतरी वेगळं करावं अशी मनात इच्छा निर्माण झाली. मग टेबलटॉपमध्ये काम करताना त्यांच्याकडून टिप्स मिळवल्या व त्याप्रमाणे काम चालू झाले.

टेबलटॉप फोटोग्राफी ही एक निर्मिती आहे. क्रिएशन आहे. या प्रकारात आपल्याला संपूर्ण दृष्य निर्माण करायचे असते. येथे आपण विविध वस्तू, ड्रेपरी मांडून त्यावर प्रकाशयोजना करून टेबलटॉप फोटोग्राफ तयार करतो. अन्य फोटोग्राफीच्या प्रकारात जे समोर दिसते, त्याचा आपण फोटोग्राफ तयार करतो. अर्थात समोर एक विशाल फोटोग्राफ तयार असतो, त्यातून आपण आपल्याला हवी तशी एक चौकट निवडतो व आपला फोटोग्राफ तयार होतो. पण टेबलटॉपमध्ये आपल्याला फोटोग्राफ तयार करायचा असतो. किंबहुना तो टेबलटॉप फोटोग्राफ प्रथम आपल्या मनात तयार असतो. म्हणूनच या प्रकाराला क्रिएटिव्ह फोटोग्राफी म्हणतात. आपल्या मनात एखादा टेबलटॉप फोटोग्राफ तयार झाला, की मग आपण त्याला लागणार्या चीजवस्तू गोळा करून त्यांना टेबलावर मांडून त्यावर हवी तशी प्रकाशयोजना करून त्याचा फोटोग्राफ


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

काढतो. टेबलटॉप फोटोग्राफी एक कविता आहे. कवितेत कवी जसे कमी शब्द वापरून मोठा आशय सांगतो, तसेच टेबलटॉप फोटोग्राफीमधून आपण आपलं मत मांडत असतो. काहीतरी संदेश देत असतो. किंवा काहीच नाही तर एक कलात्मक फोटोग्राफ तयार करत असतो. जे एखाद्या चित्रकाराच्या चित्रापेक्षा कमी नसतं. आपल्याला माहित आहे, की प्रदर्शनामधून पेंटींगच्या तुलनेत फोटोग्राफ फारसे विकले जात नाहीत. पण क्रिएटीव्ह टेबलटॉप फोटोग्राफ चांगल्या किंमतीला विकले जातात हा माझा अनुभव आहे.

फोटोग्राफीमधील काही तांत्रिक बाबी टेबलटॉप-फोटोग्राफीमध्ये सर्वात महत्वाच्या आहेत. रचना, वस्तू, ड्रेपरी वापरून योग्य रीतीने मांडणी झाली पाहिजे. मांडणीतून अर्धा फोटोग्राफ तयार होतो. वस्तूंची मांडणी करताना आकारांचा विचार करावा लागतो. वस्तूंना वेगवेगळे रंग असतील, तर रंगांचा विचार करून त्यानुसार मांडणी करावी लागते, ज्याला आपण कलर बॅलन्स म्हणतो. ड्रेपरी वापरायची असेल, तर कोठून कोठे टाकायची, तिचा प्रवाह (फ्लो) कसा असावा, वस्तूंना पोत (टेक्श्चर) असेल, तर त्याचाही विचार झाला पाहिजे. एवढया सर्व बाबींचा विचार झाल्यावर त्या मांडणीतून आपल्याला उत्कृष्ट कंपोझिशन मिळालं पाहिजे. त्या मांडणीतून आपल्याला डेप्थ मिळाली पाहिजे. त्याशिवाय टेबलटॉप फोटोग्राफीला थर्ड डायमेंशन येणार नाही. खोली मिळवण्यासाठी प्रकाशयोजनेचा चा व लेन्सचही उपयोग होतो हे आपल्याला माहितच आहे. म्हणून मांडणी उत्कृष्ट झाल्यावर त्यावरील प्रकाशयोजना हा महत्वाचा भाग आहे. आपल्या मांडणीतील जो भाग महत्वाचा आहे, त्यावर की लाइट टाकून तो हायलाइट करता येतो. अन्य भागांवर फिल लाइट टाकून व कट लाइट वापरून आपल्या टेबलटॉप फोटोग्राफचे सौंदर्य वाढवता येते. हे सर्व झाल्यावर जर आपल्याला यात हालचालीचा परिणाम दाखवायचा असेल, तर वस्तू हलवून स्लो शटर-स्पीडवर फोटो काढून तो आणता येतो.

तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर आपण आपल्या विचारशक्तीच्या जोरावर या टेबलटॉप फोटोग्राफीतून काही सामाजिक संदेश देऊ शकतो. उदा. धूम्रपान, हुंडाबळी, एड्स्,


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

बेट बचाव अशा अनेक विषयांवर आपण टेबलटॉप फोटोग्राफी तयार करू शकतो. अशा प्रकारचे फोटोग्राफ निर्मिती करणा-या फोटोग्राफर्सना खूप मानाचे स्थान आहे.

खूप वेगवेगळया प्रकारच्या वस्तू वापरून केलेले टेबलटॉप फोटोग्राफ मी बघितले. ग्लास, केटली, प्लेटस, मातीची भांडी, अनेक प्रकार बघितले. पण मला काहीतरी वेगळी वस्तू वापरून टेबलटॉप फोटोग्राफ करायचा होता, अशी वस्तू जी आज पर्यंत कोणी वापरली नसेल. या ध्यासाने मी अनेक वस्तू वापरून फोटोग्राफ काढले. पण ते फोटो कोठेतरी पाहिलेले आहेत असेच वाटायचे. एकदा ग्लासला वर्तमानपत्र गुंडाळून फोटो काढत असतांना आठ-दहा फोटो काढून झाल्यावर वाटले, हे पण कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते आहे. कंटाळून ग्लासचा कागद काढून चुरगाळून फेकला. तो बोळा लायटींग केलेल्या टेबलवर पडला व त्यावर नजर खिळली. कारण त्या बोळयामध्ये निरनिराळे आकार दिसू लागले. त्या क्षणापासून निर्माण झाले माझे चुरगाळलेली वर्तमानपत्रे, रद्दीतले कागद वापरून केलेले टेबलटॉप फोटोग्राफी प्रदर्शन.

''द जर्नी ऑफ लाइफ" या प्रदर्शनात जुनी वर्तमानपत्रे काही रंगीत पेपर चुरगाळून त्यांना मानवी आकार देत पुरूष, स्त्रिया व मुले अशा संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीरेखांचे अनेक छोटे छोटे पुतळे तयार करून त्यांच्या वेगवेगळ्या रचना करून सुमारे सहा महिने रोज रात्री तीन ते चार तास मी टेबलटॉप फोटोग्राफ करायचो. त्यातून जवळपास सहाशे प्रतिमा तयार झाल्या. त्यापैकी ४० प्रतिमा निवडून हे प्रदर्शन तयार झाले. हॉलमध्ये या प्रदर्शनाची मांडणी मानवी जीवनावर आधारीत केली होती. सुरूवातीला आपण एकटे जन्माला येतो. नंतर आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी, मुले अशी नाती जोडली जातात. आयुष्याच्या मध्यात आपल्या सोबत खूप लोक असतात. तर उत्तरार्धात त्यातून एक एक व्यक्ती कमी होत जाते व शेवटी आपण एकटेच उरतो व जातो. मरणोत्तर पुढे काय? हे आपल्याला कुणालाच माहित नाही. म्हणून शेवटी ग्रे-कलर-स्किममधील अमूर्त फोटोग्राफ लावले होते. अशी या प्रदर्शनाची मांडणी होती. हे प्रदर्शन बघायला सुरूवात केली, की पहिल्या दोनचार फोटोंमध्ये हे कागदाचे पुतळे वाटायचे. मात्र पुढचे फोटो बघताना त्यात खरी माणसे दिसायला लागायची. ही माणसे कोण? यांना आपण कोठे पाहिले आहे का? कधी भेटलो आहोत का? ही माणसे आपल्यातलीच आहेत का? असे प्रश्न बघणाऱ्याला नक्कीच पडायचे.


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

नंतर मला श्री. केकी मूस या महान कलावंताची माहिती मिळाली. त्यांची संस्था टेबलटॉप व इतर विषय घेऊन फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करत होती. केकी मूस हे पन्नास-एक वर्षं घराबाहेर न पडता फक्त आपल्या कला जोपासत होते. असे हे एक कलेचे तपस्वीच होते. चाळीसगांवला त्यांचं स्मारक आहे. स्मारकात वाचनालय व मूससाहेबांचे वैयक्तिक कलादालन आहे. हे समजल्यावर मी ते बघायला गेलो व धन्य झालो. त्या कलाकृतींनी भरलेल्या दालनात शिल्प, काष्ठशिल्प, पेंटीग्ज्, पाषाण-शिल्पकला, लाकडातील कोरीवकाम, मातीच्या विविध वस्तू, ओरीगामी, फोटोग्राफ व टेबलटॉप फोटो आहेत. या सर्व कला त्यांच्या अंगी होत्या. मूससाहेबांना सर्व बाबूजी म्हणत. मला जास्त भावले ते त्यांनी केलेले टेबलटॉप फोटोग्राफस. यातील दोन टेबलटॉप फोटो तर सदैव माझ्या आठवणीत राहतील. एक काश्मिरमधील घर ''विंटर" आणि दुसरे श्री. नेहरूंचे व्यक्तीमत्व टेबलटॉप फोटोमध्ये आणलेले ''द पोट्रेट आफ नेहरू." पहिल्या टेबलटॉपमध्ये कार्डशीट व पुठ्ठा वापरून घर तयार केले होते, मातीची टेकडी करून त्यावर ठेवलेले आणि घराभोवती काडयांना दोरा बांधून आवार तयार केले होते. आजूबाजूला वाळलेल्या झाडांच्या फांदया रोवून झाडे दाखवली होती. मातीचा माणसाचा छोटासा पुतळा करून तो पायवाटेने घराकडे जातांना दाखवला होता. त्यामुळे लँडस्केपमध्ये जिवंतपणा आला. असं हे लँडस्केप टेबलवर


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

मांडले होते. हे दृश्य काश्मिरमधले वाटावे याकरीता त्यावर बाबूजींनी मीठ व खडूची पावडर टाकलेली होती. डाव्या बाजूने 90 डिग्रीतून की-लाइट टाकलेला, उजव्या बाजूने सावलीमधील बारकावे दिसतील, इतपत फिल-लाइट टाकलेला. त्यामुळे डाव्या बाजूने झाडांवर, घरावर व इतरत्र सकाळची सूर्यकिरणं पडलेली दिसतात. बॅकग्राऊंडला वापरलेल्या कापडाच्या मागे एक लाइट लावलाय. त्यामुळे मध्यभागी हॅलो तयार झाला व फोटोग्राफमध्ये डेप्थ मिळाली आहे. हा टेबलटॉप फोटो प्रथमदर्शनी काश्मिरमध्ये बर्फ पडल्यावर काढलेला खरा फोटो वाटतो. तेथील व्यवस्थापकांनी सांगितल्यावर कळतं, की हा टेबलटॉप आहे.

एकदा पंडीत नेहरू धुळे जिल्हयातील पुरमेपाडा धरणाच्या उदघाटनासाठी आले होते. त्यांच्यासोबत चाळीसगांवचेच त्यांच्याच मंत्रीमंडळातले तत्कालीन कायदामंत्री श्री. हरीभाऊ पाटसकर हे सुध्दा होते. पाटसकरसाहेबांनी मूससाहेबांबद्दल नेहरूजींना सांगितले व त्यांच्या कलाकृती बघण्याचा व त्यांना भेटायचा आग्रह धरला. नेहरूजींनी भेटीसाठी दहा मिनिटे देऊ केली. पण भेटायला गेल्यावर कलाकृती पाहण्यात ते इतके रमले, की अखेर बाबूजींकडे ते चार-पाच तास थांबले. अशी ही पहिली भेट. दुसर्यांदा नेहरूजी जळगांव जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करायला आलेले असतानाही बाबूजींना भेटायला गेले. त्यावेळेस ते बाबूजींना म्हणाले, "मी दोन वेळा तुमच्याकडे आलो. तुम्ही एकदाही माझा फोटो काढला नाही. तुम्ही माझा एक पोर्ट्रेट करावा असे मला वाटते." पण नेमका त्यादिवशी बाबूजींच्या कॅमेर्यातला रोल संपलेला होता. त्या काळात चाळीसगांवात रोल मिळत नसे. जळगांव किंवा मुंबईहून आणावा लागत असे. तेव्हा बाबूजींचा नाईलाज झाला. पण बाबूजी नेहरूजींना म्हणाले, तुम्ही तुमचा दौरा आटोपून दिल्लीला पोहचायच्या आत तुमचा पोट्रेट पोहचेल. त्यावर नेहेरूंना त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. नंतर नेहरू तेथून गेल्यावर बाबूजींनी नेहरूजींचे व्यक्तीमत्व असलेला टेबलटॉप केला. त्या टेबलटॉप मध्ये नेहरूजींनी नगरच्या जेलमध्ये लिहिलेलं ''डिस्कव्हरी आफ इंडीया" हे पुस्तक,


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

त्यावर नेहरूजींना नेहमी आवडणारे गुलाब पुष्प व सोबत पंचशील तत्त्वांची शिकवण देणारी बुध्दाची मूर्ती, आणि एक प्रिंटेड पडदा या सर्व वस्तूंची मांडणी केली. उजव्या बाजूने थोडे अगेन्स्ट लायटींग करून हा टेबलटॉप लावला. हा टेबलटॉपवजा पोट्रेट नेहरूजींनी बघितल्यावर ते प्रसन्न झाले. त्या पोट्रेटवर त्यांनी ''द युनिक पोट्रेट ऑफ माय लाईफ" अशी टिप्पणी केली. अशा प्रकारे एखादया व्यक्तीचे व्यक्तीमत्व टेबलटॉपमध्ये आणता येते. बाबूजींबद्दलच्या माझ्या माहितीत भर घातली व फोटो सहकार्य केले, ते केकी मूस फाऊंडेशनचे आत्ताचे व्यवस्थापक श्री. लोखंडे यांनी.

केकी मूस फाऊंडेशन फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करत असे. त्या स्पर्धेतील टेबलटॉप या विषयावरील दोन टेबलटॉप माझ्या कायम आठवणीत आहेत. एक माझे मित्र सुरेश तारकर यांचे प्रथम क्रमांकाचे चित्र व दुसरे माझे द्वितीय क्रमांकाचे चित्र. तारकरांच्या टेबलटॉपचे नाव होते ''नाद". या टेबलटॉपमधून वारकऱ्यांचे, संतांचे व्यक्तीमत्व दाखवण्यात आलं आहे. एका कार्डशीटवर मधोमध वारकरी संप्रदायात जसा टिळा लावतात, तसा टिळा रंगवला असून त्यावर 'विठठल' असे शब्द लिहिले होते. टिळयाच्या मध्यभागी ''तुम्ही संत मायबाप" हे शब्द आहेत. या कार्डशीटचा बॅकग्राऊंड म्हणून वापर करण्यात आला. त्यासमोर चार टाळ लटकवले गेले. ही या टेबलटॉपची मांडणी. यामध्ये एकाच गटातले रंग वापरलेत. अर्थात कलर-हार्मनी सांभाळली आहे. रचना करताना कलर बॅलन्सचा विचार केला आहे. संपूर्ण कंपोझिशन तांत्रिकदृष्टीने परीपूर्ण आहे. एक की-लाईट व एक फील वापरून या टेबलटॉपचे लायटींग करण्यात आलं. टेबलटॉपचा दर्जा उंचावण्यासाठी यात क्रिएटीव्ह इफेक्ट वापरलाय. तो म्हणजे क्लिक करतांना चार टाळांपैकी दोन टाळ हलवले व कॅमेरा स्लो स्पीड ठेवून फोटो काढला. त्यामुळे टाळ एकदुसर्याला लागून त्यातून आवाज घुमतोय असे वाटते. म्हणून याला ''नाद" हे नाव देण्यात आले.


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक

याच स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे टेबलटॉप माझे. टेबलटॉपचे नाव होते 'स्टिल वॉटर'. हे टेबलटॉप एक लँडस्केप आहे. जे दृष्य दाखवायचे होते, त्याची छोटया स्वरूपाची प्रतिकृती तयार केली. हा टेबलटॉप करतांना मनात संपूर्ण चित्र तयार होते, की आपण एक स्विमिंग पूल बनवू, ज्यामध्ये स्विमींग पुलांवर (काठावर) असणार्या छत्रीचे प्रतिबिंब दिसेल. म्हणून त्यासाठी लागणार्या वस्तू गोळा केल्या. काही विकत आणल्या, तर काही हातांनी बनवल्या. प्रथम एका जेवायच्या थाळीला आतून निळा रंग लावला, जेणे करून त्यात पाणी ओतल्यावर पाणी स्थिर, खोल व निळसर वाटेल. नंतर एक पुठठा घेऊन त्यावर टाईल्स आखल्या. त्या ताटाच्या आकाराचा गोल कट करून काढून टाकला व तो पुठठा ताटावर ठेवला. आता स्विमींग पुल तयार झाला. मग पांढर्या कार्डशीटच्या पट्ट्या कट करून आराम खुर्ची बनवली. ती काठावर मध्यापासून थोडी उजव्या बाजूला ठेवली. कंपाझिशन चांगली होण्याच्या दृष्टीने मग त्यावर बर्थडेकेकवर वापरतात ती छत्री ठेवली. ही टेबलटॉप फोटोग्राफीतील महत्वाची मांडणी झाली. आता लायटींग. की-लाईट, फील-लाईट व कट-लाईट वापरून बरेच फोटोग्राफ काढून झाले. पण मनासारखा परिणाम साधला जात नव्हता. सिंगल लाईट वापरून हवा तसा इफेक्ट मिळायला लागला. शेवटी एक सिंगल स्नूट वापरून रात्रीचा शांततेचा फिल मिळाला. कारण पाणी रात्री शांत स्थिर असतं. या लायटींगने छत्रीचे प्रतिबिंब पाण्यात दिसले व एक सुंदर टेबलटॉप मधून रात्रीच्या वेळीचे स्विमींग पुलाचे लँडस्केप मिळाले.


माझी टेबलटॉप फोटोगीरी मिलिंद देशमुख, नाशिक


मागील लेख पुढील लेख