1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

गा विहगांनो माझ्यासंगे!

सतेजा राजवाडे
इंजिनीअरीग क्षेत्रात गेली 14 वर्षे स्थापत्य आरेखक म्हणून काम करत असतानाच त्यांना प्रकाशचित्रण आणि प्रवासाची आवड आहे. आविष्कार आणि गिरीमित्र आयोजीत स्पर्धांमध्ये पारितोषीक मिळवली आहेत.


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे

आजचे युग आहे विज्ञानाचे, यंत्रांचे. या प्रगतीने आपल्याला अनेक ऐषोआराम, सोयी दिल्या. पण त्याचबरोबर धावपळीचा, स्पर्धेचा शापही दिला. हा शाप सगळ्या सुविधा नीट उपभोगू देत नाही. धावपळीने, स्पर्धेने आपल्याला पूर्णपणे वेढून टाकले आहे. अस्थिरतेने आपला फास आपल्यावर असा टाकलाय, की प्रत्येकजण नुसता धावतोय कशाच्या ना कशाच्या मागे. म्हणूनच आपले पाय निसर्गाकडे सहज वळत नाहीत. छंदाची गरज इथेच आहे. एखादा मनापासून जोपासलेला छंद आपल्या मनातला फुलांचा ताटवा टवटवीत ठेवतो. हा ताटवा, ही फुललेली बाग आपल्याला नवनिर्मितीचा, प्रफुल्लित राहण्याचा, प्रसंगी पुनरुज्जीवनाचा मार्ग दाखवतात. छंद जोपासलेल्या मनाचे डोळे नदीकाठावर, माळावरच्या हिरव्या-करड्या पाऊलवाटेवर, इवल्याशा फुलांवर, तर कधी आकाशातल्या विविध रंगछटांना, त्यातल्या विभ्रमांना शोधत असतात. छांदिष्ट नजरेला निसर्गाचा सगळा खजिना, माणसांमधली गूढरम्यता, त्यांचे वेगळेपण अनुभवता येते. प्रत्येकामध्ये सृष्टीच्या अनेक अद्भुत संवेदना ग्रहण करण्याची उपजत शक्ती असते. मात्र रोजची धावपळ, स्पर्धा, हव्यास ही प्रेरणा मालवत नेते. छंद मात्र ही प्रेरणा जागवतच नाहीत, तर ती अजून प्रज्वलित करतात. एक निराळीच ओढ आपल्याला व्यापून टाकते. मग तो छंद कुठलाही असो.

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे

बालकवींच्या या शब्दातला विलक्षण आशय मग कोणी आपल्याला शिकवायची गरज भासत नाही. निसर्गातले सगळे रंगीबेरंगी कोलाज आपल्याला नुसते रूपात दिसत नाहीत, तर सतारीच्या सुरांसारखे मनात झंकारत जातात. मग कुणी पोस्टाची तिकीटे जमवतो. तर कुणी इवल्याशा फुलांशी संवाद साधतो. कुणी निसर्गाचे चित्र कुंचल्यातून साकारतो.


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे

तर कुणी सुरावटी सोबत सुखाच्या लहरींवर तरंगतो. कुणी तासन्तास मचाणावर बसून जंगलातलं विश्व न्याहाळतो. तर कुणी मनाने आभाळात भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालणाऱ्या पक्ष्यांना कॅमेऱ्यातून चितारतो. कितीतरी अगणित छंद. मलाही असाच एक छंद मिळाला. त्या छंदाने माझं मन दिवाळीतल्या दिव्यांच्या प्रकाशासारखं उजळलं.

मी काही वर्षांपूर्वी माझ्याकडे असलेला साधासा कॅमेरा घेऊन फोटो सर्कल सोसायटीमध्ये सामील झाले. या संस्थेत असलेल्या काही व्यावसायिक तसेच काही हौशी प्रकाशचित्रकारांची प्रकाशचित्रे पाहण्याचा अनुभव घेतला. अजूनही घेतेय. याव्यतिरिक्त निरनिराळ्या प्रकाशचित्र प्रदर्शनांना भेटी दिल्या. तसे करताना मी एकेक प्रकाशचित्र खूप बारकाईने पाहत असे. प्रत्येक चित्रातील भाव कळतच होता असे नाही. परंतु तो समजून घेण्याचा माझा प्रयत्न असे. एखादे प्रकाशचित्र कसे पाहावे, त्याचा आस्वाद कसा घ्यावा, पाहताक्षणीच ते चांगले आहे, की वाईट, असे विधान करावे का? की अर्थ लागत नसेल तर पुन्हा पुन्हा पाहावे? त्या प्रकाशचित्राच्या depth पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, की केवळ उठून दिसणाऱ्या रंगांवरच भुलावे? या आणि अशा अनेक प्रश्नांनी आणि त्यावर जेष्ठ प्रकाशचित्रकारांकडून मिळालेल्या उत्तरांनी माझा चित्रे समजून घेण्याचा, मनात साठवण्याचा, कलेच्या आविष्काराने झपाटले जाण्याचा प्रवास सुरु झाला .

कॅमेरा कोणताही असो, प्रकाशचित्र टिपण्यामागे कोणता हेतू आहे हे जास्त महत्वाचं आहे असे म्हटले जाते. ते काही अंशी खरेही असावे; परंतु पूर्ण सत्य नाही असे मला वाटते. एखादे प्रकाशचित्र सुंदर आहे असं म्हणताना त्यात कितीतरी गोष्टींच्या सौंदर्याचा वाटा असतो. प्रकाशचित्र टिपण्याच्या वेळची परिस्थिती पूरक, आदर्श असेल, तर कोणत्याही कॅमेऱ्याने काढलेलं प्रकाशचित्र मनासारखं मिळू शकते; परंतु तेच जर उलट असेल, आपल्याला अपेक्षित असा परिणाम साधणारा प्रकाश, परिस्थिती अथवा मांडणी प्रत्यक्षात नसेल तर मात्र कल्पक प्रकाशचित्रांसाठी चांगल्या उपकरणाची गरज भासते. आणि चांगलं उपकरण म्हणजे चांगला कॅमेरा, चांगली लेन्स. हे कॅमेरे, लेन्स वापरायचे तंत्र अवगत


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे

करून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्या नवनवीन कल्पना प्रकाशचित्राच्या रुपात मांडता येतील. ज्येष्ठ प्रकाशचित्रकारांकडून वेळोवेळी ऐकलेय, की तांत्रिक ज्ञान गरजेचे आहे, तसेच अपेक्षित प्रकाशचित्राची फ्रेम सुद्धा आपल्या डोक्यात पक्की असायला हवी. थोडक्यात, कशाचे प्रकाशचित्र काढायचे हे माहिती आहे आणि कसे काढायचे हेही कळले तर मनातल्या भावनांना प्रकाशचित्राच्या आधारे मूर्तस्वरूप देणं नक्कीच शक्य होते. प्रकाशचित्रणाच्या माध्यमातून संवाद साधता येतो.

तसे पाहता प्रकाशचित्रणाचे अनेकविध प्रकार आहेत. प्रकाशचित्रांच्या व्यक्त होण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु अनेक प्रकाशचित्रं पाहिल्यानंतर, माझ्या छोट्याशा अनुभवावरून मला जाणवले, की प्रकाशचित्रांचे मुख्य दोन प्रकार असू शकतात. पहिला प्रकार, (instant visual impact ) लक्ष वेधून घेणारे, पाहताक्षणीच अर्थ समजणारे आणि दुसरा प्रकार म्हणजे निरीक्षणानंतर अर्थबोध होणारे, हळूहळू उलगडणारे. प्रत्येक चांगले प्रकाशचित्र हे प्रकाशचित्रकाराच्या मनातील भावनांचं प्रतिबिंब असते. प्रकाशचित्रकार प्रकाशचित्रातील रंग, पोत, मांडणी, नाट्य, कथा याद्वारे जर दर्शकांसोबत संवाद साधू शकला, प्रवास करू शकला, तर त्याची ती कलाकृती दर्जेदार ठरते. काही प्रकाशचित्रं माहितीपूर्ण असतात. त्यात ऑब्जेक्टचे बारकावे स्पष्ट दिसणं अपेक्षित असते. तर काही प्रकाशचित्रं धूसर असतात. परंतु त्यात एक्स्प्रेशन्स असतात, स्वतःचा असा मूड असतो, जो दर्शकाला एका निराळ्या विश्वात नेऊन ठेवतो, स्वप्नांची अनुभूती देतो, तणावाकडून तरलतेकडे पोहोचवतो.

कोणताही छंद जोपासताना त्यासाठी विशेष वेळ देणे क्रमप्राप्त असतं. ऑफिसच्या वेळा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सण -समारंभ, कुटुंबियांचे आणि स्वतःचे आरोग्य अशी एक ना अनेक व्यवधानं सांभाळून जेव्हा आपण आपल्या छंदासाठी वेळ काढतो, तेव्हा या सगळ्या जबाबदारींचे असलेले अदृश्य असे ओझे कुठल्याकुठे नाहीसे होते. अनेकजणांचा प्रश्न असतो, की वेळ कसा मिळतो फोटोग्राफी साठी? याला माझं एकच उत्तर आहे, की आवड असली, की सवड मिळतेच! 'प्रकाशचित्रण' कलाक्षेत्र हे बऱ्यापैकी पुरुषप्रधान क्षेत्र आहे


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे

असे म्हटले जाते. प्रकाशचित्रणकलेच्या जोपासनेसाठी कल्पनाशक्ती, अभिरुचीसंपन्न दृष्टी, प्रयत्नातील सातत्य, चिकाटी, निरीक्षणशक्ती , स्वसंरक्षण सामर्थ्य आणि अर्थातच प्रकाशचित्रण कलाशास्त्राचे तांत्रिक ज्ञान हे गुण आवश्यक आहेत. माझ्या विश्वासानुसार वरील सगळे गुण महिलांमध्ये थोड्याफार फरकाने जन्मजात असतातच. राहिली गोष्ट तांत्रिक ज्ञानाची. असा समज आहे, की महिलांना अथवा मुलींना तंत्रज्ञानाची जाण कमी असते. परंतु या समजुतीवर मात करणाऱ्या अनेक महिला आज आपल्याला अनेक क्षेत्रांत आघाडीवर दिसतात. त्यामुळे तंत्राचा बागुलबुवा न वाटून घेता ते आत्मसात करण्याचा मनापासून प्रयत्न केला, तर अपेक्षित रिझल्ट मिळवणे शक्य होते.

कॅमेरा हे माध्यम आहे, भावना व्यक्त करण्याचे. त्यातील बारकावे समजून घेऊन आपण नक्कीच आपल्या प्रकाशचित्रात हवा तो परिणाम साधू शकतो. प्रकाशचित्रणकलेचा उपयोग निखळ आनंद मिळवण्यासाठी जसा होतो, तसाच आपल्या मनातील विविध भाव-भावना व्यक्त करण्यासाठीही होतो. याच विचारांतून जन्मास आलेल्या फोटो सर्कल सोसायटीच्याच्या 'विद्युल्लता' या उपक्रमाविषयी इथे मुद्दाम सांगावसे वाटते. अनेकविध क्षेत्रांत असामान्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचे कष्ट, त्यांच्या कष्टांना मिळालेले यश प्रकाशचित्रांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी महिला प्रकाशचित्रकारांनी आपले प्रकाशचित्र कौशल्य पणाला लावावे यासारखी दुसरी आनंदाची, अभिमानाची बाब नसावी. या प्रवासात आम्हां सर्व महिला प्रकाशचित्रकारांच्या टिम चे निरनिराळ्या कार्यकुशल सखींशी अनुबंध निर्माण होत आहेत. प्रत्येकीचं बहुआयामी व्यक्तिमत्व जीवनाला स्फूर्ती देणारं ठरतेय. छंदाच्या रुपानं स्वत्त्व गवसतेय. 'विद्युल्लता'च्या प्रवासातला एक अनुभव इथे लिहावासा वाटतो. अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या नसीमा दीदी हुरजूक यांचे कार्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आम्ही कुडाळला गेलो होतो. तिथे जाण्यापूर्वी त्यांचं 'चाकाची खुर्ची' पुस्तक वाचले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याच्या व्याप्तीची कल्पना होती. अपंग साहाय्य केंद्रात जाताना मी थोडी भावूक झाले होते. अपंग व्यक्तींचे फोटो कसे काढावेत? त्यांना ते आवडेल का? अशा विचारांनी मनात काहूर माजवले होते; परंतु आम्ही त्यांच्या 'स्वप्ननगरी'त पाऊल ठेवल्यापासून ते तिथून निघेपर्यंतचा अनुभव फार वेगळा होता. नसीमा दिदींनी तिथल्या सगळ्या सदस्यांची ओळख करून दिल्यानंतर प्रथमदर्शनी मनात वाटणाऱ्या सहानुभूतीची जागा त्यांच्याविषयीच्या कौतुकाने कधी घेतली ते कळलेच नाही. आम्हांला भेटून त्यांना झालेला आनंद अजूनही चांगलाच स्मरणात आहे. आपल्या संस्थेची,


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे

तिथल्या कामकाजाची माहिती देताना त्यांच्यात दिसणारा उत्साह लाखमोलाचा होता. आपण आपल्या पायांवर, स्व-बळावर उभे आहोत ही जाणीव त्यांना आत्मविश्वास देणारी होती. नसीमा दीदी स्वतः wheel -chair वर असताना अनेक अपंग व्यक्तींसाठी भक्कम आधार बनल्या आहेत हे प्रकर्षाने जाणवले. आम्ही फोटोग्राफी करून तिथून निघालो ते "आपल्याला लहान-सहान गोष्टींसाठी तक्रार करण्याचा अजिबात अधिकार नाही" हे मनोमन ठरवूनच.

गेल्या तीन-चार वर्षांपासून माझ्या फोटोग्राफीच्या छंदाने माझ्या मनाला टवटवीत ठेवलेय. किती वेगवेगळ्या लोकांविषयी मला माहिती झाली. त्यांचे जगावेगळे कार्य, नि:स्वार्थीपणा, विचारांची उत्तुंगता मला जवळून बघता आलीच. शिवाय त्यांचं कार्य फोटोद्वारे चितारता देखील आलं. हे फोटो तर काढताना माझ्या नजरेची क्षितिजंही विस्तारली गेली. त्या ओघात लिखाणाची उर्मी साक्षात्कार व्हावी तशी झाली. कधी मनात विचारदेखील केला नव्हता. पण काही लेख लिहिले गेले. आणि प्रतिष्ठित वर्तमानपत्रात छापून देखील आले. छंदाची किमया अशी विलक्षण आहे. आणि हे सगळं, छंद जोपासला तर करायला मिळेल असा पुसटसादेखील विचार मनात नव्हता.


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे

मी आपली जमेल तसा छंद जोपासत गेले. मनात नक्की प्रबळ इच्छा होती. त्यामुळे चुका झाल्या तरी अधोरेखित न करता प्रामाणिकपणाने समजावणारे मिळत गेले . मला कळलेच नाही, की कधी मला त्यातले थोडेसे अधिक जाणवायला लागले ते! खऱ्या अर्थानं माझा फोटोग्राफीचा छंद माझे जीवनगाणे झाले. मला माझ्या छंदाविषयी काय वाटते हे सांगताना कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेचेच हे समर्पक शब्द आठवतात -

माझे जीवनगाणे, माझे जीवनगाणे
कधी ऐकतो गीत झऱ्यातून,
वंशवनाच्या कधी मनातून,
कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून
झुळझुळतात तराणे.

गा विहगांनो माझ्या संगे
सुरांवरी हा जीव तरंगे.
तुमच्यापारी माझ्याही स्वरांतून
उसळे प्रेम दिवाणे, माझे जीवनगाणे.


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे


गा विहगांनो माझ्यासंगे! सतेजा राजवाडे, ठाणे
मागील लेख पुढील लेख