1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

कशी नशिबाने थट्टा मांडली

वेदवती पडवळ
जे जे इन्स्टिटयूट ऑफ अफ्लाइड आर्ट मधून प्रकाशचित्रण हा विषय घेऊन पदवीधर झालेल्या वेदवती पडवळ या व्यवसाय म्हणून स्वत:चा फोटोग्राफी स्टुडियो सांभाळतात. तसेच छंद म्हणून वन्यजीव प्रकाशचित्रणही करतात. विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि ऑनलाईन स्पर्धांमध्ये त्यांना अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. तसेच वेळोवेळी त्यांची प्रकाशचित्रे वेगवेगळ्या प्रदर्शनातही मांडली गेली आहेत. इतक्या कमी वेळात त्यांनी मिळवलेले नाव आणि यश नक्कीच गौरवास्पद आहे.


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे

वन्यजीव फोटोग्राफी करताना बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तुमची समयसूचकता, कॅमेरावरील तुमचा पक्का हात, तेव्हाचा उपलब्ध असलेला प्रकाश, योग्य वेळी तुमचा फोटो क्लिक होणं वगैरे वगैरे. पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचे असते ते तुमचे नशीब. त्या नशिबाची साथ असेल, तरच तुम्हाला वन्यजीवन बघायला मिळते आणि वन्यजीवन दिसले, तरच तुम्ही त्याची फोटोग्राफी करू शकता. माझ्याबाबतीत तर या नशिबाने मला बऱ्याच वेळा हुलकावणी दिली आहे. आता मला या गोष्टीची इतकी सवय झाली आहे, की मी आता नशिबालाच आव्हान देते. तू साथ दे किंवा नको देउस; मी मात्र वारंवार जंगलात जाणार आणि जे दिसेल त्याची फोटोग्राफी करणार आणि त्यातच आनंदी राहणार.

नशिबाने कधी कधी मला कशी साथ दिली नाही, त्याचे अनुभव सांगण्यासाठी हा लेखाप्रपंच !

मे २००८. कान्हा आणि जिम कॉर्बेट अशा दोन राष्ट्रीय उद्यानांना भेटी देण्याचा दहा दिवसांचा कार्यक्रम होता. त्यात कान्हाला दहा आणि जिम कॉर्बेटला सहा अशा एकूण सोळा पार्क राउंड आम्ही करणार होतो. सर्वप्रथम आम्ही कान्हाला पोहोचलो. आमच्या एकूण सहा जीप्स होत्या. आम्ही सगळे फोटोग्राफर एका जीप मध्ये होतो. आमची पहिली पार्क राउंड झाली. आम्हाला काही व्याघ्रदर्शन झाले नाही. हॉटेलवर आलो, तर बाकीच्या पाच जीप्सना मात्र मस्त वाघ दिसला होता. आमची जाम निराशा झाली. पुढच्या तीन पार्क राउंड झाल्या. त्यातही आमच्या जीपला सोडून बाकीच्या दोन-तीन जीप्सना वाघ दिसत होता आणि आम्ही मात्र निराश होत होतो.

कान्हाला काही sighting होत नाही, म्हणून आम्ही बांधवगडला जाऊन नशीब अजमावयचे ठरवले. पण हाय! वाटेत पाऊस पडायला सुरवात झाली. पाऊस पडला, की वाघ दृष्टीस पडणे कठीण! दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पार्क राउंडला गेलो, तर जंगलात गाडीच बंद पडली. खूप वेळ प्रयत्न करूनही सुरु झाली नाही. मग येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे

गाडीत आमच्यापैकी एकेक जण बसला आणि आम्ही जंगल फिरून आलो; पण वाघ काही दिसला नाही. तीन पार्क राउंड झाल्या, पण शेवटी चौथ्या पार्क राउंडला नशिबाची साथ लाभली आणि वाघ दिसला. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं व्याघ्रदर्शन! सलग आठ पार्क राउंड नंतर मला वाघ दिसला होता. मग झालेला आनंद काय वर्णावा!

पुढच्या वर्षी म्हणजे २००९ मध्ये मी परत बांधवगडला भेट दिली. यावेळी आम्ही अकरा पार्क राउंड करणार होतो. आम्ही संध्याकाळी बांधवगडला पोहोचलो आणि आमच्या जीप ड्रायवरने आनंदाची बातमी दिली, की बांधवगड मधील राजबेहरा dam मध्ये एक वाघीण आणि तिची चार पिल्ले रोज खेळत असतात. नुकत्याच केलेल्या पार्क राउंडला तो त्यांना बघून आला होता. एक-दोन नव्हे, तर चक्क पाच वाघ बघायला मिळणार ह्या आनंदातच आम्ही झोपलो. सकाळी लवकर उठून उत्साहाने पार्क राउंडला निघालो. राजबेहरा dam पाशी येऊन जीप उभी केली. बराच वेळ झाला, पण वाघीण आणि तिची चार पिल्ले काही येईनात. खूप वेळ वाट पाहून निराश मनाने आम्ही माघारी परतलो. हॉटेलवर आल्यावर खबर मिळाली, की एक नर वाघ त्या हद्दीत आल्यामुळे वाघिणीने तिची पिल्ले आत लपवून ठेवली. नंतर प्रत्येक पार्क राउंडला 'आज तरी वाघीण पिल्लांना घेऊन पाण्यात खेळायला येईल' या अपेक्षेने आम्ही dam पाशी जायचो, पण वाघीण काही आली नाही. आमच्या अकरा पार्क राउंड अशाच निष्फळ ठरल्या. आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि जबलपूर स्टेशनला पोहोचायच्या आतच आमच्या जीप ड्रायवरचा फोन आला, की संध्याकाळच्या पार्क राउंडला वाघीण आणि तिची चारही पिल्ले खेळताना दिसली. म्हणजे आम्ही पोहोचलो त्याच्या आधीच्या आणि निघालो त्या नंतरच्या पार्क राउंडमध्ये ही वाघीण व चार पिल्ले पाण्यात खेळली; पण आम्ही ज्या अकरा पार्क राउंड केल्या त्या एकाही वेळी दिसली नाहीत.


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे

पाच वाघ एकत्र बघायचं स्वप्न अपूर्णच राहीलं. नशिबाने केलेली थट्टा, दुसरे काय?

अर्थात जंगलात प्रत्येकवेळी वाघ दिसलाच पाहिजे, असा माझा अट्टाहास नसतो. इतर प्राणी, पक्षी यांची फोटोग्राफी मी करत असते; पण शेवटी जंगलचा राजा वाघ बघून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. आम्ही २०१०मध्ये पेंच नॅशनल पार्कमध्ये जाऊन अकरा पार्क राउंडस करणार होतो. पेंचच्या सलग नऊ पार्क राउंडस झाल्या, पण इतर प्राणीसुद्धा काही दर्शन देईनात. संपूर्ण जंगलाने जणू संप पुकारला होता. शेवटच्या दोन पार्क राउंडस रद्द करून आम्ही ताडोबाला गेलो, पण तिथेही तोच प्रकार! पहिल्या दोन पार्क राउंड फुकट गेल्या. तिसऱ्या पार्क राउंडला एक पाणवठ्याजवळ गाडी उभी केली. खूप वेळ वाट पाहूनही काही दिसेना, म्हणून एक राउंड मारून परत त्या पाणवठ्यापाशी आलो. थोड्याच वेळात एक मारुती गाडी तेथे आली आणि तिच्यातले लोक आम्हाला सांगू लागले, की त्यांनी नुकताच एक वाघ आणि एक बिबट्या पाहिला आणि तोही असा, की गाडीतले उजव्या बाजूचे लोक वाघ बघतायेत आणि डाव्या बाजूचे लोक बिबट्या पाहताहेत. त्यांनी जो रस्ता सांगितला, त्याच रस्त्यावरून आम्ही राउंड मारून परत पाणवठ्यापाशी येउन उभे होतो. फक्त दहा मिनिटांच्या फरकाने आम्ही या अभूतपूर्व दृश्य बघितलं नव्हतं. त्या गाडीतल्या कोणाकडेही कॅमेरा नव्हता. जाता जाता एखादी पार्क राउंड करून जाऊ म्हणून ते आले होते आणि त्यांना वाघ-बिबट्या दोघही दिसले. आम्ही मात्र नुसतं सुनसान जंगल पाहत बसलो होतो. दुर्दैव! दुसरं काय?

जुलै २०११ केनियाच्या जंगलसफरीला जायचं नक्की झालं आणि माझा आनंद गगनात मावेना. ही माझी पहिलीच इंटरनॅशनल वाईल्डलाईफ टूर , जिथे जाण्याचे सर्व वन्यजीव प्रकाशचित्रकारांचे स्वप्न असते, ते हे ठिकाण! माझही स्वप्न पूर्ण होणार होतं. तिथल्या प्राणी, पक्ष्यांचा अभ्यास सुरु केला, माहिती गोळा केली आणि अखेर जाण्याचा दिवस उजाडला. आम्ही रात्री बारा वाजता एअरपोर्टवर पोहोचलो आणि फ्लाईट कॅन्सल झाल्याचे समजले. आम्ही ज्या एअरलाईन्सने जाणार होतो, तिचा अचानक संप सुरु झाला होता. झाले, आता आमचे खरेच बारा वाजले होते. आता आमच्या केनिया ट्रिपचे काय होणार? आमची मुंबईच्या एका हॉटेलमध्ये सोय करण्यात आली; पण मन सैरभैर होतं.


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे

आपण केनियाला जाणार, की नाही, ते कळत नव्हतं. तो संपूर्ण दिवस आम्ही हॉटेलमध्येच अस्वस्थतेत काढला. दुसऱ्या दिवशी पहाटे फोन आला. एअरलाईन्सने पर्यायी व्यवस्था केली आणि शेवटी आम्ही केनियाला पोहोचलो. अकरा दिवसांच्या ट्रीपपैकी दोन दिवस आमचे मुंबईतच गेले होते; पण नंतरच्या दिवसांत मात्र फोटोग्राफी छान झाली.

आणि आता दोन महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रसंग ! मी भावाकडे अमेरिकेला गेले होते. मला 'अमेरिकेतले एक तरी नॅशनल पार्क दाखव' म्हणून मी भावाला सांगितले होते. यलोस्टोन नॅशनल पार्क हे जगातले सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोठे नॅशनल पार्क आहे. तेच बघण्याचे आमचे ठरले. भावाने पाच दिवसांचा कार्यक्रम आखला. सगळे बुकिंग झाले. न्यूयॉर्क ते डेनवर आणि डेनवर ते जॅक्सन बो (jakson bow) एअरपोर्ट असे दोन विमानप्रवास होते. आम्ही न्यूयॉर्कच्या ला’ गाडिया एअरपोर्टवर पोहोचलो आणि समजले, की आम्ही ज्या विमानाने जाणार होतो, ते विमान उशिरा येणार आहे आणि त्यामुळे पुढचे कनेक्टिंग फ्लाईट पकडता येणार नाही. काउन्टरवर मी आणि माझा भाऊ उभे होतो. पर्यायी व्यवस्था होऊ शकत नसल्याने रिसेप्शनिस्टने आम्हाला दुसर्या दिवशीच्या विमानाने जाण्याची विनंती केली. भावाने माझ्याकडे पहिले. मी शांतपणे 'ओके' म्हणून मान डोलावली. दुसऱ्या दिवशीच्या विमानाची तिकिटे घेऊन आम्ही काऊन्टर सोडले. बाहेर पडल्यावर भावाने विचारले, ''तू इतक्या शांतपणे कसं काय ओके म्हणालीस? आपल्या पाच दिवसांच्या ट्रीपमधला एक अख्खा दिवस कमी होतो आहे.'' मी उत्तर दिलं, "मला ह्या सगळ्याची आता सवय झाली आहे. नशिबात जे असेल तेच होणार.''

वन्यजीव प्रकाशचित्रणादरम्यान उत्कृष्ट फोटो मला मिळाले त्यासाठी माझ्या नशिबानेच मला साथ दिली आहे, हे मी जाणून आहे; पण अजून थोडी साथ नशिबाने दिली असती, तर अजून काही दुर्मिळ, चांगले प्रसंग मी कॅमेराबद्ध करू शकले असते, असं राहून राहून मनात येतं. असो, हेही नसे थोडके!


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे


कशी नशिबाने थट्टा मांडली वेदवती पडवळ, ठाणे
मागील लेख पुढील लेख