1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

'रेघोट्या'

स्वप्नाली मठकर
इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी घेऊन 14 वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करताना प्रकाशचित्रणाची आवड सातत्याने जोपासत आहे. आविष्कार आणि ऑन लाईन प्रकाशचित्रण स्पर्धेतली पारितोषीके विजेती. मराठीतून प्रकाशचित्रणाबद्द्दल ब्लॉग लिहीत असून सोबत बालकथा लिहीण्याचाही छंद जोपासते.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

लहान मुलांना रंगीत खडू दिले, की मुलं कागदावर रेघा ओढतात. रंगीत खडूने गिरगिटवून ठेवतात. तेव्हा, अगदी बोलता येत नसले, तरी रेघा ओढायला त्यांना नक्कीच आवडते. बोलता यायला लागल्यावर त्या रेषांना नावे फुटतात. आपल्यासाठी त्या अगम्य असल्या, तरी त्यांच्यासाठी त्या रेघा म्हणजे चिमणी, घर, हत्ती, मासा असे काहीही असू शकते. रेषांतून आकार शोधण्याचा हा पहिला प्रयत्नच म्हणा ना. जरा मोठं झाल्यावर मात्र चिमणीसारखी चिमणी, माणसासारखा माणूस जमला नाही, की चित्रकलेपासून मुलं दूर दूर जात राहतात. मोठं होऊनही रेषांतून आणि रंगातून आकार शोधणे किंवा आकार तयार करणे या गोष्टी जमायला हव्यात, असं नाही वाटत?

फोटोग्राफी हे चित्रकलेपेक्षा वेगळे क्षेत्र वाटले, तरी नीट विचार केला, तर हे ही प्रकाशाने चित्र काढणेच आहे. फोटोग्राफी करता करता केव्हातरी ते मला जाणवले. रंग आणि रेषांशी तशी लहानपणापासूनच जवळीक होती. त्यामुळे फोटोग्राफीशी सहज मैत्री झाली. माझी आवडती निसर्गचित्रे, इमारती इत्यादींचे फोटो काढता काढता मला जाणवले, की आपल्याला रचना (पॅटर्न), सममिती आकार (सिमिट्री), रेषा शोधण्याचा एक वेगळा छंदही आहे. निसर्गात किंवा मानवनिर्मित जगातही अनेक सममित आकार, रचनात्मक आकार असतातच. अशा रेषा आणि रंगांनीच तर निसर्ग बनतो, आकार बनतात. कधी या रेषा वेड्यावाकड्या धावणाऱ्या असतात, तर कधी त्या या टोकापासून त्या टोकापर्यन्त आरपार जाणाऱ्या सरळसोट असतात. कधी स्वत:शीच गिरकी घेऊन वाटोळ्या वाटोळ्या फिरत जाणाऱ्या असतात, तर कधी एका बिंदुतून निघून चहू दिशांना पसरलेल्या असतात.

रेषा आहेत म्हणुन आकार आहेत. आकार आहेत, तर त्याना रंगही आहेत. प्रकाशाचे खूप असणे म्हणजे पांढरा रंग, तर प्रकाशाचे अजिबात नसणे म्हणजे काळा रंग. या पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या मध्ये आहेत त्या रंगांच्या अगणित छटा. आणि त्याच्या दुसऱ्या प्रतलावर आहेत वर्णछटा. या एक एक वर्णछटा एका एका रंगाला पुन्हा अगणित छटांमध्ये दाखवतात. काय किमया आहे निसर्गाची हे तोच जाणे. आणि


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

तरीही आपण मनुष्यप्राणी डोळ्यांनी जे रंगपटल पाहू शकतो, ते अगदी छोटे आहे. निसर्गाच्या खऱ्या रंगांचा पसारा नक्की केवढा आहे याचा अंदाज बांधणे कठीणच.

या रेषा आणी रचनात्मक आकार शोधून त्यांचे फोटो घ्यायचे ही एक वेगळीच गंमत मला जाणवली. हे फोटो नेहेमीच तांत्रिक नियमांमध्ये बसतील असे नाही. कधी ते परफेक्ट सिमिट्रीला ब्रेक करायच्या नियमालाच ब्रेक करतील, तर कधी ‘रूल ऑफ थर्ड’ला धुडकावून लावतील. पण हे नियम आहेत म्हणून तर त्यांना थोडे वाकवून, तर कधी चक्क तोडूनच चित्रनिर्मिती करण्यात मजा आहे. नियम तोडणाऱ्या या फोटोंना सर्वसामान्य जगात काही मान्यता नसेल, त्यांना काही कमर्शियल व्हॅल्यू नसेल, अगदी स्पर्धांमधेही असे फोटो फारसे स्वीकारले जातीलच असे नाही. पण तरिही हे आकार, या रेषा आणि त्यांच्यातले समतोल शोधून त्यांचे फोटो मी काढते.

मी एखादा फोटो काढते, तेव्हा मला ते दृश्य बघताना आलेल्या अनुभवाची पुनर्निर्मिती करायची असते. आय क्रिएट एक्स्पिरियन्सेस. उदा. एका स्टेशनवरून जाताना मला हिरव्या बाटल्या मांडून ठेवलेली एक काचेची शोकेस दिसली. कामाच्या धकाधकीत शेकडो जण त्या शोकेस समोरून गेले असतील. क्वचित कुणी जाताजाता क्षणभर या परफेक्ट समतोल रचनेकडे पाहिलेही असेल. अगदी माझ्याबरोबर असणारे डिझाईनचे विद्यार्थीही ही शोकेस दुर्लक्षित करून पुढे निघून गेले. मात्र असे समतोल आकार आणि रंग शोधणाऱ्या माझ्या दृष्टीला ती शोकेस फारच आकर्षक वाटली. हातात छोटा पॉइंट अँड शूट कॅमेरा होता. त्यात हे आकार चित्रबद्ध केले. नंतर त्या दिवशी माझ्याबरोबर असणाऱ्यांना हा फोटो दाखवल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले, की ही शोकेस त्यांना दिसली कशी नाही.

या फोटोला फोटोसर्कलच्या स्पर्धेत बक्षीस मिळाले.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

गाड्यांचे हेडलाईट्स ही तर नेहेमीच्या बघण्यातली गोष्टं! पण कधी लक्ष देऊन पाहिलं, तर ते गाडीला चेहऱ्याचा भास देतात. लहानपणी तर मी गाडीच्या हेडलाईटवरून गाडीचा स्वभाव (!) मनाशी ठरवायचे, हे आठवले की हसू येतेच. म्हणजे वाळू वाहून नेणारा जुनाट ट्रक आठवतोय? त्याचे हेडलाईट्स रागावल्यासारखे असत, म्हणून तो चिडका ट्रक वाटायचा वगैरे. पण आताच्या नव्या महागड्या गाड्यांचे हेडलाईट्स पाहिलेत, तर ते अतिशय कलात्मक दिसतात.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

कधी बिना साखर दुधाची नुकतीच ब्रु करून फेसाळत, वाफाळत कपात ओतलेली काळी कॉफी पाहिलीत, तर तिच्यावर असंख्य बुडबुडे दिसतील. हे चमकणारे बुडबुडे एकमेकांना चिकटून, धक्के देत, गर्दी करत आहेत असे वाटते. हे बुडबुडे आठवून पुढच्या वेळी तुमच्या कॉफीची मजा अधिक वाढणार हे नक्की!


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

आरस्पानी पाण्यात डोकावून पहाणारे डोंगर आणि त्यांच्या सोबतीला असणारा एक पूल असे एक छान दृश्य, त्याच्या प्रतिबिंबामुळे समतोल रचना मांडते. निसर्ग आणि मानवनिर्मित गोष्ट यांचा योग्य बॅलन्स आणि समतोल रचना हे विरळाच दिसणारे दृश्य मला नानताइ सरोवराजवळ दिसले.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

एरवीही ट्रेनने किंवा गाडीने जाताना आपल्याला पुढे बसायला आवडते. ट्रेनमध्ये ट्रेन-ड्रायवर असल्याने ते शक्य होत नाही. मात्र मोनोरेलमधून जाताना असे पुढे उभे रहाणे शक्य झाले. रेनबो ब्रिजच्या आतून जाताना ट्रेनचा वेग आणि ब्रिजचे रेलिंग्ज यामुळे जो भन्नाट वेगाचा अनुभव आला, तो या ट्रेनच्या फोटोमध्ये चित्रबद्ध करायचा प्रयत्न केला.

या फोटोला फोटोसर्कल सोसायटीच्या स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

वर्तुळाकार जिने ही माझ्यासाठी एक गंमतीची आणि किंचितशी धडकी भरवणारी गोष्टं. या गोलगोल जाणाऱ्या जिन्यांचे कठडे फार सुरेख दिसतात. आणि सुंदर स्पायरल पॅटर्न तयार करतात. या जिन्यांचे फोटो पहाताना नजर कधी त्या जिन्यांवरून अलगद वरखाली करायला लागेल हे कळणारही नाही.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

समोरून काढलेला आयफेल टॉवरचा फोटो सगळ्यांनी नक्कीच पाहिला असेल. पण या टॉवरच्या खाली गेलात आणि बरोब्बर मध्यावर उभे राहून वर पाहिलेत, की एक वेगळेच दृश्य दिसेल. मध्ये मध्ये आकाशाचे निळे तुकडे आणि त्यांना फ्रेम करणारा नक्षीदार अष्टकोन, त्याच्या बाहेरचा चौरस आणि असंख्य चौकोनांच्या नक्षीने वाढत जाउन दोन्ही बाजूना गोलाकार महिरप. त्या टॉवरची उंची, त्याची भव्यता हे सगळे विसरायला लावून समोर दिसणारी एक चौकोनी नक्षीदार फ्रेम खरंच फार वेगळी आहे.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

कधी एखाद्या वास्तूत समोर आणि भिंतीवर बघत चालता चालता वर लक्ष गेलं की नेहेमीपेक्षा वेगळं, अनपेक्षित काहीतरी दिसू शकतं. अशीच ही दोन ठिकाणाची छताची नक्षी. एक आहे रोमन साम्राज्याच्या ठळक खुणा असलेले घुमटाकार नक्षीदार छत. छतावरच्या उघड्या गवाक्षातून येणारा सूर्यप्रकाश घुमटाच्या नक्षीला एका वेगळी डेप्थ देतोय. दुसरे आहे मॉडर्न, कॉण्टेम्पररी प्रकारचे एक छत. या छताच्या वळणदार रेघा प्रत्येकवेळी वेगळा पॅटर्न दाखवात. कधी तो उभा खांब वाटतो, तर कधी खोलगट आकार वाटतो. तो नक्की कसा आहे ते न कळण्यातच त्याची गंमत आहे.


'रेघोट्या' स्वप्नाली मठकर, ठाणे

या रेषा, हे आकार, हे रंग बघताना माझ्या मनात जे लयबद्ध तरंग उठतात ते मला जाणवतात. इतरांना ते जाणवतात की नाही याची कल्पना नाही. पण तरीही मला जो अनुभव आला होता, तो माझ्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून दर्शकांपर्यन्त पोहोचवावा असे मला वाटते. अमूर्त प्रकाशचित्रणापेक्षा काहीसे वेगळे असे हे ग्राफिक्स प्रकारातले चित्रण रेषा, आकार, सममिती, रंग यांची अनुभूती देणारे आणि त्याच वेळेस त्यातली गम्मत जाणवून देणारे वाटते. कुठल्याही प्रकारात मोडणारा का असेना, पण काढलेला फोटो बघताना प्रत्येकवेळी त्या अनुभवांची पुनर्निमिती व्हावी असा माझा प्रयत्न असतो. 'आय क्रिएट एक्स्पिरियन्सेस ' माझ्यासाठी फोटोग्राफी म्हणजे अनुभवांची पुनर्निमिती - रिक्रीएटींग एक्स्पिरियन्सेस.

http://www.swapnali.com
http://prakashraan.blogspot.comमागील लेख पुढील लेख