1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

रतिका रामसामी
तामिळनाडूची रतिका रामसामी भारतातली पहिली महिला वन्यजीव प्रकाशचित्रकार आणि या क्षेत्रातले एक महत्त्वाचे नाव आहे. तिने कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करून पुढे एमबीए ची पदवी प्राप्त केली आहे आणि सध्या ती नवी दिल्ली येथे असते. सुमारे दहा वर्षांपूर्वी ती प्रकाशचित्रणाच्या क्षेत्रात आली असून पक्ष्यांच्या प्रकाशचित्रणामध्ये आणि प्रकाशचित्रणातून त्यांच्या नोंदी करण्यामध्ये तिला विशेष रस आहे. भारतातल्या बऱ्याच राष्ट्रीय उद्यानांमध्ये आणि आफ्रिकेतही तिने भटकंती केली आहे. प्रत्येक प्रकाशचित्रामधून काहीतरी कथा सांगण्याचा तिचा प्रयत्न असतो आणि तिच्यामते वन्यजीव प्रकाशचित्रण हा निसर्गाचे संगोपन करण्याचाच वेगळा मार्ग आहे. तिने काढलेली प्रकाशचित्रे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनामध्ये प्रकाशित झालेली असून काही नॅशनल फोटोग्राफिक सलोन्स मध्ये प्रदर्शित झाली आहेत. ती भारतात विविध ठिकाणी वन्यजीव प्रकाशचित्रणाच्या कार्यशाळा घेते आणि त्याविषयी व्याख्याने देते. निकॉन प्रोफेशनल सर्विसेसची ती मेंबर आहे. तिच्या मते कॅमेऱ्याच्या शटरची प्रत्येक क्लिक तिला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेते.

भाषांतर - स्वप्नाली मठकर


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

उत्तराखंडातले जिम कॉर्बेट हे एक अतिशय सुंदर आणि माझं अतिशय आवडतं असं राष्ट्रीय उद्यान. या जंगलात काय नाही?! वर्षभर वाहणाऱ्या नद्या, निळ्या पाण्याची तळी, अस्ताव्यस्त पसरलेली गवताळ माळरानं, घनदाट हिरवे जंगल. हे सगळंच पाहताक्षणीच प्रेमात पडावं असं. त्याशिवाय जैवविविधतेने नटलेल्या या जंगलात सुमारे ६००पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती आहेत. त्यात मत्स्यगरूड (Fish eagle), गिधाडे(Vulture) आणि घुबड( Brown fish owl) यांना पाहण्यासाठी आणि त्यांची प्रकाशचित्रे टिपण्यासाठी बरेच पक्षी निरीक्षक येत असतात.

तसं म्हटलं तर अगदी दाट जंगलात मुक्काम ठोकून जंगल भटकंती करता येण्यासारखी फार कमी ठिकाणं भारतात आहेत. जिम कॉर्बेट राष्ट्रीय वनउद्यान हे त्यापैकीच एक. म्हणूनच मी बऱ्याच वेळा विविध ऋतूंमध्ये या जंगलात भटकंती आणि प्रकाशचित्रणासाठी जाते.

या जंगलात वाघ, हत्ती असे प्राणी पाहायचे असतील तर उन्हाळा सर्वात उत्तम ऋतू. तर विविध पक्षी पाहण्यासाठी थंडीतला काळ हा सर्वात चांगला समजला जातो. या काळात पक्षी सहजतेने दिसतात. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र दर्शनासाठी मस्त स्थळ आहे. तुम्ही नशीबवान असाल तर नक्कीच एकदातरी वाघोबाचे दर्शन तुम्हाला घडेल. मात्र इथले महत्त्वाचे सस्तन प्राणी (mammal) म्हणजे हरणे आणि हत्ती हेच आहेत.


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

मागच्या वर्षी या जंगलात गवताळ माळराने तुडवत जाताना मला हा हत्तींचा कळप दिसला. माझ्याच दिशेने येत असलेल्या या हत्तींच्या कळपाने मला सुरेख फॅमिली फोटो दिला. आपल्या आईसोबत चालणारे, मस्ती करणारे बाळ हत्ती, त्यांना संरक्षण देणाऱ्या, जपणाऱ्या त्यांच्या आया, कळपातले इतर हत्ती बघून खूपच मस्त वाटलं. अगदी आपण माणसं जशी वागतो तसेच हत्तींचेही वागणे आहे असे वाटत होते. संध्याकाळी हत्तींचा कळप नदीकिनाऱ्यावर आला होता. तिथे त्यांची पाण्यातली मस्ती, खेळ, आंघोळ, लुटुपुटूची मारामारी बघून फारच गंमत वाटली.


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

जंगलच्या राजाचा त्याच्या अधिवासात उत्तम फोटो काढायला मिळणे ही प्रत्येक वन्यजीव प्रकाशचित्रकाराची मनापासूनची इच्छा असते. आणि जिम कॉर्बेटमध्ये हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. या जंगलात मी अनेक वेळा वाघ पाहिले त्यांचे फोटोही काढले. पण या वाघाची ऐट मात्र काही निराळीच होती. उन्हाच्या तलखीत गारव्याला आलेला हा वाघ माझ्या समोर अगदी काही फुटांवर समोरच्या तळ्यात मस्त डुंबत होता. मी अगदी भारावल्यासारखी त्याच्याकडे पाहत बसले आणि त्याने मात्र मला बघून देखील अगदी बेदखल केलं. त्याची ऐट आणि रुबाब काही वेगळाच होता.


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

जंगल इतक्या अविश्वसनीय गोष्टींनी भरलेले असते की कुठल्या क्षणी तुमच्यापुढे कुठले नाट्य उलगडेल याचा काही नेम नाही. आणि एकदा दिसलेले नाट्य पुन्हा कधी दिसेल की नाही याचाही काही भरवसा नाही. नेमके दिसलेले ते नाट्य कॅमेऱ्यात चित्रबद्ध करता यावे म्हणून जंगलात असले की मी माझा कॅमेरा नेहमीच तयार ठेवते. अगदी जंगलाच्या सीमेबाहेर येईपर्यंत मी नवीन काहीतरी पाहण्याच्या , टिपण्याच्या तयारीत असते. माझ्या मागच्या जिम कॉर्बेट भेटीत परतीच्या वाटेवर अचानकच मला हे मोर दिसले. अचानक या मोरांनी एकमेकांशी लढत सुरू केली. दोन मोरांना अशा प्रकारे लढताना मी कधीच पाहिले नव्हते. सुमारे वीस मिनिटं त्यांची लढत चालू होती. वीस एक मिनिटांनी दमून भागून ते जवळच्या झुडपात अदृश्य झाले. मात्र या वीस मिनिटात मला अनेक प्रकाशचित्र टिपता आली. एरवी शांततेत जगणाऱ्या या पक्षाच्या लढतीचे असे अविस्मरणीय क्षण मला टिपता आले ही माझ्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे.


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

हिवाळ्यातल्या पहाटेच्या वेळी हलक्या धुक्यातल्या ढिकाळा माळरानात फिरणे हा एक जादुई अनुभव आहे. याच काळात अनेक पक्षी या जंगलात दिसतात. गरूड, गिधाडे आणि घुबड हे पक्षीही इथे सहजतेने दिसू शकतात. अशाच एका पहाटे जंगलात गेट उघडायच्या प्रतिक्षेत असताना पुढचा एक हत्ती दिसला. हा हत्ती त्या झाडाजवळ जाईपर्यंत मी वाट पाहिली आणि मग फोटो काढला. काही काही वेळेस ज्या क्षणी एखादा फोटो काढता त्याच क्षणी त्या फोटोच्या, त्या फ्रेमच्या तुम्ही प्रेमात पडता तसेच काहीसे माझे या फोटोच्या बाबतीत झालेय. यातल्या धुक्यामुळे या फोटोला मिळालेली गूढता मला फारच भावते.

मला या जंगलात बऱ्याच वेळेस ब्राऊन घुबड (Brown fish owl) दिसते. बहुतेकवेळा ते एकाच झाडाच्या एखाद्या दाट फांदीवर लपून बसून झोपा काढताना आढळते. एकदा मात्र ते असे बाहेर उघड्या फांदीवर बसून असलेले दिसले


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

मत्स्यगरूड (Lesser Fish-Eagle) आणि सर्पगरूड (Crested Serpent Eagle) हे दोघेही सकाळच्या वेळेत आपले भक्ष्य शोधताना आढळतात. विस्तीर्ण पसरलेल्या गवताळ माळरानात त्यांना त्यांचे भक्ष्य सापडते. हा असाच एक उन्हात शेक घेत बसलेला मत्स्यगरूड.

जिम कॉर्बेटचं जंगल नेहमीच माझ्यातल्या सर्जनशील प्रकाशचित्रकाराला साद घालते. पहाटे पासून रात्रीपर्यंत सतत इथे काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे घडत असते. इथले सूर्यास्त बघणं आणि त्यावेळी प्रकाशचित्रण करणं हा नेहमीच एक समृद्ध अनुभव असतो. अशाच एका मावळत्या संध्याकाळी रामगंगा नदीच्या काठावर मला हे एकांडे हरीण दिसले. मावळत्या सूर्याच्या प्रकाशाने सोनेरी झालेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर या हरणाचा सिलहाउट फारच मोहक वाटत होता.


लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड रतिका रामसामी, न्यू दिल्ली

असे हे प्रचंड जैववैविध्याने नटलेले सुंदर जंगल माझ्यासारख्या निसर्गप्रेमी, आणि प्रकाशचित्रकाराला भुरळ न घालेल तरच नवल. या जंगलातले प्रत्येक वळण, प्रत्येक रस्ता, प्रत्येक पायवाट तुमच्यासाठी काहीतरी नवीन, अनपेक्षित नाट्य घेऊन येते. एका प्रकाशचित्रकारासाठी यापेक्षा मोठी पर्वणी कोणती!! इथे भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा अगदी योग्य काळ आहे. मात्र वाघ आणि हत्तींच्या प्रकाशचित्रणाकरता एप्रिल, मे आणि जून या काळात जायला हवे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन आहे रामनगर (१९ किमी) आणि दिल्लीहून रामनगरसाठी ट्रेन उपलब्ध आहे. जंगलाच्या आतल्या भागात असलेल्या ढिकाळा झोन मधील फॉरेस्ट रेस्ट हाऊस मध्ये राहून या जंगलाचा खरा थरार आणि सौंदर्य अनुभवता येईल.
मागील लेख पुढील लेख