1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

केरळ - एक अनोखी संस्कृती

अनूप नेगी
भारतातल्या विविध संस्कृती, विविध ठिकाणच्या लोकांचे जीवन यांचे चित्रण करण्याचा ध्यास घेतलेले अनुप नेगी हे डिजीटल फोटोग्राफीच्या सुरुवातीपासून या क्षेत्रात आहेत. त्यांचे फोटो डिस्कवरी पीएलसी, लोनली प्लॅनेट (ऑस्ट्रेलिया), बीबीसी गुड फूड, टूडे (जर्मनी), थॉमस कूक (यूके), सिंगापूर एअरलाईन्स, डिस्कवर इंडीया, प्लॅनेट गोवा मॅगझिन, क्रिएटिव गागा मॅगझिन, हिमालया मॅगझिन अशा अनेक प्रकाशकांनी प्रिंट माध्यमात विविध स्वरूपात वापरले आहे.
सुप्रसिद्ध लेखक अमिताव घोष यांच्या 'द हंग्री टाईड' या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी आणि डेविड यांच्या 'द सॉलिट्युड ऑफ एम्परर्स' या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी नेगी यांचे फोटो वापरले आहेत.
सोनीने प्रायोजित केलेल्या 'वर्ल्ड फोटोग्राफी अ‍ॅवार्ड्स' मध्ये बेस्ट फोटोग्राफर (२००७) आणि बेस्ट फोटोग्राफ स्पोर्ट्स (२००७) ही आणि याव्यतिरिक्तही अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या फोटोग्राफ्सची विविध प्रदर्शनेही भरवली आहेत. विविध मासिकांमध्ये त्यांच्या मुलाखती प्रकाशित झालेल्या असून www.121click.com या वेबसाईटवर भारतातल्या आघाडीच्या २५ फोटोग्राफरमध्ये त्यांचा उल्लेख केला आहे.

भाषांतर - स्वप्नाली मठकर


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

तिथे निळेशार पसरलेले पाणी, स्वच्छ सागरी किनारे, चहाचे मळे असलेल्या टेकड्या, आणि ठिकठिकाणी आतपर्यंत शिरलेले समुद्राचे खारे पाणी असे सगळे आहे. प्रकाशचित्रणासाठी स्वर्ग मानली जाणारी, जगातल्या पहिल्या दहा ठिकाणांत मोडणारी अशी ही अतिशय सुंदर जागा, केरळ !

मात्र केरळ म्हणजे नुसताच देखणा प्रदेश नाही, तर पुरातन संस्कृती आणि आचारविचार यांचा एक अनोखा मिलाफ आहे. इथे सुंदर निसर्गदृष्यांबरोबरच शंभरहून अधिक जणांनी चालवायच्या बोटीची शर्यत, बैलांची शर्यत, लोकनृत्य, थेय्यम, कथकली यांसारखे पारंपारिक नृत्यप्रकार अशा अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत. सार्वजनिकरीत्या साजरे केले जाणारे अनेक हिंदू सण, त्यातल्या सजावटी, शेकडो हत्तींच्या मिरवणुका या गोष्टीही केरळची अनोखी संस्कृती लेऊन येतात. ही भूमी पुरातनकालापासून परदेशी लोकांना इथल्या मसाल्यांसाठी आकृष्ट करत होती आणि आजही तिथे आकर्षित करण्यासारख्या अनेक अद्‌भुत गोष्टी आहेत.

केरळमधल्या मल्याळी लोकांच्या, आपल्या समाजाच्या कक्षातच राहण्याच्या वृत्तीमुळे तिथली संस्कृती, जुन्या चालीरिती, श्रध्दा, प्रथा हे सगळे बहुतांशी तसेच्या तसे सांभाळले गेले असे वाटते. तिथले लोक सहसा कधी इतर कोणामध्ये लुडबुड करणार नाहीत, आपल्या आपल्यातच रहातील. हा स्वभाव इतर भारतीयांच्या मानाने थोडा वेगळाच आहे.

केरळ आणि तिथले हवामान, प्रकाश हे सगळेच फोटोग्राफीसाठी अतिशय सुरेख आहे. तिथली दाट झाडी आणि भरपूर पाणी यामुळे धूळ, प्रदूषण यांपासून हा प्रदेश मुक्त आहे आणि त्यामुळेच इथे कधी धुरकटलेले, धुकट हवामान दिसत नाही. अतिशय स्वच्छ हवा ही कुठल्याही छायाचित्रकारासाठी पर्वणीच असते. मी केरळमध्ये सुमारे तीन वर्ष प्रकाशचित्रण केलं. इथे पाहण्यासारख्या, चित्रण करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. मला असं वाटतंय, की आत्ता कुठे मी या संस्कृतीमधला किंचितसा भाग दाखवू


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

शकलोय. मी बोट-शर्यती, बैलांच्या शर्यती, थेय्यमचे नृत्यप्रकार, मार्शल आर्टचे प्रकार असे काही अनुभव इथे घेतले. तिथल्या काही अनुभवांचे हे चित्रण.

ओणम या सणाच्या दिवशी इथे बैलांची शर्यत भरवतात. ही शर्यत पहायला मी 'अडूर' या गावी गेलो. प्रसिद्ध लेखक 'अडूर गोपालकृष्णन' यांचे हे जन्मगाव. या शर्यतीसाठी शेतात बरेच दिवस पाणी भरून चिखल करून ठेवतात आणि शंभर मीटरच्या शर्यतीमधे बैलांना दौडवतात. हे प्रकाशचित्रण तीन कोनांतून करता येते. बाजूने, एखाद्या कोनातून किंवा मग सरळ समोरून. बरेच जण बाजूने उभे राहून चित्रण करतात. पण त्यामुळे अगदी काही क्षणच चित्रण करता येते. शिवाय पॅनिंग करावे लागते. मी समोरून हे चित्रण करायचे ठरवले, कारण त्यामुळे बैल जास्त वेळ समोर राहतील, शिवाय बैल आणि त्यांच्याबरोबरची माणसे यांचा भौमितिक समतोल साधणारे डिझाईन तयार होईल. यानंतर महत्वाचा भाग प्रकाशाचा होता. त्या दिवशी सकाळपासून ढगाळ हवामान होते. मात्र संध्याकाळी अगदी थोडा वेळ ढग बाजूला झाले आणि सुंदर सूर्यप्रकाशात मला हे फोटो घेता आले. समोरून फोटो घेतल्याने आणि सोनेरी प्रकाश यामुळे हे फोटो वेगळे आहेत. मात्र असे फोटो घेताना धोका पत्करावा लागतो. जर फोटो काढून चपळाईने बाजूला होता आलं नाही, तर बैलांच्या पायदळी तुडवले जाण्याची भीती असते. हे फोटो गुढघाभर चिखलात उभे राहून, कॅमेरा आणि स्वत:चा जीव सांभाळत काढले आहेत. अशा स्पोर्ट्स फोटोग्राफसाठी शटर स्पीड योग्य असणे आवश्यक आहे. १/५०० ते १/१००० या स्पीडवर हे फोटो काढले गेले आहेत.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

केरळचे सण - ओणम आणि मिरवणुका
केरळ अतिशय धार्मिक वृत्तीचे राज्य आहे. सणांमधेही इथल्या लोकांमधली एकजूट आणि शांतता वाखाणण्यासारखी आहे. ओणम हा केरळमधला एक पारंपरिक सण. त्यावेळची इथली राजा महाबळीची आख्यायिका, आल्लपुरा (Alleppey) येथील बोट रेस या गोष्टी प्रसिध्द आहेत. कोचीनजवळची अथचमायम (Athachamayam) म्हणजे पारंपारिक मिरवणुक बघणे ही फोटोग्राफरसाठी पर्वणीच असते. हे दिलेले फोटो मिरवणुकीमधल्या 'थेय्यम' या नृत्यप्रकाराचे आहेत. पहिल्या फ़ोटोमधल्या थेय्यम नर्तकाने पूर्ण लाल रंगाचे कपडे घातले होते. या मिरवणुका जातात त्या गल्ल्या खूपच अरुंद असल्याने फोटो काढायला जरा अडचणीचे होते. मात्र फोटोग्राफर असल्याने मिरवणुकांच्या मध्ये घुसून फोटोग्राफीही करता येते. खूप जागा नसल्याने अगदी जवळून घेतलेला हा फोटो पोझ घेऊन काढलेला नाही. मला या नर्तकाचा चेहरा आणि रंग हेच प्रामुख्याने दाखवायचे होते. अ‍ॅपर्चर वाईड ओपन ठेवल्यामुळे जास्त शटरस्पीड ठेवून नाचतानाही शार्प, न हललेला फोटो घेता आला. मी याचे बरेच फोटो घेतले, मात्र हा माझा सर्वात आवडता. या फोटोत पार्श्वभूमीच्या इतर अनावश्यक गोष्टी न आल्याने नर्तकाचा चेहरा अगदी उठून दिसतो. हा फोटो डिस्कवरी चॅनलने, लॅटीन अमरिकेत, जाहिरातीसाठी प्रचंड मोठ्या आकाराच्या बिलबोर्डवर वापरला आहे.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

या फोटोमधले हे दोन पुरुष-नर्तक केरळमधला अजून एक जुना आणि पारंपारिक नृत्यप्रकार दाखवत होते. यात चेहरे हिरवे रंगवले जातात. वाईड अ‍ॅपर्चरमुळे मागचा नर्तक थोडा धूसर दिसतोय, पुढच्याचा चेहरा अधिक उठून दिसतोय आणि एक डिझाईन तयार होतेय असे मला वाटते. व्यक्तीचित्रणात डोळे थेट दिसणे हा एक महत्वाचा नियम मानला जातो. या फोटोत मात्र तो नियम डावलला आहे. पण या फोटोमध्ये मला चेहऱ्यावरचे रंगकाम दाखवायचे असल्याने नियम डावलून देखील हा एक उत्कृष्ठ फोटो ठरतो. केरळ ट्रॅव्हल कंपनीने हा फोटो त्यांच्या ‘यू.के.’साठी प्रिण्ट केलेल्या १६० पानी माहितीपत्रकात मुखपृष्ठ म्हणून वापरला आहे.

या तिसऱ्या फोटोतही चेहऱ्याचे रंगकाम, सजावट आणि नर्तकाच्या डोळ्यातले हावभाव दाखवायचे होते. सुदैवाने फोटो घेताना तो नर्तक एकच क्षण थांबला आणि त्याने कॅमेऱ्यात रोखून बघतानाचा तो नेमका क्षण मी पकडला. यात बॅकग्राऊंड फोटोशॉपमध्ये थोडी बदलली आहे.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

नृत्य प्रकार - थेय्यम आणि कथकली
थेय्यम हा नृत्यप्रकार हिवाळ्यात रात्रीच्या वेळेत सादर केला जातो. यावेळी सुकलेली लाकडे गोळा करून पेटवली जातात आणि त्या प्रचंड आगीभोवती नर्तक नाच करतात. मुख्य नर्तक पुन्हा पुन्हा त्या अग्नीज्वाळांवर झेपावतो आणि इतर दोन जण त्याला बांधून त्यापासून परावृत्त करत असतात. कधी कधी हे नृत्य पाऊण तासापर्यंतही चालू असते. नर्तक नृत्य आणि मार्शल आर्ट्स दोन्हींमध्ये अतिशय निपुण असतो आणि त्याचे त्यावेळचे सादरीकरण पाहण्यासारखे असते.

रात्रीच्या वेळेची ही फोटोग्राफी बरीच कठीण आहे. कारण फारच कमी प्रकाश उपलब्ध असतो. तिसऱ्या फोटोमध्ये नर्तकाचे झेपावणे ‘ब्लर’ करायचे नव्हते आणि त्याच वेळेस निखाऱ्यांचा लालभडक रंगही हवा होता. नाहीतर ते निखारे नुसतेच राखाडी दिसले असते. सातआठ फूट उंचीचा लाकडाचा ढीग करून तो जाळला जातो. तयार होणारा कोळसा इतस्तत: पसरू नये म्हणून पुन्हा पुन्हा एकत्र केला जातो. थेय्यम नर्तक पेटत्या निखाऱ्यावर झेपावताना.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

Backwaters - रेस आणि बरेच काही
दूरदूर पसरलेले खाड्यांचे जाळे हे केरळचे एक महत्वाचे अंग. हे पाणी इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ऑगस्ट महिन्यात आल्लपुरा आणि कोचीन या भागात नौकांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. कधी कधी चक्क शंभरएक नाखवे एका लंबोडक्या नौकेत बसून जोरजोरात ओरडत रोरावत जातात. इतके नाखवे बसल्यावर ही नौका पाण्याच्या अगदी एखादा इंचच बाहेर असते. जोरात ओरडत एका तालात वल्हवत नेल्या जाणाऱ्या या नौका बघणे खरोखरच रोमांचकारक असते. या नौका-शर्यतीचा फोटो कुठून काढायचा हे ठरवणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. त्यासाठी मी मुद्दाम ब्रिजवर उभा राहिलो. वरून ज्या प्रकारे नौका दिसते, तो कोन मला हवा होता. नेमके लाल रंगाचे कपडे घातलेले नाविक असलेली नौका समोर येणे हा मात्र थोडा नशिबाचा भाग होता. सुमारे साठ नाविक असलेल्या या नौकेचा हा फोटो. फोटोत नौका अर्धीच दिसतेय आणि हिरव्यागार रंगाच्या पाण्यावर ते लाल रंगाचे कपडे घातलेले नाविक हे एक वेगळेच अनोखे दृश्य वाटतेय.

या खाड्यांमुळे इथले आयुष्य खडतरही आहे. खेकडे मिळवण्यासाठी पाण्यात डुबकी घेणारे कोळी किंवा तळातली वाळू हाताने उपसून काढणारे कामगार इथे सर्रास दिसतात. मी ब्रिजवर उभा असताना अशीच एक वाळू वाहून नेणारी छोटी बोट खालून गेली. नेमके आकाशाचे अप्रतिम प्रतिबिंब त्या पाण्यात डोकावत होते. मी योग्य ठिकाणी, योग्य वेळी उभा होतो असे मला वाटले. अशा प्रकारचे फोटो मिळवण्यासाठी कधी कधी महिनोंमहिने वाट बघावी लागते. फोटोग्राफीसाठी संयम आणि सहनशीलता दोन्ही असायला हवी. हा क्षण मिळाल्यावरही तो कसा कॅमेऱ्यात पकडला जातो ते महत्वाचे. इथे ‘फास्टर शटर’ आवश्यक होते आणि मी बोटीला तिरके म्हणजे डायगोनल ठेवले, त्यामुळे कंपोझिशन चांगले झाले.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

रायडींग द स्काय. हा फोटो सुप्रसिद्ध भारतीय लेखक अमिताव घोष यांच्या 'द हंग्री टाईड' या पुस्तकाच्या हार्डबाउंड मुखपृष्ठावर वापरला आहे.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली

हा पाण्यात डुबक्या मारून शिंपले आणि कालवं काढणाऱ्या एका कोळ्याचा फोटो. हे कोळी कॅटॅमरॅन (Catamaran) नावाची खास लाकडी नौका आणि बांबूपासुन बनवलेले वल्हे वापरतात. भर समुद्रात खडकाजवळ जाऊन हे कोळी पाण्यात डुबक्या मारून खडकाला चिकटलेले शिंपले आणि कालवं काढतात. उसळणाऱ्या समुद्रात असे खडकाजवळ जाऊन पाण्यात डुबक्या घेणे हे किती जिवावरचे आणि कौशल्याचे काम आहे!

फोटो घेताना समोरच्या दृष्यातली नेमकी अॅक्शन, त्यातले मर्म जाणून त्याचा फोटो काढता येणे हे कसब असते. फोटोग्राफी ही बाहेर जाऊन, फोटो काढत राहून शिकण्याची गोष्ट आहे. जितके जास्त फोटो काढाल, तितके जास्त शिकता येईल. फोटो काढताना चपळ आणि दक्ष रहावे लागते. 'कलारिपैयुथू' या पारंपारिक केरळी मार्शल आर्ट्सचा हा फोटो तेच सांगतो. सतत दक्ष राहून गरज पडेल तेव्हा स्ट्राईक करायचे! तुम्हाला कॅमेऱ्यातले विविध कंट्रोल सहजपणे वापरता आले, की असे अचानक दिसणारे क्षण कॅमेराबध्द करणे नक्कीच सोपे जाते.


केरळ - एक अनोखी संस्कृती अनूप नेगी, न्यू दिल्ली


मागील लेख पुढील लेख