1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून

निर्भय अनंत पाटील A.R.P.S
पूर्वी खेळाडू असलेले निर्भय पाटील काही कारणास्तव खेळाकडुन प्रकाशचित्रणाकडे वळले आणि त्यांच्यात दडलेला अनोखा प्रकाशचित्रकार आपल्या समोर आला. निसर्गाकडुन त्यांना त्यांच्या प्रकाशचित्रणासाठी प्रेरणा मिळते असे ते म्हणतात. अनेक राष्ट्रीय आणी आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते असलेले निर्भय पाटील सामाजिक बांधिलकी जपणारे, विज्ञानवादी दृष्टीकोन असणारे आणी विविध प्रकारचे प्रकाशचित्रण करणारे प्रकाशचित्रकार आहेत.


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

दोन चार वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एका नामवंत संस्थेच्या वार्षिक स्पर्धेचे प्रदर्शन पाहायला गेलो होतो. खूप छान सजवलेल्या हॉलमध्ये शंभरावर प्रकाशचित्रे वेगवेगळ्या विषयाप्रमाणे सुंदर वर्गीकरण आणि छान रचना करून आकर्षक फ्रेम्समध्ये मांडली होती. पिक्टोरिअल विभागात काही पोट्रेट्स, फुले, निसर्गदृश्य अशी जवळपास चाळीस प्रकाशचित्रे होती. रंगीत आणि कृष्णधवल विभागात एकूण अठरा पोट्रेट्स होती. त्या पोट्रेट्स पैकी सात प्रकाशचित्रे एकाच मुलीची होती. इनडोअर स्टूडीओमध्ये प्रकाशयोजना करून बहुतेक त्या संस्थेच्या सभासदांनीच स्टुडिओ फोटोग्राफी वर्कशॉपमध्ये काढलेल्या असंख्य प्रकाशचित्रांपैकी ती सात प्रकाशचित्रे असावीत. प्रदर्शन पाहताना सारखे मनात येत होते की एखाद्या प्रदर्शनामध्ये एका पिक्टोरिअल विभागात अठरा पोट्रेट्स निवडण्याची आवश्यकता होती का? तसेच एकाच मुलीची एवढी प्रकाशचित्रे तीही साधारण एकाच प्रकारची प्रकाशयोजना करून (काहीवेळा त्या मुलीचा पोशाख बदलून) काढलेली प्रकाशचित्रे परीक्षकांनी कशी निवडली? वेगवेगळी पोट्रेट्स काही इनडोअर, काही नैसर्गिक प्रकाशातील, काही भावपूर्ण मुद्रा असलेली काही हाय-की, काही लो-की, काही ग्लॅमरस तर काही बोलकी पण गावरान अशी विविधता असलेली पोट्रेट्स निवडून परीक्षकांनी पोट्रेट्स या विषयाचा संपूर्ण अंगांनी विचार होईल अशी निवड करण्याचा प्रयत्न करायला हवा होता.

त्याच प्रदर्शनात नेचर विभागात निवडलेल्या तीस चाळीस प्रकाशचित्रांमध्ये पंधरा-वीस प्रकाशचित्रे तर वाघाची आणि उरलेल्या पंधरामध्ये पक्षी, इतर प्राणी फुलपाखरे आणि कीटक. नेचरमध्ये वाघ हा सर्वात महत्वाचा घटक असतो हे मान्य केले तरी किंवा वाघ जिथे आहे त्या जंगलाला परिपूर्ण जंगल असं म्हटलं जात असलं तरीही परीक्षकांनी निवड करताना नेचर विभागाला न्याय दिला असं जाणवत नव्हतं. असं का होत असावं? कोणत्याही व्यक्ति किंवा संस्था यांना मला दोष ध्यायचा नाही परंतु कोणत्याही परीक्षकाने किंवा संस्थेने काही सर्वसंमत निकष परीक्षणाच्या आधी ठरवलेले असले किंवा त्याबद्धलची चर्चा परीक्षक आणि संस्थेच्या पदाधिकार्यांनी घडवून आणली तर खूप छान प्रकारे


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

परीक्षण करता येतं आणि प्रदर्शन पाहताना प्रेक्षकांचही नक्कीच समाधान होऊ शकतं.

गेल्या २५ वर्षात मला असंख्य प्रकाशचित्रकार भेटले त्यातल्या कित्येकांनी राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये आणि प्रदर्शनामध्ये पुरस्कार मिळवून जागतिक पातळीवर आपले अत्युच्च स्थान सिद्ध केले आहे. परंतु याच काळात मला काही प्रकाशचित्रकार असेही भेटले की त्यांचा दर्जा अत्युत्तम असूनही ते कधीही प्रकाशचित्र स्पर्धेत भाग घेत नाहीत. त्यामागची त्यांची प्रत्येकांची वेगवेगळी मते आहेत आणि त्यांच्या त्या मतांचा मी आदरही करतो. पण मला स्वतःला असं वाटतं की राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले काम कोणत्या दर्जाचे आहे याची परीक्षा स्वतःपुरती घेण्यासाठी तरी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षणाबद्धल नाही पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून तरी खूप चांगल्या पद्धतीने पुरस्कार दिले जातात असं माझं स्वतःचे मत आहे. क्लब पातळीवर किंवा मासिके, वर्तमानपत्रातल्या स्पर्धेत एखादवेळेस थोडेसे अधिक उणे होत असेल. पण मानवी स्वभावाचाच तो एक भाग आहे असं मानून आपण स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे असे मला वाटते. आपलं प्रकाशचित्र आपणा स्वतःला खूप छान वाटू शकतं परंतु इतरांच्या नजरेतून त्या प्रकाशचित्राचं मोल काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे अजमावून पाहण्याची संधी अशा प्रकाशचित्र स्पर्धांतून साधता येते.

अशा प्रकाशचित्र स्पर्धेतून यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रकाशचित्रकाराने केला पाहिजे. प्रकाशचित्रणाच्या स्पर्धांचे साधारणपणे मुख्यतः दोन प्रकार प्रमुख मानले जातात. एक म्हणजे विषयांवर आधारीत स्पर्धा आणि दुसरा प्रकार हा प्रकाशचित्रणाच्या मूळ आणि सर्वसाधारण अंगांचा ज्यात प्रामुख्याने विचार केला जातो अशा खास स्पर्धा.

यापैकी सर्वसाधारण प्रकाशचित्रणाच्या खुबींचा वापर करून काढलेल्या प्रकाशचित्रांच्या खास स्पर्धांमध्ये बर्याचदा मोनोक्रोम आणि कलर तसेच पीक्टोरीयल आणि नेचर एवढेच


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

विभाग असतात. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रकाशचित्रणाच्या कलेतील तांत्रिक बाबींवर, त्यातील सौंदर्यदृष्टीवर प्रकाशचित्रकाराने केलेल्या कौशल्याचा अधिक विचार केला जातो. विषयाचे बंधन कमी असते. पीक्टोरीयल मध्ये कोणताही विषय येऊ शकतो. फुले, पाने,कीटक, पशू, निसर्गदृष्य ते पोट्रेट्स, वास्तूरचना, अगदी काहीही येऊ शकतं. तर नेचरमध्ये फक्त प्राणी, पक्षी, कीटक, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती एवढेच विषय येऊ शकतात. त्यामुळे या खास स्पर्धांमध्ये प्रकाशचित्रकाराने त्याच्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि सौंदर्यदृष्टींचा कसा उपयोग केला आहे हेप्रामुख्याने पहिले जाते.

दुसरा स्पर्धा प्रकार हा विषयांवर आधारीत असतो. यामध्ये विषयाला अधिक महत्व दिले जाते. अर्थात फोटोग्राफरने विषयाचा विचार कसा केला आहे हे तर पहिले जातेच त्याचबरोबर सर्व तांत्रिक बाबींचाही विचार केला जातो. यात दिलेल्या विषयाच्या मर्यादेतच प्रकाशचित्र पाठविलेली असतात त्यामुळे कितीही चांगले प्रकाशचित्र असले तरी ते विषयाशी विसंगत असेल तरस्पर्धेतून बाद होऊ शकते.

प्रकाशचित्रण स्पर्धेच्या परीक्षणासाठी जेव्हा तज्ञ मंडळी येतात तेव्हा ते कसा विचार करतात याबद्धल स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येक स्पर्धकाला माहिती असणं आवश्यक आहे. तसं पहाता एखाद्या विषयाचा कोण कसा विचार करेल हे ठरवणं अवघड असलं तरीही सर्वसाधारणपणे माणूस कशा कशाप्रकारे विचार करू शकतो याचा विचार तर केलाच पाहिजे असे मला वाटतं. स्पर्धेच्या परीक्षणांची जबाबदारी एकाहून अधिक व्यक्तींकडे असली तरी त्या सर्वांचे मत, विचार सारखेच असतील असे नाही. प्रत्येकाची साहजिकच काही आवड निवड असते. जसं जीवनाच्या प्रत्येक अंगात हे आढळून येतं. कोणाला एक रंग आवडतो, कोणाला शाकाहारी जेवण आवडतं तर कोणाला समुद्रांच वेड तर कोणाला डोंगरदर्याचं. प्रकाशचित्राची निवड करताना या वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रभाव तर


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

विषयावर आधारीत स्पर्धामध्ये विषयाला महत्व आहेच त्याशिवाय विषयाच्या अनुषंगाने येणार्या इतर बाबींचाही विचार फोटो पाठवताना केला पाहिजे. इतर बाबी म्हणजे स्पर्धा कोणी आयोजित केली आहे. ती आयोजित करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, त्या संस्थेने काही भूमिका मांडली आहे का? तसेच स्पर्धेचे परीक्षक कोण आहेत याचीही माहिती काही स्पर्धा आयोजक आधीच घोषित करतात. त्या परीक्षकांची काम करण्याची पद्धत (style) याची माहिती मिळते का? या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो.

मला आठवतं एका संस्थेने १९९० साली “प्रदूषण”या विषयावर स्पर्धा घेतली होती. “प्रदूषणाचे परिणाम” आणि “जलप्रदूषण”हे विषय होते. केंद्रीय प्रदूषण मंडळाने ती स्पर्धा प्रायोजित केली होती. जल प्रदूषणामध्ये खूप लोकांनी नदीच्या पाण्याच्या प्रदूषणावर भर दिला होता. आपल्या देशात जास्त वापर विहीरीच्या पाण्याचा होतो. मी विहीरीच्या पाण्याच्या प्रदूषणावर लक्ष केंद्रीत केलं आणि फोटो पाठवले. तसेच कारखान्याच्या कचर्यावर आणि दूषित रसायनांवर योग्य प्रक्रिया न करता कुठेही सोडून देण्याच्या सवयीमुळे जमीन, पिण्याचे पाणी यावर होणार्या प्रदुषणावर आधारीत फोटो पाठवले. विशेष म्हणजे दोन्ही विभागात मला प्रथम पुरस्कार मिळाला होता. विषयांवर आधारीत स्पर्धेमध्ये विषयाचा सांगोपांग विचार करणं फार महत्वाचं ठरतं. “Indian flora & fauna” या विषयावर चंदिगड येथे झालेल्या स्पर्धेसाठी भारताच्या असंख्य वनस्पतींचा त्यातूनही दुर्मिळ वनस्पतींचा मी धांडोळा घेतला होता. Indian या शब्दावर भर देत फक्त भारतीय उपखंडातच आढळणार्या बाकी कुठेही न सापडणार्या रानटी फुले वनस्पतींचे मी फोटो पाठवले.


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

परिक्षक चांगले आणि अभ्यासू असावेत, त्यांनीही मला पुरस्कार दिला. माझ्या पुरस्काराबद्दल मला लिहायचे नाही तर मला तुमच्या हे लक्षात आणून द्यायचे आहे की विषयाचा विचार खूप काळजीपूर्वक केला पाहिजे एवढचं!

नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय वाईल्डलाईफ फोटोग्राफी स्पर्धेत हजारो उत्तमोत्तम फोटो आले होते. प्रदर्शनासाठी १०० फोटो निवडताना परीक्षकांची अक्षरशः तारांबळ उडाली; आणि शेवटचे १० फोटो निवडताना परीक्षकांची दमछाक झाली. अनेक परिमाणे लावून असंख्य रोमांचक फोटोंमधून परीक्षकांनी निवडला तो वेडा राघू (bee eater) चा पाण्यातून बाहेर येणारा फोटो. उत्कृष्ट प्रकाशरचना, जोरकस अॅक्शन, विलक्षण क्षण, योग्य एक्सपोजर, पाण्याच्या पातळीवरचा लो – अॅंगल आणि वेडया राघुची अपरिचित असलेली कृती या सर्व गोष्टीमुळे जगप्रसिद्ध फोटोग्राफर श्री. बैजू पाटील यांना प्रथम पुरस्कार मिळाला. एका स्पर्धेत विषय होता “ Twilight ”. स्पर्धेत चार पाचशे फोटो आले होते. (त्यातल्या निम्म्याहून अधिक फोटोमधे सूर्य प्रत्यक्ष किंवा ढगाआड दिसत होता) सूर्योदयाच्या आधीचा पहाटउजेड किंवा सूर्यास्तनंतरचा संधीप्रकाश म्हणजे Twilight. त्यामुळे निम्मे फोटो परीक्षणाच्या आधीच बाद झाले; अशी गल्लत प्रकाशचित्रकरांनी करू नये. एकदा महाराष्ट्रातील लोककला हा विषय होता. माझ्याबरोबर दिग्गज परीक्षक होते. फोटोही खूप होते पण ९०% फोटो कॉलेज गॅदरिंग किंवा स्टेजवरच्या विशिष्टकार्यक्रमातले होते. भिल्लनृत्यामध्ये गोर्या गोर्या कॉन्व्हेंट्च्या मुलामुलींचे नृत्याचे फोटो, तारफा नृत्यात कॉलेजच्या मुलांनी सादर केलेले तारफा नृत्याचे फोटो. शेवटी आम्हाला संयोजकांना सांगावे लागले की हे खर्या अर्थाने महाराष्ट्रातील असंख्य लोककलांचे फोटो नाहीत; तुम्हाला चालणार असतील तर यातले निवडतो; नाहीतर हे सगळे बाद करतो. असे प्रसंग स्पर्धकावर येऊ नयेत यासाठी विषयाचा व्यवस्थित अभ्यास करण फार महत्वाचं आहे.

विषयावर आधारित स्पर्धेपेक्षा विषय न देता ज्या खर्या अर्थाने फोटोग्राफीच्या स्पर्धा असतात त्याचे परीक्षण करताना खूप गोष्टींचे भान ठेवावे लागतं आणि परीक्षण करणार्या तज्ञांना फोटोग्राफीचे सखोल आणि परिपूर्ण ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. या स्पर्धांसाठी निवड करताना माझे सहकारी परीक्षक काय विचार करतात याला मी फारसे महत्व


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

देत नाही परंतु मी काय विचार करतो हे मला मोकळेपणाने सांगायला हवे असे वाटते. कोणतीही स्पर्धा, विषयावर आधारित किंवा इतर कोणतीही असो ती स्पर्धा प्रकाशचित्राची स्पर्धा आहे हे मी महत्वाचे मानतो. प्रकाशचित्रणाचे तंत्र आणि त्यावरची प्रकाशचित्रकाराची पकड किती मजबूत आहे हे पाहणं मला आवश्यक वाटतं. फोटो शार्प असावा, त्यातील डेप्थ ऑफ फील्डचा वापर कसा केला आहे,उपलब्ध प्रकाशाची तीव्रता आणि दिशा ( direction & amount of available light ) यांचा वापर करून एक्सपोजर कसे मिळवले आहे या गोष्टी मी प्रामुख्याने विचारात घेतो. फोटोग्राफरने अंतिमतः फोटो मिळवण्यासाठी अॅपरचर आणि शटरस्पीडचा योग्य वापर जाणीवपूर्वक केला आहे की नाही हे तर पाहिलंच पाहिजे त्याशिवाय स्पर्धेत फोटोचा क्रम ठरवताना किंवा गुण देतानाफोटोग्राफरला किती अवघड परिस्थितीत काम कराव लागलं आहे आणि त्या परिस्थितीवर मात करून त्याने उत्तम effect मिळवला आहे का हे पाहणं मला जास्त महत्वाचं वाटतं.

आता एकेका प्रकारच्या फोटोग्राफीकडे पाहायला गेलो तर खूप वेगवेगळ्या प्रकारे परिक्षकाला विचार करायला लागतो. नेचर किंवा वाइल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये खूप तरुण आणि नव्या फोटोग्राफर्सना अधिक रस असतो. पण स्पर्धेचा विचार करताना फोटोला कसे गुण दिले जावेत याची एक निश्चित पद्धती असते. वाघाच्या कडक क्लोजअप पेक्षा पाणी पिणारा, फोटोग्राफर्सकडे डोळ्यात डोळे घालून पाहणारा वाघ मला जास्त महत्वाचा वाटतो. त्याचे प्रतिबिंब, जिभेतून टपकणारे पाणी,त्याची नजर यासगळ्याला मला अधिक गुण द्यावेसे वाटतात. परंतु त्याहीपेक्षा भक्ष्याचा पाठलाग करणारा किंवा त्याच्यावर झेप घेतलेला अतिशय शार्प असा वाघाचा फोटो त्याच्या क्लोजअपपेक्षा अधिक महत्वाचा ठरतो. जंगलात वाघ दिसणं आणि सावज पकडणारा वाघ पाहायला मिळणं हे खूप दुर्मिळ क्षण आहेत. ते कॅमेरात टिपण तेही योग्यप्रकारे हेच उत्तम फोटोग्राफेरचे लक्षण आहे. त्याला त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे. खुप वेळा जंगलात जाऊनही


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

असे फोटो मिळतातच असे नाही आणि या दुर्मिळतेमुळेच त्यांचे महत्व आणि स्पर्धेच्या दृष्टीने गुण वाढतात. फोटोग्राफीच्या कौशल्याबाबत बोलायचे तर कोणताही वाघ किंवा तत्सम प्राणी फोकस करणं आणि करेक्ट एक्सपोजरने त्याचा फोटो काढणं यापेक्षा एखाद्यापक्ष्याचा अॅक्शनमधला फोटो काढणं अधिक कठीण आहे. आपले सावज पकडताना झेपावणारा पक्षी अचूक फोकसमध्ये आणून शार्प फोटोमध्ये बंदिस्त करणं हे वाघाच्या कोणत्याही स्थिर फोटोपेक्षा अधिक कौशल्याचे आहे असे मी मानतो. त्यातूनही ती पक्षाची जात जर दुर्मिळ असेल तर नेचर विभागात त्या फोटोला अधिक गुण मिळालेच पाहिजे असे माझे मत आहे.

नेचरमध्येच मोडणारा आणखी एक प्रकार म्हणजे मॅक्रो फोटोग्राफी. निसर्गाच्या नुसत्या डोळ्यांनी न दिसणार्या गोष्टी मॅक्रो लेन्सच्या सहाय्याने अतिशय आकर्षक आणि आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वेगळ्या दिसतात. या विषयाच्या स्पर्धेमध्ये डोळ्यांना न दिसणारे एखाद्या वस्तूचा ( कीटक, फुलं, वनस्पति इ. ) किती सूक्ष्म तरीही वेगळा फोटो काढला आहे यावर गुण दिले जातात. नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे अतिसूक्ष्म चित्रण त्यातील रंगसंगती, अत्यंत सुंदर दिसणार्या या वस्तूंचा किंवा सूक्ष्म प्राण्यांचा मूळ स्वरूप न बिघडता कसा फोटो काढला आहे. त्या वस्तूची (subject ) दृष्टीस न पडणारी कलात्मक रचना फोटोमध्ये कशाप्रकारे घेतली आहे यावर त्याला गुण दिले जातात. त्याशिवाय नैसर्गिक अवस्थेतील वातावरणातील फोटोला अधिक गुण मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर तर कृत्रिम प्रकाशयोजना किंवा फ्लॅश वापरुन काढलेल्या फोटोंना ( काही अपवादात्मक परिस्थिती सोडता ) स्पर्धेसाठी विचारातही घेतले जात नाही. आणि घेतले तरी त्याला गुण देताना हात आखडता घेतला जातो.

इनडोअर फोटोग्राफीमध्ये विविध वस्तु आणि व्यक्तींचे पोट्रेट्स यांचा समावेश असला तरी स्पर्धेमध्ये हे फोटो पिक्टोरीअल विभागात धरले जातात. फोटो कसलाही असला तरी फोटोग्राफरने कृत्रिम प्रकाशाचा उपयोग करून फोटोतले सौंदर्य अधिक कलात्मक कसे केले आहे याचा सर्वप्रथम विचार केला जातो. कृत्रिम लाईट किती आणि कोणत्या प्रमाणात वापरले आहेत त्यांचा उपयोग करताना नैसर्गिक आऊटडोअरचा भास व्हावा अशाप्रकारे वापर केला आहे का यावरही फोटोंचे गुण ठरतात. वस्तूंचे फोटो असतील तर वस्तूंच्या विशेष गुणवैशिष्ट्यांना योग्य न्याय मिळाला आहे का त्या वस्तूंचा आकार, टेक्शचर, रंग आणि पोत यांचे अचूक चित्रण झाले आहे का यावरही त्या फोटोंचे गुण अवलंबून असतात. तसेच पोट्रेट्समध्ये त्या व्यक्तिची बसण्याची पद्धत, आजूबाजूच्या वस्तू, त्या व्यक्तीची नजर आणि चेहर्यावरचे भाव, त्यातील सहजता यांचा विचार केला जातो. प्रकाशाचा अचूक वापर, त्या व्यक्तीच्या चेहर्याच्या ठेवणीचा म्हणजेच नाक, कान, डोळे, गाल, हनुवटी यांचा थ्रीडी इफेक्ट दर्शविणारा फोटो आहे का याचाही विचार गुण देताना केला जातो. मुख्य लाईट, साईड लाईट यातील कोणते डायरेक्ट आणि कोणते सॉफ्ट केले आहेत त्यांचा काय परिणाम साधला आहे हेही विचारात घेतले जाते. इनडोअर फोटोमध्ये वस्तू असो की व्यक्ती, बॅकग्राऊंडचा कसा वापर केला आहे, त्याच्यावर कोणत्या दिशेने प्रकाश टाकला आहे ह्याचा गुण देताना विचार केला जातो. काचेच्या वस्तु असतील तर बॅकग्राऊंड पांढरे आहे की काळे आहे त्यावरही गुण अवलंबून असतात. पोट्रेट्समध्ये चेहर्यावरचे भाव पकडताना लाईटचा वापर कसा केला आहे, चेहर्याचा थ्रीडी इफेक्ट फोटोग्राफरने मिळवला आहे का ? हे सारे गुण देताना विचारात घेतले जाते.


प्रकाशचित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून निर्भय अनंत पाटील, पालघर

काही परीक्षक फोटोग्राफीतल्या तांत्रिक बाबींपेक्षा एखाद्या फोटोतून काही थीम तयार होते का ? काही स्टोरी निर्माण होते का ? यालाही फार महत्व देतात. जर का अशी काही थीम असेल तर तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करायलाही त्यांची तयारी असते. मला मात्र तांत्रिक बाबी आणि थीम यांना सारखेच महत्व दिले पाहिजे असे वाटते. तांत्रिकदृष्ट्या एखादा फोटो अपुरा असेल तर स्पर्धेच्यादृष्टीने त्याचे गुण कमी व्हावेत असे मी मानतो.

कधी कधी असे होते की खूप छान फोटो आहे, कलर ,शार्पनेस, एक्सपोजर सगळं काही ठीक आहे परंतु कंपोजिशन चांगलं नसल्यामुळे काही फोटो फायनलला येऊनही पुरस्कार मिळवू शकत नाहीत. स्पर्धेमध्ये कंपोजिशनला अनन्य साधारण महत्व आहे. कित्येक स्पर्धक कधी कधी अतिशय टाईट कंपोजिशनमुळे (आजूबाजूला आवश्यक जागा न सोडल्यामुळे ) आपले गुण गमावतात तर कधी कधी अनावश्यक गोष्टींसहीत कंपोजिशन करतात त्यामुळे मुख्य विषयावर लक्ष केंद्रीत न झाल्याने गुण जातात. कंपोजिशनच्या पारंपारिक नियमांतच फोटो पाठवला पाहिजे असे नाही तर डोळ्यांना सुखद वाटेल असे कंपोजिशन असावे. एखाद्यावेळेस अतिशय वेगळे कंपोजिशनही नेहमीपेक्षा हटके असल्याने अधिक गुण मिळवून जाते.

एकंदरीत काय तर प्रत्येकाने फोटो स्पर्धेत भाग घेतला पाहिजे आपली कलाकृती कसाला लावून पाहिली पहिले. आपण काय दर्जाची फोटोग्राफी करतो ते आजमावून पहिले पाहिजे. फोटोग्राफी करण्यातला आनंद उपभोगतानाच कोणाशीही स्पर्धा करण्याच्या भावनेतून नाही, बक्षिस मिळालेच पाहिजे असा अट्टाहास न ठेवता स्वतःशीच स्वतःची स्पर्धा असे मानून स्पर्धेत भाग घेतला तर आपण आपोआपच आपला स्वतःचा फोटोग्राफीचा दर्जा उंचावण्यात यशस्वी होउ.

थोडक्यात जर स्थिर हाताने काढलेला, शार्पनेस उत्तम असलेला, परफेक्ट एक्सपोजर असलेला, उपयुक्त प्रकाशाचा योग्य उपयोग केलेला, शटरस्पीड, अॅपरचर आणि डेप्थ ऑफ फील्डचा जाणीवपूर्वक वापर करून काढलेला आणि अगदी योग्य वेळेला अत्यंत दुर्मिळ क्षण अचूकपणे टिपलेला सुरेख कंपोजिशन असलेला, कलात्मक फोटो जर तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी पाठवू शकलात तर बक्षिसाची १००% हमी मी देऊ शकतो. जरी बक्षिस नाही मिळाले तरी असा फोटो प्रदर्शित झाला तर त्या फोटोचे कौतुक करणारे प्रेक्षक पाहून जो आनंद मिळेल तो नक्कीच अविस्मरणीय असेल. अशा फोटोंसाठी धडपड आणि कष्ट करायची तुमची इच्छा असेल, त्याचा ध्यास तुम्ही घेतला असेल तर तुमच्या फोटोग्राफीचा दर्जा तुम्हाला एका अत्युच्च जागी घेऊन जाईल याची मला खात्री वाटते.
मागील लेख पुढील लेख