1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर

माधवी नाईक
गेली १८ वर्षे वकिलीचा व्यवसाय, १० वर्षे महापालिकेत नगरसेविका, एका प्रख्यात राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या असलेल्या माधवी नाईक या महिलांच्या विविध समस्यांशी निगडीत कामात सक्रीय आहेत. अध्यक्ष अर्थ फाउंडेशन ( एन. जी. ओ ), सदस्य - एस. डी. ओ ठाणे द्वारा विभागीय समिती कौटुंबिक छळापासुन सुरक्षा कायद्यानुसार, सदस्य - तहसीलदार ठाणे द्वारा जिल्हा समिती नोकरदार स्त्रियांचा लैंगिक छळ या कायद्यानुसार, महाराष्ट्र प्रदेश भा. ज. पा. महीला मोर्चाची सरचिटणीस म्हणुन कार्यरत.

प्रकाशचित्रे - संजय नाईक, प्रविण देशपांडे


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा प्रवास संपता संपत नव्हता. दुपारचं टळटळीत ऊन, निर्जन रस्ते, निष्पर्ण वृक्ष, उजाड माळरानं, सर्वदूर भरुन राहिलेला निव्वळ शुष्कपणा! त्यामुळे गावंच्या गावं ओस पडलेली दिसत होती. आणि अचानकच माडग्याळ गावाच्या वेशीवरच तहसील कार्यालयाबाहेर गडद रंगाचे पागोटे आणि साड्या नेसलेल्या वयस्कर स्त्री-पुरुषांची गर्दी दिसली. उत्सुकतेने आम्ही यंत्रवत त्यांच्याजवळ पोचलो. सांगली जिल्ह्यातील हा पट्टा गेली अनेक वर्ष कायम दुष्काळाचा, पाण्याविना! ना शेती ना अन्य उद्योग! उपासमार तरी किती सोसायची? मग गावातली तरुण पिढी रोजगाराच्या शोधात शहरात गेली. कालांतराने तिथेच स्थिरावली. मग उजाड माळरानांवर वृद्धांच्या रुपात उरली थकलेली शरीरं आणि खचलेली मनं! पण याही परिस्थितीत पोटाची खळगी भरावी लागतेच ना? म्हणुन मग निराधार, परित्यक्त्या, विधवा, वयस्करांसाठी मिळणारं ४०० रुपयांचं सरकारी मानधनही अमोल वाटतं. आणि त्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करायला आसपासच्या गावातून अशी झुंबड उडते.

सहज लक्ष गेलं तर भैरवनाथाच्या कृपेनी उभ्या केलेल्या शेतीच्या अवजार विक्रीच्या दुकानात आता गृहोपयोगी वस्तु विकल्या जातात. आणि क्रेडिट सोसायटीला तर कुलुप ठोकायचीच वेळ आली आहे. नियतीच्या विरोधाभासाचं हे चित्र कॅमेर्यात बंद करुन पुढे निघालो. गावात शिरलो तर १९६५ साली बांधल्यापासून २०१३ सालापर्यंत केवळ दोनच वेळा पावसाच्या पाण्याने भरलेला, एरवी कोरडा ठक्क असणारा, ऐतिहासिकच म्हणावा असा कोरडा तलाव पाहिला. वर्षानुवर्ष पाण्याच्या एका थेंबाचाही वर्षाव न झालेला परिसर कसा असेल, ह्याचा कल्पनाविलास करणंही जिथे बुद्धीचा कस लावणारं ठरलं असतं तेच दृष्य आम्ही वास्तवात पहात होतो. तलावा लगत घराच्या पडवीत उपासमारीने खंगलेले एक मध्यमवयीन गृहस्थ शून्यात नजर लावुन बसले होते. त्या नजरेच्या दिशेने पाहिलं तर अंगावर सरसरुन काटाच आला. हाडांचा सांगाडा वाटावा अश्या अवस्थेतली एक गोमाता सुकलेल्या झाडाखाली निश्चल उभी होती. त्या तिघांचा जणू आपसात मूकसंवाद सुरु असावा. वातावरणातल्या कोरडेपणात आता विषण्णतेची भर पडली होती.


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे

दुष्काळातल्या समस्या जवळुन अनुभवाव्यात म्हणुन आम्ही या दौर्याचा घाट घातला होता. नेमकं काय पहायचं याबद्दल आम्हीही अनभिज्ञच होतो. मात्र प्रवासाच्या सुरुवातीलाच सत्य असं विदारकपणे समोर येईल याची आम्हालाही कल्पना नव्हती.

फेब्रुवारीच्या सुरुवाती पासूनच दुष्काळ, पाणीटंचाई, आणि त्याच अनुषंगाने सिंचन घोटाळा, चारा छावण्या, जळलेल्या फळबागा, बंधारे बांधण्यातला गैरप्रकार यांच्या बातम्या आणि प्रकरणं विविध प्रसिद्धीमाध्यमातुन चर्चेला येत होती. माणसं तथा जनावरांची पाण्यासाठीची वणवण आणि परवड पाहुन आपल्या घशाला कोरड पडत होती. दुष्काळाची ही तीव्रता अनेकदा गप्पांचा विषय होत होती. आणि एक दिवस अचानक प्रवीण दादांनी (प्रवीण देशपांडे) प्रस्ताव मांडला, चला रे, आपणच जाऊन पाहुया हा दुष्काळ प्रत्यक्षात आहे तरी कसा! कल्पना उत्तमच होती. पण दहाबारा दिवस सतत उन्हातान्हातून प्रवास करावा लागणार होता. पण या विषयाची तीव्रता इतकी होती की उन्हाच्या तडाख्याची भिती मागे टाकून मी, संजय नाईक आणि प्रविण देशपांडे कधी तयारीला लागलो ते आम्हालाच कळलं नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. विनोद तावडे यांनी त्याच सुमारास दुष्काळी भागाचा दौरा केला असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, बुलढाणा, औरंगाबाद आणि नगर असा दहा जिल्ह्यांचा प्रवास निश्चित झाला.

सातार्या पासून सुरुवात केली. रयतेचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करणार्या छत्रपतींचा वारसा लाभलेलं ऐतिहासिक शहर. बागांनी बहरलेलं, हिरव्यागार शिवारांनी नटलेलं सधन समृद्ध सातारा. लगतच सांगली. कृष्णा कोयनेच्या प्रवाहाने सुजलाम सुफलाम असणार्या या दोन्ही जिल्ह्यातील माण, खटाव आणि जत हे दोन्ही तालुके मात्र कायम तहानलेले. ज्या माण नदीवरुन गावाचं नाव पडलं तिचं विस्तिर्ण पात्र आता वाहनांच्या नियमित रहदारीचा मार्ग झालाय. मोठी धरणं बांधली गेली पण त्यात पाणी सोडण्याचं


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे

नियोजन नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष या भागात बेकारी, उपासमार आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर दिसुन आलं. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागात तर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार लोकांनीच उघड केला. नुसते कागदावर दाखवलेले, चुकीच्या ठिकाणी बांधलेले निकृष्ठ दर्जाचे बंधारे! प्रसिद्धीमाध्यमांमधे समोर आलेले भ्रष्टाचाराच्या रकमेचे कोट्यावधीचे आकडे एरवी खोटे वाटतात. पण पाणी नक्की कुठे मुरतय ते या प्रवासादरम्यान जवळुन पाहता आलं.

बीड, जालना, उस्मानाबाद या भागात तर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर दिसुन येतं. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील सुपीक भागात ऊसतोडणीला मजुर लागतात. दहा ते बारा तास तोडणी करुन दिवसाकाठी चारशे रुपये मिळतात. गावात शेती नाही, पाऊस नाही, त्यामुळे स्थानिक सावकाराकडुन उदरनिर्वाहासाठी कर्ज काढायचं. जुजबी सामानाची जुळवाजुळव करुन पाठीवर बिर्हाड बांधायचं आणि म्हातार्या-कोतार्यांना घरी ठेवुन पोराबाळांसह गाव रिकामं करायचं. जानेवारी ते एप्रिल तोडणीचं काम करुन पुन्हा गावात यायचं. सावकाराचं कर्ज फेडायचं. यंदा तरी पाऊस येईल या आशेने जमिनीची मशागत करायची, पेरणी करायची आणि आभाळाकडे डोळे लावुन बसायचं. पावसाने फसवलं की उपासमार टाळण्यासाठी पुन्हा कर्ज आणि पुन्हा पाठीवर बिर्हाड! या दुष्टचक्रातुन सुटका नाही. दाद मागायची कोणाकडे? निसर्ग रुसलेला आणि सरकारी यंत्रणांनी पाठ फिरवलेली. स्थानिक लोक तर म्हणतात धनदांडग्या साखरकारखानदार नेत्यांना ऊसकापणीला मजुर हवे म्हणुनच दुष्काळावर सरकार पर्याय शोधत नाही.

जालना शहर - बुलढाणा - औरंगाबाद - नगर - उस्मनाबाद या परिसरात तर आपण कल्पनाही करु शकणार नाही अशी भीषण पाणीटंचाई! जालना शहरात पंधरा दिवसांनी एकदा तर बुलढाण्यात एकोणतीस दिवसांनी पाणी दिलं जातं. उस्मानाबाद मधे ५०० लिटर पाण्याचा भाव तीनशे ते चारशे रुपये. संपूर्ण मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या तानसा आणि वैतरणा नदीच्या किनार्यावर वसलेल्या भागातही हंडाभर पाण्याची किंमत पंचवीस ते पाचशे रुपये! बाया-बापड्या मैलभर लांबीच्या रांगेत हंडे ठेवुन आठवडेच्या


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे

आठवडे सरकारी टँकरची वाट पाहतात. नाहीतर ५-६ किलोमीटर अंतरावरील खाजगी विहिरीतुन पाणी भरतात. मग मिळालेलं पाणी पुरवुन वापरायचं म्हणुन स्टुलवर बसुन आंघोळ करायची. खाली गाळणी ठेवायची. त्याखाली दुसरं भांडं. मग आंघोळीचं पाणी गाळुन इतर कामांसाठी वापरायचं. पाणी भरुन मायभगिनींना मणक्याचे आजार जडलेत. अनेक कुटुंबातील सुनांचे गर्भपात होतायत. पायांना फोड येऊन कातडी जळुन गेलीच तर अस्वच्छ पाणी देखील वापरावं लागत असल्याने साथीचे कातडीचे रोग होत आहेत. खेडोपाडी मुख्य रस्त्यांवर - महामार्गावर सर्वदूर दिवसारात्री कोणत्याही प्रहरी माणसं दिसली ती केवळ आणि केवळ पाण्याचा शोध घेणारी. चालत्या बोलत्या माणसांची ही कथा तर मुक्या जनावरांची काय सांगावी? दुष्काळामुळे ना खायला चारा ना प्यायला पाणी. मग पर्याय चारा छावणीचाच! एका जनावराला दिवसाला ४० लिटर पाणी आणि १५ किलो चारा. पण त्यासाठी त्यांनी दिवसरात्र छावणीतल्या दावणीला बांधून राहायचं. जिवंत राहण्यासाठी स्वातंत्र्याची तिलांजली! गायीगुरं म्हणजे शेतकऱ्याचा प्राण, त्यांची उपासमार नको म्हणुन त्यांची रवानगी छावणीत करायची. त्यांना चारा देण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याने अहोरात्र छावणीत राहायचे. पोरासोरांचा अभ्यास, खेळ, शाळा सगळंच चारा छावणीत!

दहा दिवसांच्या प्रवासात दुष्काळ अगदी जवळून अनुभवता आला. सारंच प्रकाशचित्रबद्ध करणं शक्य नव्हतं. तरिही जमेल तेवढं, जमेल तसं चित्रण केलं. प्रवासाला निघताना फक्त दुष्काळच बघायचा असं मनाशी ठरवलं होतं. त्याचं पुढे काय करायचं याचा काही विचारच केला नव्हता. परत आल्यावर जेव्हा सगळी प्रकाशचित्रे पाहिली तेव्हा परिस्थितीचे गांभिर्य अधिक ठळकपणे जाणवलं. आणि पुढे काय करायचं याचं चित्रं स्पष्ट व्हायला लागलं. इतका संवेदनशील विषय अधिकाधिक लोकांपर्यंत मांडला जावा, समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोचावा असं मनापासून वाटायला लागलं. त्याकरिता प्रकाशचित्रांइतकं प्रभावी माध्यम कोणतं असणार?


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे

प्रविण देशपांडे आणि संजय नाईक ठाण्यातले नामवंत प्रकाशचित्रकार. त्यातही वृत्तपत्र प्रकाशचित्रणाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे प्रकाशचित्रणातून नेमकेपणाने विषय मांडणे अंगभूतच होते. सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्यादरम्यान समोर आलेलं वास्तव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवावं असं ठरलं. प्रकाशचित्रं म्हटलं की तांत्रिक आणि कलात्मक दृष्टीकोन अपेक्षितच असतो. पण टळटळीत उन्हात अडतीस ते चाळीस अंश सेल्सियस तापमानात काढलेल्या फोटोंबाबत आम्ही विषयाला अग्रस्थान दिलं आणि तयारी सुरु केली. 'अर्थ फ़ाऊण्डेशन' आणि 'फोटो सर्कल सोसायटीने' 'पाणी… द स्टोरी ऑफ वॉटर' या शीर्षकाखाली प्रदर्शनाचं आयोजन केलं.

शहरातील रोजच्या धकाधकीत बोथट झालेल्या सामाजिक जाणिवा जागृत करणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. मोटारी धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वारेमाप गैरवापर करणाऱ्यांना, आठवडेच्या आठवडे हंडे घेऊन पाण्याच्या रांगेत बसून पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या भगिनींची, अन्नपाण्यावाचून सुकलेल्या माणसांची, गुरांची प्रकाशचित्रे दाखवून त्यांच्यातल्या संवेदनशीलतेला साद घालणं हे आम्हाला आमचं कर्तव्य वाटलं.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही दोन आवाहने केली. एक म्हणजे पाण्याचे मर्यादीत साठे जर संपवले गेले तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल. हे टाळण्याकरता महत्वाचा उपाय म्हणजे 'पाणी वाचवा' आणि दुसरं म्हणजे दुष्काळ, मग तो मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित, त्यात होरपळलेल्या आपल्या बांधवांच्या वेदना जाणुन, त्यांना आपल्या परीने आर्थिक आधार देऊन बंधुभावाला जागणं हे होय.


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे

आम्ही प्रामाणिकपणे घातलेल्या सादेला, उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी प्रदर्शन उभं करायला आर्थिक मदत केली. तर प्रदर्शन पहाण्यासाठी आलेल्या प्रत्येकानेही जमेल तशी मदत करून दुष्काळग्रस्त भागात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्यात आपला खारीचा वाटा दिला. उत्सुकतेपोटी सुरु झालेला एक प्रवास अशाप्रकारे एका सामाजिक उपक्रमात संपन्न झाला.


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे


पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर माधवी नाईक, ठाणे
मागील लेख पुढील लेख