1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

मी आणि माझी फोटोग्राफी

निलेश भांगे
निलेश भांगे हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून प्रकाशचित्रण हा त्यांचा छंद आहे. २००४ साली पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतल्यानंतर गेल्या काही वर्षांतले त्यांचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. रंग, आकार यांच्या माध्यमातून अमूर्त शैलीतले प्रकाशचित्रण ही त्यांची खासियत आहे.


मी आणि माझी फोटोग्राफी निलेश भांगे, इंदोर

गेल्या खूप दिवसांपासून माझ्या मनात चलबिचल चालू आहे. मला सारखे वाटायचे की मी हे कोणासमोर आणि कसे व्यक्त करावे. मला जेव्हा 'फ फोटोचा' दिवाळी अंकाच्या टिमने संपर्क करून काहीतरी नवीन लिहायचा आग्रह केला, तेव्हा मी बराच विचार केला आणि मला वाटले की काहीतरी फॉर्मल लिहिण्यापेक्षा मनसोक्त गप्पा माराव्यात आणि मन मोकळे करावे. कदाचित काही अनुभवी वाचक या स्थितीतून गेले असतील किंवा जात असतील. त्यांच्याकडून अधिक काहीतरी शिकायला मिळण्याच्या, सल्ले मिळण्याच्या अपेक्षेने हा लिखाणाचा खटाटोप करतोय.

मूळात मी प्रकाशचित्रण सुरू केले ते २००४ साली, माझा पहिला डिजीटल कॅमेरा घेतल्यानंतर - तेही माझ्या मुलीचे, मानसीचे फोटोग्राफ घेण्यासाठी. त्याआधी मला प्रकाशचित्रणाचा काहीच अनुभव नव्हता. सुरुवातीच्या एखाद् दोन वर्षांतल्या फोटोंना कलात्मकतेची जोड नव्हती. नंतर मी इंटरनेटवरील काही वेबसाईट पाहिल्या, तिथे नियमितपणे ऑनलाईन स्पर्धा होत. तिथे भाग घेत गेलो. तेव्हापासून इतर वेगवेगळ्या विषयांवर काम करायला सुरूवात केली. खरेतर अजूनही मी कोणत्या एकाच प्रकारच्या प्रकाशचित्रणात स्वत:ला बांधून घेतले नाहीये. पण तरीही आत्तापर्यंतच्या माझ्या कामाकडे मागे वळून पाहताना बहुतेक करून विषयापेक्षा त्याचा आकार, रंगसंगती यावर माझे लक्ष असते असे मला वाटते. त्यामुळे सध्यातरी माझा ओढा अमूर्त प्रकाशचित्रणाकडे आहे.

ही कला फक्त छंद म्हणुन जोपासत असल्यामुळे त्यासाठी वेळ देण्याचा प्रयत्न तर नक्कीच असतो. पण माझी पत्नी विद्या आणि माझ्या पालकांच्या संयमित व खंबीर आधारामुळे गेली सात आठ वर्षे मी प्रकाशचित्रणावर काम करू शकलो हे खूप महत्वाचं आहे. योगायोग म्हणा किंवा नशिबाची साथ म्हणा, पण माझ्या कामाचे मित्रमंडळीत कौतुक झालेच शिवाय देशी विदेशी स्पर्धांमध्ये काही प्रकाशचित्रांची निवडही झाली. बऱ्याच मासिकांत, वर्तमानपत्रांत मी काढलेले फोटो आणि लेख छापून आले. विशेषत: मी केलेल्या 'पेपर अॅंबस्ट्रॅक्ट'च्या कामाला खूपच छान प्रतिसाद मिळाला.


मी आणि माझी फोटोग्राफी निलेश भांगे, इंदोर

पेपर अ‍ॅबस्ट्रॅक्टवर जे काम केले त्यात काही फोटो घेण्याआधी व्हिज्युअलाईज झाले असले तरी बाकी बहुतांश फोटोग्राफबद्दल तसे नाही. केलेल्या कामावर पोस्ट प्रोसेसिंग करताना बऱ्याचदा त्या आकारांचे ज्ञात असलेल्या मूर्त आकारांशी साधर्म्य आढळते. अमूर्त प्रकाशचित्रणाची गंमत हीच की त्यात कोणाला काय गवसेल हे सांगता येत नाही. एक उदाहरण सांगायचे तर इथल्या फोटो क्र. १ मध्ये एका रसिकाला 'मदर तेरेसा' यांचा भास झाला. अशी प्रतिक्रिया मिळेपर्यंत माझ्या मनात तसे काहीच नव्हते.

मूळात अमूर्त प्रकाशचित्रण म्हणजे काय? यावर खूपच प्रकारची वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे आणि ती पुरेशी गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळेच या विषयावरती खूप विसंगत कामही पहायला मिळते. मी असे मानतो की अमूर्त प्रकाशचित्रण म्हणजे वस्तूच्या मूळ स्वभावाचे वास्तविक चित्रण न करता त्या वस्तूचा रंग, छटा, आकार यांच्यावर केलेले काम. हे चित्रण मूळ वस्तूच्या गुणधर्मापेक्षा वेगळ्याच गोष्टींविषयी बोलत असेल तर अजूनच उत्तम.

मी छंद म्हणून प्रकाशचित्रण करत असलो तरी बऱ्याचदा या विषयाचे रितसर शिक्षण न घेतल्याची खंत वाटते. आत्तापर्यंत जे काही शिकलो ते उपलब्ध असलेल्या पुस्तकांतून आणि निरीक्षणातूनच. पण यामुळे बऱ्याचदा कामाला मर्यादा येत असल्याची जाणीव होते. कला ही शिकता येत नाही हे खरे असले तरी त्या विषयातल्या अधिक गहिऱ्या ज्ञानासाठी शिक्षण गरजेचे आहे असे वाटते. दुर्दैवाने तांत्रिक बाबींवर जे वाचायला मिळते तितके किंबहुना त्याच्या निम्मेही प्रकाशचित्रणातल्या कलात्मकतेकर लिहिले वा बोलले जात नाही. केवळ या कारणामुळे "फ फोटोचा" अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी तांत्रिक बाबींपेक्षा प्रकाशचित्रकाराच्या मनाचा वेध घेण्यावरती जास्त भर दिला आहे.

प्रकाशचित्रणाचा छंद मला जडण्याचे मुख्य कारण म्हणजे एखाद्या विषयावर काम करताना त्या विषयाशी


मी आणि माझी फोटोग्राफी निलेश भांगे, इंदोर

होणारी एकरूपता. ही भावना इतकी तीव्र असते की आपोआपच वास्तविकतेपासून अलिप्तता निर्माण होते. ही एक प्रकारची साधनाच! मला खात्री आहे की याची प्रचिती कलेशी निष्ठा असणाऱ्या प्रत्येकालाच येत असणार. जोपर्यंत आपण चित्रित करत असलेल्या विषयाबद्दल आदर, प्रेम असत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकाशचित्राची निर्मिती शक्य नाही. या कारणासाठीच आपण परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत की त्याने आपल्याला ही दृष्टी दिली ज्यायोगे आपण त्याच्याशी तादात्म्य पावू शकतो.

सौंदर्य आणि भावना व्यक्त करणे मूळात खूप कठीण आहे. आहे. प्रकाशचित्रणातून तर अजूनच अवघड कारण तिथे ज्ञात असलेल्या भाषेची जोड नसते. सौंदर्य आणि भावना याची अनुभूती घेता येते. ती घेताना आपल्या मनाच्या स्थितीचे आकलन होणे, आपल्याला एखादी वस्तू आवडण्याचे आकलन होणे माझ्या मते खूप गरजेचे आहे. हे आकलन कलाकाराला त्याच्या कलेतून व्यक्त करायला मदत करते. हे करण्यासाठी स्वतःला सगळ्या धावपळीपासून अलिप्त ठेवणे तितकेच गरजेचे आहे. यातूनच मला खूप काही शिकायला मिळते. आजकाल टिव्ही, इंटरनेट, मोबाईल इत्यादींमुळे स्वत:साठी वेळ देता येणं हीच कल्पनातीत गोष्ट वाटते. एखादी गोष्ट का आवडली, त्यामागच्या सौंदर्य आणि भावना मला माझ्या प्रकाशचित्रामार्फत रसिकांपर्यंत पोहोचवता आल्या तर माझी कला, माझा जन्म सफल झाला असे मला वाटते.

लेखाच्या आरंभी मी जे मनातल्या गोंधळाविषयी बोलत होतो ते असे की मन व बुद्धी एकसारख्या विचार करत नाहीत. बुद्धीला वाटते की फक्त चांगल्या कामापासून प्रेरणा घेऊन काम करणे बास झाले. आता जे काही करायचे त्यात नाविन्य हवे. विचार करून, ठरवून एकाग्रतेने काम करावे. मनाला वाटते की विचार करून केलेल्या कामामध्ये कृत्रिमता येईल, त्यापेक्षा जसे आत्तापर्यंत करत आलोय तसेच करावे. त्यातूनच वेगळ्या कामाची निर्मिती होईल. तर मुख्य प्रश्न असा आहे की कामात कृत्रिमता येऊ न देता ते


मी आणि माझी फोटोग्राफी निलेश भांगे, इंदोर

नाविन्यपूर्ण कसे करता येईल?

दुसरी मनातील चलबिचल अशी आहे की मला एक असाधारण भीती वाटत असते की जी काही कलादृष्टी परमेश्वराने मला दिली आहे ती अचानक लुप्त तर होणार नाही ना? विशेषकरून जेव्हा केलेल्या कामाला चांगला प्रतिसाद मिळतो तेव्हा. बऱ्याचदा झालेल्या स्तुतीचे कौतुक वाटण्यापेक्षा त्याचे ओझेच जास्त जाणवते. तुम्हालाही असाच अनुभव येतो का?

मात्र प्रकाशचित्रण ही कला आणि त्यामागे असलेले एका कलाकाराचे भावविश्व याबद्दल अधिक मनसोक्त चर्चा करायला, त्याबद्दल अधिक वाचायला मला खूप आवडेल.

या विषयावरची ही दोन पुस्तके मला वाचनीय वाटतात-
1) The Art of Photography: An Approach to Personal Expression by Bruce Barnbaum
2) Photography and the Art of Seeing: A Visual Perception Workshop for Film and Digital Photography by Freeman Patterson

इथे लिहायचा प्रयत्न करूनही मला माझ्या मनातले प्रश्न मांडता आले आहेत का याबद्दल मीच साशंक आहे. तुमचे अनुभव आणि सल्ला मला जरूर कळवा.


मी आणि माझी फोटोग्राफी निलेश भांगे, इंदोर


मी आणि माझी फोटोग्राफी निलेश भांगे, इंदोर

मागील लेख पुढील लेख