1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

अ‍ॅमराल्ड ग्रीन

रेखा भिवंडीकर
सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधुन फाईन आर्टची पदवी घेतली असून, त्यांना पोर्टेट आणि इलस्ट्रेटर साठी सलग चार वर्षे पारितोषीके मिळाली आहेत. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित जहांगीर आर्ट गॅलरीतील वार्षिक प्रदर्शनात त्यांची दोन पेंटीग्स निवडली गेली आहेत. सध्या त्या प्रकाशचित्रणासोबतच आपले हस्तकला नावाचे बुटिक सांभाळत आहेत. त्यांना लेखन आणि प्रवासाचीही आवड आहे.


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

आता मी एका बेटावर आहे…
खरंतर हे एक स्वप्नच आहे, जे जिवंतपणी, जागेपणी मी बघतेय… अनुभवतेय…
माझ्या घरापासून, रोजच्या धकाधकीपासून, रोजच्याच आजूबाजूच्या नकोश्या माणसांपासून…
करावीच लागणारी कर्तव्ये, लादलेली कामे, रूढींनुसार चाललेल्या परंपरा…
सर्व सर्व काही सोडून फक्त काही दिवसांच्या सुट्टीवर,
मी इथे दूर, खूप दूरवरच्या एका बेटावर आलेय.

जिथे फक्त एका बेटावर एकच हॉटेल
आणि माझी खोली समुद्राच्या अगदी जवळ!
त्याचा "अथांग"पणा माझ्या खोलीच्या दरवाज्यातूनही आत येतो
अशा एका ठिकाणी मी आलेय…

आज हट्टानेच लिहायला बसले. मन ऐकतच नव्हतं.
कितीवेळ मी आणि माझे मन बोलतोय एकमेकांशीच…
चार दिवस झाले तरी आमच्या गप्पा संपतच नव्हत्या!
कितीवेळा मी मनाला बजावले की
हे सर्व लिहायलाच हवं,
नाहीतर ते विरून जाईल!

पण जिथे मी होते तिथे असं काही विलक्षण होतं, इतकं काही होतं की नुसतं बघत रहावं… तासन् तास! आणि भानच हरपून जावं, मन असं कशाने तरी भरून घ्यावं… नाही! त्यापेक्षा सर्व शरीरच त्या समोरच्या सौंदर्याने भरून घ्यावं… इतकं काही होतं तिथे.


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

मला तिथे त्या समुद्राकडे बघण्याव्यतिरीक्त खरंतर काहीच काम नव्हते.
तरीही मला लिहायला वेळ नव्हता.

मी हिरवीच झालेय…
मी पाचूची झालेय…
आधीही घनदाट झाडं पाहून मी हिरवीगार झाले होते.
पण या बेटावर आले आणि त्या हिरव्या रंगात पाचूचा रंग, अ‍ॅमराल्ड ग्रीन मिसळला!
मी पाचूच्या रंगाची झाले.
या चार दिवसांच्या माझ्या या बेटावरच्या वास्तव्यात मीच तो 'अ‍ॅमराल्ड ग्रीन' झाले!!
आता मी माझी ओळख 'अ‍ॅमराल्ड ग्रीन' म्हणूनच देणार. आधीपासूनच हा रंग माझा आवडता आणि आता तर अनपेक्षितपणे देवाने मला याच रंगाच्या दुनियेत आणले.

मी होते एका पाचूच्या बेटावर…
मधे मी आणि चहुदिशांना हिरवे हिरवे पाणी, नितळ आणि स्वच्छ!
इतके स्वच्छ बघण्याची सवय नसल्यामुळे ते बघून आपणही तितकेच नितळ, स्वच्छ, स्पष्ट आरशासारखे किंवा त्या पाण्यासारखेच होऊन जातो.
समजतेय मला सर्व, जाणवतेय मला ते, अनुभवतेय मी हे या क्षणी.

आता मी नाही…
इथे येऊन मी या रंगात बुडून गेले असे म्हणण्यापेक्षा तो आसमंतच, तिथला रंगच मी माझ्यात भरून घेतलाय.


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

कुठेही फिरायला जाताना मनात एक विचार येतो की इथे गेल्यावर मला काहीतरी मिळणार आहे, काहीतरी गवसणार आहे.
मग काहीवेळेस नविन काहीतरी मिळतं तर काही ठिकाणी निराशा पदरी येते.
काही ठिकाणी नुसता टाईमपास होतो, हाती काहीच लागत नाही.
पण नेहेमीच मनात अशी भावना असते की मला नक्कीच इथे काही मिळणार आहे!

मी शोधत असते…
अखंड शोध चालू असतो…
मीच मग सुट्टीत कुठे जायचं ते ठरवत असते.
आत आत खूप तळमळ चालू असते तरिही मी सतत अलर्ट.
आता मिळेल, आता मिळेल, मिळेल काही…हे एक सत्य असते.
माझ्या जीवनातील एक सत्य
माझा विश्वास आहे, अगदी पक्का विश्वास आहे
खोल खोल अंतर्मनातला विश्वास!

इथे मालदीवच्या बेटावर येताना मी विमानातूनच ही हिरवीगार पाचूची बेटं पाहिली.
आणि तेव्हाच माझ्या मनाने काही वेगळे संकेत मला दिले.
माझ्यातल्या रेषा अश्या एकसारख्या, एकसंध, लयीत माझ्या मनातून बाहेर पडायला लागल्या.
कसलीतरी विलक्षण सुरूवात झालीये इतकं समजलं!

विमानातून 'माले' बेटावर उतरले आणि समोरच ते हिरवे पाणी!


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

ते हिरवेगार पाणी इतक्या जवळून पाहिले आणि माझे डोळेच अ‍ॅमराल्ड रंगाचे झाले.
हळूहळू तो रंग माझ्यात झिरपत जात होता…
समजत होतं मला.
माझ्या आत काहीतरी घडतंय,
माझ्यातल्या रेषा अशा आतुर झाल्यात आणि बाहेर येताहेत!

गेले चार दिवस मी अखंड तो समुद्र बघतेय,
पण बघणं, अनुभवणं संपतच नाहीये.
किती बघू! किती साठवू!! किती घेऊ!!!
किती किती मी त्याला माझ्यात सामावून घेऊ?
किती किती मी स्वत:लाच ओतून देऊ, समर्पण करू?
संपतच नाही!
आत्ताही मी एका झाडाच्या सावलीत,
माझ्या डायरीतल्या पानांवर उन्हाचे कवडसे वार्‍याने नाचताहेत.
समोरच, अगदी पायाशीच त्या हिरव्या लाटा पांढर्‍या फेसाळ होऊन माझ्याकडे झेपावाताहेत.
सुंदर वारा, शुद्ध तरल मन, मनात येणारे सुंदर विचार, एक सुंदर अवस्था!
जसंच्या तसंच मी लिहून काढतेय.
जोडीला लाटांचा खळखळाटही आहे, कदाचित तो तुम्हालाही ऐकू येईल.
इतकं मी जसंच्या तसंच लिहितेय.


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

समोर हिरवेगार पाणी, वीस एक फुटांवरची संरक्षक भिंत आणि पुढे नंतर प्रशियन ब्लू रंगांचा शांत, धीरगंभीर समुद्र आहे.
या गडद निळ्या रंगावर दूरवर दिसणारी छोटी छोटी अनेक बेटं आहेत.
पण मला ती बेटं बघण्याची मुळीच इच्छा नाही;
मला आता काहीच नकोय;
इथेच इतकं मिळालंय की आता खरंच काही नको.

आधीची मी पूर्ण रिकामी झालेय.
आता या चार दिवसांच्या मालदीवच्या अ‍ॅमराल्ड ग्रीन रेषांनी मी पूर्णपणे भरून गेलेय.
आता त्या रेषांची आकारबांधणी मनात चालू झालीये;
आता काही आविष्कार घडणार आहेत,
हा अ‍ॅमराल्ड ग्रीन रंग ते घडवणार आहे,
प्रत्येकाचा रंग असतो, माझा अ‍ॅमराल्ड ग्रीन आहे.
मी कोण आहे याचे भान द्यायला नियतीने मला त्याच रंगाच्या बेटावर आणून सोडावे हे किती विलक्षण आहे!

अनुभवणं संपतच नाहीये,
किती बघू, किती नाही ही अवस्था आहे.
आता माझ्या पॅलेटवर अ‍ॅमराल्ड ग्रीनला प्रथमस्थान असेल…
माझ्या प्रत्येक नवनिर्मितीत अ‍ॅमराल्ड ग्रीन असेल,


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

माझ्या प्रत्येक चित्रात त्यालाच अग्रक्रम असेल.
तो म्हणजेच मी, मी म्हणजेच रेषा!
आजूबाजूचं वातावरण किती महत्त्वाचं असतं नाही; आपल्यातल्या रेषा जाग्या होण्यासाठी?
त्यांना कोंब आणण्यासाठी, त्यांना लयीत आणण्यासाठी?

माझ्यातल्या 'मी' चा शोध संपलाय.
सगळी तगमग संपलीये आता.
भिरभिरणारी मी, नेहेमीच अस्वस्थ असणारी मी,
इथल्या निरागस निसर्गाच्या सौंदर्याने शांत शांत झालेय.

इतकी शांत, इतकी शांत…
अशी शांतता मला आजच मिळालीये.
मी याही क्षणाला अनुभवतेय;
या अनुभवण्यात पण काय मजा आहे…
असं वाटतं की जिथे या वाळूवर बसलेय तिथेच पडून जावं,
कणाकणांनी मोकळं व्हावं. वाळूसारखंच पांढरं होऊन.
मग समुद्राच्या हिरव्या लाटांनी मला त्यांच्यात ओढून घ्यावं.
बस्स! आता काहीच नको.
सगळंच मिळालं, सगळं मिळून मी तृप्त तृप्त झाले.

आजपर्यंत मनाला रिझवण्याचे नाना प्रकार संपले.


अ‍ॅमराल्ड ग्रीन रेखा भिवंडीकर, कल्याण

खरं काय हवं ते मिळालंय आता.
इतर काहीच नको.
लिहिता लिहिता मन भरून गेलंय, डोळ्यातून बरसतंय, हातातून लिहिलं जातंय.
मनात भरून राहिलीये एक शांती… एक तृप्ती… इथल्या सौंदर्याने झालेली एक सुंदर अनुभूती!

अ‍ॅमराल्ड ग्रीन रंगाची ही किमया आहे!!!

तो आत्मा, मी रेषा
तो रंग, तर मी आकार.
तो सर्वस्व, मी फक्त कणमात्र.
त्यानेच निर्मिलेला,
पण त्याच्यासाठी आसुसलेला... एक 'कण'!

मागील लेख पुढील लेख