1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

जत्रा

संघमित्रा बेंडखळे
फोटोजर्नालिझमचा कोर्स करुन नंतर एडीटोरियल आणि जाहिरातक्षेत्रात प्रकाशचित्रकार म्हणुन काम करणा-या संघमित्रा बेंडखळे या क्षेत्रातल्या खूप अनुभवी प्रकाशचित्रकार आहेत. त्यांना फुड फोटोग्राफी, लग्नसमारंभाची फोटोग्राफी याचाही खुप अनुभव आणि आवड आहे. सॅवी, शोटाईम यांसारख्या अनेक मासिकांतुन त्यांचे काम प्रकाशित झालेले आहे. पोर्टफोलियो आणि स्टॉक फोटोग्राफीतही त्यांनी बरेच काम केलेलं आहे.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

जत्रा ही एक सांस्कृतिक प्रथा आहे. भारतातच नव्हे तर जगभरात कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच जत्रा भरत असतात. पूर्वीपासून आत्तापर्यंत गावे आणि शहरांच्या वेशीवर भरणारी जत्रा ही कुठल्याही वयातल्या व्यक्तीला भरभरून आनंद देत असते. अनेक ठिकाणाहून एखाद्या सर्वमान्य जागेत एका ठरल्या दिवशी एकत्र येणं, देवदर्शन करणं, बाजार करणं आणि घटकाभराची करमणूक करून घेणं म्हणजे जत्रा.

महाराष्ट्र जत्रांच्या बाबतीत तसा सुखी आहे. जिल्ह्या-जिल्ह्यातून गाव किंवा गावपंचक्रोशीतून विविध जत्रा भरत असतात. जत्रेला ग्रामदेवतांचं आणि उपाध्यदेवतांचं अभयदान असतं अशी लोकांची श्रद्धा असते. अशा उपकारक देवतांना वर्षातून एकदा आपण भेटावं असं प्रत्येकाच्याच मनात असतं. ज्या देवदेवतांच्या कृपेने वर्षभर आपला संसार चालतो, शेतीवाडी जपली जाते, गुरांचा सांभाळ होतो आणि धन-धान्यांनी आपण सुखी होतो त्या देवदेवतांना स्मरत सर्व स्त्रीपुरुष, मुलंबाळं, नातीगोती जपलेली माणसं अशा सार्वजनिक देवदेवतांच्या दर्शनाला एकत्र जमतात. दर्शनानंतर सर्वजण रमतात ते जत्रेच्या आनंदोत्सवात व बाजारात.

काळानुसार जत्रेचं स्वरूप बदलत जातंय पण मी अनुभवलेली प्रकाशचित्रीत केलेली ठाणे जिल्यातील 'म्हशाची जत्रा' म्हणजे एक आनंद उत्सवच!


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळ १०-१५ किलोमीटरवर 'म्हशा' हे एक गाव आहे. म्हसोबा खांब लिंगेश्वर हे इथल्या ग्रामदेवतेचे नाव. स्वयंभू खांब लिंगेश्वराचा पौष पौर्णिमेला जन्मोत्सव साजरा केला जातो. तेव्हाच ग्रामस्थ, दूरवरचे गावकरी गळ लावून नवस फेडतात आणि पुढील कामासाठी आशीर्वाद घेऊन देवळाच्या परीसरात भरलेल्या जत्रेत सामील होतात. साधारणपणे २ किलोमीटर परीघात वसलेली ही जत्रा पाहणे हा एक उत्तम अनुभव आहेच पण प्रकाशचित्रणासाठी एक उत्तम संधीही आहे. एक संपूर्ण दिवसही येथील प्रकाशचित्रणास कमीच पडतो इतक्या व्यक्ती, इतके विषय इथे सापडतात. मन कॅमेर्‍यासकट बेधुंद होतं!

परंपरागत शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या जत्रेत प्रथम दर्शनी दिसतात ती मिठाईवाल्यांची मोठमोठ्या मंडपाच्या सहाय्याने मांडलेली दुकाने! रंगीत मिठाई, जांभूळ, गुलाबजाम, पेढे, बर्फी, म्हैसूरपाक, सुत्तर फेनी, खाजे यांनी सजलेली ही दुकाने! दुकानाच्या पुढच्या भागात आचारी मोठ्या कढईत तळणी करत असतो तर पाठीमागच्या भागात मोठ्या प्रमाणात आचारी व त्यांचे सहकारी म्हैसूरपाक, गुलाबजाम, पेढे बनविण्यात गुंग असतात. माझा कॅमेरा याच दुकानापाशी थांबला आणि रंगीत मिठाई खरेदी विक्री करणार्‍या लोकांवर माझी लेन्स स्थिरावली. पण खाद्यपदार्थावरील टेक्श्चर, रोड लाईट खूप ड्रॅमेटीक पोट्रेट इफेक्ट देत होता. मिठाईवरील टेक्श्चर, रंगीत मिठाई ही प्रकाशचित्रणासाठी उत्तम होतीच.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

थोडंसं पुढे गेल्यावर पेरूवाला पेरू विकण्यात दंग होता. त्याच्या गाडीवर पडणार्‍या क्रॉस लायटींगमध्ये पेरू खरेदी करणार्‍या लोकांच्या हावभावांचे सुंदर प्रकाशचित्र मला टिपता आले.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

म्हशाच्या जत्रेतील बाजारात मुख्य आकर्षण होते ते येथील प्रसिद्ध घोंगडी बाजाराचे. माझा कॅमेरा आपसुकच या दुकानाकडे कधी वळला ते मलाही समजलं नाही. सोलापूर, सांगली, कराड, जुन्नर येथील प्रसिद्ध घोंगडी या बाजारात मिळते. सोलापुरी उंच बांध्याच्या स्त्रिया व पुरुष या घोंगड्या इथे विणत होते. त्यांचे काम खूप वेगाने चालू होते. लांब दोर्‍याच्या गाठी पायाच्या व हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने पडत होत्या. आमचा फोटोग्राफरांचा सर्व ग्रूप या घोंगड्या विणणार्‍या विणकरांच्या भोवती फिरत होता व सुंदर प्रकाशचित्र टिपण्यासाठी धडपडत होता. काही बांधव घोंगडी विकण्यात तर काही खरेदी करण्यात गुंग होते.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

लहान मुलांची निरागसता टिपण्यात मजा येत होती. ती खेळण्याच्या दुकानात प्लास्टिकची खेळणी,लाकडाच्या बॅट, स्टंप, रंगीत टोप्या,शिट्या, पिपाण्या, फुगे, मुखवटे घेण्यात गुंग होती. बहुतेक आदिवासी, ग्रामीण, शेतकरी स्त्रिया ह्या सांसारिक वस्तू घेण्यात मग्न होत्या. छोटे छोटे घोळके आपापसात चर्चा करून वस्तू खरेदी करत होते.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

जत्रेत जीवनाचं रहाट गाडगं पहायला मिळतं. टिचभर पोटासाठी लागतं ते किती आणि त्यासाठी लागणार्‍या वस्तूंची यादी मात्र किती लांबलच्चक! अन्न शिजवण्यापूर्वी आणि नंतर लागणार्‍या वस्तू इथे नीट आपल्या पुढ्यात रांगोळी सारख्या मांडून त्यांची विक्री होत असते. परातीपासून डब्यापर्यंत, निरांजनापासून समईपर्यंत आणि पणत्यांपासून लामणदिव्यापर्यंत ही मांडलेली दुकाने म्हणजे फोटोग्राफीसाठी तयार ऑब्जेक्टीव फोटोग्राफीचे विषय! मग त्या वस्तुमधील विविधता शोधायची, कल्पक अँगल्स लावायचे, टेक्श्चर असलेल्या वस्तू, बॅकग्राऊंड मध्ये वापरायच्या वस्तू यांच्या आकर्षक रंगसंगती करून पॅटर्नस् व ऑबजेक्टस् ह्या विषयाला धरून सुंदर प्रकाशात ह्या वस्तू चित्रित करायच्या. धान्य, किराणा सामान, मसाल्याचे पदार्थ आकर्षकरीत्या मांडलेले असल्यामुळे त्याचा फोटो काढण्याचा मोह कुणाच्याही हातून सुटणार नव्हताच.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

टाळ, मृदुंग, झांजा, तबला, डग्गा, डमरू यांचे स्टॉल पुरुषवर्गाला आकर्षित करतात. पांढर्‍या टोप्या परिधान केलेले पुरुष ढोलकीचा ताल लावून पाहतात, तेव्हा त्यांचे हावभाव कॅमेर्‍यात कैद केल्याशिवाय राहवत नाही.

या जत्रेतून कॅमेरा घेऊन फिरणे म्हणजे अनेक विषयांना हात घालणे. कॅमेर्‍याच्या लेन्समधून जत्रा पाहताना आपण प्रत्येक व्यक्तीशी, विषयाशी संवाद साधत प्रकाशचित्रण करीत असतो. जत्रेतील व्यक्तीचे हावभाव कॅमेरा टिपत असतो. प्रत्येकजण काहीतरी कामात व्यग्र असतो. अशातच क्रॉस लाईटींगची साथ मिळाली तर खूप सुंदर पोर्ट्रेट तयार होत असतात.

माघ महिना असल्यामुळे वातावरण तसं आल्हाददायक व थंड असते. काही ठिकाणी दोन मंडपांच्या मधून आलेले तिरपे सूर्यकिरण फोटोंची ताकद वाढवतात व उत्कृष्ट फोटो तयार होतात.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

जत्रेमध्ये लहान मुलांसाठी,मोठ्यांसाठी अनेक खेळ असतात. त्यात विद्युत रोषणाई केलेले,उंच गोलाकृती झोपाळे, मेरी गो राउंड, विजेवर चालणारी ट्रेन, बैठे झोपाळे, मौत का कुआ, जादूचा घोडा, कपबशी असे अनेक खेळ लहान मोठेजण खेळत असतात. विद्युत रोषणाई केलेले हे झोपाळे प्रकाशचित्रणासाठी एक खास विषय असतो. सर्व दुकानांच्या शेवटी उरलेल्या मैदानामध्ये हे विद्युत झोपाळे असतात. बेफाट गर्दी, आवाज आणि लाल रंगाची उसळलेली धूळ यातूनच हे रोषणाई केलेले झोपाळे टिपण्यासाठी कॅमेरे सज्ज होतात आणि प्रत्येकजण अचूक अॅंगल्स आणि कंपोझिशन टिपण्यात गुंग होतो. रात्रीचे आठ कधी वाजतात ते समजतही नाही. संपूर्ण दिवस ओसरतो. रात्र पडते आणि करमणुकीसाठी पुन्हा एकदा लोककला सादर होतात. तेथून घुंगरांचे आवाज सुरू होतात. बहारदार लावणी व ढोलकी तमाशे यांनी प्रेक्षक प्रत्यक्ष नृत्य व अभिनय यांचा आनंद लुटतात.

जत्रा म्हणजे केवळ मौजेचा देखावा असे मात्र मुळीच नाही. त्यात दु:खी चेहेरे नवीन काहीतरी शोधण्यासाठी येतात तर काही जण देवदर्शनाने, बळी दिल्याने, व्रत वैकल्यामार्फत सुखाच्या शोधात जत्रेतील देवाला भेटायला येत असतो. मौन या जत्रेत असतेच पण मानवी जीवनाचा, मनाचा आणि स्वभावाचा हा भव्य दिव्य देखावा व चित्रपट असतो. जत्रा म्हणजे तर्‍हेतर्‍हेच्या व्यक्तिरेखा, कला, रंग, वेगवेगळ्या भाषा, त्यांची गीते, वाद्य, संस्कृती, आचारविचार, रूढी परंपरा, पोशाख, गर्दीत बेधुंद झालेली माणसं यांचं एक अजब मिश्रण! प्रकाशचित्रणासाठी ह्या सर्व गोष्टी अगदी चित्रपटाच्या सेटप्रमाणे मांडलेल्या वाटतात. पण प्रत्यक्षात मात्र ह्याच जत्रेतून अनेक चित्रपटांची कथानके, व्यक्तिरेखा, चित्रपटांचे सेट तयार झालेले आढळतात. आणि पुन्हा एकदा आपला विश्वास बसतो तो साध्या कष्टकरी जनसमुदायाचा आनंद घेण्याच्या जत्रा या परंपरेवर.


जत्रा संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

मागील लेख पुढील लेख