1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

हा छंद जीवाला लावी पिसे

मेघना शहा
पर्यावरणशास्त्र या विषयात एम एससी झालेल्या मेघना शहा या पर्यावरण दक्षता मंचच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग देतात. रेडियो, वर्तमानपत्र आणि मासिके यात त्यांनी लिहिलेले पर्यावरण विषयक लेख प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर त्या निसर्ग प्रकाशचित्रणाची आवड जोपासत फोटोसर्कल सोसायटीच्या समिती सदस्य आहेत.


हा छंद जीवाला लावी पिसे मेघना शहा, ठाणे

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हणतात. माझा हा बालपणीचा काळ सुखाचा करण्यात पक्ष्यांचा देखील मोठा वाटा आहे. घर, घरापुढे मोठे अंगण, भरपूर झाडे असे छान निसर्गरम्य वातावरण. झाडांमुळे साहजिकच पक्ष्यांचा मुक्त वावर असे. पहाटे जाग येताच विविध पक्ष्यांची किलबिल ऐकू येत असे. ही किलबिल ऐकून हळूहळू पक्षी बघण्याची सवय लागली. आणि पक्ष्यांविषयी आवड निर्माण झाली. तेव्हा सर्वच पक्षांची नावे ठाऊक नसत. म्हणून पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांवरून त्यांची नावे ठेवत असू. उदा. 'स्वर्गीय नर्तक' या पक्ष्याची शेपटी लांब असते म्हणून तो लांब शेपटीवाला, 'दयाळ' म्हणजे काळा पांढरा. काही काळाने नर-मादी पक्षी यातील फरकही ओळखू येऊ लागला. निसर्गातील एका छान घटकाचा परिचय झाला. पुढे हेच निसर्गवाचन पर्यावरणाचा अभ्यास करताना कामी आले. ‘जीवो जीवस्य जीवनम्’, food chain, food web यांची तोंडओळख झाली.

पुढे शहरात देखील थोडेसे शांत, झाडे झुडुपे असणारे ठिकाण राहण्यासाठी निवडले. गर्दी, आजूबाजूला असणार्‍या भरपूर इमारती यामुळे थोडी शंका होती. पण सुदैवाने येथेही पक्षी सोबतीला होते. बागेत असणार्‍या झाडांवरून किलबिलाट ऐकू येई. परंतु चिमण्यांचा चिवचिवाट काही ऐकू येत नव्हता. मग किचन मधल्या खिडकीवर थोडे तांदूळ ठेवण्यास सुरूवात केली. थोडे दिवस कुणीच आले नाही. काही दिवसांनी दोन तीन चिमण्या आल्या. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. बागेत मोठी अशी तीनच झाडे आहेत. किचनच्या अगदी समोर असणारे पिवळ्या फुलांचे झाड ‘काशिद’, त्याच्या थोडेसे पुढे ‘जंगली बदामाचे झाड’ आणि डावीकडे गडद लाल रंगाची फुले असणारे ‘पिचकारी’ नावाचे झाड. ही तिन्ही झाडे पक्ष्यांची आवडती आहेत. पिवळी फुले असलेल्या झाडांच्या ‘शेंगा खाणे’, पिचकारी फुलातील ‘पाणी पिणे’, जंगली ‘बदाम खाणे’ हे मुख्यतः पोपटांचे आवडते उद्योग. तसेच फुलातील मध पिण्यासाठी सूर्यपक्षांची सतत सुरु


हा छंद जीवाला लावी पिसे मेघना शहा, ठाणे

असलेली धावपळदेखील पहावयास मिळते. कबुतर, चिमण्या, कावळे, घारी, दयाळ ,मैना ही नेहमीचीच मंडळीही असतातच. आता तर आवाजावरून पक्षी ओळखणे जमू लागले आहे. याचा एक मोठा फायदा असा होतो की नवीन पक्षी आला तर ते लगेच कळते. यासाठी कायमच झाडावर पक्षी शोधण्याची गरज नाही. आवड मात्र हवी. म्हणतात ना, आवड असली की सवड मिळते. डॉ. सालिम अली यांची पुस्तके रात असल्याने पक्षी ओळखणे अजूनच सोपे झाले आहे.

एकदा सहज मनात विचार आला की आपल्या घरातून पाहिलेल्या पक्ष्यांची संख्या मोजुया. चक्क २३ पक्ष्यांची यादी तयार झाली. थोडा वेळ माझाही विश्वास बसला नाही. पण नंतर आनंद झाला. बरे वाटले. या पक्ष्यांनी मला कितीतरी आनंदाचे क्षण दिले होते आणि अजूनही देत आहेत. पक्षी निरीक्षण करताना काही गोष्टी जाणवल्या. जसे जागेवरून भांडण, नवीन पक्ष्याला सहज न स्वीकारणे, ‘बळी तो कान पिळी’ हा प्रकार म्हणजेच मोठ्या पक्ष्याची छोट्या पक्ष्यावर दादागिरी इत्यादी. अर्थात हे सर्व आपल्या मनुष्य जातीस तसे परिचित आहेच.

असे एवढे सगळे पक्षी सहज दिसत असतील तर त्यांचे फोटो घेण्याचा मोह कुणाला होणार नाही? वाटले तेवढे हे काम सोपे नव्हते. पण हळूहळू जमू लागले. यातील काही पक्षांच्या सवयी, स्वभाव टिपता आले.

चिमणी (Sparrow):
अतिपरिचयामुळे दुर्लक्षित राहिलेला हा पक्षी. सहज एकदा चिमणीचा फोटो घेतल्यानंतर लक्षात आले की ही देखील किती सुंदर दिसते. खिडकीवर येऊन चिवचिवाट करणाऱ्या या चिमण्या आपल्या घराचाच एक भाग होतात. जणू काही family member, आणि त्यांच्या family मध्ये नवीन member चे आगमन झाले तर ते देखील कळते.


हा छंद जीवाला लावी पिसे मेघना शहा, ठाणे

कावळा(House & Jungle Crow):
निसर्गात ‘सफाई कामगार’ म्हणून ओळखला जाणारा हा कावळा. आपल्या काळ्याकुट्ट रंगासाठी प्रसिद्ध असणारा. ‘एकीचे बळ’ हा यांचा एक गुण लक्षात राहण्यासारखा आहे. घारीने दोन वेळा दोन वेगवेगळ्या जागी घरटे बांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कावळ्यांनी काही घरटे बांधू दिले नाही. या कावळ्यांमुळे एक फायदा झाला, कबुतरांची अंडी हे कावळ्यांचे खाद्य आहे. आपोआपच कबुतरांच्या संख्येवर नियंत्रण आले.

जांभळा शिंजीर(Purple Sunbird):
छोटासा आकार, परंतु तुलनेने मोठा वाटणारा. ‘विच विच’ असा आवाज करत हे पक्षी उडत असतात. बहुतेक पक्ष्यांप्रमाणेच यांचा देखील नर मादीपेक्षा अधिक आकर्षक असतो. विणीच्या हंगामात तर हा रंग अतिशय सुंदर दिसतो. सतत अस्थिर असे हे पक्षी आपल्या लांब चोचीतून फुलांतून रस शोषून घेतात.

Vigorus Sunbird:
फक्त दोनच दिवसांसाठी आलेला हा पाहुणा पक्षी कायमच लक्षात राहील. छोटासा आकार परंतु संपूर्ण शरीरावर गडद रंगांची जणू उधळण केली आहे असे वाटावे इतका सुंदर पक्षी आहे.

बुलबुल (Red- vented bulbul & Red-whiskered Bulbul) :
आपल्या आसपास सहज दिसणारा हा पक्षी. आमच्याकडे याच्या दोन जाती दिसतात. डोक्यावर तुरा असणारा लालगाल्या आणि शेपटीच्या बुडाशी लाल रंग असणारा लालबुड्या बुलबुल. लालबुड्या हा लालगाल्या बुलबुलपेक्षा जास्त आक्रमक असतो. जर एखादा नवीन पक्षी आलाच तर त्याला हुसकून लावण्यात याचा नंबर पहिला असतो.


हा छंद जीवाला लावी पिसे मेघना शहा, ठाणे

दयाळ (Magpie Robin):
काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी सतत आपली शेपटी वरखाली करत असतो. ‘चरर् चरर्’ असा आवाज तो काढतो. पण वसंत ऋतू जसजसा जवळ येतो तसा हा फार सुरेल आवाजात गातो. जणू काही आपल्याला तो वसंताच्या आगमनाची वर्दी देतो. सकाळी ५-५.३० किंवा संध्याकाळी ७-७.३०ला सुद्धा याचा आवाज आपण ऐकू शकतो, इतका तो दिवसभर गात असतो.

पोपट(Parakeet) :
Rose-ring Parakeet आणि Alexandrine Parakeet या दोन जातींचे पक्षी आमच्याकडे येतात. Alexandrine Parakeet हे बहुधा जंगलात आढळतात. संजय गांधी राष्ट्रीय थोड्या अंतरावर असल्याने ते येत असावेत. कधी दोनचार तर कधीकधी आठ दहा या संख्येने ते येतात. आपण आलो हे जणू सर्वांना कळलेच पाहिजे अश्या रीतीने जोरजोरात ओरडत असतात. काशिदच्या शेंगा, जंगली बदाम खाताना खाणे कमी आणि टाकणे जास्त असा प्रकार सुरू असतो. इथे शहरात हे दृश्य बघताना काही वाटत नाही पण हेच पक्षी शेतकर्‍याचे किती नुकसान करत असतील? हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

मैना (Myna):
सर्वांना परिचित असणारी हि मैना. Common Myna व Pied Myna या दोन जाती आमच्या बागेत दिसतात. Pied Myna आली तेव्हा Common Myna म्हणजेच साळुंकीने तिला हुसकावून लावण्याचा खूप दिवस प्रयत्न केला. परंतु Pied Myna म्हणजेच रंगीत साळुंकी गेली तर नाहीच परंतु तिने तिचे घरटे देखील बांधले.

तांबट (Coppersmith Barbet):
हा पक्षी चिमणीपेक्षा थोडा जाड, शरीरावर हिरवा रंग, डोके व छाती लाल-शेंदरी रंगाची, जाड चोच असा


हा छंद जीवाला लावी पिसे मेघना शहा, ठाणे

साधारण दिसतो. आपले डोके एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे असे सारखे हलवत ‘टुक टुक’ असा आवाज करीत असतो. पानांसारखा हिरवा रंग असल्यामुळे हा लगेच दिसत नाही.

कबुतर-पारवा (Blue Rock Pigeon) शांतीदूत, प्रेमाचे प्रतिक असे जरी याचे वर्णन करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र अतिशय आळशी, खादाड असा हा पक्षी आहे. चिमण्या, कावळे, साळुंकी इ. पक्षी त्यांचे खाणे आपल्या सहकाऱ्यांबरोबर वाटून खातात. परंतु कबुतर मात्र नेहमीच एकटाच खात असतो. आणि खाण्याचा वेगही खुपच जास्त असतो. घरटे बांधण्यासाठी यांना चार काडयादेखील पुरतात.

या पक्ष्यांच्या सोबत हळद्या, ससाणा, कोतवाल, खंड्या, नाचरा हे देखील दिसतात. साधारणपणे वसंत ऋतूत पक्षी जास्त दिसतात. पहाटे त्यांची छान किलबिल ऐकू येते. घरापासून थोड्या अंतरावर पाणथळ जागा आहे. बगळा, पाणकावळा इ. पाण्याजवळ आढळणारे पक्षी ये जा करताना दिसतात.

या पक्षी निरीक्षण तसेच त्यांचे फोटो टिपणे यामुळे सध्या माझी अवस्था ‘हा छंद जीवाला लावी पिसे’ अशी झाली आहे.


हा छंद जीवाला लावी पिसे मेघना शहा, ठाणे


मागील लेख पुढील लेख