1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

बिंब – प्रतिबिंब

मेघना शहा
पर्यावरणशास्त्र या विषयात एम एससी झालेल्या मेघना शहा या पर्यावरण दक्षता मंचच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग देतात. रेडियो, वर्तमानपत्र आणि मासिके यात त्यांनी लिहिलेले पर्यावरण विषयक लेख प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर त्या निसर्ग प्रकाशचित्रणाची आवड जोपासत फोटोसर्कल सोसायटीच्या समिती सदस्य आहेत. त्यामध्ये थोडा बदल करून खालील परिचय हवा आहे. (सध्या मी फोटोसर्कल सोसायटीची समिती सदस्य नसल्यामुळे हे वाक्य काढले आहे.) पर्यावरणशास्त्र या विषयात एम एससी झालेल्या मेघना शहा या पर्यावरण दक्षता मंचच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग देतात. रेडियो, वर्तमानपत्र, मासिके आणि ब्लॉग यात त्यांनी लिहिलेले पर्यावरण विषयक लेख प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर त्यांचे ई बुक देखील प्रसिद्ध झालेले आहे. त्या निसर्ग प्रकाशचित्रणाची आवड जोपासत आहेत.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

‘पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे’ गंगाधर महांबरे याचे हे सुंदर गीत. ‘हसणारे प्रतिबिंब’ हे ऐकताना कायम थोडे नवल वाटायचे. आपण जर हसलो तर आपले प्रतिबिंब नक्कीच हसरे असेल. पण निसर्गातील एखाद्या घटकाचे प्रतिबिंब हसरे कसे असेल? कदाचित कवीमनाला तसे दिसू शकेल. नाहीतरी ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हणतात ते काही उगीच नाही. हसरे नसले तरी कधी कधी प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असेदेखील होऊ शकते. शेवटी काय तर आपण कुठल्या नजरेने त्या गोष्टीकडे पाहतो हे महत्त्वाचे आणि निसर्गप्रेमींना तर निसर्गातील कुठली गोष्ट आवडेल याचा काही नेम नसतो! कुणाला निर्जीव वस्तू आवडतील, तर कुणाला सजीव. उदा. एखाद्या कलारसिकाला दगडात देखील एखादी कलाकृती दिसू शकते. तर दुसरा कुणी दगड काय बघायचा? असे देखील म्हणू शकतो. कुणाला नदी, समुद्र आवडतो, तर कुणाला जंगल आवडते.

आपले स्वतःचे प्रतिबिंब आरश्यात पाहणे कुणाला आवडत नाही? अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बहुतक सर्वांनाच ते आवडते. पूर्वी ही मक्तेदारी फक्त मुलींची असे मानले जायचे, परंतु आता मुलेही यात मागे नाहीत. आपण सुंदर दिसावे असे सर्वांनाच वाटत असते. काहींना ती नैसर्गिक देणगी मिळालेली असते, तर काहीजण ती प्रयत्नपूर्वक मिळवतात. अर्थातच यात सौदर्यप्रसाधनांचा वाटाही असतो. उगीच नाही टी.व्ही.वर एवढ्या सगळ्या जाहिराती झळकत


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

असतात. असो. तर एवढे सगळे करून आपण आरश्यात पाहून जणू विचारत असतो. ‘सांग दर्पणा कशी मी दिसते/दिसतो?’ गंमतीचा भाग सोडला, तर आपले प्रतिबिंब पाहणे हे सर्वांना आवडते हे एक ‘जागतिक सत्य’ आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये.

कधी कधी तर प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर दिसते. हे जसे आपण टिपलेल्या प्रकाशचित्राविषयी होऊ शकते, तसे निसर्गचित्रात देखील होऊ शकते. फरक एवढाच असतो, की आपले प्रकाशचित्र काढताना आपण शक्य असल्यास हवे तसे बदल करू शकतो. म्हणजेच मेकअप, स्थळ, काळ, कोन इत्यादी; परंतु निसर्गचित्र टिपताना हे शक्य नसते. मला निर्सग आवडतो, त्याच प्रमाणे निसर्गचित्र टिपायला देखील आवडतात. समजा एखाद्या पाणथळ जागेवरून पक्ष्यांचा थवा उडत आहे आणि त्याचे छान प्रतिबिंब तळ्याच्या पाण्यात पडले आहे. हे प्रकाशचित्र मला कॅमेऱ्यात टिपायचे आहे. त्यावेळेस अतिशय जलद गतीने कॅमेऱ्याचे सेटिंग करणे तसेच पाणी स्तब्ध असणे हे देखील जरुरीचे आहे. थोडक्यात काय तर, सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून येणे महत्वाचे आहे. तरच तुम्हाला छान प्रकाशचित्र मिळू शकते. इथे धोका एकच असतो, तो म्हणजे जर काही चुकले तर सहसा तो क्षण आपण आपल्या मर्जीनुसार परत मिळवू शकत नाही.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - आकाशाचे प्रतिबिंब
एकदा असेच पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. जवळच एक तळे होते. त्या तळ्याजवळ एक खंड्या उडत असताना दिसला. मासे पकडण्याची त्याची धडपड सुरु होती आणि त्याचे प्रकाशचित्र घेण्याची माझी धडपड सुरु होती. माझी चाहूल लागल्याने तो उडून गेला. मी थोडी निराश झाले होते. पण अचानक लक्ष तळ्याकडे गेले आणि तिथले दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. तळ्यात आकाशाचे आणि तळयाकाठी असलेल्या झाडाचे फार सुंदर प्रतिबिंब पडले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ पाणी असल्यामुळे प्रकाशचित्रात रंग उठून दिसत होते. सहज मनात विचार आला, की आपण समोर एकतर झाडे पाहू शकतो किंवा वर आकाश पाहू शकतो, पण या दोघांचे एकत्रितपणे दिसणारे प्रतिबिंब आपण पाण्यात पाहू शकतो. ते प्रतिबिंब प्रत्यक्षापेक्षा निश्चितच सुरेख दिसत होते.
प्रकाशचित्रण करताना अचानकपणे त्या शांत तळ्यात हलके तरंग दिसू लागले, बहुतेक पाण्यातील बेडूक किंवा माश्याची हालचाल झाली असावी. शांत असणाऱ्या पाण्यावर हलक्या लाटा दिसू लागल्या. मी पुन्हा वैतागले... पक्षी नाही, प्रतिबिंब नाही, आज काही प्रकाशचित्रणाचा दिवस नाही हेच खरे. तसेच पाणी पाहताना लक्षात आले, की त्या तरंगांच्या मध्यभागी एका झाडाचे प्रतिबिंब दिसत आहे. त्याचेही छान प्रकाशचित्र मिळाले. म्हणजे गेले होते कशासाठी आणि झाले काय अशी त्यादिवशी माझी स्थिती होती. हीच तर निसर्गाची गंमत आहे!


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - सूर्याचे आणि मुलाचे प्रतिबिंब
एकदा असेच संध्याकाळी समुद्रावर भटकंती करत होतो. मी मावळतीच्या सूर्याचे प्रकाशचित्र टिपत होते. हातात कॅमेरा असल्यावर हा मोह कुणाला नाही होणार? सूर्यास्त होण्यापूर्वी जास्तीत जास्त प्रकाशचित्र टिपण्याचा माझा प्रयत्न सुरु होता. तेवढ्यात लांबून दोन मुले येताना दिसली. छोट्याच्या हातात पिशवी होती, मोठा नुसताच चालत होता. ते तसे चालत जात असताना बरोबर सूर्यकिरण पाण्यात पडले होते तेथे पोहोचले. मोठ्या मुलाचे प्रतिबिंब बरोबर सूर्याच्या गोल प्रतिबिंबात असतानाच मला प्रकाशचित्र घेता आले. प्रकाशचित्र घेण्यास थोडा जरी उशीर झाला असता, तरी तो त्या प्रतिबिंबाच्या पुढे गेला असता आणि माझी एक चांगली संधी चुकली असती.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - गढूळ पाण्यातील प्रतिबिंब
पाण्यातील प्रतिबिंब टिपण्यासाठी पाणी स्वच्छ हवे असे मला नेहमी वाटत असे. पण थोड्याश्या गढूळ पाण्यात देखील बऱ्यापैकी प्रतिबिंब दिसते हे लवकरच लक्षात आले. रस्त्याच्या आजूबाजूला छान हिरवीगार भातशेती असणाऱ्या रस्त्यावरून एकदा प्रवास करत होतो. ऊन जास्त होते. त्यामुळे प्रकाशचित्र कसे घ्यावे या विचारात असताना पाण्यात भाताच्या रोपांचे प्रतिबिंब पडलेले दिसले. प्रखर ऊन असल्यामुळे पाणी गढूळ असूनदेखील प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - खिडकीचे प्रतिबिंब
पाण्यात दिसणारे प्रतिबिंब टिपण्यासाठी पावसाळा हा ऋतू सर्वात उत्तम. कारण तुम्हाला सहजपणे कितीतरी ठिकाणी प्रतिबिंब मिळू शकते. अशीच ही पावसाळ्यात टिपलेली प्रतिमा. खिडकीच्या गजाचे प्रतिबिंब खिडकीखालील पाण्यात पडले होते आणि त्या आकारामुळे एक छान रचना तयार झाली होती. खरं तर मला त्या खिडकीवर एखादा पक्षी बसलेला असतानाची प्रतिमा हवी होती. म्हणजे प्रतिमा थोडी वेगळी दिसली असती. बघू या तो योग कधी येतो ते.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - पाण्याच्या थेंबात संकुलाचे प्रतिबिंब
अशीच ही खिडकीवरून टिपलेली दुसरी प्रतिमा. नुकताच पाऊस पडून गेला होता. खिडकीवरील गजावरून पाण्याचे थेंब ओघळत होते. त्या थेंबांकडे बघत असताना लक्षात आले, की या थेंबात समोरील संकुल(कॉम्प्लेक्स) दिसत आहे. त्या एवढ्याशा थेंबात समोरील संकुल तसेच क्लब हाउस याचे प्रतिबिंब दिसत होते. जणू काही संकुल आपल्यात सामावून घेण्याची ताकद त्या छोट्याश्या थेंबात होती. नजरेने टिपलेले दृश्य लगेच कॅमेऱ्याने टिपण्याचा प्रयत्न केला.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - विद्युत रोषणाईचे प्रतिबिंब
ठाण्याची तलावपाळी ही एक प्रसिद्ध जागा. गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री ही तलावपाळी जणू उजळून निघते. सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताची उत्साहाने तयारी करत असतात. तलावाच्या काठावर छान पणत्यांची आरास केलेली असते. तसेच आजूबाजूला विद्युत दिव्यांची रोषणाई केलेली असते. फटाक्यांची आतिषबाजी असते. या सर्वांचे प्रतिबिंब तलावात पडलेले दिसते. अश्याच एका प्रतिबिंबाची ही टिपलेली प्रतिमा.


बिंब – प्रतिबिंब मेघना शहा, ठाणे

फोटो - कमळाचे प्रतिबिंब
कमळांच्या फुलांची टिपलेली प्रतिमा ही आपण नेहमीच पाहतो. पण खरंच, त्या फुलांचा रंग एवढा सुंदर असतो, की आपण त्यांची प्रतिमा घेण्याचा मोह आवरू शकत नाही. या प्रतिमेत उन्हामुळे खऱ्या फुलांचा रंग थोडा फिक्कट आला आहे, पण प्रतिमा सावलीत असल्याने तिचा रंग गडद आला आहे.

चांगली प्रतिमा मिळण्यासाठी तांत्रिक बाबी आणि कलात्मक दृष्टीकोन यांचा योग्य मिलाफ आवश्यक असतो आणि नियमित सरावाने ते शक्य होते. पण यासाठी आपली नजर कॅमेऱ्याच्या नजरेइतकीच तयार असावयास हवी हे देखील तितकेच खरे.To Read in English मागील लेख पुढील लेख