1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

ऑबसेर्व्हशन@वर्क

प्रशांत गोडबोले
प्रकाशचित्रणाला


शब्दांकन - स्वप्नाली मठकर


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

त्यादिवशी रस्त्याने चालताना मला महाकालीची अवाढव्य मूर्ती दिसली. तिच्या पायाशी थकून भागून झोपी गेलेला एक रस्त्यावरचा माणुस होता. तिथे आजुबाजुने अनेक लोक जात येत होते, पण कुणाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते आणि इतक्या गोंधळातही तो निवांत झोपलेला होता. महाकालीच्या पायाखाली जिथे राक्षस असतो त्याच जागी शांतपणे झोपलेला तो माणूस पाहून मला ती फोटोसाठी उत्कृष्ठ संधी वाटली. आजूबाजूचे लोक निघून जायची मी जरावेळ वाट पाहिली. काही वेळातच इतर लोक निघून गेले आणि मला हवी तशी फ्रेम कॅमेरामध्ये बंदिस्त करता आली.

तसं पहायला गेलं तर ही माझी फोटोग्राफीची स्टाईलच आहे. आजूबाजूचं दृश्य मी अगदी काळजीपूर्वक मनात टिपत असतो. आसपास घडणाऱ्या सर्व घटनांची नोंदही घेत असतो. प्रत्येकवेळी माझ्याकडे कॅमेरा असेलच असं नाही. पण तरिही अशा घटना नोंदवण्याचं मी थांबवत नाही. अनेकदा असं निरीक्षण करता करता एखाद्या वेगळ्याच घटनेचा साक्षीदार बनण्याचं भाग्य मला लाभतं. बऱ्याचवेळा एखादं दृश्य पाहिल्यावर पुढे काय घडू शकेल याचा अंदाज लावत हुकमी फोटोसाठी थांबलं, तर नेमका हवा तसा फोटो मिळतो. काही वेळा चक्क आपले अंदाज चुकून एखादी विलक्षण घटनाही पहायला आणि टिपायला मिळते.

आपण जेव्हा एखादं दृश्य पहातो, त्याच क्षणी डोक्यात त्या फ्रेमचं कम्पोझिशन सुरू होतं. मी याला एडिटींग म्हणतो. काहीजणांच्या मते एडिटिंग म्हणजे फोटो काढून झाला की करायचं पोस्ट प्रोसेसिंग. पण माझ्यामते खरं एडिटींग फ्रेम कंपोज करण्यापासूनच सुरू होतं. समोर दिसणारा कुठला भाग फ्रेममध्ये हवा, कुठला नको, कुठे मोकळी स्पेस हवी, प्रकाशाची दिशा काय, कुठल्या लेवलला कॅमेरा हवा या सगळ्याचा विचार करणे म्हणजे एडिटिंग. हे बऱ्याचवेळा योग्य प्रशिक्षणानं आणि सवयीनंही जमायला लागतं.


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

माझ्या लहानपणी मी चित्र काढायचो, शिवाय इंटरमिडीएट परीक्षाही पास झालो होतो. माझ्या वडिलांना असं वाटलं, की मी कलाक्षेत्रात चांगलं काम करू शकेन. त्यामुळे माझी रवानगी आर्ट स्कूल मध्ये झाली. इथे मला खूप मित्र मिळाले. आम्ही एकत्र स्केचिंग, लँडस्केप करायला जायचो. एकूण तो काळ खूप मस्त होता. शेवटच्या वर्षीच्या परिक्षेत मी महाराष्ट्रातून पहिला आलो होतो आणि माझ्यापुढे नोकरीच्या एकापेक्षा एक सरस अशा दहा संधी उभ्या होत्या. त्यातली सर्वात जास्त पगाराची नोकरी मी स्वीकारली. कारकिर्दीच्या अगदी सु्रूवातीलाच मला अरुण कोल्हटकर, किरण नगरकर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडुन जाहिरातीसाठी विचार कसा करायचा हे शिकायला मिळाले आणि ते फारच महत्वाचं होतं.

नंतर पुढे ‘फालक्रम (Falcrum)’मध्ये अमूलच्या जाहिरातींचे सर्वेसर्वा राहुल डाकुन्हा यांच्याबरोबर मी काम सुरु केलं. पुढची दहा वर्षं आणि तीन वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये आम्ही एकत्र काम केलं. फालक्रम (Falcrum) , लिंटास (Lintas) आणि कॉन्ट्रॅक्ट (Contract) अशा तिन्ही ठिकाणी आम्ही अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्टस्वर काम केलं. आमच्या 'हमारा बजाज' , 'पार्क अव्हेन्यू', 'शॉपर्स स्टॉप' अशा अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या. 'शॉपर्स स्टॉप'च्या कॅम्पेनसाठी Art Directors Club Annual Award मिळालं. 'हमारा बजाज'च्या जाहीरातीपासूनच मी थोडीफार स्ट्रीट फोटोग्राफी सुरु केली होती. मला बरीच बक्षीसंही मिळत होती. प्रबुद्ध दासगुप्ता, अजित पटेल, फारूक चोटीया, स्वपन पारेख, रघू राय यांसारखे दिग्गज फोटोग्राफर्स, मोठमोठे आर्ट डिरेक्टर्स आणि अॅटलेक पदमसी, जर्सी अॅणत्रेक, मुहम्मद खान यांच्यासारखी महान व्यक्तीमत्त्वं, अशा सर्वांबरोबर मला काम करायला मिळालं. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. पुढे मी झरवन पटेलबरोबर ‘आयडीयाज@वर्क (ideas@work)’ ही माझी जाहिरातसंस्था सुरु केली.


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

मी कलाकार असल्याने पेंटिंग, इलस्ट्रेशन्स, जलरंग, पेन स्केचिंग असे सगळे प्रकार हाताळतो. मला संकल्पनात्मक रेखाटनं (conceptual sketches) करायला सर्वात जास्त आवडतं. या रेखाटनांमधून माझ्या डोक्यातल्या विविध कल्पना कागदावर उतरतात. फोटोग्राफी माझ्या आयुष्यात कशी आली याचा एक वेगळाच किसा आहे.

जाहिरातीसाठी मी प्रत्येकवेळेला त्या विषयातल्या तज्ज्ञ फोटोग्राफरलाच बोलवायचो. ते कसं काम करतात याचं बारकाईनं निरीक्षण करायचो. एखादा शॉट असाच का केला, टेक्निकल गोष्टी काय असे प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती मिळवायचो. एकदा एअरटेलच्या 'एक्स्प्रेस युअरसेल्फ' या जाहिरातीसाठी स्वपन पारेख उपलब्ध नव्हते. त्यामुळे मी कॅमेऱ्याची जबाबदारी स्विकारली. ही जाहीरात आश्चर्यकारकरित्या लोकप्रिय झाली आणि तिला काही बक्षिसंही मिळाली. अनपेक्षितरीत्या वाट्याला आलेल्या कौतुकामुळे माझा फोटोग्राफीविषयीचा उत्साह वाढला आणि मी फोटोग्राफी करायला लागलो.

मला फोटोग्राफी अधिकाधिक आवडायला लागली. कारण एकतर हे खूप ताकदीचं माध्यम आहे. आपण एखादं चित्र काढतो, तेव्हा शेवटी एकच चित्र पूर्ण होतं; पण फोटोग्राफीत तसं नसतं. तुम्हाला एकाच घटनेची सहा, सात किंवा जास्त प्रकाशचित्रं मिळू शकतात; एखादी घटना घडताना ती कॅप्चर करणं शक्य होतं. माझा 'कुत्र्याच्या पायातून दिसणारा घोडा आणि माणूस' हा जो फोटो आहे, त्याचं उदाहरण घेता येईल. आधी मी खाली बसून घोडा आणि त्याच्या जवळ बसलेला माणूस असा फोटो काढत होतो. त्याच वेळेस नेमका एक कुत्रा तिथे आला आणि फोटोचा एक नवा कोन मिळेल असं मला वाटलं. त्या कुत्र्याला मी अगदी जवळ येऊ दिलं आणि मग त्याच्या पायातून घोडा आणि माणूस दिसतोय असा फोटो काढला. आता माझ्याकडे या एकाच घटनेचे सहा-सात चांगले फोटो आहेत. ही गोष्ट मला चित्रापेक्षा वेगळी वाटते. इथे आपण कोन बदलला की अगदी वेगळं प्रकाशचित्र मिळू शकतं. म्हणूनच आता कॅमेरा म्हणजे माझ्यासाठी माझी नवी दृष्टी बनला आहे.


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

माझ्या प्रकाशचित्रात कुत्रे, मांजरी, कबुतरं, कावळे मुबलक असतात. मला असं वाटतं, की आपण शहरात राहताना हे प्राणी, पक्षी जागोजागी दिसतात. त्यांचं अस्तित्व सतत आपल्या अवतीभवती असतंच. हे प्राणी म्हणजे शहरी आयुष्याचा भाग झालेले आहेत. त्यांना फोटोत आणलं, की फोटो अधिक जिवंत, खरे वाटतात. एखादी नुसती भिंत फोटोत बघायला कशी सुनीसुनी वाटेल. पण जर त्या भिंतीवर एखादं कबुतर येऊन बसलं, तर त्या भिंतीचा फोटो एखादा वेगळा अर्थ सांगून जाईल, त्या भिंतीला जिवंतपणा देईल. हे प्राणी प्रतिक आहेत असं मानलं, तर ते ही चित्राला एक वेगळा आयाम देतात. म्हणजे कुत्रा हा मित्र, कबुतर हे विचाराचं प्रतिक, हत्ती संपत्तीचं प्रतिक असा विचार केला, की फोटोला अधिक अर्थपूर्ण मिती मिळते.

सगळा विचार करता करता आपण पुन्हा कंपोझिशनकडेच येतो. मघाशी म्हणालो तसं कंपोझिशन म्हणजे एडिटिंग. एखाद्या फोटोत स्पेस म्हणजे मोकळी जागा आणणे किंवा जाणीवपूर्वक मोकळा भाग ठेवणे हे अतिशय महत्वाचं आहे. फ्रेममध्ये विषयाला पुरेशी जागा मिळाली, की तो विषय अधिक उठून येतो आणि बघणाऱ्या व्यक्तीला विषयाचं महत्त्व ठळकपणे जाणवतं. एखाद्या विषयाची जाणीव होण्यासाठी त्याभोवतालचं वातावरणही जरुरी आहे. हे वातावरण त्या फोटोतून स्टोरी उलगडून दाखवतं. पण त्या नादात फार गिचमिड, नको असलेल्या गोष्टीही फोटोत आल्या, तर त्या मारक ठरतात. अर्थात स्पेस हवी, भोवतालचं वातावरण हवं पण अगदी नेमक्या गोष्टीच हव्यात आणि तरीही साधं-सोपं हवं हे साध्य करणं मात्र थोडं कठीण आहे.


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

प्रत्येक फोटोग्राफर वेगळा असतो, आणि त्यामुळे प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते. मला सुप्रसिद्ध फोटोग्राफर रघू राय यांच्याबरोबर काम करण्याची आणि शिकण्याचीही संधी मिळाली. त्यांच्या फोटोचं कंपोझिशन थोडं कठीण असतं; फोटोत एकात एक असलेल्या स्पेसेसही असतात आणि त्यात लेयर्सही असतात ही त्यांची खासियत आहे. ती त्यांची खास अशी स्टाईल आहे असं म्हणता येईल. माझी स्टाईल सिम्पल आहे. जाहिरातक्षेत्रामुळे फोटो साधा-सोपा आणि थेट मांडण्याकडे माझा कल असतो, त्यामुळे बघणाऱ्याची नजर नेमक्या गोष्टीवर खिळून रहाते.

कधीकधी मला वाटतं, की चित्रकला आणि फोटोग्राफी या कलादेखील संगीतकलेसारख्याच आहेत. संगीतात चढ-उतार असतात, ठहराव असतात; या गोष्टीमुळे संगीत ऐकताना भान हरपून जातं. डोळे मिटून एखादं गाणं ऐकलं, की त्यातले आकृतिबंध आणी रेषा डोळ्यासमोर उमटायला लागतात. चित्रकला आणि फोटोग्राफीचंही तसंच काहीसं आहे. यातल्या स्पेसेस चित्राला अधिक आशयपूर्ण बनवतात. उदाहरण म्हणून माझं '३०किमी' हे चित्र पाहिलं, तर त्यात खूप रिकामी जागा आहे. त्यात तो कावळा नसता, तर या चित्राला फारसा अर्थ नव्हता. मी त्याबरोबर एखादा माणूसही फ्रेममध्ये आणू शकलो असतो. पण मग मुख्य फोकस बदलला असता आणि चित्र आताइतकं अर्थपूर्ण वाटलं नसतं.

दृश्यकलेतल्या सगळ्या गोष्टी शेवटी निरीक्षणावर अवलंबून असतात असं म्हणायला हवं. जितकं बारकाईने तुम्ही निरीक्षण कराल तितक्या ताकदीने तुम्ही तुमच्या कल्पना कागदावर मांडू शकाल. रस्त्यानं चालताना डोळे उघडे ठेवून फिरलं, की भारतासारख्या देशात फोटो काढण्यासारख्या अनेक गोष्टी दिसत रहातात. लोकांना न दुखावता, त्यांच्या अजाणतेपणीही तुम्ही खूप छान गोष्टी कॅप्चर करू शकता. पण त्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असण्याची गरज आहे.


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

इण्टरनेटवरही तुम्हाला खूप फोटो पाहायला मिळतात. ते अवश्य पहा, पोर्ट्रेटचा अभ्यास करा. त्यातून एक नवी दृष्टी मिळते. पण त्याचा अर्थ असा नव्हे, की दुसऱ्या कुणीतरी काढलेले फोटो कॉपी करा. एखाद्या फोटोला बक्षीस मिळालं, की अनेकजण तो फोटो जवळपास कॉपी करू लागतात. नेटवर एकासारखेच अनेक फोटो दिसायला सुरूवात होते. आज प्रत्येकाकडे कॅमेरा आहे आणि सगळ्यांना फोटोग्राफर बनायचं आहे. तुम्ही नेमक्या क्षणी तिथे असाल, तर तुम्हाला छान फोटो मिळतो; पण तुमच्या कामात सातत्य आहे का? तुमच्या कामात प्रयोगशीलता असणं जरुरी आहे. मोठमोठ्या कलाकारांच काम बघा. एखादा फोटो कसा काढला हे विचारण्याआधी 'असाच का काढला' हा प्रश्न विचारायला शिका. नेटवर दिवसाला ३५० मिलियन फोटो अपलोड होत असतात. तुमचं काम वेगळं असेल, क्रिएटिव असेल अणि तुमच्या कामात सातत्य असेल तरच तुम्ही या स्पर्धेत टिकून राहू शकाल. नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी निरीक्षण करायला शिकणं हे सगळ्यात महत्वाचे आहे.

Observation, It's a power within you, only if you observe!


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले


ऑबसेर्व्हशन@वर्क प्रशांत गोडबोले

To Read in English मागील लेख पुढील लेख