1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

वारी !

रेखा भिवंडीकर
सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधुन फाईन आर्टची पदवी घेतली असून, त्यांना पोर्टेट आणि इलस्ट्रेटर साठी सलग चार वर्षे पारितोषीके मिळाली आहेत. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित जहांगीर आर्ट गॅलरीतील वार्षिक प्रदर्शनात त्यांची दोन पेंटीग्स निवडली गेली आहेत. सध्या त्या प्रकाशचित्रणासोबतच आपले हस्तकला नावाचे बुटिक सांभाळत आहेत. त्यांना लेखन आणि प्रवासाचीही आवड आहे.


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण

हिरवी शाल पांघरलेला तो दिवेघाट......
खोल दरीत मस्तानीचं तळं
आकाशाचा निळा रंग घेऊन भरलाय
थंड वारा...
ऊन-पावसाचा खेळ आणि
पांढर्या रंगांनी भरलेला, दूरवर पसरलेला
नागमोडी रस्त्यांचा दिवेघाट...
हिरवा, पांढरा, करडा, निळा हे रंग
आणि भजन, कीर्तन, अभंग, टाळांचा गजर...

शरीर आणि मन त्या आसमंतात असं काही तल्लीन होऊन जातं, की तिथे तुम्ही तुमचे राहतच नाही. त्या भूमीत पाय ठेवल्याबरोबरच त्या वलयामध्ये, त्या तेजामध्ये तुम्ही विरघळून जाता. आपण सहज त्या टाळ-मृदुंगाच्या नादात सामील होतो. आणि एकदा का हे वेड लागलं की जन्मात सुटका नाही. खरंच, मला वेड लागलं या वारीचं!

दिवेघाटातून वारी सासवडला जाते, तेव्हा आम्ही सेवा म्हणून त्यांना ट्रक भरून चिक्की आणि पाणी वाटतो. सकाळी सहापासून संध्याकाळी सहापर्यंत, अखंड उभे राहून त्या माऊलींना हे वाटप केलं जातं. पांडुरंगाच्या ओढीने चालणारा प्रत्येकजण इथे माऊली. इथे स्त्री-पुरुष भेद नाही, जाती-भेद नाही; फक्त सेवा करणे हा एकच धर्म वारीला असतो.


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण

मी दरवर्षी नित्यनियमित वारीला जायला लागले. दिवसभर अखंड उभं राहून चिक्की, आलेपाक, पाणी वाटता वाटता, माऊली माऊली म्हणता म्हणता माझं वारीशी, वारकर्यांशी एक नातंच तयार झालं. एकादशीच्या उपवासाच्या दिवशी हे वारकरी एका दिवसात सर्वात मोठा पल्ला पार करतात. घाट चढून थकलेली माणसं चिक्की खाऊन पाणी पितात आणि तृप्त होऊन मनापासून आशीर्वाद देतात. असे कितीक आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे असतील याची गणतीच नाही. किती भक्ती, प्रेम बघितलेय त्यांच्या डोळ्यात! मधेच असं वाटून जातं, की या वारकर्यांना भेटताना एखाद्यामध्ये मला पांडुरंगही भेटला असेलच ना?

अर्थात या सर्वात आपण आपले नसतोच. आपण त्रयस्थासारखेच तिथे वावरत असतो. अंतर्मनातले संकेत घेऊनच बोलत असतो, वागत असतो. मनाला एक प्रकारचा मोकळेपणा, शांतता प्राप्त झालेली असते. खरेतर ही अवस्था अनुभवण्यासाठीच आयुष्यात एकदा तरी वारी करावी. भले दोन दिवस तरी वारकर्यांबरोबर घालवावे, तो अनुभव घ्यावा आणि तो ‘ईश्वरी स्पर्श’ अनुभवावा.

आत्मिक समाधान काय असते हे मला इथे समजले. हे समाधान एक वर्षभर पुरवून परत पुढच्या वर्षी जास्त उत्साहात मी तयार व्हायचे. प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी मिळायचं. मग काही वर्षांनी कॅमेरा हाती आला. मला रंगांचं वेड होतंच, रचनाही दिसतंच होत्या. यापूर्वी मी हे सर्व डोळ्यांनी आस्वादत होते. आता कॅमेर्यात बंदिस्त करू लागले. इतकी वर्षे सतत जात राहून तिसरा डोळा तयार झालाच होता. त्यामुळे काय फोटो काढायचे, कसे काढायचे याचा जास्त विचार करावा लागलाच नाही. तेथील वातावरण, परिसर सुंदरच असतो. मग शिस्तीत चालणार्या दिंड्या, गाणारे, नाचणारे, फुगड्या खेळणारे वारकरी आणि मागे निळेभोर आकाश असे सुंदर सुंदर फोटो मिळतात.


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण

सात ते आठ लाख वारकरी, जवळ जवळ २५० दिंड्या! इतक्या चेहऱ्यांमध्ये मला सुरकुतलेले चेहरे, भडक लाल, नारंगी, पिवळे फेटे घातलेली पुरुष मंडळी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या बायका, नथनी घातलेल्या बायकांचे चेहरे खूप आवडतात. शेतात, रस्त्याच्या बाजूला कुठेही झोपलेले, विश्रांती घेणारे, भजन, अभंग म्हणत चालणारे वारकरी व त्यांच्या हातातील फडफडणार्या नारंगी पताका(झेंडे) असे कितीतरी रचना, विषय तिथे उपलब्ध असतात. फोटोग्राफीसाठी वारी म्हणजे एक वेगळेच आव्हान आहे.

आता सेवा करता करता मला त्यांचे फोटो काढायचं वेड लागलंय. मी त्यासाठी खूप फिरत असते. वारकरी चालतात, पण त्या व्यतिरिक्त आजूबाजूला काय काय चाललंय हेही मला आता दिसतं. विश्रांतीसाठी ते घोळक्यांनी बसतात. काहीजण झाडाच्या सावलीत, रस्त्याच्या कडेला, शेतात झोपलेले असतात. त्यांचे चालून चालून थकलेले, खूप भेगा पडलेले पाय मला दिसतात. बाजूला तात्पुरत्या टपर्या उभारलेल्या असतात. त्यांच्याही रचना बघण्यासारख्या असतात. चहाची गाडी तर खास सजवलेली असते. मध्येच तलावावर आंघोळीसाठी गर्दी झालेली असते. काठावर बायका आपल्या साड्या धुवून एकमेकींच्या हातात धरून सुकवत असतात. हे फोटो काढायला मला फार आवडतात. किती रंग, कीती रचना मला दिसत असतात. मी त्यांना टिपत असते. कधी वाईड लेन्स लाव, तर १८-१३५ ही लेन्स लाव, अशी माझी खूप गडबड चालू असते. आनंद प्रचंड असतो. त्या वेडात मी फिरत असते. शोधात असते. खूप काही मिळतं. बघून बघून शेवटी डोळे थकून जातात. आणि तो जड कॅमेरा, ती त्याची ब्याग सांभाळून हात थकतात. शेवटी मी कॅमेरा ठेवून देते. कारण समोरचं नाट्य काही संपतच नसतं. आता सर्व परत मनानेच, डोळ्यानेच आस्वादते.


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण

हे सर्व भरपूर अनुभवून मी माझं मन खंबीर, कार्यक्षम व मजबूत करते. आयुष्यात कुठेही मी डगमगायला नको, कोलमडायला नको, मागे फिरायला नको. इतके लाखांच्या संख्येने येणारे वारकरी, प्रत्येकालाच त्या पांडुरंगाची ओढ, प्रेमाने भरलेलं त्याचं मन, त्यांच्यात अवतरलेली ती वेगळीच शक्ती, या सगळ्याचं मिळून तयार झालेलं ‘अमूर्त रसायन’ असं काही मला दिसत नसलं, तरी पण ते जाणवत असतं. माझी ओढ, माझा नाद हे पण त्या अमूर्त शक्तीत मी सहज मिळवून टाकते. इतक्या वर्षांच्या सवयीमुळे मला ते आता शक्य होतं. मी त्यात नखशिखांत बुडून जाते. त्या वलयांमध्ये, त्या तेजात मी पूर्ण विरघळून जाते. ती शक्ती आणि मी एक होऊन जातो. ती माझ्या आत्म्यात असते. मीच तो पांडुरंग असते. ‘एकच क्षण’ मला असा मिळतो, की मी थेट त्याच्यातच जाऊन, त्याचीच होऊन जाते.

तो एकच क्षण मला तृप्त करतो. शांत शांत करतो. मी परत जेव्हा माझ्यात येते, भानावर येते, तेव्हा मला जाणवतं, की मी कितीतरी स्थिर व शांत झालेय. आयुष्यात खूप काही मिळवलं, तरी समाधान शेवटी आपण शांत होण्यात, शांत जगण्यात आहे. नक्की काय करायचं, काय पाहिजे, कसं जगावं याची गणितं, आराखडे विरून जातात. एका तरल अवस्थेतच आपण जातो. खरं सांगायचं तर आपण लायनीवर येतो.


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण


वारी ! रेखा भिवंडीकर, कल्याण
To Read in English मागील लेख पुढील लेख