1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

आनंदवारी

स्वप्नील पवार
फोटोग्राफर


शब्दांकन: मानसी आमडेकर


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे

ज्येष्ठ महिना अर्धा सरला, की साऱ्या महाराष्ट्रभर लगबग सुरू होते. घरोघरी तयारी सुरु होते ती आषाढातल्या एकादशीच्या वारीची! घरातल्या वयोवृध्द मंडळीकडून पंढरपुराचं वर्णन, त्यांच्या कल्पनेनेच जागा झालेला उत्साह आणि आनंद आपल्यापैकी अनेकांनी पाहिला, ऐकला असेल! तिथल्या एकूण वातावरणाबद्दल, आषाढी वारीतल्या लोकांच्या प्रचंड आणि उस्फूर्त सहभागाबद्दल आजवर अनेक प्रसारमाध्यमांनी अनेक अंगांनी भाष्य केलं आहे, त्याचीही दखल आपण दरवर्षी घेतो. पण अनुभवांच्या या देवाण-घेवाणीमध्ये बदलत्या काळाच्या अनुषंगाने होणारे बदल आणि व्यक्तिसापेक्षता हे दोन महत्वाचे मुद्दे अडथळा ठरू शकतात!

आषाढ सुरु झाल्यावर आम्ही मित्र-मंडळींनी एकत्र येऊन वारी करायचं ठरवलं, तेव्हा आमच्यापाशी इतपतच पार्श्वभूमी होती. पावसाळ्याच्या हंगामात घडणारा हा मानवनिर्मित चमत्कार पहायला आम्ही सरसावलो होतो. ही इतकी माणसं, देशाच्या कानाकोपऱ्यातून, अगदी परदेशातून सुद्धा, कोणत्या अनामिक ओढीने आणि प्रेरणेने इथे येत असतील? देवळाच्या नुसत्या कळसाच्या दर्शनाने यांना नेमकं कोणतं आंतरिक सुख मिळत असेल, ज्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांना इथे, इतक्या लांबवर यावंसं वाटत असेल? असे असंख्य प्रश्न आमच्या मनात येत होते.


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे

पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन जन्माचं सार्थक होतं असं म्हणतात. त्याची यथार्थता ही अनुभवातूनच लक्षात येते. ती अनुभवण्यासाठी आम्ही खांद्यावर सॅक टाकली आणि निघालो. ‘एक तरी ओवी अनुभवावी’, तशी एक तरी वारी अनुभवण्यासाठी! महाराष्ट्राला सर्वच अर्थांनी जोडणारी ही अदभूत वारी आमच्याही झोळीत कित्येक नवीन गोष्टी टाकून आम्हाला नवनवीन गोष्टी शिकवून, दाखवून आणि जाणवून देणारी अनुभूती ठरली. त्या वातावरणातलं भारलेपण आणि वारकऱ्यांकडून मिळणारं आपलेपण मात्र प्रत्यक्षच जगावं असं असतं!

दिवेघाटातून माउलीची पालखी पुढे सरकत असताना उंच टेकडीवरून पाहिलं, तर एक मोठा नागमोडी रस्ता पांढराशुभ्र झालेला दिसतो . झेंडे, पताका, फेटे, शेले आणि रंगीत ट्रकचे रंग सोडले तर एकच एक पांढरा रंग नजरेत भरतो. उच्च-नीचतेची सारी आवर्तनं गळून पडतात! शेजारच्या दरीतल्या हिरवाईची किनार त्याला आणखीच खुलवून जाते .

पंढरीच्या वारीमध्ये एक वेगळीच दिनचर्या पाळावी लागते. आपल्या शहरी सरावलेल्या वेळापत्रकापेक्षा ती प्रत्येक बाबतीत वेगळी असते. गेली तीनशे-चारशे वर्षं आपल्या महान संत-महंतांनी ज्या रस्त्यावरून हरी दर्शनासाठी पंढरपूरची वारी केली त्याच रस्त्याने, त्याच वाटेवरून आपला प्रवास सुरु असतो. भावनांची अनेक आंदोलने मनात सुरू असतात. आणि त्याच बरोबर वाटेत अनेक खेळ, उद्बोधक प्रवचनं, अभंग पठण असंही बरंच काही सुरू असतं. घटकाभर सगळेच विश्रांती घेतात. चार-दोन गप्पागोष्टी होतात. हलकी न्याहारीही होते. घाटाच्या वाटेत कुठेच सावली नसते; त्यामुळे दुपारच्या रणरणत्या उन्हात डोक्यावरच्या नाजूक तुळशीला त्याची झळ लागू नये म्हणून तिला तात्पुरती सावलीची व्यवस्था करून विश्रांती दिली जाते! आपण आपली सावली स्वतः टोपी, छत्री किंवा कपड्याचा सहाय्याने तयार करू शकतो, पण त्याची गरज फक्त आपल्याला असते असं नाही हा विचार सगुण भक्ती शिकवतो!


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे

पण पाऊस काही इतका कठोरपणे वागत नाही, मधूनच आपल्या ढगांची सावली देऊन चालणाऱ्या पावलांना सुखावतो. प्रवास तोही करतो, आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन त्यालाही घ्यायचंच असतं की! या वारीमध्ये तर आमच्या कॅमेरावरही कृपा केली होती त्याने!

वारी करताना शहरी आधुनिक जीवनशैलीपेक्षा अगदी वेगळी मूल्य शिकायला मिळतात; किंबहुना ती आत्मसात करावीच लागतात. स्वतःचं सामान स्वतःच उचलायचं, कपडे–भांडी स्वतःच धुवून व्यवस्थित ठेवायची. कुणाशीही भेदाभेद बाळगायचा नाही. पडेल ते काम आणि जमेल तशी सर्वांना मदत करायची. पांडुरंगाचं अखंड नामस्मरण होत असलेल्या वातावरणात मग आपोआपच सगळ्या ‘अमंगळ’ गोष्टी मनातून काढता पाय घेतात! नवीन माणसं भेटतात, त्यांच्याशी बोलणं होतं. वेगवेगळी छोटीछोटी गावं वाटेत लागतात. तिथलं समाजजीवन जवळून पाहायला मिळतं. आपण आपल्या राहणीवरून त्या सगळ्यांपेक्षा वेगळे दिसत असलो, तरी आपणही त्याच मातीतला, त्याच संस्कृतीमधला एक सामान्य मनुष्य आहोत ही जाणीव आपल्याला होत राहते. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ हा एकच धागा सर्वांना एकत्र एका सूत्रामध्ये जोडतो आणि बांधून ठेवतो. रिंगण धरून त्यात उभं राहिलं, की बाजीरावाची विहीर जिथे आहे, तिथे ८ ते १० लाख लोकांचा प्रचंड जनसमुदाय एकाच ध्येय्याने, एकाच ध्यासाने प्रेरित झालेला आपल्याला पाहिला मिळतो. आणि आपणही त्याचा एक हिस्सा आहोत ही भावना खूप काही देऊन जाते .


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे

पंढरीच्या वारीमध्ये एक वेगळीच दिनचर्या पाळावी लागते. आपल्या शहरी सरावलेल्या वेळापत्रकापेक्षा ती प्रत्येक बाबतीत वेगळी असते. गेली तीनशे-चारशे वर्षं आपल्या महान संत-महंतांनी ज्या रस्त्यावरून हरी दर्शनासाठी पंढरपूरची वारी केली त्याच रस्त्याने, त्याच वाटेवरून आपला प्रवास सुरु असतो. भावनांची अनेक आंदोलने मनात सुरू असतात. आणि त्याच बरोबर वाटेत अनेक खेळ, उद्बोधक प्रवचनं, अभंग पठण असंही बरंच काही सुरू असतं. घटकाभर सगळेच विश्रांती घेतात. चार-दोन गप्पागोष्टी होतात. हलकी न्याहारीही होते. घाटाच्या वाटेत कुठेच सावली नसते; त्यामुळे दुपारच्या रणरणत्या उन्हात डोक्यावरच्या नाजूक तुळशीला त्याची झळ लागू नये म्हणून तिला तात्पुरती सावलीची व्यवस्था करून विश्रांती दिली जाते! आपण आपली सावली स्वतः टोपी, छत्री किंवा कपड्याचा सहाय्याने तयार करू शकतो, पण त्याची गरज फक्त आपल्याला असते असं नाही हा विचार सगुण भक्ती शिकवतो!

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा | आनंदे केशवा भेट द्यावी ||
असं म्हटलंय ते अगदी खरं आहे.


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे

गावोगावच्या वेशीवर पालख्यांचे स्वागत पेढे-बत्ताश्यांनी करणारी मुलं, ठिकठिकाणी भोजनाची आणि वारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणारी दानशूर मंडळी, आपल्या पालखीसोबत चालणाऱ्या सर्वांना आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य मानून त्यांच्यासाठी देखील पिठलं-भाकरी रांधणाऱ्या, नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या आणि लाडू गावोगावहून करून पाठवणाऱ्या माता-भगिनी.... खरंतर पांडूरंगाचीच रूपं वाटतात ही सगळी! निव्वळ स्वतःचा विचार सोडून स्वतःपलीकडचं जग पाहण्याचा अनुभव म्हणजेच त्या देवाचं खरं दर्शन असतं असं म्हणावसं वाटतं! चंद्रभागेच्या काठावरचं देवाचं गाव एकदा तरी प्रत्येकाने पहावंच! आणि मनात वसलेलं एक समृद्ध असं ‘अनुभवाचं गाव’ घेऊन आपापल्या वाटेला लागावं!

या लेखासोबत ‘रानवाटा’ या संस्थेने तयार केलेला ‘आनंदवारी’ हा लघुपट youtube वर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याची link पुढीलप्रमाणे https://www.youtube.com/watch?v=3RB948sqhqs


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे


आनंदवारी स्वप्नील पवार, ठाणे











To Read in English मागील लेख पुढील लेख