1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

स्ट्रीट फोटोग्राफी

सायली घोटीकर
छायाचित्रकार


स्ट्रीट फोटोग्राफी सायली घोटीकर, ठाणे

हातात कॅमेरा घेऊन दिवसदिवस रस्त्यांवरून भटकत स्ट्रीट फोटोग्राफी करणे हा माझा आवडता उद्योग आहे. असे फिरताना मला हजारो चेहरे भेटतात. त्या चेहऱ्यांमागची हाडामासाची खरीखुरी माणसं भेटतात आणि त्यांच्या जगात घेऊन जातात .

मला वाटतं खरं जीवन या साध्यासुध्या माणसांच्या राहणीत पाहायला मिळतं. सुरूवातीला ही माणसं पटकन खुलून बोलत नाहीत. त्यांना बोलतं करण्यासाठी मी त्यांच्याशी गप्पा मारते. एखाद्या कोळीणीला कालवणाची रेसिपी विचारते. तर एखाद्या ट्रेनमधल्या फुलवालीला फुलांच्या वाढत्या किमतींबद्दल विचारते. कधी एखादा गजरा घेऊन तिलाच गिफ्ट करते. मग हळुहळू हे लोक बोलायला लागतात, जवळ येतात, हसतात. आणि चक्क फोटो काढायला परवानगीही देतात. त्यांच्या सहज सुंदर भावमुद्रा टिपताना जाणवतं की त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यातही किती सौंदर्य दडलेलं आहे. त्या खडबडीत चेहऱ्यामागची नजर प्रेमळपणे हसत असते. मग अशी एखादी भाजीवाली आजी पोटतिडकीने सांगते,"बयो एकटी हिंडते आहेस, जपून बरं …" काहीही संबंध नसताना असे सूर जुळतात.


स्ट्रीट फोटोग्राफी सायली घोटीकर, ठाणे

ही खरी माणसं असतात, कसलेही मुखवटे धारण न केलेली. त्यांच्या आयुष्यात काही भपका नसतो! हातावर पोट असतं, उद्याच्या जेवणाची भ्रांत असते. पण तरीही जगण्याची तीव्र इच्छा असते. चमकणारे डोळे, हसणारे ओठ खूप शिकवून जातात मला आणि सांगतात, "जगत रहा, हसत रहा". कधी उदास वाटत असेल तरीही मी मग कॅमेरा गळ्यात अडकवून बाहेर पडते, आणि मग आपसूकच जाणवतं, की देवाने आपल्या पदरात कित्ती मोठ्ठ दान दिलंय! मी शिकते या लोकांकडून. फोटोग्राफीबरोबर जीवनाचे धडे आपोआप मिळत जातात.

हे रस्ते 'जीवंत' असतात; रंगीत असतात. जीवनाचे विविध पैलू इथे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात. अगदी नशेखोर माणसापासून टिळा लावलेल्या साध्याभोळ्या भक्तापर्यंत सगळे या रस्त्यांवर भेटतात. रस्त्यावर आलेलं बालपण घेऊन फुगे विकणारे लहानगे भेटतात. बुटपॉलीशवाल्यापासून पानवाल्यांपर्यंत आणि व्यावसायिकांपासून ते कॉर्पोरेट काम करणाऱ्या लोकांपर्यंत हजारो लोक रस्त्यावर दिसतात, भेटतात. इथेच मला समाजाचे विविध रंग बघायला मिळतात. विविध मूड्स, विविध मुद्रा, विविध पोशाख, characters ! कित्ती विविधता टिपता येते. भाजीवाल्या बायकांच्या साड्या कित्ती रंगीत असतात आणि भिरभिरं विकणारा एखादा पोरसवदा तरुण त्या भिरभिऱ्यांच्या रंगात नाहून निघलेला असतो. मग मी कधी एखाद्या भेळवाल्याला कॅमेरात टिपत रहाते. आपलं काम किती तन्मयतेने करत असतो तो. माझेफोटो आपसूक छान येतात असं मला वाटतं.

रस्त्यावरच्या वेड लागलेल्या बाईला ‘फोटो काढू का?’ असं विचारल्यावर ती साडी नीट करत हसते. तिला बिस्किटांचा पुडा दिल्यावर तोंडभरून आशीर्वाद देते. छोटी मुलं चॉकलेट चॉकलेट करत भोवताली गोळा होतात. एखादा पानवाला त्याचे फोटो काढल्यावर आनंदाने हातावर लिमलेटची गोळी ठेवतो. रस्त्यावर फोटो काढण्याबरोबरच मी माणसंही जोडत जाते.


स्ट्रीट फोटोग्राफी सायली घोटीकर, ठाणे

कुठेही ट्रीपला गेल्यावर मी आधी तिथल्या बाजाराला भेट देते. हे बाजार मला नेहमीच खुणावत असतात. कुठल्याही गावाचा बाजार त्या-त्या गावची संस्कृती दाखवतो. गावाच्या, तिथल्या समाजजीवनाच्या विविधरंगी छटा तिथे बघायला मिळतात. फक्त स्थळदर्शन करून ती जागा कळत नसते, तर त्यासाठी तिथे लोकांमध्ये मिसळावं लागतं. गावातल्या भाषेचा लहेजाही या बाजारात हळूहळू समजत जातो. आणि मला हे सारं खूप आवडतं!

मला वाटतं या रस्त्यांनी मला खूप घडवलंय! माझ्यातल्या लाजऱ्याबुजऱ्या मुलीला या रस्त्यांनी समज दिली, धीट बनवलं. लोकांशी संवाद साधायला शिकवला. स्वत:बद्दल अधिक खुलेपणाने विचार करायला शिकवलं. मी या रस्त्यांची नक्कीच ऋणी आहे. इथे फिरताना सगळेच चांगले अनुभव येतात असंही नाही. इथेही वाईट प्रवृत्ती असतातच. पण मी इतक्या वर्षांच्या सवयीने आता माणसं ओळखू शकते असं मला वाटतं.

हे रस्ते फोटोग्राफीसाठी अनेक विषय देतात. प्रत्येक व्यवसाय, स्वभाव, पोशाख, चेहरेपट्टी, सगळंच वेगळं! फोटो काढायला सुवर्णसंधीच जणू. व्यक्तिचित्रणासाठी तर इथे खजिनाच खुला असतो. इथेही जीवनात धावपळ असतेच, पण तरीही आयुष्य आपल्या गतीने चालू असतं. इथे फोटोग्राफीबरोबर मी जगायला शिकते. इथल्या लोकांसारखाच आहे त्यात आनंद शोधायला शिकते! हसत रहायला शिकते. त्यांच्या जगात हळूच डोकावून आल्यावर माझं जग विस्तीर्ण होतं, अनुभव वाढत जातो, माणसं जोडली जातात. आणखी काय पाहिजे असतं माणसाला?


स्ट्रीट फोटोग्राफी सायली घोटीकर, ठाणे


स्ट्रीट फोटोग्राफी सायली घोटीकर, ठाणे

To Read in English मागील लेख पुढील लेख