1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

एक अनोखा स्लाईड शो

बैजू पाटील
सुप्रसिद्ध वन्यजीव प्रकाशचित्रकार बैजू पाटील हे सुमारे पंधरा वर्षापासून फोटोग्राफी करत आहेत. जंगलातले वैविध्य, भव्यता आणि तिथे घडणाऱ्या विलक्षण घटना त्यांना कायम जंगलात जाऊन फोटोग्राफी करायला उद्युक्त करतात. भारतातली जवळपास सर्व राष्ट्रीय उद्याने त्यांनी पालथी घातली आहेत. प्रत्येक वेळी फोटो काढताना काहीतरी वेगळा, सर्जनशील आणि उत्तम फोटो काढायचा त्यांचा प्रयत्न असतो. कलेची आवड असल्याने त्यातली रंग, कम्पोझिशन इत्यादीची त्यांना जाण आहे आणि ती त्यांच्या फोटोग्राफीमध्येही दिसून येते. त्यांचे वाइल्डस्केप नावाचे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असून एनव्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया, सेव एस बँक अवार्ड, वीर भागात सिंह अवार्ड, महाराष्ट्र भूषण, आरबीएस सँक्चूअरी अवार्ड फॉर बेस्ट वाइल्डलाईफ फोटोग्राफर-२०१०, कॅनन फोटोग्राफर ऑफ द इयर, वाईल्ड महाराष्ट्र फोटोग्राफर ऑफ द इयर, WWF, Picasso, NWF, US, Big Picture, San Francisco असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. http://www.baijuwildlife.com

शब्दांकन - संघमित्रा बेंडखळे


एक अनोखा स्लाईड शो बैजू पाटील

प्रसिद्ध पक्षी आणि वन्यजीवन प्रकाशचित्रकार बैजू पाटील यांची भेट त्यांच्या अमूल्य फोटोंचा स्लाईड-शो पाहताना झाली. स्क्रिन वरील एक-एक चित्र सरकत होते. पटकन मनात विचार येऊन गेला, ही प्रकाशचित्र Google Screen Saver तर नाहीत ना? प्रत्येकजण प्रकाशचित्रांमध्ये गुंतून जात होता.. कुठला कॅमेरा, कॅनन की निकॉन? किती मेगा पिक्सल? फोटोशॉप एडीटींग वगैरे नेहमीचे प्रश्न खूप लांब गेले आणि फक्त शब्द येत होते, वा आणि वा!

बैजू पाटील गेली १५ वर्षे मनसोक्तपणे वन्यजीवन फोटोग्राफी करीत आहेत. प्रकाशचित्रे काढण्यासाठी देश विदेशातील जंगले त्यांनी अभ्यासिली आहेत. अनेक ऋतू अंगा-खांद्यांवर झेलले आहेत, कधी चटके लावणारी वाळू तर कधी गोठविणारी थंडी...ध्येय एकच वन्यजीवानाचे, निसर्गाचे हुबेहूब छायाचित्रण करणे.

बैजू पाटील मूळचे औरंगाबादचे. या ऐतिहासिक शहरात अनेक परदेशी पर्यटक येत असतात. त्यांच्या जवळचे कॅमेरे आणि एकंदरीत त्यांची काम करण्याची पद्धत बैजू पाटील यांनी लहानपणीच मनाशी नोंदवून ठेवली होती. पुढे ते वाणिज्य शाखेतील पदवीधर झाले असले, तरी त्यांची नाळ मात्र कलेशी जोडलेली. सुरूवातीच्या काळात ते निसर्गातील देखाव्यांची यथासांग पेंटिग्ज करायचे व त्यातून आनंद मिळवायचे. परंतु पुढे पुढे त्यांच्या लक्षात आले की निसर्गाच्या लीला खूप आहेत, निसर्ग अनंत आहे. पेंटिंग्ज करायला लागणारा वेळ व निसर्गाची व्याप्ती यांना जोडायला लागणाऱ्या वेळेचे गणित त्यांनी विचारपूर्वक सोडवले आणि कॅमेरा हाती घेतला.


एक अनोखा स्लाईड शो बैजू पाटील

वन्यजीवन प्रकाशचित्रण करीत असतांना कॅमेऱ्याचे तांत्रिक ज्ञान हवेच असते. पण त्याचबरोबर प्राण्यांची माहिती, पक्ष्यांच्या हालचाली, जंगलांचा अभ्यास, लायटिंगचा अंदाज असल्याशिवाय उत्तम प्रकाशचित्र मिळणं कठीणं असं ते ठामपणे सांगतात.

भरतपूर हे पक्ष्यांचे अभयारण्य. बैजूंचे आवडते ठिकाण. कॅमेरे घेऊन पक्ष्यांच्या या नंदनवनात तासन्तास मनसोक्त भटकायचे आणि भावतील त्या उत्तम क्षणांची प्रकाशचित्रणासाठी संधी शोधात रहायची हा त्यांचा ध्यास-छंद बनला.

भरतपूरच्या जंगलात पाणपक्ष्यांचा अधिवास लक्षणीय आहे. अशाच एका क्षणी त्यांनी टिपलेले कार्मोरंटचे प्रकाशचित्र विलक्षण बहारदार आहे. या प्रकाशचित्राला Save Yes Bank या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मुळातच या पाणकावळ्याची मान लांबसर. तो वेगाने भक्ष्य, मासे पकडतो तेव्हा भक्ष्याला तसाच न गिळता तोंडात सरळ जाण्यासाठी वरच्या वर हवेत उडवून त्याला सरळ करतो आणि चोचीतून सरळ घशात घेऊन गिळतो. या प्रकाशचित्रात काळ्या लवचिक मानेच्या कार्मोरंटच्या तोंडातील पांढऱ्या सोनेरी खवल्यांचा मासा आपल्या सर्व अंगांसह दिसतो आहे. या प्रकाशचित्रातील पाणकावळा व मासा यांची अचूक हालचाल, गती, लायटिंग, बॅकग्राउंड मिळवणं फारच अवघड होतं. बैजूसर सलग दहा दिवस तलावाजवळ या फोटोंच्या प्रतिक्षेत होते. त्यांचा नाष्टा, जेवण हे याच ठिकाणी चालू होते.


एक अनोखा स्लाईड शो बैजू पाटील

ताडोबाच्या जंगलातील वाघांचे बछडे (बेंगाल टायगर) तलावाच्या काठावर खेळत असताना मध्येच एकमेकांवर गुरगुरतात. तलावाच्या पाण्यावरचा क्रॉस सॉफ्ट लाईट इथे सॉफ्ट बॅकग्राउंड झाला आणि पिवळसर नारिंगी उजेडाने चित्र मोहकही झाले. ही बंगाल टायगरच्या बछड्यांची टाईट, शार्प फोकस फ्रेम ‘नॅचरल वाईल्ड लाईफ फेडरेशन U.S. A.’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशचित्र स्पर्धेची २०१३ मधली मानकरी ठरलेली आहे.

बैजू सरांचे निसर्ग निरीक्षण लाखमोलाचे आहे. त्यांच्याच औरंगाबादजवळील काजगीपूरा येथील तळ्यात रात्रीच्या अंधारात चित्रित केलेले झाडावर बसलेल्या असंख्य बगळ्यांचे प्रकाशचित्र Santury RBS Wildlife Award 2009 या स्पर्धेचे मानकरी ठरलेले आहे. बगळ्यांचा थवा एकाच झाडावर घरटी बांधुन रहातो त्याला सारंगागार असे म्हणतात. रात्रीच्या वेळेस रात्री निवाऱ्यासाठी एकत्र आलेल्या अशा असंख्य बगळ्यांनी तलावातील दोन्ही झाडे पूर्णतः भरून टाकली होती. बैजू सरांच्या मनात हे झाड होतेच, परंतु त्याचे फोटो रात्रीच्या वेळीच काढायचे असे त्यांनी ठरवले. मग काय, त्यांनी कॅमेरा Slow शटर स्पीडवर ठेवला व दोन्ही बाजूंनी फ्लॅश-लाईट वापरले. त्यामुळे झाडावर सर्वत्र प्रकाश पसरला. त्यात बगळ्यांचे सुंदर छायाचित्र मिळालेच; शिवाय त्या सुंदर दृश्याचे बोलके प्रतिबिंबसुद्धा मिळाले. झाडावर विसावलेल्या या बगळ्यांचे बिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब अजरामर झाले.

निसर्गाची वेगवेगळी रूपे मिळवण्यासाठी निसर्गाच्या खूप जवळ जावे लागते. मग असा हा निसर्ग मनुष्य वस्तीपासून खूप दूर, दाट जंगलाच्या मधोमध, अवघड पर्वतांच्या माथ्यावर असा कुठेही दिसू शकतो. निसर्गातील हालचाली व कॅमेऱ्यांचे क्लीक यांची सांगड घालता येण्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. तसंच प्रगल्भताही लागते.


एक अनोखा स्लाईड शो बैजू पाटील

त्यांचा अजून एक गाजलेला व Santury Award, २०१२ मध्ये मानकरी ठरलेला लडाखमधील पेन्गॉन्ग सरोवराचा फोटो. लडाखमधील पेन्गॉन्ग हा लेक म्हणजेच बर्फाचे थंडगार पाणी, या तळ्याचा आय लेवलवर घेतलेला फोटो व त्यावरून उडणारे पक्षी (Gulls ) हे अनोखे दृश्य टिपतांना बैजूसर नुसत्या एका ट्रॅक पँट, टिशर्टवर या पाण्यात Waterproof SLR कॅमेरा घेऊन उतरले व पक्ष्यांची वाट बघत थांबले, थोड्या वेळाने पक्ष्यांचा थवा आला आणि अपेक्षित फ्रेम पूर्ण झाली - निळे आकाश, क्षितिजापर्यंत पोहोचलेले डोंगर, तळापर्यंत पाहू शकू असे पारदर्शक पाणी व तेव्हाच वर ढगांना गवसणी घालणारा पक्ष्यांचा थवा. साहजिकच उत्कृष्ट प्रकाशचित्र मिळाले. परंतु तोवर त्यांच्या शरीराची संवेदना पूर्णपणे नाहीशी झाली होती. पुढे आठ दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.

फॅन थ्रोटेड लिझार्डचे "टेरिटोरियल फाईट" प्रकाशचित्र बैजूसरांनी औरंगाबादजवळील लासूर या भागातील शेतात मिळविले. सतत तीन वर्षे सरड्याच्या जीवनाचा अभ्यास, हालचाली, प्रदेश-निश्चिती, परिसर अशा प्रकारचा अभ्यास त्यांनी केला; सरड्यांसोबत इतकी जवळीक साधली की, हे अशा फाईटचे प्रकाशचित्र आश्चर्यकारकरीत्या टिपता आले. त्यासाठी त्यांनी लेन्स वापरली ती "१०० एम. एम. मायक्रो", अशक्य वाटते ना? पण खरे आहे.


एक अनोखा स्लाईड शो बैजू पाटील

साहजिकच एवढी सुंदर छायाचित्रे पाहतांना कॅमेऱ्यांची सेटिंग्ज् काय असतील याची माहिती विचाराविशी वाटते ना? फोटोग्राफी करतांना त्यांचा कॅमेरा साधारणपणे Auto WB, Aperture Priority, Non VR, Crop Body, Prime Lens, Raw असे सेटींग केलेला असतो. लायटींगमध्ये त्यांना Low Light व Spot Lighting आवडते.

जिज्ञासा, कुतूहल हे कलावंताचे जीवन असावे. ते असेल तर निसर्ग आपल्याला असंख्य चमत्कार दाखवित असतो. थोडा धीर, थोडासा निसर्गावरचा विश्वास, सौंदर्यनिर्मितीबद्दलचे कौतुक आणि कृतज्ञता मनात ठेवून वागलो तर प्रकाशचित्रकारांना निसर्ग भरभरून देत असतो असा संदेश त्यांचा हा एक अनोखा स्लाइड शो पाहिल्यानंतर आपल्याला मिळतो.To Read in English मागील लेख पुढील लेख