1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी

स्वप्नाली मठकर
स्वप्नाली मठकर यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी घेऊन चौदा वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम केले, त्यातली सुमारे दहा वर्षे त्या जपानमध्ये होत्या. त्याच बरोबर गेली अनेक वर्षे त्या प्रकाशचित्रणाची आवडही सातत्याने जोपासत आहेत. गेल्या अडीच वर्षापासून फोटोग्राफी आणि लिखाण या क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देश्याने 'फ फोटोचा' या दिवाळी अंकाची संकल्पना मांडून कार्यकारी संपादक म्हणुन त्या काम करत आहेत. त्या विविध प्रकाशचित्रण स्पर्धेतल्या पारितोषीके विजेत्या असून 'The Photographic Angle, UK' या संस्थेमार्फत युके येथे प्रकाशचित्रे प्रदर्शनासाठी त्यांची प्रकाशचित्रे निवडली गेली आहेत. त्या मराठीतून प्रकाशचित्रणाबद्द्दल ब्लॉगही लिहीत असून त्यांनी लहान मुलांकरता लिहीलेल्या गोष्टींची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
www.swapnali.com
prakashraan.blogspot.com


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

१७६० साली जन्मलेल्या कात्सुशिका होकुसाईला लहानपणापासून चित्रं काढायची फार हौस होती. त्याच्या नशिबाने त्याला खूप चांगले मास्टर्स मिळाले आणि त्याची चित्रकला बहरत गेली. हाच काळ जपानमधला ‘एदो पिरियड’ म्हणून ओळखला जातो. होकुसाईने आपल्या सुमारे नव्व्याण्णव वर्षांच्या आयुष्यात अनेक चित्रं काढली. त्यातल्या बर्याच चित्रांना खूप प्रसिद्धीही मिळाली. होकुसाई म्हणे, "वयाच्या सहाव्या वर्षापासून इतकी वर्षं मी चित्रं काढतोय. मी चित्रकार झालो आहे. पण वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर माझं काम जरा दखल घेण्याइतपत झालं असं मला वाटतं. साधारण त्र्याहत्तराव्या वर्षानंतर मला खरोखरच पक्षी, प्राणी, कीटक, वृक्ष, निसर्ग यांच्या आकारांची आणि आकृतीबंधांची नीट ओळख व्हायला लागली आहे. आणखी प्रयत्न करत राहिलो तर वयाचा नव्वदीत मला या सगळ्याचं मर्म कदाचित कळायला लागेल. माझ्या वयाची शंभरी गाठता गाठता मला या दुनियेतल्या सगळ्यांचा स्वर्गीय अर्थ कळून मी त्याचं चित्रण करू शकेन. आणि तेव्हाही मी सतत चित्र काढत, प्रयत्न करत राहिलो तर वयाच्या एकशेतीस, एकशेचाळीसाव्या वर्षी मी काढलेला प्रत्येक बिंदू, मी ओढलेली प्रत्येक रेषा जिवंत असेल. देव माझं म्हणणं खरं करून दाखवायला मला इतकं आयुष्य नक्कीच देवो." निसर्गापुढे, देवापुढे आणि आपल्या कलेपुढे इतके विनम्र असणारे कलाकार फारच क्वचित दिसतात. मात्र असे कलाकारच त्यांच्या मृत्यूनंतरही रसिकांच्या हृदयात अमर राहतात.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

होकुसाईच्या जीवनकाळात म्हणजेच एदो पिरियडमध्ये ‘युकिओ’ अर्थात ‘वुडब्लॉक प्रिंटींग’ची कलाही बहरली होती. होकुसाईची चित्रंही या रंगीत वुडब्लॉक प्रिंटींगच्या माध्यमातून अजरामर झाली आहेत. जपानमधल्या असंख्य कलाकारांप्रमाणेच होकुसाईला देखील फुजीयामा म्हणजे माऊण्ट फुजीचं प्रचंड आकर्षण होतं. एका लोककथेनुसार असं म्हणतात, की एका चंद्रावरच्या राजकुमारीनं चंद्रावर परत जाताना जपानच्या त्यावेळच्या राजाला अमृत (elixir of life) भेट म्हणून दिलं होतं. राजकुमारीच्या वियोगानं दु:खी होऊन त्या राजानं ते फुजी पर्वताच्या माथ्यावर जाळून टाकलं. या अशा दंतकथांमधून जपानी लोकांमध्ये फुजी पर्वताबद्दल असणारं आकर्षण आणि कुतूहल लक्षात येतं. अशाच काही कारणांमुळे असेल किंवा फुजीच्या सौंदर्यामुळे असेल, पण होकुसाईला देखील फुजीयामाचं प्रचंड आकर्षण होतं. या फुजीप्रेमातूनच त्यानं विविध ठिकाणी प्रवासात असताना दिसणारा फुजी पर्वत पाहून त्याचं चित्रण केलं. हे चित्रण Thirty-six Views of Mount Fuji (Fugaku Sanjūrokkei) या नावानं जगप्रसिद्ध आहे. हे सुरूवातीला छत्तीस चित्रांचं कलेक्शन होतं आणि वुडब्लॉक प्रिंटींग माध्यमात उपलब्ध होतं. त्यानंतर होकुसाईनं त्यात आणखी दहा चित्रांची भर घातली. पण तरीही या कलेक्शनचं नाव मात्र ‘थर्टीसिक्स व्ह्यूज ऑफ माउंट फुजी’ असंच राहिलं. आणखी काही वर्षांनी होकुसाईनं ही चित्रसंख्या शंभरपर्यंत वाढवली; शिवाय इतर चित्रकारांनी आपापली माउंट फुजी दृश्याची चित्रंही काढली. मात्र आजही जगात कात्सुशिका होकुसाईचं नाव या चित्रांशी जोडलेलं असून ही चित्रं त्या काळातला एक मानबिंदू मानली जातात.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

मी जपानमध्ये गेले त्या सुमारासच या छत्तीस चित्रांबद्दल माझ्या वाचनात आलं होतं. एखाद्या पर्वताची छत्तीस किंवा झालंच तर पुढची शंभर चित्र काढण्याचं काय प्रयोजन असेल हे मात्र मला लक्षात येत नव्हतं. किंवा एकाच पर्वताची इतकी चित्रं काढण्याइतका त्यात काय बदल होत असेल हे ही माझ्या आकलनाच्या बाहेर होतं. अर्थात तेव्हा मी माऊंट फुजी नावाचा संमोहित करणारा निसर्ग चमत्कार पाहिला नव्हता.

पहिल्यांदा फुजीयामा पाहिला तो पुसटसा, मेगुरो नामक स्टेशनजवळ असणार्या 'वॉर्ड ऑफिसमधून'. तिथली एक जपानी आज्जी धावत मला काहीतरी सांगायला आली आणि मी नवीन असल्याने मला काहीच कळणार नाही हे जाणून मला सरळ हाताला धरून काचेच्या तावदानापाशी घेऊन गेली. खिडकीतून सुरेख मोकळं निळं आकाश आणि दूरवर बिल्डींगच्या गराड्यात सापडलेला एक छोटासा पर्वत दिसत होता. ऑगस्टमध्ये इतकं मोकळं आकाश दिसणे म्हणजे पर्वणीच हे मला तिथे अनेक वर्षे राहिल्यावरच कळलं म्हणा. ‘ओह! हा फुजी!’ मला अनेक वर्षांपूर्वी शाळेच्या पुस्तकात पाहिलेलं दोन्ही बाजू सममितीत असलेल्या पर्वताचं कृष्णधवल रेखाचित्र आठवलं.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

नंतर कळलं, की फुजीच्या अर्ध्यापर्यंत बसनं जाता येतं. पण नोव्हेंबरनंतर मात्र हा रस्ता बर्फामुळे बंद होतो. मग अगदी ऑक्टोबरच्या शेवटाला तिथपर्यंत एकदा जाऊन येऊ म्हणून निघालो. तेव्हा तिथे काय दिसेल वगैरे कसलीच कल्पना नव्हती. अनेक ट्रेन्स बदलत शेवटी कावागुचीको या स्टेशनवर उतरलो आणि बस घेऊन तासाभराचा प्रवास सुरू केला. अचानक डोंगर-दर्यांमधला रस्ता सुरू झाला. एका वळणावर निसर्गानं अचानक हिरवा रंग सोडून देऊन केशरी, पिवळा साज धारण केला. हे माझं ‘ऑटम’चं पहिलं दर्शन, फुजीच्या दरीतलं. आम्ही शेवटच्या थांब्यावर पोहोचलो आणि प्रचंड थंडीने गारठून गेलो. खाली इतकी थंडी जाणवत नव्हती, पण इथे गोठवणारी थंडी आणि वारा होता. मात्र इथे दिसला तो मोहवणारा फुजीयामा! काळीभोर, दगडांची आणि ज्वालामुखीच्या खुणा सांगणारी माती आणि माथ्यावर नुकताच झालेला पांढरा बर्फाचा शिडकावा. पर्वतमाथा इथून साधारण चौदाशे फूट वर, पण चढण खूप आहे म्हणतात. हा फुजी पर्वत अतिशय आकर्षून घेणारा आहे हे तेव्हाच लक्षात आलं, पण पुढची नऊ वर्ष आणि नंतरही सतत मला बोलावत राहील हे मात्र जाणवलं नाही.

तिथून उतरून पुढे कावागुची सरोवराजवळच्या काचीकाची यामा या पर्वतावर ‘रोप-वे’नं गेलो. इथून दिसणारा फुजी अप्रतिम होता! आम्ही इथे पोहोचलो ते सूर्यास्ताच्या वेळेस. सर्वदूर पसरलेलं मोकळं माळरान, खाली दूरवर दिसणारी चिमुकली खेडी, त्याच्या आजूबाजूला अथांग पसरलेली शेतजमीन आणि या सर्वांवर देखरेख करणारा सोनेरी प्रकाशात एकटाच उंच उभा असलेला फुजीयामा! अतिशय अनोखं दृश्य होतं. दुर्दैवानं पुन्हा असं दृश्य कधीच दिसलं नाही. ती सायंकाळ, मोकळं आकाश, सोनेरी जादुई प्रकाश आणि केशरी आकाशावर रेखलेला सममित फुजीयामा हे संयोजन पुन्हा कधीच जुळून आलं नाही. मात्र त्या क्षणी जे फुजीनं वेड लावलं ते कायमचंच. आता कुठे मला होकुसाईच्या फुजीप्रेमाची जाणीव व्हायला लागली.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

त्यानंतर एखाद महिन्यात मी जॉब चालू केला. ही पहिली नोकरी; सुमारे पावणेदोन तास जायचा आणि तितकाच यायचा प्रवास होता. मात्र या प्रवासात एक मोठं सुख होतं. ठराविक स्टेशन्स पार केली, की सुरेख असं फुजीचं दर्शन घडायचं. रोज सकाळी ऑफिसला जातानाचा प्रवास त्या फुजीच्या दर्शनानं अगदी सुखकारक होत होताच; शिवाय ऑफिसमधूनही काही खिडक्यांतून फुजी अगदी समोर दिसायचा. इतर काहीही त्रास झाले तरी केवळ आणि केवळ या फुजीदर्शनामुळे मी कायम आनंदात असायचे!


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

काही महिन्यांत आम्हाला घर बदलावं लागलं. दुसरं घर बघायला गेलो. तिथे दरवाजा उघडून आत गेलो, तर समोरच्या दोन्ही खिडक्यांतून आणि बाल्कनीतून दूरवर फुजीयामा! त्या क्षणी ते घर निवडलं हे वेगळं सांगायला नकोच. या घरातून किती वेगवेगळा फुजी दिसलाय हे सांगताही येणार नाही. सकाळी पडदा उघडला, की पहिल्यांदा फुजी आज दिसतोय का, कसा दिसतोय हे बघितलं जायचं. कधी बर्फानं झाकून गेलेला, कधी ढगात दडलेला, कधी शांत चंदेरी तर कधी सोनसळी रंगात झळाळणारा फुजी बघणे ही रोजच्या दिवसाची सुरूवात असायची. संध्याकाळी कधी घरी असलोच, तर लाल केशरी आकाशात डौलाने उभा असणारा फुजी आणि त्याच्या उतारावरून मावळणारा सूर्य दिसायचा. कधी निळ्या, केशरी अशा मिश्र रंगांच्या आकाशावर चिमुकला पुसटसा चंद्र आणि खाली फुजीचं ‘सीलहाऊट’ असं अप्रतिम दृश्य दिसायचं. कधी वारा फुजीयामाच्या माथ्याभोवती गिरक्या घेत त्याला ढगांची टोपी घालायचा. तर कधी कधी ढगांनाही फुजीयामाचं गारूड पडायचं आणि ते त्याच्या जवळून हटायला तयारच व्हायचे नाहीत. असला अनंत रंगांतला फुजी बघताना मला पुन्हा पुन्हा होकुसाईच्या त्या छत्तीस चित्रांची आठवण प्रकर्षानं व्हायचीच! कधी समुद्रकिनार्यावर फिरायला गेलो, की दूरवर पुसटसा फुजीचा आकार आकाशात दिसायचा आणि होकुसाईचं 'द ग्रेट वेव्ह' हे चित्र आठवायचं.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

असा रोजच्या रोज फुजी पहात असतानाही दरवर्षी किमान एकदा तरी फुजीच्या अर्ध्यापर्यंत जाऊन यायचं व्यसनच लागलं होतं मला. नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत रहायचं. तिथे जाऊन फुजीचं दर्शन घेतलं की मात्र शांत वाटायचं. केव्हातरी फुजी पर्वताजवळच्या ‘यामानाका को’ नावाचं सरोवर असलेल्या एका नितांत सुंदर जागेची मला भुरळ पडली. बर्फाच्या दिवसात भल्या पहाटे उठून यामानाका सरोवराच्या (को म्हणजेच सरोवर) काठाशी जायचं. गोठलेल्या रात्रभरात बर्फाची चिमुकली फुलं काठभर पसरलेली दिसतात. त्या फुलांवर हळुवार पाय ठेवत पाण्यापाशी येऊन थांबायचं. रात्री फार थंडी असली, तर कधी कधी सरोवराचं पाणी गोठलेलं दिसे. नाहीतर हलकासा चुबुक चुबुक आवाज करत काठावरच्या बर्फुलांशी खेळत असताना दिसे. समोर उंच उभा असलेला फुजीयामा आणि शांत पसरलेल्या त्या निळ्या विस्तीर्ण सरोवरात दिसणारं त्याचं प्रतिबिंब! मधेच कुठूनतरी हंसांची जोडी येऊन अलगद पाण्यावर उतरे आणि आपल्या पोहण्याने उठलेल्या तरंगांमुळे फुजीयामाच्या प्रतिबिंबाला थरथरवत दुसर्या काठाला निघून जाई. एखादा कोळी हळूच आपली बोट पाण्यात सरकवे आणि सरोवराच्या मध्यावर जाऊन जाळं टाकून गरम कपड्यात गुरफटून बसून राही. आणि मग केव्हातरी सूर्याची अगदी कोवळी किरणं फुजीच्या माथ्याला स्पर्श करत. पुढच्या दोन-तीन मिनिटांचा वेळ म्हणजे चक्क निसर्गाचा जादूचा खेळ! ती किरणं अगदी माथ्यापासून खाली सरकू लागत आणि इतकावेळ पांढराशुभ्र दिसणारा फुजी चक्क लाल-सोनेरी दिसायला लागे. खाली पाण्यात पहावं तर वितळणारं सुवर्ण पाण्यात मिसळतंय असंच वाटे. आपण मंत्रमुग्ध होऊन ही जादू कॅमेरात आणि मनात उतरवून घ्यायची, बस्स! कुणीतरी ‘अकाफुजी’ म्हणजे लालफुजी असं त्याचं नामकरणच करून टाकलं आहे. काही क्षणातच ही जादू आटपे आणि इतकावेळ काठाशी पाण्यात बसलेले इतर पक्षांचे थवे भरार्या घेऊन आवाज करत पाण्यावर उतरू लागत.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

अशा पहाटेच्या वेळी तिथे हमखास एखाद-दोन जपानी फोटोग्राफर आजोबा येऊन कॅमेरे लावून बसलेले असतात. हे आजोबा तिथेच जवळपास कुठेतरी राहणारे असतात. त्यांच्याशी गप्पा मारल्या, की ते पुन्हा एकदा वेगवेगळ्या ऋतूमध्ये दिसणार्या फुजीचं गुणगान ऐकवतात. ‘वर्षानुवर्षं असे फोटो काढूनही अजून रोज नवा फुजी दिसतो’ असं सांगतात. काहीजण आवर्जून स्वतः काढलेले आणि माझ्यासारख्या नवख्याला दाखवायला ठेवलेले फोटो गाडीतून घेऊन येतात; उन्हाळ्यातला बर्फविरहित फुजी, ऑटममधला फुजी असे अनेक विभ्रम दाखवतात आणि पुढच्या उन्हाळ्यात यायचं आमंत्रणही देतात!


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

एकदातर मी ‘यामानाका को’ला संध्याकाळी पोहोचले तेव्हा फुजीच्या खालच्या भागात अगदीच तुरळक बर्फ होतं. इतर रस्ते, झाडं बघूनही अनेक दिवसात बर्फवृष्टी झाली नाहीये हे जाणवत होतं. नेहमीच्या टेकडीवरच्या हॉटेलमधले आजोबा आम्हाला बसस्थानकावर न्यायला आले होते. गाडीत बसून निघालो तेव्हाच ते म्हणाले, की आज बहुधा खूप दिवसांनी बर्फ पडेल. आणि अंधारून आलंच होतं. बर्फ पडायच्या आधी आकाश अगदी विचित्र राखाडी दिसतं तसं दिसत होतं. आम्ही अर्ध्या रस्त्यात होतो तेव्हाच बर्फाची पिसं अलगद आकाशातून जमिनीवर भिरभिरत यायला लागली होती. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत जोरदार बर्फ पडायला लागला. खोलीच्या काचेच्या तावदानातून एरवी सहज समोर दिसणारा फुजी अंधुक झाला आणि काचेला नाक लावून पाहिल्यावर बाहेर झाडाझुडपांवर जमा होणारा बर्फ दिसायला लागला. बहुधा रात्रभर बर्फ पडतच होता. नेहेमीप्रमाणे सरोवरावर जायला पहाटे मी उठले आणि काचेतून बाहेर पाहिलं तर स्वच्छ, गडद निळ्या आकाशावर बर्फाळलेला फुजी दिमाखात उभा होता. कालची रुक्ष, मातकट जमीन ताज्या बर्फानं झाकून पांढरीशुभ्र झाली होती. झाडंही बर्फाच्या भारानं वाकून गेली होती. अस्पर्श अशा ताज्या बर्फाचे मऊशार गालिचे मला अतीव मन:शांती देतात. अशा ताज्या बर्फात चालणं म्हणजे एक वेगळाच अनुभव! पांढर्याशुभ्र अस्पर्श बर्फावर आपल्या पाऊलखुणा उमटवत चालायचं आणि दूरवर पोहोचून वळून त्या खुणा बघायच्या - एक वेगळाच आनंद होतो; कसला ते नाही सांगता येणार! मी कॅमेरा घेऊन त्या ताज्या बर्फातून हळुहळू चालत टेकडी उतरून तलावाजवळ गेले आणि पाहिलं तर जवळपास अर्धं सरोवर गोठलेलं होतं! त्यामुळे फुजीयामा आज पाण्यात उतरलाच नव्हता!


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

या यामानाका सरोवराच्याच अगदी दुसर्या काठाला एका ठराविक जागी वर्षातल्या ठराविक दिवशी ‘डायमंड फुजी’ दिसतो. म्हणजे सूर्य फ़ुजीच्या अगदी डोक्यावर मावळतो आणि मावळताना चकाकणाऱ्या हिऱ्यासारखे चहुबाजूंनी प्रकाशकिरण पसरतात. मात्र हा क्षण मिळवण्यासाठी योग्य वेळी, योग्य दिवशी त्या जागी असणं आवश्यक आहे. स्वत:ची गाडी नसताना तिथे पोहोचायचं म्हणजे बरेच द्राविडी प्राणायाम करत जावं लागतं आणि त्याहीपेक्षा जास्त त्रास परत यायला होतो; कारण आधीच उशीर झालेला असतो. मी बर्याचदा इथे जायचा प्रयत्न केला, पण दरवेळेस काही ना काही कारण निघून राहून जायचं. जपानमधून कायमचं परतायच्या आदल्या वर्षी मात्र सगळी कारणं बाजूला ठेवून गेले आणि डायमंड फ़ुजीला त्याच्या प्रतिबिंबासहीत मनात आणि कॅमेरात साठवून आले! फुजीचं आणखी एक रूप!


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

ही विलोभनीय रूपं बघता बघता केव्हातरी मला होकुसाईच वेड काय होतं हे ही समजायला लागलं असावं. मात्र या फुजीयामाच्या असंख्य रुपांनी वेड लागणारा होकुसाई काही एकटाच नव्हता. असे अगणित कलाकार या विभ्रमांनी भुलले असतील, त्यातलीच मी ही एक. पण होकुसाईबरोबरच मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ओयामा युकीओ या प्रकाशचित्रकाराचा. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा म्हणजे काय हे यांच्याबद्दल वाचल्यावर कळतं. सुमारे १९७६साली फुजीचे फोटो बघून त्यांना आपणही फुजीचे फोटो काढावे असं वाटलं आणि तेव्हापासून ते सतत फुजीयामाचे फोटो काढत आहेत. हे फुजीवेड इतकं वाढलं, की शेवटी त्यांनी फुजीच्या पायथ्याच्या ओशिनो नामक गावातच मुक्काम हलवला. तिथून पुढे जवळच्या एका ठिकाणी घर बांधून तिथे ते पूर्ण वेळ फोटोग्राफी करू लागले. इथे या घरात दिवसाचे २४ तास फुजीयामा समोर दिसेल अशी डोम सदृश्य जागा त्यांनी करून घेतली. तसंच जपानमधल्या दक्षिण आल्प्स या पर्वतराजीमधे फक्त फुजी चित्रणासाठी त्यांनी एक मोठा कॅमेरा कायमचा माउंट करून ठेवला आहे. आणखी एक कॅमेरा बहुतेक वेळा समुद्राच्या काठावरच्या एका भाड्याच्या खोलीत ठेवलेला असतो. इथूनही फुजीचं एक वेगळंच दृश्य दिसतं. वेळीअवेळी कुठल्याही ऋतूमध्ये कॅमेऱ्याचं प्रचंड वजन घेऊन जंगलं, डोंगरदऱ्या तुडवत, कधी हेलीकॉप्टरनंही फिरत फुजीचे विलक्षण सुंदर असे असंख्य फोटो ते काढत असतात. एखाद्या फोटोसाठी जंगलात आठवडा आठवडा राहून योग्य वेळेची आणि प्रकाशाची वाट बघणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही. या अप्रतिम सुंदर फोटोंचे प्रदर्शन झालेलं आहे; पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. त्यातला एक एक फोटो पाहून आपल्याला असा फोटो काढायला जमला पाहिजे हे राहून राहून वाटतं. अर्थातच त्यासाठी ओयामा यांनी केली तितकी मेहनतही हवी!


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

होकुसाई काय किंवा ओयामा युकीयो काय, कलेची साधना यांना उमगली. आपल्या विषयाशी एकरूप होत आयुष्य जगण्याचं कसब आणि हिम्मतही त्यांच्याकडे होती. होकुसाईने कलेच्या आराधनेसाठी देवाला दीडशे वर्षाचं आयुष्य मागितलं आणि त्याला एक पूर्ण शतक मिळालं. तितकं आयुष्य मला नको, पण जे काही असेल त्यात होकुसाईसारखं तन्मयतेने कलेची साधना करायचं, ओयामा युकिओसारखं विषयाशी एकरूप होता यायचं वरदान मात्र देवाने द्यावं.


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे


स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी स्वप्नाली मठकर, ठाणे

To Read in English मागील लेख पुढील लेख