1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती

योगेश जगताप
मुंबईस्थित आयटी कंपनीत नोकरी. वाचन, लेखन या सोबत भटकंती आणि निसर्ग छायाचित्रणाची आवड.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

"घर सोडा घर आणि जरा बाहेर निघा, जग किती सुंदर आहे थोडं तरी बघा.
परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."

लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजू लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना 'घर सोडा' असं सांगावं लागत नाही; त्यांची पावलं आपोआपच बाहेर वळतात आणि जर ही भटकंती हिमालयाच्या कुशीतली असेल, तर होणारा आनंद हा कॅमेर्याच्या मेमरी कार्डातही मावणारा नसतो. असं म्हणतात, की जंगलातून चालताना कधी कधी ‘रानभूल’ पडते. पायाखाली ठळक वाट असूनही 'चकवा' लागतो. पुन्हा फिरून फिरुन त्याच जागेवर येणं होतं. साधारण ४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाला भेट दिली होती, तेव्हा वाटलं नव्हतं, की हा 'चकवा' दरवर्षी पुन्हा पुन्हा लागणार आहे. उत्तराखंड, काश्मिर, लेह-लडाख आणि आता हिमाचल प्रदेश. हिमालयाची 'हिमभूल' पडते म्हणतात. पण इथं वाट चुकली जात नाही, तर खास वाट चुकवून इथे यावंस वाटतं. इथे निसर्गाचा रौद्र व महाकाय अविष्कार पाहून मनात वादळं निर्माण होतात. त्या रौद्र निसर्गात स्वतःला झोकून द्यावसं वाटतं. खरं तर सगळ्यांनाच हा अनुभव येतो असंही नाही. निसर्गाकडे पाहण्याची मनाची उत्कटता जितकी जास्त, तितकी अशा अनुभवांची तीव्रता जास्त! निसर्ग आपल्याला दोन प्रकारे भेटतो - एक म्हणजे स्वत:च्या उन्मुक्त आणि खर्या अवस्थेत आणि दुसरा म्हणजे साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणांच्या स्वरूपात. लाहौल स्पिती परिसरात आपल्याला भेटणारा निसर्ग हा पहिल्या प्रकारातला. कुठल्याही ऋतूत इथला निसर्ग आपल्याला उन्मुक्तपणेच भेटतो. निसर्गाचा समतोल आज जरी आपल्या कर्मामुळे बिघडत चालला असला, तरी तो स्वत: मात्र बेईमान होत नाही. इथला निसर्गही त्याला अपवाद नाही. इथे तुम्ही मानव म्हणून आलात तरीही तो देताना कुठेही डावं-उजवं करत नाही. इथून दूरचे डोंगरही साजिरे दिसतात आणि जवळचेही. फक्त निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याला सामोरं जाताना मनाची प्रांजळता हवी.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो तेव्हा "अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने" ही उक्ती अगदी सार्थ ठरते. निसर्गाच्या सर्व छ्टांची मुक्त उधळण जिथे आपण अनुभवतो ती देवभूमी म्हणजेच हिमाच्छादित बर्फशिखरांनी सजलेलं, नटलेलं ‘हिमाचल प्रदेश’. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात शिमलामार्गे स्पिती व्हॅलीचा बेत ठरला. 'लाहौल स्पिती' म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ. स्पितीचा अर्थ 'मध्यवर्ती भूभाग'. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग. सीमा कसली, हा सारा परीसर म्हणजे हिमालयातील रौद्रभीषण सौंदर्याची परिसीमाच! या स्वप्नभूमीत येण्यासाठी दोन प्रवेशद्वारं आहेत. पहिलं म्हणजे मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरं शिमला, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमची भटकंती शिमलामार्गे असल्याने आम्हाला ही दोन्ही प्रवेशद्वारं पाहता आली.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

काझा - स्पिती खोर्याचं मुख्यालय काझा येथे आहे. स्पिती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या गावात आणि परिसरात बौध्द मठ आणि मंदिरं आहेत. चांगली हॉटेल्स, पेट्रोल पंप, होम स्टे आणि बाजार उपलब्ध असल्याने स्पिती खोर्यातील भटकंती करणारे बरेचसे पर्यटक इथेच थांबतात. ताबो, किब्बर, लांग्झा, पीन व्हॅली, कि मॉनेस्ट्री, काझा, कुंजुम पास ही येथील महत्वाची पर्यटनस्थळं.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

ताबो - स्पितीच्या दक्षिणेस, स्पिती नदीच्या किनारी वसलेलं ताबो हे गाव काझापासून साधारण ४०-४५ किमी अंतरावर आहे. एक हजार वर्षं इतक्या पुरातन असलेल्या या मॉनेस्ट्रीचा शोध इ.स. ९९६ रोजी रिंगचेन जैंगपो (Rinchen Zangpo) याने लावला. ताबो मॉनेस्ट्री ही स्पिती खोर्यातील सगळ्या मोठी मॉनेस्ट्री मानली जाते. तिबेटमधील थोलिंग मॉनेस्ट्रीनंतर बौद्धधर्मियांमध्ये ताबो मॉनेस्ट्रीला खूप महत्त्व आहे. येथे काही मॉनेस्ट्री या मातीच्या बनवलेल्या आहेत. कदाचित या भागात पाऊस कमी पडत असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. येथील मठातल्या आणि अंजठात असलेल्या चित्रांमध्ये सारखेपणा आहे आणि यामुळेच याला 'हिमालयातील अजंठा' म्हणूनही ओळखलं जातं. याच मॉनेस्ट्रीसमोर डोंगरात काही नैसर्गिक गुंफाही आहेत.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

किब्बर, कौमिक लांग्झा - किब्बर हे पक्क्या रस्त्याने जोडलं गेलेलं जगातील सर्वात उंचीवरील गाव आहे. लांग्झा गावात एका टेकडीवर बुद्धांचा पुतळा उभारला आहे. पांढर्याशुभ्र हिमनगाच्या धौलाधार पर्वंतरांगामध्ये आणि निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर शांतीदूत बुद्धाचा पुतळा विलोभनीय दिसतो. इथली घरं तिबेटी शैलीतली असल्याने ही सगळीच गावं एकसारखी वाटतात.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

पिन व्हॅली - काझा परीसरातील मला स्वतःला आवडलेलं ठिकाण म्हणजेच पिन व्हॅली. हिमालयातील एक अतिशय सुंदर व्हॅली. कुंगरी ग्लेशिअरच्या कुशीतील मुढ या गावातूनच पुढे 'भावा पास' हा साधारण ४०-४५ किमीचा ट्रेक सुरू होतो. त्यामुळे येथे नेहेमीच गिर्यारोहकांची वर्दळ असते. येथूनच पुढे सुरू होणार्या हिमाचलमधील नॅशनल पार्क मध्ये स्नो लेपर्ड, Ibex इ.प्राणी आढळतात.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

ढंकर मॉनेस्ट्री - ताबो-काझा हायवेपासून साधारण ७ किमी अंतरावर उजवीकडे सुमारे ३३७० मी. उंचीवर १००० वर्षं जुनी ढंकर मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीपर्यंत गाडीनं जाता येतं. ढंकर मॉनेस्ट्रीमध्ये एक छोटेसं संग्रहालयही आहे.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

कि मॉनेस्ट्री - काझापासून किब्बरकडे जाताना 'कि मॉनेस्ट्री' लागते. मॉनेस्ट्रीपासून पुढे चालत थोड्या अंतरावर भगवान बुद्धाचे पितळेचे तीन मोठे पुतळे आहेत. कि मॉनेस्ट्रीला प्राचीन इतिहास आहे. ११व्या शतकात Ge-lug-pa यांनी मॉनेस्ट्रीचा पाया रचला. दरवर्षी ऑगस्टमधे हजारो भाविक येथील 'कलाचक्र' उत्सवाला हजेरी लावतात.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

कुंजुम पास - मनालीहून येताना कुंझुम हे स्पितीचं प्रवेशद्वार मानलं जातं. आम्ही काझाहून लोसर, कुंजुमपासमार्गे मनालीला निघालो. येथून जाणार्या सर्व गाड्या येथे असलेल्या कुंजुमदेवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालूनच पुढच्या प्रवासाला निघतात. कुंजुमपास्हून चंद्रा नदी आणि बर्फाच्छादित शिखरांचं विलोभनीय दृष्य दिसतं. हा पास पार केल्यानंतर खोकसरहून एक रस्ता हिमाचलमधील एका सुंदर सरोवराकडे, चंद्रतालकडे, जातो. स्पिती नदीचा उगम कुंझुंमपासजवळील ग्लेशियरमधून होतो.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

चंद्रताल - हिमालयातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक म्हणजे चंद्रताल. हा तलाव चंद्राच्या आकाराचा आहे. म्हणून त्याचं नाव चंद्रताल. इथूनच चंद्रा नदी पुढे लाहौल दरीत जाते. या चंद्रतालचे अलौकिक सुंदर फोटो पाहूनच आम्ही ही टूर आखली होती. पूर्ण प्रवासभर चंद्रताल बघायची उत्सुकता होती. पण नेमकी लँडस्लाईड झाल्याने खोकसरखून तेथे जाणारा रस्ता बंद झाला आणि आम्ही एका नितांत सुंदर अनुभवाला मुकलो. कदाचित पुन्हा इथे यायला काहीतरी निमित्त पाहिजे, म्हणूनच देवाने आमचा यावेळचा प्लॅन अधुरा ठेवला असावा.


देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती योगेश जगताप, मुंबई

कुंजुमपासच्या पुढे चंद्रताल आणि बातल येथून मनालीला जाणारा हा सारा भूभाग शीत वाळवंट अर्थात कोल्ड डेझर्ट म्हणून ओळखला जातो. हा परीसर म्हणजे फोटोग्राफर्सना पर्वणीच. हिमाच्छादित शिखरं, खळाळत बेफाम वाहणारी चंद्रा नदी आणि तिच्या तीरातीराने, दगडधोंड्यातील आणि ग्लेशिअरच्या पाण्यातून जाणारा रस्ता. इथून पुढे ग्रांफूपर्यंतचा सारा प्रवास हा चंद्रा नदीच्या सोबतीनेच होतो. चंद्रा आणि भागा या दोन नद्या उत्तरेला सूरजतालजवळ बारालाच्याच्या खिंडीतून उगम पावतात. भागा पश्चिमेला पत्तन दरीत, तर चंद्रा दक्षिणेला लाहौल दरीत उतरून बातल येथून पश्चिमेला वळते. पुढे तंडी या गावी या एकमेकांत समरस होतात आणि मग जन्म घेते ती ‘चंद्रभागा’. हीच नदी पुढे काश्मिर आणि मग पाकिस्तानात ‘चिनाब’ या नावानं ओळखली जाते. गेल्यावर्षीची लेह-लडाख टूर संपल्यानंतर जेंव्हा सार्चु मार्गे मनालीला परतत होतो तेव्हा या अवखळ चंद्रभागा नदीच्या ओढीनेच लाहौल स्पितीचा बेत शिजला होता आणि वर्षभराच्या आत तो तडीसही गेला. हा परीसर निवांत पहावयाचा झाला तर कमीत कमी ८-१० दिवस हाताशी असले पाहिजेत. इथे जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जुलै ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत. मात्र हा परीसर निव्वळ 'पिकनिक' करणार्यांसाठी नाही, तर निसर्गाचं रौद्र भीषण सौंदर्य बघणार्या आणि त्या निसर्गोत्सवाला कॅमेर्यात टिपणार्या अस्सल भटक्या लोकांसाठीच आहे. दहा दिवसांच्या या भटकंतीत आम्हाला निसर्गाची विविध रूपं बघायला मिळाली. हिमालयातल्या उंच हिमशिखरांच्या संगतीत मानवाचा क्षूद्रपणा प्रकर्षानं जाणवला. इथल्या निसर्गाची शुचिर्भूतता आपल्या मलीन, व्याधिग्रस्त मनाला टवटवीत करते. खरंतर हा हिमालय नव्हे, तर एक मायावी जादूगार आहे. त्याच्या कुशीत येणार्यांना तो असंच संमोहित करतो आणि इथे पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतो. आपणही मग आपल्याच नकळत नतमस्तक होऊन त्याच्याकडे पाहत हात जोडतो आणि परत भेटण्याचं मनोमन वचन देतो

कसे जाल?
चंडिगडहून मनालीमार्गे काझा - अंदाजे ४९५ किमी (मुक्काम : मनाली)
चंडिगडहून शिमला, सांगलामार्गे काझा - अंदाजे ७५० किमी (मुक्कामः शिमला, सांगला, कल्पा, ताबो)
To Read in English मागील लेख पुढील लेख