1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन

गिरीश वझे
सुप्रसिध्द निसर्ग प्रकाशचित्रकार गिरीश वझे यांना ऍस्ट्रोनॉमी आणि ऍस्ट्रोफोटोग्राफीचीसुध्दा आवड आहे.
अनुवाद - मेघना शाह


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण म्हणजेच निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणे. सर्वसाधारणपणे बहुतेक निसर्ग-प्रकाशचित्रकार प्रकाशचित्रण करताना ते जास्तीत जास्त अचूक, बरोबर कसे होईल याचा प्रयत्न करतात. थोडक्यात सांगायचे तर प्रकाशचित्रणाचे सर्व नियम वापरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच प्रकाशचित्राची चौकट व्यवस्थित असली पाहिजे, ते अचूक असले पाहिजे, धूसर नको इ. परंतु हे सर्व नियम कलात्मक निसर्ग-प्रकाशचित्रण करताना लागू होतीलच असे नाही. कलात्मक निसर्ग-प्रकाशचित्रण करताना आपण निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे गरजेचे असते. कलात्मक निसर्ग-प्रकाशचित्रकार नेहमीच या सर्व नियमांच्या उलट वागतात. कारण निसर्गातील रचना टिपताना प्रकाशचित्रणाचे सर्व नियम वापरणे नेहमी शक्य असतेच असे नाही. ती रचना वेगळ्या दृष्टीकोनातून टिपणे हे प्रकाशचित्रकारासाठी जास्त महत्त्वाचे असते. कारण त्या प्रकाशचित्रातून त्याला वेगळेपणा दाखवायचा असतो.

दुर्दैवाने कलात्मकतेची ठराविक अशी व्याख्या नाही. हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. योग्य प्रकाश मिळावा म्हणून खूप मेहनत करून घेतलेला फोटो एखाद्याला चुकीचा किंवा योगायोगाने मिळाला आहे असे देखील वाटू शकते. यासाठी उदाहरणादाखल मी काही फोटो देत आहे जे माझ्या दृष्टीने कलात्मक आहेत. त्याच बरोबरीने त्यांची तांत्रिक बाजू आणि त्यांची प्रक्रिया देखील देत आहे. हे फोटो कलात्मक आहेत की नाहीत ते वाचकांनीच ठरवावे. कदाचित ते मार्गदर्शक देखील ठरू शकतील.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

प्रकाशाचा परिणाम : बाह्य प्रकाश आणि एक्सपोजर कंट्रोल यांचा विविध परिणाम मिळवण्यासाठी उपयोग करणे प्रकाशाचा योग्य वापर करून आपण कलात्मक प्रकाशचित्रणाची सुरूवात करू शकतो, जे सहज शक्य आहे आणि त्याचे काही वेगळे, चांगले परिणाम देखील आपणास मिळू शकतात.

पानांत असलेली मुंगी
एकदा बागेत प्रकाशचित्रण करत असताना मला एका पानावर एक मुंगी इतस्ततः भटकत असताना दिसली. थोड्या वेळाने त्या पानावर काटकोनात प्रकाश पडला. त्यामुळे ते पान सुंदर दिसत होते. मी थोडासा विचार केला की मुंगीला हे पान आतून कसे दिसत असेल, बरे? मी माझ्याकडे असलेला बाह्य प्रकाश (external light ) वापरून शक्य तितक्या जवळून फोटो घेतला. त्या पानावर पडत असलेल्या प्रकाशामुळे पानाचा पोत आणि रंग सुंदर दिसत होता. ही प्रतिमा मिळवण्यासाठी अचूक एक्स्पोझर आणि फ्लॅश पॉवर (flash power) ची गरज होती. माझ्या अनेक प्रदर्शनात हे चित्र मी वापरले. परंतु हा हिरवा भाग म्हणजे पान आहे हे कुणीही ओळखू शकलेले नाही. अनेकांना ते ग्राफिक्स आहे असे वाटते.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

प्रतिमा अंडरएक्स्पोझ किंवा ओवरएक्स्पोझ करण्यासाठी देखील प्रकाशाचा वापर करण्यात येतो. फुलांमधील विविध रंग दाखवणे हे बऱ्याच प्रमाणात एक्स्पोझरवर अवलंबून असते. वेगवेगळे एक्स्पोझर वापरून आपण फुलांमधील रंग आपल्या मनासारखे दाखवू शकतो.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

ओव्हर एक्स्पोझर
जर आपण जांभळ्या रंगासाठी ओव्हर एक्स्पोझर वापरले तर आपणांस गुलाबी रंग मिळतो. या फोटोतील कारवीच्या फुलाचा मूळ रंग हा असा आहे. पण ओव्हर एक्स्पोझरमुळे तो असा पेस्टल, जलरंगासारखा दिसत आहे. ओव्हर एक्स्पोझरमुळे मला अपेक्षित असणारा सौम्य, मृदू असा रंग प्रतिमेत दाखवता आला. अश्या प्रकारे एक्स्पोझर नियंत्रण करून तुम्ही रंग आणि पोत बदलू शकता.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

अंडर एक्स्पोझर
लाल रंग हा ओव्हर एक्स्पोझ होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे मूळ रंगाची भव्यता (कलर डेप्थ) पूर्णपणे जाऊ शकते. म्हणूनच लाल रंगासाठी नेहमी अंडर एक्स्पोझर वापरावे. असे केल्याने आपल्याला छान प्रतिमा मिळू शकते. खालील फोटोतील फुलाचा रंग बघा. नेहेमीच्या लाल रंगापेक्षा जास्त गडद आहे आणि अंडर एक्स्पोझरमुळे तो जास्त उठावदार दिसत आहे.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

काही महत्वाचे (Details as an anchor point)
काही वेळेस संपूर्ण भागापेक्षा ठराविक भाग दाखवून देखील छान प्रतिमा मिळू शकते. सुपर मॅक्रो वापरून आपण हे करू शकतो. या तंत्राने आपण फुलांच्या छान प्रतिमा टिपू शकतो. फुले संदल (सेपल्स), प्रदल (पेटल्स), केसरदल (स्टामेन्स) अश्या थरांनी बनलेली असतात. नीट निरीक्षण केले तर यातील एखाद्या भागाचा सुद्धा आपल्याला छान फोटो मिळू शकतो.

खालील प्रतिमेत फुलाचा मध्यभाग टिपलेला आहे. प्रतिमा टिपताना कोन आणि रचना यांची अश्या प्रकारे निवड केली, की जेणेकरून फुलाची नजाकत आणि रंग योग्य प्रकारे दिसू शकेल. या प्रकारच्या प्रकाशचित्रणामध्ये योग्य रचना (फ्रेम) तसेच योग्य खोली (डेप्थ) हे आव्हानात्मक असते. कारण एकतर खूप जवळून फोटो घेतल्यामुळे योग्य रचना आणि खोली मिळणे कठीण असते आणि फुलांचे विविध घटक विविध प्रकारे विभागले गेले असल्यामुळे योग्य, हवा तसा फोटो मिळवणे कठीण होते.

फक्त फुलेच नव्हे तर फुलातील देठातून देखील आपल्याला छान रंगसंगती मिळू शकते. पुन्हा येथेही जागेची (कोनाची) योग्य निवड महत्वाची ठरते, जेणेकरून आपण फोटोसाठी योग्य ती खोली मिळवू शकतो.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

कधी कधी चांगला फोटो टिपणे हे प्रकाशचित्रणाच्या दृष्टीने कठीण नसते. परंतु जंगलातील वेगळेपणा टिपण्याची आपली नजर असणे हे थोडे कठीण असते. यासाठी आपल्याकडे कोणीही मार्गदर्शक नसतो. या प्रतिमेत एका किटकाने कुरतडलेले पान दिसत आहे. कुरतडल्यामुळे तो भाग हिरव्या रंगापेक्षा छान वेगळा दिसत होता. गोष्ट साधीच होती पण त्याची रचना योग्य प्रकारे होणे गरजेचे होते.

दुसरी एक गोष्ट आपण ठळकपणे दाखू शकतो ती म्हणजे त्याचा पोत. येऊर येथे भटकताना मला एक सुकलेल्या पानाची जोडी दिसली तिच्यावर जणू सुरकुत्या पडल्या आहेत असे वाटत होते. त्याचा फोटो घेताना गडद पार्श्वभूमी आणि योग्य कोन यांचा मेळ साधणे हेच फक्त आव्हानात्मक होते.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण करण्यासाठी योग्य मार्ग म्हणजे वस्तूंकडे वेगळ्या नजरेने, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे. जेव्हा आपण एखादी वस्तू जास्त उंचीवरून, वेगळ्या जागेवरून पाहतो, तेव्हा ती आपणांस नक्कीच वेगळी भासते. एकदा मी कास पठारावर होतो आणि त्या वर्षी ‘टोपली कारवी’ मोठ्या संख्येने फुलली होती. तो सर्व परिसर कारवीने भरून गेला होता. दुर्दैवाने खूप वारा आणि पाऊस होता तसेच धुक्यामुळे पठाराचे फोटो घेणे कठीण होते. म्हणून मग योग्य कोन शोधत असताना मी फुलांच्या जवळ गेलो तेव्हा फुलांमध्ये असलेले पाण्याचे थेंब नजरेस पडले. त्या थेंबांवरून प्रकाश परिवर्तित होत होता. त्यामुळे मला मनासारखा फोटो घेणे शक्य झाले. पठारावरील कारवीची फुले पाण्याच्या छोट्या थेंबांत दाखवता आली. हा फोटो माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक आहे.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

कलात्मक पध्दतीतील एक सोपे प्रकाशचित्रण म्हणजे पाण्याच्या थेंबांचे प्रकाशचित्रण होय आणि मला वाटते कलात्मक प्रकाशचित्रणाची सुरूवात पाण्याच्या थेंबांच्या प्रकाशचित्रणाने करणे योग्य ठरेल. आता मी तुम्हाला पाण्याच्या ४ प्रतिमा दाखवीत आहे. यांत विषय एकच आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या पद्धतीने दाखवला आहे.

ही माझ्या सुरुवातीच्या काळातील टिपलेली पाण्याच्या थेंबाची प्रतिमा आहे. अगदी पहाटे टिपलेली प्रतिमा आहे ही. ते एक जमिनीलगत असलेले कोळ्याचे जाळे होते. परिसरातून फिरत असताना माझ्या लक्षात आले, की सूर्यप्रकाशामुळे एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास ते जाळे चमकत होते; जाळीच्या पाठीमागे छान सूर्यप्रकाश पडला होता. म्हणून मी लगेच कॅमेरा आणला आणि वेगवेगळ्या कोनाचे निरीक्षण केले आणि हा फोटो टिपला. एकच कठीण गोष्ट होती ती म्हणजे योग्य कोन आणि योग्य एक्स्पोझर मिळणे. असे दृश्य मिळणे खरोखरच भाग्याचे असते. कारण सूर्य थोडासा जरी वर आला तरी जाळ्याचे वेगवेगळे भाग चमकू लागतात, त्यामुळे तुम्हाला हवे ते दृश्य मिळेल याची खात्री नसते. म्हणून तुम्ही नेहमी जागरूक राहून संधीचा फायदा घेणे आवश्यक असते.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

पाण्याचे प्रकाशचित्रण
दुसरा छान फोटो म्हणजे ‘मोत्याची माळ’. खरं तर याला पाठीमागच्या भागातून प्रकाश मिळत होता. परंतु तो स्पष्टपणे न दाखवता त्याचा वापर प्रतिमेची खोली दाखवण्यासाठी केला. हा येऊर येथे काढलेला फोटो आहे. दुसरा फोटो काढताना हा पाण्याचा थेंब मला दिसला. हा थेंब इतका काही छान नव्हता, परंतु त्याची पार्श्वभूमी चांगली होती. त्यामुळे ती पार्श्वभूमी ठळकपणे दाखवून त्यावर पाण्याचा थेंब आणि देठ अश्या प्रकारे दाखवायचे ठरवले, की जेणेकरून रचना नियम (रूल ऑफ कंपोझिशन) याचा वापर संतुलन साधण्यासाठी केला जाईल. पार्श्वभूमीवर योग्य प्रकाश मिळवणे, प्रतिमेची खोली योग्य प्रकारे दाखवणे आणि एकूणच फोटोतील तपशील ठळकपणे दाखवणे यासाठी मला बाह्य प्रकाशाचा वापर करावा लागला.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे

हा गवतावरून पाण्याचा थेंब पडतानाचा फोटो घेताना विचार केला, की नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करूया. म्हणून थेंबावर सूर्यप्रकाश पडला असतानाचा फोटो घ्यायचे ठरविले. सूर्यप्रकाश पडत असतानाच काळजीपूर्वक फोटो टिपला आणि त्याचे एखादा तारा असावा असे आकृतिबंध मिळाले.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे


वरील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल, की कलात्मक प्रकाशचित्रणांसाठी काही नियम नसतात. अर्थात माझ्या दृष्टीने कलात्मक असलेले दुसऱ्या एखाद्याला निरुपयोगी देखील वाटू शकेल. खरेतर या प्रकारचे प्रकाशचित्रण थोडेसे कठीण असते. नेहमीच्या नैसर्गिक प्रकाशचित्रणांमध्ये प्रकाशचित्रकार निसर्गातील घटना हुबेहूब आणि अचूकपणे टिपायचा प्रयत्न करत असतो. अश्या वेळी निसर्ग कलाकार असतो आणि आपण ते नैसर्गिक कलाकौशल्य कॅमेऱ्याने टिपत असतो. परंतु कलात्मक प्रकाशचित्रकारीतेत मात्र प्रकाशचित्रकार नैसर्गिक वस्तूंत त्याच्या किंवा तिच्या नजरेने मनातील भाव त्या प्रकाशचित्रात दाखवत असतो. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावणे हे वाटते तेवढे सोपे नसते. म्हणूनच तुमच्या विचारांत स्पष्टता असणे आवश्यक असते.

काही लोकांचा असा आक्षेप असतो, की कलात्मक प्रकाशचित्रकार निसर्गाचेच अनुकरण करत असतात. परंतु मला वाटते की एकप्रकारे तो निसर्गाचा गौरव असतो, जो तुम्ही तुमच्या वेगळ्या नजरेने पाहता. निसर्गाचे न उलगडलेले पैलू इतरांसमोर आणत असता.

म्हणून, निसर्ग-प्रकाशचित्रकारांना मी असा सल्ला देईन की निवडलेल्या विषयाकडे कलात्मक पद्धतीने बघा. (मग तो विषय दगड, फूल किंवा इतर काहीही असेल) त्याचे नीट निरीक्षण करा आणि नंतर ५ वेगवेगळ्या कोनातून, फोकल लेंथ, प्रकाशाची स्थिती यांचा विचार करून फोटो घ्या. यातून तुम्ही बरेच काही नवीन, वेगळे, चित्तवेधक असे शिकू शकतात.


कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण: एक वेगळा दृष्टीकोन गिरीश वझे


याविषयाची अधिक माहिती http://creativenaturephotography.net/ या साईटवर पाहू शकता. तसेच भारतात उत्कृष्ठ कलात्मक प्रकाशचित्रणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींपैकी एक असे गणेश एच शंकर यांचे काम www.naturelyrics.com येथे पाहू शकता.
To Read in English मागील लेख पुढील लेख