1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

सिनेमॅटोग्राफर

संदीप यादव
पूर्वी

शब्दांकन - पल्लवी यादव


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई

बनारसच्या एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला. वडिलांची नोकरी मुंबईत. मुंबई महापालिकेच्या शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. म्हणूनच आम्ही भावंडं मुंबईला आलो आणि या स्वप्ननगरीत शिक्षण घेऊ लागलो.

मला शिक्षणाची तशी फारशी आवड नव्हती. खरं सांगायचं तर वह्या-पुस्तकांची आणि अभ्यासाची भीतीच होती! दहावी गाठली कशीतरी. पण त्यानंतर सुट्टीत काय करायचं हा प्रश्नच होता. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट फोटो असायचे. त्याचं टच-अपचं काम ब्रशनं चालायचं. एकदा माझी मोठी बहीण सहज म्हणाली, "तू फोटोग्राफीचा कोर्स कर. मग फोटो टच-अपचें काम उत्तम जमेल. तुझं ड्रॉईंग चांगलं आहे." मग ठरलंच! फोटोग्राफीचा क्लास शोधू लागलो. खूप हुडकल्यानंतर दादरला एक क्लास मिळाला. पण फी होती रु. ७००. कुठून आणायचे एवढे पैसे? मग परत बहिणीलाच गाठलं. तिनं मदत केली, पण तरी अर्धेच पैसे जमले. वडिलांजवळ मागून पाहिले, पण काही उपयोग नाही झाला. मग अर्धे पैसे भरूनच प्रवेश मिळवला व फोटोग्राफीच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला. प्रवेश घेताना हा कोर्स पूर्णपणे इंग्रजीमध्ये असल्याची मला कल्पनाच नव्हती. त्यामुळे फारसं काही कळलंच नाही. एकंदर हा दादरला केलेला कोर्स हे या क्षेत्रातलं मी घेतलेलं एकमेव शिक्षण.


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई

दहावीची सुट्टी संपली. पुढे कॉलेजात प्रवेशही घेतला. पण कॉलेजमध्ये आणि अभ्यासातही मन लागतच नव्हतं. तेव्हाच माझ्या कंटाळवाण्या आयुष्यात एक व्यक्ती आली - राज शैलियम. ते पूर्वी फिल्ममध्ये स्टील फोटोग्राफी करायचे. हा माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट होता. कारण ते मला भेटले आणि मी फोटोग्राफी करियर म्हणून निवडले. सुरूवातीला चित्रपट कलाकार जवळून पहायला मिळतील निव्वळ या उद्देशानं मी त्यांचा मदतनीस म्हणून काम करायला लागलो. पण तसं काहीही झालं नाही. त्यांना फारसं फिल्मचं काम न मिळाल्याने ते पूर्णपणे फंक्शन फोटोग्राफी करू लागले. मग मीही त्यांच्याबरोबर फंक्शनला त्यांना असिस्ट करू लागलो. त्यावेळी मला कॅमेराला कुणी हातही लावून द्यायचं नाही. मग आपला स्वत:चा कॅमेरा असावा हे मला जाणवलं. पण त्यासाठी पैसाही लागणार होता. अशा अडीअडचणीला आपले खरे मित्रच कामी येतात याचा अनुभव याच दिवसांत आला. इंटेरियर डिझायनर असणारा माझा मित्र जयंत तावडे यानं मला त्याचा कॅमेरा वापरायला दिला. पण किती दिवस वापरायची दुसऱ्याची वस्तू! माझ्यामुळे त्यानंही घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या. मग मी काटकसर करून पैसे जमा केले व Pentax K १००० कॅमेरा विकत घेतला. माझी स्वतंत्र फोटोग्राफीला सुरूवात झाली. फंक्शन फोटोग्राफीमध्ये फारसं काही करायला नव्हतं, समाधानही नव्हतं. मग क्रियेटीव्हिटीचा किडा वळवळायला सुरवात झाली. फंक्शन फोटोग्राफीतून उरलेल्या निगेटिव्हमधून प्रयोग करायला सुरूवात केली. मित्रांचे पोर्ट्रेट, टेबल टॉपचे शूट करायला लागलो. त्यानंतर मी मामिया आर. बी.६७ हा कॅमेरा घेतला व अॅड एजन्सी व कॉर्पोरेटचं काम करायला लागलो.


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई

हे काम करताना माझी माझ्या एका शालेय मित्राशी, विकास कश्यब यांच्याशी भेट झाली. विकास कश्यब चित्रपटक्षेत्रात आर्ट डिरेक्टर होते. मी ही त्या क्षेत्रात यायची इच्छा दर्शवली. एकीकडे माझी फोटोग्राफी चालूच होती. एक-दोन वर्षांनी माझ्या या मित्राचा मला फोन आला. "एका मराठी मालिकेच्या कॅमेरामनकडे काम करशील का?" असं त्यानं विचारलं. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी लगेचच नरेन गेदिया यांच्याकडे कामास रुजू झालो. मी त्यांचा शिकाऊ असिस्टंट होतो आणि मालिका होती 'एक होता राजा'! श्रेयस तळपदे याची पहिली मालिका आणि माझीही! म्हणूनच तो आजही मला तितक्याच उत्साहाने भेटतो. असो. या मालिकेचं शूटींग फलटणला करायचं ठरलं. सगळं युनिट फलटणला रवाना झालं. मी शिकाऊ असल्याने गेलो नव्हतो. एक-दोन दिवस गेले असतील, त्यांचा मला फोन आला, की "मी तुला काही फोननंबर देतो. तू प्रयत्न करून बघ, की यांच्यापैकी कुणी फलटणला माझ्या जागी येतील का? कारण मला मुंबईत यावं लागतंय." मी सगळ्या कॅमेरामनला फोन लावले. पण कुणीही फलटणला जायला तयार नव्हतं. मी त्यांना फोन केला व सांगितलं, की कुणीही तयार नाहीये. मग मी स्वतःशी म्हटलं, की मी का नाही करू शकणार हे काम? तशी इच्छा दर्शवली. पण नरेन गेदिया यांनी नकार दिला. कारण मी अगदीच नवीन! पण माझं नशीब चांगलं, की त्यांना शेवटपर्यंत कुणीही मिळालंच नाही आणि त्यांच्या पुढे माझ्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही. अगदी जड मनानं त्यांनी ही मालिका माझ्याकडे सोपवली. मीही त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा मान राखला. माझा स्टील फोटोग्राफीचा पाया पक्का असल्याकारणाने फ्रेमिंग, लायटिंगचा कधी अडथळा आला नाही.


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई

या मालिकेचं एडिटिंग होताना तानाजी घागडे (दिग्दर्शक) यांनी मी शूट केलेलं फुटेज पाहिलं. त्यांना माझं काम आवडलं. त्यांनी मला त्यांच्या 'समिधा' या मालिकेसाठी बोलावलं. ही माझी स्वतंत्र सिनेमॅटोग्राफार म्हणून केलेली पहिली मालिका.

या दरम्यान नरेन गेदिया हिंदी सिरियलचं काम करू लागले होते. कधी जास्त काम असलं, की ते मला कळवायचे. आणि मी त्यांच्या बरोबर काम करायचो. त्यांच्या बरोबर काम करताना परत एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली, जी मराठी मालिका करताना झाली होती. नरेन सरांना भारताबाहेर जावं लागलं. या हिंदी मालिकेचे दिग्दर्शक होते भूषण पटेल. ते स्वतः सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे छोट्या छोट्या चुका पकडायचे. यांच्यासोबत काम करायला कुणीही तयार नव्हतं. पण मी कुठल्याही परिस्थितीत न डगमगता संधीच्या शोधात असायचोच. तसाच याही परिस्थितीत सज्ज झालो. पण यावेळी मात्र हाताशी थोडा अनुभव असल्यामुळे नरेन सरांनी ही हिंदी मालिका सहज माझ्या हातात सोपवली. अशा प्रकारे 'गन्स् अँड रोझेस्' ही हिंदी मालिका मी पुढे सांभाळली. पुढे या मालिकेचं 'इंडियन टेली अवॉर्ड'मध्ये बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी नॉमीनेशन झालं. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई

पुढे भूषण पटेल यांनी मला स्वतंत्र सिनेमॅटोग्राफीचं काम दिलं. मालिका होती 'ट्विंकल ब्युटी पार्लर'. इथे वासिम साबीर यांनी माझं काम पाहिलं. त्यांनीही मला पुढे भरपूर कामं दिली. मी वासिम सरांबरोबर गेले सुमारे आठ वर्षं काम करत आहे. या आठ वर्षांमध्ये आम्ही एकूण बारा हिंदी मालिका केल्या. आतापर्यंत एकूण सत्तावीस हिंदी, तर चार मराठी मालिका मी केल्या आहेत. सध्या 'सरस्वती चंद्र' या मालिकेचं काम सुरू आहे.

पण अजूनही क्रियेटीव्हिटीचा किडा शांत झालेला नाहीये. आता आणखी नवीन काहीतरी आणि अजून मोठ्या पातळीवर करायची इच्छा आहे. हिंदी फिल्म्स करायची इच्छा आहे. चित्रपटसृष्टीचं आकर्षण सगळ्यांना असतं. लहान असताना मलाही होतं. कसं करत असतील हे शूटींग? कसे दिसत असतील हे कलाकार? काय काम चालत असेल? असे अनेक प्रश्न मला पडायचे. मात्र आपण या क्षेत्रात येऊन काही काम करू असं माझ्या कल्पनेतही नव्ह्तं. ध्यानी-मनी नसताना मी या चित्रपटसृष्टीचा भाग झालो. इथे काहीतरी करून दाखवल्याचा मला अभिमान आहे. माझे वडील आज असते तर त्यांनी नक्कीच माझी पाठ थोपटली असती. आज माझं यश पाहण्यासाठी ते जगात नाहीत याची खंत मला नेहमी असते.


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई


सिनेमॅटोग्राफर संदीप यादव, मुंबई


To Read in English मागील लेख पुढील लेख