1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

मुलाखत

अधिक शिरोडकर
अधिक शिरोडकर यांच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रकाशचित्रणाच्या क्षेत्रातला एक लखलखता तारा निखळला आहे. त्यांना मानवंदना म्हणून २०१२ सालच्या 'फ फोटोचा' दिवाळी अंकातली ही मुलाखत पुन्हा प्रकाशित करत आहोत.

मुलाखत - स्वप्नाली मठकर


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

श्री. अधिक शिरोडकर, वन्यजीव प्रकाशचित्रणातलं अगदी अग्रेसर नाव. मासिकासाठी त्यांची मुलाखत घ्यायची आहे असे कळल्यावर थोडे टेन्शनच आलं होते. इतकी मोठी व्यक्ती आपल्याशी कशी बोलेल, आपल्या प्रश्नांना अगदीच बाळबोध समजणार नाही ना, अनेक शंका मनात होत्या. त्या तशाच मनात ठेवून त्यांच्या घरी पोहोचले. शिरोडकरसर त्यावेळी कुणाशीतरी फोनवर बोलत होते. मी, अंजू मानसिंग, प्रवीण देशपांडे आणि आकृती माहिमकर अशी आमची टीम आजूबाजूचे निरीक्षण करण्यात गुंतलो. केवळ पाचच मिनिटांत या व्यक्तीचे भाषेवर किती प्रभुत्व आहे आणि त्यांना किती सुरेख प्रकारे एखादा मुद्दा समजावता येतो हे जाणवलं. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे, सहजतेमुळे मनावर असलेलं दडपण सहज दूर झालं आणि तिथून सुरू झाला एक वेगळा प्रवास.

तुमच्या प्रकाशचित्रणाची सुरूवात कशी झाली? सु्रूवात वन्यजीव प्रकाशचित्रणानंच केलीत की इतरही काही प्रकारचे फोटो काढलेत?
१९५२साली माझं लग्न झालं तेव्हा पत्नीला 'एन्सान' नावाचा एक कॅमेरा भेट मिळाला होता. तिच्या परवानगीने मी तो वापरायला सुरूवात केली. तेव्हा फोटोग्राफी करणं अतिशय महागडं होतं. सव्वातीन रुपयांना फिल्म डेव्हलप व्हायची. तेव्हा सव्वातीन रुपये म्हणजे फार वाटायचे. मग आज एक फोटो, चार दिवसांनी दुसरा, महिन्यानी तिसरा असे फिल्म जपून वापरत फोटो काढायचो. पाच सहा महिन्यांनी रोल भरला की डेव्हलप करायचो. त्यात एखादा फोटो फारच आवडला तर त्याचा मोठ्ठा म्हणजे ४ x ६ चा प्रिंट काढायचो! ती मला वाटतं B2 साईझ म्हणत.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

माझे गुरू म्हणजे मासिकं. वाचून वाचून फोटोग्राफी शिकलो. तेव्हा कुठे आतासारखे क्लास वगैरे होते? प्रोफेशनल फोटोग्राफर्स असले तरी कुणी कुणाला शिकवत नसत. आता इच्छा असेल तर फोटोग्राफी शिकवणारे क्लासेस आहेत, पुस्तकं, मासिकं आहेत. तेव्हा मात्र पॉप्युलर, मॉडर्न अशी दोन-तीन मोजकी मासिकं होती तीच वाचायचो.

नंतर 'रॉलीकॉन'ची कॉपी असलेला, रिट्झ नावाचा एक कॅमेरा ४०० रुपयांना मिळायचा, तो घेतला. जुना विकला आणि त्यावर ८० रुपयांची सूटही मिळाली. या कॅमेर्यानं फोटोग्राफी वाढत गेली. डेव्हलपमेंट स्वत:च करायचो. तेव्हा ‘Adox ३२ एएसए’ची फिल्म मिळायची आणि तिचं कॉन्ट्रास्ट जास्त असायचं. ते कमी करून डेव्हलपिंग, प्रिंटिंग करायचो.

सुरूवातीला सगळेच जसं लग्न, पार्टी, रस्त्यावरचे लोक असे कसलेही फोटो काढत असतात तसेच मीही काढले. नंतर १९८०मध्ये अजित गुलाबचंद म्हणून एक मित्र आहेत, त्यांनी भरतपूरला जाण्याबद्दल सुचवलं. भरतपूरला काय आहे हे ही मला माहीत नव्हतं. पण माझा Pentax कॅमेरा आणि २००मिमीची लेन्स घेऊन भरतपूरला पोहचलो. त्या आधी कावळे, चिमण्या, कबुतरं यापेक्षा वेगळा पक्षी कधी पाहिलाच नव्हता आणि भरतपूरला इतके वेगवेगळे पक्षी होते की बस्स. त्यानंतर जवळपास २० वेळा तिथे गेलोय. तिथूनच माझी वन्यजीव प्रकाशचित्रणाची सुरूवात झाली.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

वन्यजीव प्रकाशचित्रणच का आवडलं?
१९९०च्या दशकात वन्यजीव प्रकाशचित्रकार फारसे नव्हतेच. भरतपूरला एका देवळाजवळ एक बोर्ड लावला आहे. ब्रिटीश काळात कोणी किती पक्षी मारले याची त्यावर नोंद आहे. आपल्याकडे असे प्राणी आणि पक्षी मारण्यातच धन्यता मानतात. प्राणी आणि पक्षी हे ही तितकेच महत्वाचे आहेत आणि त्यांच्यामुळेच आपलंही अस्तित्व टिकून आहे याची आपल्याकडे जाणीवच नव्हती, अजूनही फारशी नाहीये. तेव्हा कुत्रे पाळायचे तसे चित्ते पाळत, त्यांची शिकार करत. अशाने चित्ते नामशेष झाले. शेवटचा चित्ता १९५५ साली दिसला होता.

तेव्हाचं भरतपूर आणि आताचं भरतपूर यातही फार फार फरक आहे. आता राजकारण, लोकांचे दुर्लक्ष, जाणीवेचा अभाव यामुळे तिथलं जंगल खूपच खराब झालंय. आपण जंगलं तोडून तिथे घरं बांधली. पूर्वी दादरच्या पलीकडेही जंगल होतं. मुंबईहून दादरला जायचं तर जंगल पार करायला लागायचं. आता हे सगळं तोडून टाकलं आहे. त्यामुळेच प्राणीही नाहीसे व्हायच्या मार्गावर आहेत. प्राण्यांनाही आपली टेरिटरी हवी असते. खरंतर माणसांनीच प्राण्यांच्या टेरिटरीमध्ये घुसखोरी केली आहे. आपल्याकडेही वन्यजीव संवर्धनाची जाणीव आणि प्रेम निर्माण होणं आवश्यक आहे. मला निसर्गाविषयी, प्राण्यांविषयी प्रेम आहे आणि निसर्गाचे, प्राण्यांचे फोटो पाहूनतरी लोकांना प्राण्यांविषयी प्रेम निर्माण होईल असं वाटलं. त्यामुळे वन्यजीव प्रकाशचित्रण अगदी सिरीयसली सुरू केलं.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

वन्यजीव प्रकाशचित्रण आवडतं त्याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे 'अहं'. माणसं माणसाला भेटली की सगळे तुलना करण्यात गुंततात. तुझ्याकडे कुठलं पेन आहे आणि तुझ्याकडे कुठलं घड्याळ आहे अशा दुय्यम गोष्टींना फार महत्त्व देतात. पण जेव्हा तुम्ही जंगलात जाता तेव्हा निसर्गाच्या भव्यतेपुढे अशा सगळ्या गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. निसर्ग इतका प्रचंड आहे, की त्याच्यासमोर आपलं अस्तित्त्व म्हणजे काहीच नाही याची जाणीव होते. आपल्या ‘अहं’ला काहीच अर्थ राहत नाही आणि आपण निसर्गात विलीन व्हायच्या दिशेनं म्हणजेच देवाच्या दिशेनं एक पाउल पुढे जातो. ही जाणीव पुन्हा पुन्हा निसर्गाकडे न्यायला कारण होते.

तुमची अनेक प्रकाशचित्र प्रदर्शनं झाली; काही पारितोषिकं मिळाली त्याबद्दल सांगाल का?
सुरूवातीला मी काही स्पर्धांमध्ये भाग घेतला; चार-पाच वेळा पारितोषिकंही मिळाली. पण नंतर मला वाटायला लागलं, की माझा कॅमेरा खूप चांगला आहे. तेवढा बाकीच्यांकडे सध्या उपलब्ध नाही. मी तसा अॅफॉर्ड करू शकतो, त्यामुळे बाकीच्यांना चान्स मिळत नाही का काय असं वाटायला लागलं. त्यानंतर मी स्पर्धांमध्ये भाग घेणं बंद केलं. नंतर बरीच प्रदर्शनं मात्र भरवली. मला वाटतं, भारतात वन्यजीव प्रकाशचित्रांचं प्रदर्शन भरवणारा मीच पहिला होतो. प्रदर्शनातही मी फोटो विकत नाही. मला फोटो दाखवायला आवडतात, विकायला नाही.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

वन्यजीव प्रकाशचित्रणामध्ये खूप पेशंस आणि समयसूचकता लागते त्याविषयी काही सांगाल का? त्याविषयी अनुभवही चालतील.
महत्वाचं म्हणजे वन्यजीव फोटोग्राफीमध्ये केव्हाही काहीही होऊ शकतं. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये एखादी घटना घडते. तुम्हाला सतत सतर्क राहून चौफेर लक्ष ठेवावं लागतं, स्वसंरक्षणासाठी आणि एखाद्या विशेष फोटोसाठी सुद्धा. दिसलेला प्राणी किंवा एखादा विशेष क्षण थांबणारा नसतो. त्यामुळे त्याक्षणी त्यावर रिअक्शन द्यावी लागते.

एकदा एका पक्ष्याचा फोटो काढत होतो आणि मागून ‘हिस्स’ असा आवाज आला. तेव्हा तो फोटो काढून पटकन मागे वळून पाहिलं तर झाडावर एक भलामोठा साप होता. म्हणजे त्यावेळी माझ्या कानांनी त्याचा आवाज टिपला नसता तर काही खरं नव्हतं.

असंच एकदा जंगलात बिबट्याची मादी आणि काही बछडे दिसले. अक्षरश: १०० फुटांवर पाणी होतं, पण ते पाण्यापाशी गेले नाहीत. तेव्हाच मला वाटलं, की आता इथे काहीतरी घडणार आहे. आम्ही तिथेच तासभर दबा धरून बसलो. तासाभरानं एक प्राणी पाण्यावर आला. मादी हळूच दबकत पुढे आली. ‘क्राउचिंग पोझिशन’मध्ये दबा धरून बसली आणि प्राणी टप्प्यात येताच त्यावर झडप घालून तिनं शिकार केली. त्या शिकारीचे मला चाळीस-एक फोटो काढता आले. You have to be always alert and ready to shoot.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

जंगलात प्रकाशचित्रण करतानाचे अजून काही अनुभव असतील तर आम्हाला सांगा ना.
जंगलात फोटोग्राफी करताना उघड्या जीपमधून फिरावं लागतं. त्या जीपमध्ये उभं राहून फोटो काढता येतात. मोठ्या बाहेरच्या रस्त्यावरून जाताना या जीप जोरात जातात आणि त्यामुळे सेफ्टी बेल्ट लावावा लागतोच. पण जंगलाच्या आतून जाताना मात्र जीप हळुहळू जातात. प्रत्येक वेळी जीप थांबली, की सेफ्टीबेल्ट काढून उठायचं, फोटो घ्यायचे यात बराच वेळ जातो. त्यामुळे आतल्या बाजूने जाताना आम्ही सेफ्टीबेल्ट लावत नाही. पण त्यादिवशी, कसं कोण जाणे, त्या ड्रायव्हरनं आतून जातानाही जीप जोरात नेली. मध्येच एक खड्डा होता. त्यात जीपचं चाक गेलं आणि जोरदार धक्का बसला. त्या धक्क्यानं मी पाच-एक फूट वर उडालो आणि आपटलो. त्यावेळी बरोबर काकूभाई होते. त्यांनी हात दिला आणि मी उठलो. प्रचंड वेदना होत होत्या. साळगावकरांकडून एक कॉम्बीफ्लाम घेतली आणि तसाच पुढे गेलो. नेमकं त्याच वेळी एक बिबट्याची मादी आणि तिची सहा पिल्लं दिसली. त्यांची फोटोग्राफी सुरू केली. हळूहळू जणू काही फोटो काढून घ्यायलाच ती सगळी पिल्लं मादीभोवती एकत्र जमली आणि मस्त फोटो मिळाले. दुसर्या दिवशी मुंबईला येऊन एक्स-रे काढले, तर दोन ठिकाणी फ्रॅक्चर होतं. मात्र फोटो काढताना ते काहीच जाणवलं नव्हतं.

तसंच एकदा गुजरातला सिंह आणि सिंहीण बसले होते. त्यांची पोटं बहुधा भरली होती. कारण ते अगदी शांत बसले होते. आम्ही फोटो काढण्यासाठी दबकत दबकत जवळ गेलो. चक्क १५ फुटांपर्यंत जवळ जाऊन फोटो काढले आणि परत आलो. परतल्यावर मात्र जाणवलं की जर ते सिंह-सिंहीण आमच्यावर चिडले असते, तर अगदी एकाच झेपेत आम्हाला गारद करू शकले असते.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

एकदा एक सिंहीण बछड्याला तोंडात धरून नेताना दिसली. सहाजिकच तिचे फोटो काढत होतो. तिनं बछड्याला खाली ठेवलं आणि त्याला चाटायला लागली. मग माझ्या लक्षात आलं, की तो बछडा मृत आहे. तितक्यात माझ्या चाहुलीनं त्या सिंहिणीनं वर माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतली वेदना पाहून मला अगदीच कसंतरी झाले. एकदा वाटलं प्राण्यांना असे भाव दाखवता येतात का? पण जे दिसलं होतं तेही खरं होतं. कदाचित मलाच तसं वाटत असेल असा विचार करून घरी आलो. पुढे दोन महिने तो फोटो पाहिलाच नाही. दोन महिन्यांनी पुन्हा पाहिला तर तीच भावना; तीच वेदना आणि दुःख तिच्या डोळ्यांत मला दिसलं. अशा जंगली प्राण्यांमध्येही दोन परस्पर विरोधी पर्सनॅलिटीज असतात हे प्रकर्षानं जाणवलं. एक शिकारी (predetor) आणि एक माता! हे निसर्गातच पहायला, अनुभवायला मिळतं.

भारतातली कोणती जंगलं पाहिलीत? त्यातलं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं?
भारतातली बहुतेक सगळी जंगलं पाहिली, अनुभवली आहेत. पण बांधवगड सर्वात आवडतं. अतिशय प्रेक्षणीय आणि दुर्गम असं ते जंगल आहे. बांधवगडला इन्फ्रास्ट्रक्चरही फार चांगलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे वाघ हमखास दिसतो.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

तुम्ही १९८०साली वन्यजीव प्रकाशचित्रण सुरू केलंत. असंख्य जंगलं पाहिलीत आणि अजूनही जंगलात भटकत असता. तर तेव्हाची जंगलं आणि आत्ताची जंगलं यांत फरक वाटतो का? काय फरक वाटतो?
खूप. खूप फरक आहे तेव्हा आणि आत्ताच्या जंगलांमध्ये. भरतपूर तर अलीकडे अगदीच खराब झालं आहे. कुठलंच संवर्धन नाही. त्यात गेली पाच-सहा वर्षं तिथे धड पाऊस नाही. पक्षांचं येण्याचं प्रमाणही फार घटलं आहे. यावर्षी पाऊस चांगला झालाय, पण पुन्हा पक्षी नेहेमीसारखे यायला काही वर्षं लागतील असं वाटतं.

शिवाय आपल्याकडे प्राण्यांचं, जंगलांचं रक्षण करण्याची, त्यांचं संवर्धन करण्याची जाणीवच फारशी नाहीये. प्राण्यांच्या शिकारीचं प्रमाण प्रचंड आहे. आता ते रोखण्यासाठी कोअर एरियात जायला बंदी घातली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, की या एरियाचं डिमार्केशन नीट झालेलं नाही. त्यामुळे करप्शनला प्रचंड वाव मिळतो. पैसे द्या आणि हव्या असलेल्या भागात फिरा असं चालतं. वन अधिकार्यांकडे पुरेशी हत्यारं, साधनं काहीच नाहीत. त्याच वेळी शिकार्यांकडे सर्व अत्याधुनिक हत्यारं आणि साहित्य असतं. कसे काय अधिकारी शिकार्यांना पुरे पडणार? प्राण्यांची संख्या, जंगलाचे आकार घटतच जात आहेत.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

तुम्ही भारताबाहेर आफ्रिकेतही प्रकाशचित्रण केलं आहेत. तर तिथे आणि भारतात काय फरक वाटतो? कुठे प्रकाशचित्रण करणं अधिक आव्हानात्मक वाटतं?
आफ्रिकेला सहा वेळा गेलोय. तिथे इतकी शिस्त असते आणि नियमही अतिशय कडक असतात. गाडीच्या बाहेर कुठल्याही परिस्थितीत यायचंच नाही असा नियम आहे. कुणीच गाडीबाहेर जात नाही, जाऊ दिलंच जात नाही.

एकदा दुपारी जेवायला लॉजवर गेलो, तेव्हा माझ्याकडे सँडविच होतं. तिथे काही पक्षी दिसले. त्यांना मी खायला घालायला गेलो तर मला तिथल्या लोकांनी मनाई केली. कारण त्या पक्ष्यांना असं आयतं खायची सवय होईल आणि ते स्वत:हून भक्ष्य पकडून खायचे कष्ट करणार नाहीत. जंगलात रहायचं तर त्यांनी तिथल्यासारखंच रहावं, स्वतःच स्वतःचं भक्ष्य शोधावं. मला खरोखर आश्चर्य वाटलं, पण हे पटलंसुद्धा.

तिथे जंगलातली हॉटेल्स दुरून कळणारही नाहीत इतक्या बेमालूमपणे जंगलात लपलेली असतात. आपण अगदी जवळ गेल्यावरच हॉटेल असल्याचं दिसतं. हॉटेल्स प्रचंड महागही असतात, पण त्याच वेळी तिथे सगळ्या सोयी उपलब्ध असतात. टुरिझम हा आफ्रिकेचा मह्त्त्वाचा बिझनेस असल्याने आदरातिथ्यही फार चांगलं असतं.

तिथे प्राणीही प्रचंड संख्येनं आहेत. झेब्रे लाखांनी आहेत. असं म्हटल्यावर कुणीतरी मला विचारलं होतं की तुम्ही मोजलेत का? मी म्हणालो - नाही, मी त्यांचे पाय मोजले आणि त्याला चारनं भागलं! पण खरंच खूपच झेब्रे आहेत. उड्या मारत जातानाचं त्यांचं मायग्रेशन फारच सुंदर दिसतं.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

वाइल्ड डॉग्स (जंगली कुत्री) पॅकमध्ये असतात. एकदा त्यांनी घेरल्यावर शिकार सुटणं कठीण. एकदा या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी एक बछडा आमच्या गाडीखाली बसला. कुत्र्यांनी पाच मिनिटांत कानाला पकडून त्याला बाहेर खेचलं आणि सातव्या मिनिटाला मारून खाऊन टाकलं. सतराव्या मिनिटाला गिधाडं येऊन उरलीसुरली हाडंही साफ करून गेली. त्या बछड्याचं नामोनिशाणही राहिला नाही. तिथे ते एक लाईफ सायकलच आहे. सिंह, बिबट्या अशा प्राण्यांनी शिकार केली, की आधी ते खातात. त्यावेळी गिधाडे वर घिरट्या घालत असतात. या गिधाडांना बघून तरसाला शिकारीचा माग लागतो. मग उरलेली शिकार ते तरस येऊन खातात. तरसानंतर उरलेली हाडं आणि तुकडे गिधाडं येऊन फस्त करतात. एकदम क्लीन सिस्टीम!

इथे भारतात तसं होत नाही. कारण प्राणी कमी आणि गिधाडं तर जवळपास नाहीतच. पूर्वी डुंगरवाडीतही खूप गिधाडं दिसायची. डायक्लोफेनाक नावाच्या औषधाचा वापर झालेले मृत प्राणी खाऊन गिधाडं आजारी पडून मरायला लागली आणि त्यांची संख्या खूपच कमी झाली. त्यामुळे अशी नैसर्गिक क्लिनिंग सिस्टम आपण गमावलेली आहे.

आता आपल्याकडे माळढोकही नाहीत. त्यांना हवे असणारे नैसर्गिक वातावरण आपण जतन करू शकलो नाही आणि माळढोक नामशेष झाले. आफ्रिकेत मात्र अजूनही आठ प्रकारचे माळढोक आढळतात. तिथे गेंड्याच्या बाबतीत मात्र असं झालं होतं. त्याच्या शिंगाना खूप मागणी आणि किंमत असते. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली होती. चीनमध्ये जसं वाघाचं नख किंमती मानलं जातं तसंच हे. त्यामुळे गेंड्यांची संख्या फारच कमी झालीये.

भारतात प्रकाशचित्रण करणं जास्त आव्हानात्मक आहे. कारण इथे जंगलं फारशी नाहीत. जी आहेत ती दाट आणि दुर्गम आहेत. प्राणीही फारसे नाहीत. आफ्रिकेत मात्र मोठमोठी माळरानं, प्रचंड पसरलेली जंगलं आहेत. त्यात शिकारी वगैरे नसल्याने प्राणीही भरपूर आहेत. आपल्याकडे ‘वाइल्ड व्हर्सेस मॅन’ हा मोठा प्रॉब्लेम आहे. तसा तो आफ्रिकेत नाहीये.

गुजरात मधले सिंह आणि आफ्रिकेतले सिंह यातही याचमुळे फरक आहे. गुजरातमध्ये दाट जंगल आहे. अशा जंगलात फिरायला लहान चणीचं शरीर योग्य. त्यामुळे इथले सिंह बारीक आहेत. त्याउलट आफ्रिकेत प्रचंड मोकळी जागा, मोठ्या मोठ्या शिकारी; मग सिंहही तसेच मोठेच्या मोठे दिसतात.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

तुम्ही कायदेतज्ज्ञ आहात आणि पर्यावरणप्रेमीही आहात. वाइल्ड लाईफ कमिटीवरही तुम्ही होतात. तर भारतातली ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न केलात? त्यात अजून काय करता येईल?

मी वाइल्ड लाईफ कमिटीवर होतो तेव्हा बरेच प्रयत्न केले. पूर्वी आपल्याकडे कोणालाच पर्यावरण संवर्धनाची गरज वाटत नव्हती. पण आता जेव्हा आपलं अस्तित्त्वच धोक्यात येईल असं वाटायला लागलं, तेव्हा प्राणी, वनस्पती यांचं संवर्धन व्ह्यायला पाहिजे ही जाणीव व्हायला लागली. आता जाणीव होतेय हे खरंच चांगलं आहे, पण आता फार उशीर झालाय. आधीच आपल्या जंगलांचं आपण इतकं नुकसान केलेलं आहे की ते सुधारायला फार वेळ लागेल.

पूर्वी काही पक्षी प्रकाशचित्रकार एखादं पक्ष्याचं घरटं दिसलं, तर त्याचे फोटो काढून ते घरटं तोडून टाकत. म्हणजे इतर कुणाला त्याचे पुन्हा फोटो काढता येऊ नयेत; त्या फोटोंचा युनिकनेस कायम रहावा. अशा गोष्टींनी पर्यावरणाचा, प्राण्यांचा खूपच नाश झाला आहे. आता अशा गोष्टींना बंदी आहेच. शिवाय पक्ष्याच्या घरट्याच्या आतला फोटो आजकाल स्पर्धांमध्ये ग्राह्य मानला जात नाही. पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे.

भरतपूरला ‘कॅटल व्हर्सेस एन्व्हायर्मेंट कॉन्फ्लीक्ट’ असे दृश्य आहे. कारण माणसांनी जंगलाची, त्यातल्या प्राण्यांची जागा घेतली आहे. जंगलं तोडली आहेत. आपण यावर उपाय शोधला नाही तर पर्यावरणाबरोबर आपलाही नाश होणार आहे हे नक्की. अनेक ठिकाणी आपण बिबट्या मानवी वस्तीत शिरला अशा बातम्या वाचतो. खरंतर बिबट्या आपल्या घरात शिरत नाही. आपणच बिबट्याच्या घरात, त्याच्या जंगलात घुसलो आहोत. त्याची जागा कमी झाली, भक्ष्य मिळेनासं झालं, मग तो बिचारा कुठे जाईल? बिबट्यासारखा इतका शक्तीवान प्राणी शहरी वस्तीत आला, की मग आपल्याला त्रास होणारच. एकदा गुजरातमध्ये एक बिबट्या पकडून हेवी ड्युटी पिंजर्यात ठेवला होता. अगदी लहान पिंजरा होता; फारतर सहा इंच मोकळी जागा होती. मी चुकून थोडं जवळ गेल्यावर त्या बिबट्यानं त्या सहा इंचातही पटकन झेप घेतली. झेप इतकी जोरदार होती, की सबंध पिंजरा जोरदार हलला. त्यात बिबट्याची नखं वक्र असतात. त्याचा एक फटका अंगाला लागला तर ती सरळ बाहेर पडत नाहीत, आतलं मांस ओरबाडूनच बाहेर येतात.

नॅशनल जिओग्राफिकवर मागे एक जाहिरात पाहिलेली आठवते. त्यात एक माणूस कुर्हाड घेऊन वाघ, सिंह, चित्ता अशा प्राण्यांची मोठी मोठी पोस्टर्स घाव घालून तोडत असतो. आणि सर्वात शेवटी ती सगळी तुटलेली पोस्टर्स त्या माणसाच्याच अंगावर पडतात आणि तो माणूस त्या खाली दबून जातो. ही प्रातिनिधिक जाहिरात आहे. अशीच परिस्थिती आहे सध्या आपल्याकडे.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

सध्याच्या या परिस्थितीत मला काय मिळेल, मला काय फायदा होईल याच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर फरक पडू शकेल. पण कुणालाच पर्यावरणाबद्दल काही पडलेलं नाही हे जाणवून वाईट वाटतं. मी कमिटीवर असताना तेव्हाच्या पर्यावरणमंत्र्यांशी भरतपूरबद्दल बोललो. तर त्यांना ते नावही माहित नव्हतं. चार वेळा त्यांनी ते नाव मला विचारलं. शेवटी ‘आपण जाऊया एकदा’ असं म्हणालेही पण पुढे त्याचं काहीच झालं नाही. ते कधी गेलेही नाहीत भरतपूरमधली परिस्थिती बघायला. पर्यावरणमंत्री असूनही भरतपूरसारख्या संवेदनशील जागेचं नावही माहित नसणे, त्याबद्दल काहीही आस्था नसणे याला काय म्हणायचं? मी वाइल्ड लाईफ बोर्डात चार वर्षं होतो. पण चार वर्षांत फक्त एकदा काही मिनिटांची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये कोणाला काही बोलायचं नव्हतं, की कोणाला काही ऐकायचं नव्हतं. नावाला मिटिंग झाली इतकंच! बास! अशी अवस्था असल्यावर काय होणार? तरी नवे फोटोग्राफर पर्यावरणाबद्दल जागरूक होत आहेत. जंगलातले विविध फोटो पाहून लोक जागरूक होत आहेत. त्यामुळे मी आशावादी आहे. Sustained efforts are needed .

तुम्ही कृष्णधवल प्रकाशचित्रणापासून सुरूवात केलीत. तिथून रंगीत चित्रण आणि पुढे डिजिटल प्रकाशचित्रण हा प्रवास कसा झाला? तो बदल तुम्ही कसा सामावून घेतलात? या बदलाबद्दल काय वाटतं? डिजिटल प्रकाशचित्रणाचं भविष्य काय आहे असं वाटतं?
सगळ्यात आधी म्हणजे I could afford it . शिवाय मी नवनवीन गोष्टींचं खूप वाचन करतो. स्वत:चं ज्ञान अद्ययावत ठेवायचा प्रयत्न करतो. कुठेतरी एक प्रश्न विचारला गेला होता - "Do you read to increase your knowledge?"
तर, त्यावर माझं उत्तर आहे, की "No, I read to decrease my ignorance." मध्यंतरी एक पुस्तक घेतलं. त्यात एकच फोटो फक्त फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरून कसा कसा बदलता येतो याबद्दल माहिती आहे. तर असं वाचन कुठे ना कुठे नेहेमीच उपयोगी पडतं.

डिजिटल फोटोग्राफी म्हणजे खरंच एक महत्त्वाचा टप्पा आहे. डिजिटल फोटोग्राफी आणि नंतरचे फोटोशॉप बदल यांमुळे खूप कंट्रोल मिळतो. तसा तो आधी नव्हता. आता फोटो काढताना माझं काही चुकलं, तर तिथल्या तिथे बघून चूक दुरुस्त करता येते. पूर्वी तो रोल डेव्हलप करून पाहिल्याशिवाय काय ते कळायचं नाही. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची. पण आता तसं नाही. चांगल्या क्वालिटीच्या हाय रिझोल्युशन कॅमेरानं काढलेल्या डिजिटल फोटोचे प्रचंड मोठे प्रिंट्स काढता येतात. प्रिंटची क्वालिटी अप्रतिम येतेय. फक्त एकच आहे, की हा बदल ज्या वेगाने होतोय त्याच वेगाने तो आपल्यात घडवून आणणे हे फक्त १५/२० टक्के ओव्हर अॅव्हरेज लोकांनाच जमतंय. तितकं वाचन आणि माहिती मिळवत राहिली नाही तर हे ज्ञान अद्ययावत राहणार नाही.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

अॅफोर्डिबिलिटीमुळे आता कॅमेरा सगळ्यांकडे असतो. पण पूर्वी चांगला कॅमेरा असणे हा स्टेटस सिम्बॉल असे. एकदा भरतपूरला गेलो होतो. तिथे आतल्या भागातल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. त्याचवेळी तिथे रोल्स रॉईसचे प्रेसिडेंटपण होते. खरंतर परिस्थितीने आम्ही अगदी दोन ध्रुवांवर होतो. इतके, की त्यांची आणि माझी चांगली ओळख होणंही अशक्य वाटावं. पण आमची ओळख झाली ती कॅमेरामुळे. फोटोग्राफीमध्ये सगळे एकमेकांकडे बघून काहीकाही शिकत असतात. फोटोग्राफीमुळे माणसं जवळ येतात.

मी जेव्हा पहिला कॉम्प्युटर घेतला तेव्हा त्याची किंमत दीड लाख होती. आता तसले कॉम्पुटर वापरताही येणार नाहीत. हार्डडिस्क मेमरीही खूप कमी होत्या. आता पहावं तर १६ जीबी, ३२ जीबी अशा आकाराची छोटी मेमरी कार्ड येतात, तीही अगदी कमी किंमतीला. पण घेताना फार मोठी कार्ड घेण्यातही रिस्क असते. समजा कार्ड खराब झालं, तर त्यावरच्या बर्याच इमेजेस जातील. त्याऐवजी छोटी छोटी जास्त कार्ड्स घेतली आणि एखादं खराब झालं तरी फोटो जाणार नाहीत.

फोटो साठवून ठेवताना काहीजण सीडीज बर्न करतात. पण सीडीसुद्धा काही वर्षांनी चालत नाहीत. त्यामुळे फोटो एक्स्टर्नल हार्डडिस्कमध्ये ठेवावेत.

आत्ताच्या कॅमेरांनी फोटोग्राफी सोपी केली. पण त्याचवेळी कॅमेराच्या तांत्रिक गोष्टींवर अवलंबून राहणं वाढलं आहे असं वाटतं का?
डिजिटल कॅमेरा हे शेवटी एक क्रिएटीव टूल आहे. साधन आहे. सुरी हे साधन कांदे कापायला वापरता येतं आणि माणसं कापायलाही वापरता येतं. तुम्ही ते कसं वापरता यावर त्याचा फायदा किंवा तोटा अवलंबून आहे.

पूर्वी फोकसिंग, मीटरिंग, एक्स्पोजर याला वेळ लागायचा. आता मात्र हा वेळ वाचतो. तो वाचलेला वेळ फोटोच्या क्रिएटिव्हीटीसाठी वापरायला हवा. आधी स्टुडियो लाईट मॅन्युअली एक एक करून सेट करायला लागायचे. आता तंत्र विकसित झालंय. त्यामुळे तसं करावं लागत नाही, तुमचा वेळ वाचतो. तोच वेळ अजून काही करण्यासाठी वापरता येईल.


मुलाखत अधिक शिरोडकर, ठाणे

पूर्वी जंगलात एखादा बिबट्या दिसला की तेव्हाचा लाईट बघून मिटरिंग करणे, फोकसिंग करणे यात वेळ निघून जायचा, कधीकधी बिबट्याही निघून जायचा.

मी बिबट्या दाट जंगलातून येतोय असा एक फोटो काढलाय. त्यात मी नेहेमीसारखा फोटो काढला असता, तर जंगल आणि बिबट्या दोन्ही फोकसमध्ये आले असते आणि फोटो विशेष वाटला नसता. पण त्याऐवजी मी अॅपर्चर अॅडजस्ट करून जंगल आउट ऑफ फोकस राहील असा फोटो काढला आणि तो प्रिडेटर अगदी दाट जंगलातून बाहेर पडतोय असा भास निर्माण झाला.

आफ्रिकेत किलीमांजारोला गेलो होतो. तिथे दूरवर एकच झाड होतं. त्याखाली एक हत्ती होता आणि पाठीमागे उंच किलीमांजारो पर्वत होता. बहुतेक सगळ्यांनी हॉरिझाँटल कंपोझिशन केलं होतं. पण मी व्हर्टिकल कंपोझिशन करून तो हत्ती, ते झाड आणि मागे उंच किलीमांजारो असा फोटो काढला. असा वेगळा विचार करून क्रिएटिव्ह फोटो काढणं महत्वाचं.

फोटोग्राफर्सच्या नवीन पिढीसाठी तुमच्याकडून काय संदेश आहे?
फोटोग्राफी खरतर प्रॉफिटेबल नाही. खूप स्पर्धा आहे या क्षेत्रात. फोटोग्राफी हे पर्यावरण संवर्धनासाठी शैक्षणिक साधन किंवा लोकांचा अवेअरनेस वाढवण्याचं साधन म्हणून वापरा. फोटोग्राफी शिकण्यासाठी भरपूर फोटो घ्या आणि वाचन करत रहा. एकलव्याप्रमाणे साधना करत रहा. We have turned our back to nature. Now let's go back to nature for our own survival.To Read in English मागील लेख पुढील लेख