1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

'इमेज मेकर'

बिभास आमोणकर


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

"मॉर्निंग, बोधे"
"गुड मॉर्निंग, बोला"
"काय प्रोग्राम?"
"आज ऑफिसमध्येच आहे."
"मी ११ वाजता मंत्रालयात मिटिंगला जातोय. दीडपर्यंत तुझ्याकडे येतो."
"ओके"
गेली अनेक वर्षं सकाळी बरोबर ८ वाजता बोधेसाहेबांचा फोन यायचा आणि माझ्या दिवसाची सुरूवात व्हायची. ३५ वर्षांच्या नेव्हीतल्या नोकरीमुळे बोधेंचं सारं जगणं शिस्तबद्ध झालं होतं. वेळ पाळण्याच्या बाबतीतही ते काटेकोर होते. आयुष्यभर घड्याळाची चाकोरी न सांभाळणार्या माझ्यासारख्याला त्यांच्या सहवासामुळे वेळेचं महत्त्व समजून घेणं भाग पडलं होतं.
१९८०च्या आसपासची गोष्ट आहे. उल्हास राणेंबरोबर मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत उत्साहानं काम करत असे. त्या काळात आम्ही अनेक नेचर ओरिएंटेशन कॅम्प्स, बर्ड वॉचिंग कॅम्प्स आणि नेचर ट्रेक्सचे आयोजन करत असू. अशा उपक्रमांसाठी आम्हाला नेहमीच स्वयंसेवक, मार्गदर्शक, प्रशिक्षक इत्यादींची उणीव भासायची. यावर उपाय म्हणून कर्नाळा अभयारण्याजवळ असलेल्या राणेंच्या फार्मवर व्हॉलेंटियर ट्रेनिंग कॅम्प घेण्याचं आम्ही ठरवलं. त्या शिबिरासाठी एक अभ्यासक्रमही तयार केला. नेचर फोटोग्राफी हा त्यातला एक विषय होता. प्रकाशचित्रणाबद्दल बोलण्यासाठी त्याकाळी निसर्ग प्रकाशचित्रकार म्हणून प्रसिद्ध असणार्या गोपाळ बोधेंना बोलवावं असं आम्ही ठरवलं. आमच्या आमंत्रणाला बोधेसाहेबांनी उत्साही अनुमती दिली आणि आपली सर्व साधनसामुग्री घेऊन ते ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी शिबिरस्थळी हजर झाले.


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

त्यानंतर अनेक वर्षे लोटली आणि अचानक एके दिवशी बोधेसाहेबांच्या हवाई प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाची बातमी कळली. सगळी कामं बाजूला सारून मी प्रदर्शन पहायला गेलो. जो सह्याद्री मी मुक्त मनाने पाहिला होता आणि ज्याच्या माथ्यावरील गडकोट-किल्ले मी भटकंतीच्या आणि प्रकाशचित्रणाच्या निमित्ताने न्याहाळले होते, त्याचं वेगळ रंगरूप बोधेंच्या प्रदर्शनात पहायला मिळालं. हवाई प्रकाशचित्रणाच्या माध्यमातून बोधेंनी सादर केलेला सह्याद्री पाहताना एकच शब्द वारंवार ओठावर येत होता - "अप्रतिम!"

प्रदर्शनातील प्रकाशचित्रं पाहून झाल्यानंतर बोधेसाहेबांची भेट घेतली. स्वतःच्या प्रकाशचित्रांबद्दलचं माझं मत न विचारता त्यांनी मलाच प्रश्न केला - "तुझी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कशी चाललीय?"
"सध्या मी एन्व्हायरमेंटचं पिक्टोरीयल डॉक्युमेंटेशन करतोय, त्याचंच काम सुरू आहे."
माझ्या कामाबद्दल ऐकून ते खूष झाले, म्हणाले, "व्वाह! पिक्टोरियल डॉक्युमेंटेशन म्हणणारा तू पहिला फोटोग्राफर भेटलास. मी सुद्धा तेच करतोय पण आकाशातून!"

चार-पाच वर्षांपूर्वी बोधेसाहेब मला म्हणाले, "तुझ्याबरोबर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला येऊन फोटोग्राफी करायचीय."
"साहेब, आम्ही जमिनीवरून फोटोग्राफी करतो." मी गंमतीनं म्हणालो. त्यावर हसून त्यांनी उत्तर दिलं, "आता ऑगस्टमध्ये मी रिटायर होतोय. त्यामुळे मलाही आता थोडं जमिनीवर यायचंय."


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

मग आम्ही तयारीला लागलो. रोजच्या बैठका व्हायच्या, फोटोग्राफीवर चर्चा व्हायची. राहणं, जेवणखाण आमच्या दृष्टीने तितकंसं महत्त्वाचं नव्हतंच; महत्त्वाची होती ती फोटोग्राफी. त्या आधी मी ३-४ वेळा व्हॅलीला जाऊन आलेलो होतो. त्यामुळे माझ्यापाशी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची आधीची भरपूर प्रकाशचित्रं होती. त्यात बोधे सरांबरोबर काढलेल्या फोटोग्राफ्सची भर पडाली. ते सर्व फोटोग्राफ्स बोधेसरांनी पाहिले होते. ट्रिप संपवून मुंबईला परतल्यावर त्यांनी व्हॅलीच्या फोटोग्राफ्सचं प्रदर्शन भरवण्याचा माझ्या मागे तगादा लावला. मी जेव्हा ‘हो’ म्हटल तेव्हा स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखे ते कामाला लागले. फोटोंच्या निवडीपासून ते अगदी प्रिंटींगपर्यंतच्या सर्व टप्प्यांत ते माझ्यासोबत होते. माझं ते पहिलं प्रकाशचित्र प्रदर्शन बोधेसाहेबांमुळेच साकारलं असं म्हटल तर चुकीचं ठरणार नाही.

व्हॅली प्रदर्शनानंतर आमचे संबंध अधिक दृढ झाले. दररोज भेटणं व्हायचं नाही, मात्र दिवसातून एकदा तरी फोनवरून बोलणं व्हायचं. नवे प्रोजेक्ट्स, कुठे जायचं, काय करायचं अशा गोष्टींवर सतत चर्चा चालायची. निवृत्तीनंतर बोधेसाहेब नियमितपणे माझ्या ऑफिसमध्ये यायला लागले. माझ्या हट्टाखातर त्यांनी त्यांच्या सर्व इमेजेसचं डिजिटल कन्व्हर्शन करायचं ठरवलं. अजय तुरकर यांच्याशी चर्चा करून त्यांनी डिजीटायजेशनला लागणारी, आवश्यक असणारी सगळी साहित्यसामग्री मागवून घेतली होती. विभव मांजरेकरनं त्या कामाची जबाबदारी घेतली आणि तब्बल ५ लाखांहुन अधिक इमेजेस कन्व्हर्ट करण्याचं शिवधनुष्य उचललं!


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

नेव्हीमध्ये प्रकाशचित्रकार म्हणून कार्यरत असताना बोधेसाहेबांनी केलेली कामगिरी ‘ऐतिहासिक’ म्हणण्याइतकी मोलाची आहे. चित्रिकरणासाठी उड्डाण करण्यापूर्वी बोधेसाहेब हवामान, वातावरण, ऋतुचक्र, उड्डाण मार्गातील महत्वाच्या गोष्टी, प्रकाशाची उपलब्धता अशा सर्वच घटकांचा सखोल अभ्यास करत आणि नंतरच चित्रिकरणाचा दिवस निश्चित करत. संधी मिळालीय म्हणून जसे जमतील तसे फोटो काढावे असं त्यांनी कधीही केलं नाही. तसं करणं हा त्यांचा स्वभावही नव्हता.

त्यांच्यातील प्रकाशचित्रकार कायमच जागृत असायचा. त्सुनामीनंतर चौथ्या दिवशी बोधेसाहेब अंदमान निकोबारच्या चित्रिकरणासाठी गेले होते. आवश्यक ती प्रकाशचित्रं काढून झाली. हेलिकॉप्टरनं दिशा बदलली. तेवढ्यात बेटावर जागृत झालेला ज्वालामुखी बोधेंच्या नजरेत आला. ताबडतोब त्यांनी पायलटला बेटाच्या जवळ जाण्याची सूचना केली आणि प्रचंड धूर ओकणार्या ज्वालामुखीची प्रकाशचित्रं काढली.

विक्रांत या युद्धनौकेवर राष्ट्रपती येणार म्हणून गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रातील सगळी जहाजं हलवण्यात आली होती. विक्रांतवरच्या सोहळ्याचं चित्रिकरण करून नेव्हीच्या तळावर परतलेल्या बोधेसाहेबांनी पुन्हा उड्डाण करून एकही जहाज नसलेल्या गेट वे ऑफ इंडियालगतच्या बंदर भागाची प्रकाशचित्रं काढली. मोकळ्या समुद्राच्या सानिध्यातील भारताच्या प्रवेशद्वाराचं बोधेसाहेबांचं ते प्रकाशचित्र म्हणजे एका अविस्मरणीय परिस्थितीचा दुर्मिळ दस्तऐवज म्हणावा लागेल.


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

बोधेसाहेबांनी संपूर्ण भारताचं हवाई प्रकाशचित्रण केलेलं आहे. वेगवेगळे विषय घेऊन प्रकाशचित्रण करणं हे त्यांच्या फोटोग्राफीचं वैशिष्ट्य होतं. "अ व्ह्यू फ्रॉम हेवन" या शिर्षकाखाली त्यांनी लेह-लडाख, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्विप, अंदमान-निकोबार अशा अनेक प्रदेशाचं हवाई प्रकाशचित्रण केलं. प्राचीन व्यापारी मार्गाचा सखोल अभ्यास करून त्यांनी भारतातून तिबेटमार्गे चीनमध्ये जाणार्या जुन्या सिल्क रूटचंही प्रकाशचित्रण केलं आहे.

"लाईट हाऊसेस ऑफ इंडिया"च्या अभ्यासानंतर बोधेंनी केलेल्या भारतातल्या दीपगृहांच्या प्रकाशचित्रणात काही इतरत्र नोंद नसलेल्या दीपगृहांचाही समावेश आहे. भारतातल्या दीपगृहांच्या स्थाननिश्चितीचं महत्त्वपूर्ण काम बोधेसाहेबांनी करून ठेवलं आहे. वेगवेगळ्या काळात त्यांनी केलेल्या देशाच्या किनारपट्टीच्या भागाच्या प्रकाशचित्रणामुळे तिथे झालेल्या बदलांचा अंदाज भविष्यातही बांधता येणार आहे. प्रत्येक विभागाप्रमाणे जसा सागर किनारा वेगवेगळा दिसतो, त्याचप्रमाणे मच्छिमारी करणार्या कोळ्यांच्या जहाजातही विविधता असते हे बोधेंच्या कोस्टल फोटोग्राफीतून स्पष्ट होतं.

"भारतातील धार्मिक स्थानं" हा विषय निश्चित करून बोधेसाहेबांनी केलेल्य एरियल फोटोग्राफीमुळे भूकंपात उध्वस्त झालेल्या गुजरातमधील भद्रेश्वर आणि आंध्रमधील कालाहस्ती मंदिराच्या पुनर्निमाणाच्या कामाला मदत झाली.


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

सिद्धिशक्ती नावाने स्वतःची प्रकाशन संस्था काढून बोधेंनी "गोवा - अ व्ह्यू फ्रॉम हेवन" हे स्वतःच्या प्रकाशचित्रांचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर "एन्शन्ट ट्रेड रुट्स ऑफ महाराष्ट्र" हे प्रकाशित झालं. पुढे त्यांची अजून अकरा पुस्तकं प्रसिद्ध झाली. अलीकडेच त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रकाशचित्रांचं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यासाठी संपूर्ण वर्षभर त्यांनी देवळाच्या दिनक्रमाचं चित्रिकरण केलं. या पुस्तकात सिद्धिविनायकाच्या दागिन्यांच्या प्रकाशचित्रांचा अंतर्भाव करायचा होता. पुस्तकाचं काम चालू असताना त्यांना डोळ्याचा त्रास सुरू झाला होता. मी त्यावेळी त्यांना म्हटलं, "देवाच्या दागिन्यांची फोटोग्राफी मी करतो." वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यांनी "कर ना" म्हणून मला अनुमती दिली. एवढे मोठे प्रकाशचित्रकार असूनही मनानं ते किती मोठे होते याचा प्रत्यय मला त्याक्षणी आला.

फोटोग्राफी हा त्यांचा श्वास होता. मुंबईत कुठेही भरणार्या प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाला बोधेसाहेब आवर्जून भेट देत, मग तो फोटोग्राफर होतकरू असो वा प्रतिथयश. ते स्वतःहून प्रकाशचित्रकाराची भेट घेत. त्याला मार्गदर्शन करत, उत्तेजन देत. फोटोग्राफीसाठी आवश्यक असणारी उपकरणं आपल्याकडे असायला हवीत असा त्यांचा आग्रह असायचा. निवृत्तीनंतर हवं तेव्हा हेलिकॉप्टर मिळू शकणार नाही हे वास्तव जाणून त्यांनी ड्रॅगन फ्लाय हेलिकॉप्टर घेतलं होतं. प्रकाशचित्रणाच्या विश्वात येणार्या नवीन तंत्रज्ञानाचं स्वागत करून ते थांबत नसत, तर ते तंत्रज्ञान शिकून घेत आणि आपल्या प्रकाशचित्रणात त्याचा वापरही करत. नवीन रिमोट हेलिकॉप्टर आणि थर्मल कॅमेर्याच्या सरावासाठी ते तीन वेळा कॅनडाला जाऊन आले होते. त्या कॅमेर्याच्या मदतीने जमिनीखालच्या पाण्याच्या साठ्यांचा रेकॉर्ड तयार करण्याचं त्यांनी ठरवलं होतं.


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना भेटणं, त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांची सखोल माहिती मिळवणं ही बोधेसाहेबांच्या स्वभावाची खासियत होती. आपल्याला खूप काही कळतंय - अगदी फोटोग्राफीतलंही - अशा पद्धतीने ते कधी कुणाशी वागले नाहीत. आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्याची त्यांची धडपड अविरत सुरू असायची.

२०१२ साली पंचविसावं पक्षीमित्र संमेलन मुंबईत घ्यावं असं मी ठरवत होतो. त्यासाठी महाराष्ट्राच्या गावा-शहरांतून येणार्या पक्षीमित्रांच्या राहण्याची व्यवस्था कशी आणि कुठे करावी हा आमच्यापुढे यक्षप्रश्न होता. मी बोधेसाहेबांना आमच्या अडचणी सांगितल्या. एखादी गोष्ट पटली की त्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची त्यांची तयारी असायची. बोधेसाहेब आम्हाला थेट पतंगराव कदमांकडे घेऊन गेले. आमचं काम, पक्षीमित्र संमेलन आणि आमच्या अपेक्षा त्यांनी मंत्रीमहोदयांना सांगितल्या. कदमसाहेबांनी यासंबधी कार्यवाही केली आणि नॅशनल पार्कमध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या पक्षीमित्रांच्या राहण्याची व्यवस्था झाली. मुंबईत भरलेल्या रजत महोत्सवी पक्षीमित्र संमेलनाच्या यशात बोधेसाहेबांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निसर्गप्रेमाची प्रचिती आम्हाला त्या प्रसंगी आली.

"आपला चेला म्हणता पण मला अजून हवेत नेलं नाहीत," असं मी बोधेसाहेबांना नेहमी म्हणायचो. एकदा ते मला म्हणाले, "आपल्याला लक्षद्वीपला जायचंय, फोटोग्राफी करायचीय" आणि तोच माझा एरिअल फोटोग्राफीतला पहिला पाठ ठरला. त्यानंतर तीन-चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मला सॉटीझला नेलं आणि एके दिवशी मला म्हणाले, "आता तुला सर्व काही येतंय, माझी आता गरज नाही."


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

हेरिटेज कमिटी, वाईल्ड लाईफ अॅड्व्हायजरी बोर्ड अशा अनेक शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून बोधेसाहेब कार्यरत होते. समित्यांच्या कामा-बैठकांसाठी सतत त्यांची धावपळ चाललेली असायची. सरकार दरबारीही त्यांच्या शब्दाला किंमत होती, मान होता, ते थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आपलं मत मांडू शकत.

मध्यंतरी ते मला म्हणाले, "बिभास, मी पुन्हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची ठरवतोय."
मी हसतहसत त्यांना विचारलं, "आमच्यासाठी काही ठेवाल की नाही?"

सिद्धिविनायकाच्या पुस्तकाच्या कामादरम्यान आम्ही कास, ताडोबाला जाऊन आलो होतो. पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची धावपळ सुरू होती. त्यातच मंत्रालयात बैठकांसाठी जावं लागत होतं. पुस्तक पूर्ण झालं, प्रकाशितही झालं. वर्तमानपत्रांतून बातम्या आल्या. ते होत नाही तोवर जहांगीरमध्ये भरणार्या माझ्या "व्हॅलीच्या" प्रदर्शनाची धावपळ सुरू झाली. त्या प्रदर्शनाच्या मांडणीत बोधेंचा सहभाग होता, मार्गदर्शनही होतं. जहांगीरचं प्रदर्शन पहायला ज्येष्ठ निसर्ग प्रकाशचित्रकार अधिकजी शिरोडकर आले होते. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यात बोधेसाहेबांना जीम कॉर्बेट-साततालच्या टूरच कळलं आणि ते विमानाचं तिकीट काढून मोकळे झाले. १६ एप्रिलला जहांगीरचं प्रदर्शन संपलं आणि चारच दिवसांनी हृदयविकारानं शिरोडकरसाहेब गेले. त्या घटनेमुळे साततालला जाण्याचा उत्साह सरून गेला. बोधेसाहेबांना मी म्हटलंही, "नको जाऊया कॉर्बेट-साततालला." पण जाण्याबद्दल त्यांनी आग्रहच धरला. खरंतर पुस्तकाच्या कामामुळे त्यांना खूपच दगदग झाली होती. त्यात प्रकृतीनं कुरकूर सुरू केली होती. तरीही त्यांच्या हट्टाखातर मी, बोधेसाहेब, विवेक नागवेकर, डॉ. धनंजय जोशी आणि विशाल कॉर्बेट-साततालला गेलो.


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

बोधेसाहेब आमच्यासोबत होते खरे, पण त्यांच्यात पूर्वीसारखा उत्साह दिसत नव्हता. जीपमध्ये ते बसून असायचे. एके ठिकाणी रस्त्यावरचा पूल पार करून आम्हाला पलिकडे जायचं होतं. पूल जवळ येताच बोधेसाहेब म्हणाले, "बिभास, तुमची जीप पुढे घ्या आणि आमची जीप पुलावर आली की माझा फोटो काढ". आम्ही कितीतरी टूर्स एकत्र केल्यात पण बोधेसाहेबांनी कधीही स्वतःच्या फोटोचा आग्रह धरला नव्हता. त्यामुळे त्यांचं ते बोलण मला थोडं वेगळं वाटलं. दोन दिवस कॉर्बेटला फोटोग्राफी करून आम्ही पंगोटला गेलो. तिथं एक पॅनोरमा शूटिंग पॉईंट आहे, जिथून हिमालयाची डोंगररांग दिसते. पॅनोरमा प्रकाशचित्रण हा बोधेसाहेबांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. त्यादिवशी मात्र त्यांचा उत्साह पूर्वीसारखा होता. पॅनोरामा प्रकाशचित्रणासाठी लागणारी ७/८ किलो वजनाची सगळी सामग्री घेऊन ते वेळेआधीच तयार होऊन जीपमध्ये बसले. तो उत्साह नंतरच्या सत्रात मात्र दिसला नाही. त्यांच्या चालण्यातही फरक पडला होता. साततालला आल्यानंतर त्यांनी फोटोग्राफी न करता हॉटेलमध्येच रहायचं ठरवलं. आम्ही प्रकाशचित्रण करून आलो. आपल्या रूममधून बाहेर येत उत्साहानं त्यांनी आमचं स्वागत केलं. मला म्हणाले, "काय आमोणकर, चहाची तल्लफ आली की नाही?" सतत चहा पिण्याची माझी सवय त्यांना ठाऊक होती. चहा पिताना त्यांनी आणखी एक बातमी सांगितली. "अॅडमिरलचा फोन आला होता. कोस्टल फोटोग्राफीचा आपला प्रोजेक्ट सँक्शन झाला आहे. मुंबईत गेल्यागेल्या कामाला सुरूवात करायला हवी." आमच्यात नवा उत्साह संचारला, गंमतीजंमतीत ती संध्याकाळ पार पडली.

विश्रांतीसाठी आम्ही रूम्समध्ये गेलो. थोड्यावेळानं बोधेसाहेबांनी माझ्याकडे लोमोटील या औषधाची विचारणा केली. त्यांना लूज मोशन सुरू झाले होते. शिवाय अतिशय अशक्तपणाही आला होता. गोळ्या घेतल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं. पण पुन्हा जुलाब सुरू झाले. डॉ. सुपेंशी संपर्क साधून त्यांना आम्ही उपचारांसंबंधी विचारलं. त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे उपचार चालू ठेवले. डॉ. जोशी बोधेसाहेबांच्या रुममध्ये थांबले. मध्यरात्रीच्या सुमारास जुलाबाबरोबर ओकार्याही सुरू झाल्या. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आम्ही बोधेसाहेबांना रूग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं. तातडीनं वाहनाची व्यवस्था केली. २५ किलोमीटवरच्या नैनितालमधल्या रूग्णालयात दाखल केलं. विवेक त्यांच्यापाशी थांबला. त्यांना त्वरित सलाईन लावण्यात आलं. सलाईनमुळे त्यांना बरं वाटलं. तेव्हढ्यात त्यांनी "मी बरा आहे. माझ्या घरी कळवायची गरज नाही" अशी आम्हाला तंबी दिली. मी साततालला हॉटेलवर थांबलो होतो. दिवस उजाडल्यानंतर डॉ. सुपेंशी बोलून निर्णय घ्यावा असं ठरवून हॉस्पिटलला जायच्या तयारीला लागलो. पण पहाटे ५:२०च्या दरम्यान मोबाईल खणखणला. पलिकडून विवेक बोलत होता, "बिभास ताबडतोब ये, बोधेसाहेब सिरीयस झाले". धावपळ करून आम्ही हॉस्पिटल गाठलं. तोपर्यंत सगळं संपलं होतं. पुढच्या व्यवस्थेत दोन दिवस गेले.


'इमेज मेकर' बिभास आमोणकर, ठाणे

तिसर्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये आलो. इतरवेळी टूरवरून आल्याआल्या मी फोटो पाहण्यासाठी उतावीळ असायचो. पण कॉर्बेट-साततालचे फोटो पहावे अस वाटतंच नव्हतं. आठवडा उलटल्यानंतर जड मनाने टूरचे फोटो डाऊनलोड केले.

त्यानंतर काही दिवसांतच गोमांतक मराठा समाजाने अॅड. अधिक शिरोडकर साहेबांची शोकसभा आयोजित केली होती. त्यासाठी मला बोलावलं होतं. दोघांच्या आठवणी सांगितल्यानंतर मी म्हणालो "ही टूर अधिककाकांसाठी प्लॅन केली होती, पण त्यांना तिथं घेऊन जाऊ शकलो नाही आणि हट्टानं जे बरोबर आले त्या बोधेसाहेबांना तिथून परत मुंबईत आणू शकलो नाही. हे दोन्ही अपघात मला आयुष्यभर सलत राहतील."

हवाई प्रकाशचित्रणाच्या माध्यमातून देशातल्या विविध भूप्रदेशांचं दस्तऐवजीकरण करण्याच्या अमूल्य कामगिरीची नोंद घेऊन बोधेसाहेबांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करणं शक्य होतं. पण तसं झालं नाही याबद्दल खंत वाटते.

कॅमेरा ट्रिगरवरची दोन महान बोटं कायमची थांबली. अनेक वेळा याच बोटांनी पुढील वाटचालीसाठी मला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली आणि प्रेरणाही दिली. ते सर्व आता थांबलंय.


To Read in English मागील लेख पुढील लेख