1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

गुरू

मिलिंद देशमुख, नाशिक
मिलिंद देशमुख सुमारे २५ वर्षे प्रकाशचित्रण व्यवसायात असून व्यक्तिचित्रण या विषयात त्यांचा हातखंडा आहे. केकी मूस फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणी इतर स्पर्धांमधेही त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. तसेच त्यांच्या प्रकाशचित्रांची प्रदर्शनेही भरवली आहेत.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

आपल्यावर गुरुकृपा होणे ही एक पूर्वनियोजित घटना असते असं मला वाटतं. आयुष्यात योग असेल तरच आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईने योग्य गुरू मिळतात. मग ती अंगणवाडीतील शिक्षिका असेल, प्राथमिक शिक्षक असतील, कॉलेजमधील प्रोफेसर असतील किंवा विविध कलाक्षेत्रातील अथवा व्यवसाय मार्गदर्शन करणारे गुरू असतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. योग्यवेळी आपल्याला ते भेटतात. थोडं अध्यात्मिक वाटतं पण हे असंच असतं. जसे अर्जुनाला गुरू द्रोण व श्रीकृष्ण भेटले; स्वामी विवेकानंदांना श्री रामकृष्ण परमहंस भेटले, तसंच.

एकदा तीन-चार फोटोग्राफर मित्रांसोबत आउटडोअर फोटोग्राफीला गेलो असता परत येताना नाशिक-त्रंबकेश्वर रस्त्यावर ‘नाणे संशोधन केंद्र’ लागतं तेथे आम्ही गेलो. नाणे संशोधन केंद्रात अर्थातच जुन्या नाण्यांपासून ते आतापर्यंतच्या चलनांची म्हणजेच शिवकालीन ‘होन’ या नाण्यापासून ते आजच्या क्रेडीट कार्डपर्यंतची माहिती आहे. ह्याच इमारतीतील एका दालनात तीस-चाळीस ब्लॅक अॅण्ड व्हाईट व्यक्ती प्रकाशचित्रं व स्थिर प्रकाशचित्रांचं प्रदर्शन कायमस्वरूपी लावलेलं नजरेस पडलं. आम्ही सर्व फोटोग्राफर्स असल्याने तिकडे आकर्षित झालो. एक-एक फोटोग्राफ पाहताना मंत्रमुग्ध झालो. काही तिबेटियन स्त्री-पुरुषांचे चेहर्यांवर असंख्य सुरकुत्या असलेले पोर्ट्रेट्स, चेहर्यावर प्रसन्न असे हास्य, त्या चेहर्यांचा अचूक साधलेला असा अॅन्गल, त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलेलं लायटिंग...रेम्ब्रंट लायटिंग, बटरफ्लाय, प्रोफाईल, शॉर्टलाईट, ब्रॉडलाईट अशा सर्व प्रकारच्या लाईटिंगचे फोटोग्राफिक पोर्ट्रेट्स मला तिथे बघायला मिळाले. म्हणजेच ते सर्व पिक्टोरियल पोर्ट्रेट्स होते. ही सर्व फोटोग्राफिक पोर्ट्रेट्स लो-की, हाय-की व मिडल-की प्रकारातली होती.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

एक खाणकाम करणारी व्यक्ती, तिच्या खांद्यावर दोर टाकलेला, डोक्यावर काळी टोपी, चेहरा रापलेला अशी व्यक्तिरेखा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये टिपलेली. त्या व्यक्तीची व्यक्तिरेखा त्या पोर्ट्रेटमधून जाणवत होती. त्यात एक महात्मा गांधीचाही पोर्ट्रेट होता. असे एक न अनेक फोटोग्राफिक पोर्ट्रेट्स तेथे बघावयास मिळाले. तो दिवस कायमस्वरूपी आठवणीत राहिला.

ही सर्व पोर्ट्रेट्स कोणी काढली असावीत? अशी उत्सुकता वाटली. तेथील अधिकार्यास विचारले असता त्यांनी सांगितलं, की ही सर्व पोर्ट्रेट्स बाबूजींची आहेत. म्हणजेच श्री.के.जी.माहेश्वरी यांची. श्री. कृष्ण गोपाल माहेश्वरी हे नाव पहिल्यांदा कानावर पडलं. जसजसं त्या अधिकार्याशी बोलत गेलो तसतशी आश्चर्यचकित करून देणारी माहिती ते आम्हाला सांगत गेले. तो तीन-चार एकरांमध्ये विस्तारलेला संशोधन केंद्राचा परिसर प्रायव्हेट असून बाबूजींच्या मालकीचा आहे. बाबूजी हे बिर्ला फॅमिलीचे सोयरे (इन-लॉज) आहेत. स्वत: मुंबईतील व्यावसायिक/उद्योगपती आहेत. फोटोग्राफी हा त्यांचा फक्त छंद. छंदातून टिपलेल्या त्यांच्या फोटोंना तीनशेपेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान, पदव्या, पारितोषिकं, सुवर्णपदकं मिळाली. उदा. (Hon.F.I.I.PC.;A.R.P.S;A.P.S.A.; F.P.S.(Univ.);Hon.F.I.C.S.;Hon.P.S.I.) हे ऐकून मी अवाक झालो. ही सर्व तेथील दालनात सजवून ठेवलेली आहेत. आपण कधी नाशिकहून त्र्यंबकेश्वरला गेलात तर या दालनाला अवश्य भेट द्यावी.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

एव्हढं सर्व पाहून ऐकून झाल्यावर असं वाटलं, की एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटावं. त्यांच्याकडून काही शिकावं. त्याचं एखादं वर्कशॉप अरेंज करावं अशी इच्छा मी त्या अधिकार्याकडे व्यक्त केली. त्यावेळचे ते अधिकारी होते श्री. बलसेकर. त्यांचा व माझा आधीचा परिचय होता. त्यांनी तो विषय मनावर घेतला व तेथील व्यवस्थापक श्री. झा साहेब ह्यांच्याकडे ते मला घेऊन गेले. मी त्यांना माझी इच्छा बोलून दाखवली. त्यांनी बाबूजींना विचारून तुम्हाला कळवतो असं सकारात्मक उत्तर दिलं. एका महिन्यात मला त्यांचा फोन आला. ‘बाबूजी वर्कशॉप द्यायला तयार आहेत.’ त्यांनी मला तारीख दिली. खूप आनंद झाला. काही वेगळं शिकायला मिळेल या विचाराने मन प्रसन्न झालं. नाशिकमधून सात ते आठ मित्रांना तयार केलं व आम्ही वर्कशॉप अटेंड केलं.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

दोन दिवसांच्या त्या वर्कशॉपमध्ये फोटोग्राफिक पोर्ट्रेट् काय असतं, पिक्टोरियल फोटोग्राफिक पोर्ट्रेट् कसं असावं हे हळूहळू कळायला लागलं. मॉडेलच्या चेहेर्यानुसार अॅन्गल कसा साधावा, मॉडेलची नजर कुठे असायला पाहिजे, मॉडेलचे उत्तम हावभाव कसे साधायचे अश्या बर्याच बाबींचा उलगडा बाबूजींनी केला. हे वर्कशॉप शक्यतो डेलाईटमध्ये असायचं. मोकळ्या जागेत दोन स्टॅण्डवर बॅकग्राउंड लावलं जायचं. दुसर्या बाजूला दोन स्टॅण्डवर डिफ्युजर आणि फिललाईटकरिता एक रिफ्लेक्टर. डेलाईट कंट्रोल करायला डिफ्युजर कसे वापरावयाचे, फिललाईट कसा वापरावयाचा, बॅकग्राउंडचा वापर कसा करायचा हे सर्व त्यांनी दाखविलं. मॉडेलच्या अंगावर शॉल किंवा डोक्यावर कॅपचा उपयोग करणे ही बाबूजींची स्पेशालिटी आहे. त्यावेळी बाबूजींचे वय ऐंशीपेक्षा जास्त होतं. पण वर्कशॉप देताना त्यांच्याय तरुणासारखा उत्साह असायचा, जोश असायचा. सौ.मां जी (बाबूजींच्या पत्नी)म्हणतात, "ये वर्कशॉप उनके लिये टॉनिकका काम करता है." बाबूजी त्यांच्यासोबत असिस्ट करायला एक सहकारी आणायचे. ह्या वर्कशॉपला त्यांच्या सोबत श्री.सुनील कपाडिया आले होते. ते सुद्धा एक पिक्टोरियल फोटोग्राफी मास्टर आहेत. माझ्या चेहर्याचे फिचर्स बाबूजींना आवडले होते. त्यामुळे त्यांनी मला मॉडेल म्हणून बसवलं. हा माझ्याकरिता एक वेगळा अनुभव होता. ह्या वर्कशॉपचा पुढे खूप फायदा झाला. मी प्रॅक्टिस म्हणून केलेले फोटोग्राफिक पोर्ट्रेट्स छान जमायला लागले.

एका वर्षानंतर बाबूजींचं दुसरं वर्कशॉप ठरलं. तसा मला डेनिश साहेबांचा फोन आला. मी अटेंड करायचं ठरवलं. पहिल्या वर्कशॉपला जे मित्र सोबत होते त्यांनाही सांगितलं. ते सर्व रिपीट करायला तयार नव्हते. म्हटलं ठीक आहे. पण आपण जायचं. काही नवीन मित्रांना तयार केलं. पहिल्या वर्कशॉपमध्ये जे शिकलो ते तर रिपीट झालं.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

बाबूजींना असिस्ट करायला मुंबईचेच श्री. अतुल चौबे आले होते. चौबे सर पण पिक्टोरियालीस्ट आहेत. तसंच त्याचं फोटोशॉपही खूप चांगलं आहे. दुसर्या वर्कशॉपमुळे मला स्वत:ला कॉन्फीडन्स आला, की आता आपण चांगले फोटोग्राफिक पोर्ट्रेट्स करू शकतो. स्टुडीओमध्ये येणार्या कस्टमरला फोटोग्राफिक पोर्ट्रेट्सकरिता राजी करून त्यांची पोर्ट्रेट्स करायला लागलो. पोर्ट्रेट्स बर्यापैकी जमत होती. पण मास्टरी आली नव्हती. प्रयत्न चालू होते.

एका वर्षानं मला तिसर्या वर्कशॉपचा फोन आला. वर्कशॉप रिपीट करण्याचा फायदा मला माहित झाला होता. ‘Practice makes man perfect’ ही म्हण मी ऐकून होतोच. पण ‘Repetation makes man perfect’ असं मला जाणवलं. तिसरंही वर्कशॉप अटेंड करायचं ठरवलं. दोन वर्कशॉपच्या अनुभवानंतर मला बाबूजींची शंभर वर्कशॉप करायची संधी मिळाली असती तर मी ती सर्व अटेंड केली असती. याही वेळेस पहिल्या दोन वर्कशॉपला आलेले मित्र रिपीटेशनला तयार नव्हतेच. नवीन मित्रांना तयार करून वर्कशॉपला जायचं ठरवलं. वर्कशॉपच्या तीन-चार दिवस आधी झा साहेबांचा बाबूजींचा निरोप सांगणारा फोन आला. "देशमुख, इस बार बाबूजीके साथ मुंबई से कोई असिस्ट करने नाही आ रहा है. तो आपकोही असिस्ट करना है." हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्यांना लगेचच ‘हो’ म्हटलं. फोटोग्राफी क्षेत्रातील एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या वर्कशॉपमध्ये असिस्ट करायला मिळणं ही माझ्याकरिता खूप मोठी संधी होती.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

ते दोन दिवस खूपच इंटरेस्टिंग गेले. मॉडेलला पोज देणे, त्याचा प्रॉपर अॅन्गल साधणे, लायटिंग मेनेज करणे एवढी बेसिक तयारी झाल्यावर बाबूजी त्यात सुधारणा करायचे. तिथे मला माझ्या चुका लक्षात यायच्या. अश्याप्रकारे त्या वर्कशॉपमध्ये पाच सहा पोर्ट्रेटस अरेंज केले. त्या वर्कशॉपचा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. एवढं शिकायला मिळालं की त्याचं मोजमाप नाही. सोबत बाबूजींचे आशीर्वाद मिळाले ते बोनसच. ह्या वर्कशॉपनंतर माझे पोर्ट्रेट खूप सफाईदार झाले. ह्या अनुभवाच्या जोरावर मी ‘व्यक्तिरेखा’ हे पिक्टोरियल फोटोग्राफिक पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन भरवलं. प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाठोपाठ व्यवसायही मिळाला. नाशिकमधील अनेक नामवंतांची पोर्ट्रेटस मी केलीत. ह्याच दरम्यान स्व.जयसिंगराव दळवी, सिंधुताई सपकाळ, कवी ग्रेस, वसंत आबाजी डहाके, अनिल अवचट, संगीतकार अशोक पत्की अशा अनेक मान्यवरांची पोर्ट्रेटस मी केली. मला पोर्ट्रेट फोटोग्राफर ही ओळख मिळाली. माझ्या नावापुढे पोर्ट्रेट फोटोग्राफर ही उपाधी लागली ती सिंधुताई सपकाळ ह्यांच्या पोर्ट्रेटमुळे व ठाण्याच्या फोटो सर्कलचे संजय नाईक ह्यांच्यामुळे. संजय नाईक यांनी माईंचं पोर्ट्रेट पाहून ‘हे मिलिंद देशमुख यांनी काढलेलं’ हे ओळखल्याने माझी पोर्ट्रेट फोटोग्राफर अशी आयडेन्टीटी तयार झाली. पुढे त्यांनी मला पोर्ट्रेट्सच्या स्लाईड-शो साठी निमंत्रित केलं. ठाण्यात स्लाईड-शो झाला व त्याला यश मिळालं. सर्वांना खूप आवडलं. त्यांनी मला ही पोर्ट्रेट्स कशी काढलीत ते बघायचंय म्हणून पोर्ट्रेट्स वर्कशॉपकरिता सुद्धा निमंत्रित केले. मला एक वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी दिली. थँक्स टू फोटो सर्कल ! थेंक्स टू संजय नाईक !

सध्या नाशिकमध्ये माझा छान, भव्य आणि प्रसिद्ध असा ‘द क्लासिक पोर्ट्रेचर स्टुडीओ’ आहे. पोर्ट्रेट्स, फेमिली पोर्ट्रेट्सचा व्यवसाय आहे. आतापर्यंत मी अनेक ठिकाणी स्लाईड शो, पोर्ट्रेट फोटोग्राफी व स्टुडियो लायटिंगची वर्कशॉप्स दिलीत. ह्या वैभवाला कारण आहे मला मिळालेले पोर्ट्रेट फोटोग्राफीचे योग्य गुरू श्री.माहेश्वरी व त्यांचे आशीर्वाद.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

आज बाबूजींचं तिसरं वर्कशॉप करून म्हणजेच त्यांना भेटून जवळपास सहा-सात वर्षं उलटली.पण आजही प्रत्येक फोटोग्राफिक पोर्ट्रेट काढताना मला त्यांची आठवण होते. सतत त्यांना भेटायची ओढ असते. माझे मित्र आणि बाबूजींचे माझ्या एवढेच चाहते असलेले समीर मोहिते (EFIAP, APSI, FFIP, IIPC (Platinum), APSM, APSS, AICS, FSoF) यांना मी एक-दोन वेळा बाबूजींना भेटण्याबद्दल बोललो. समीर म्हणाले, "तुझं ठरेल तेव्हा सांग, मी पण येईन तुझ्या सोबत." काही दिवसांनी सप्टेंबर-२०१४च्या पहिल्या आठवड्यात मी बाबूजींना फोन केला. आज बाबूजी ९२ वर्षांचे. तरी फोनवर मी माझं नांव सांगितलं व मी नाशिकहून बोलतोय असं सांगितल्यावर त्यांनी मला लगेचच ओळखलं. मी त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लगेच होकार दिला. म्हणाले, "आ जाईये। कब आ रहे हो?" मी म्हटलं, "संडे, १४ सप्टेंबरको आता हूँ।" ते म्हणाले, "ठीक है." नाशिक-मुंबई प्रवासाचा अंदाज घेऊन दुपारी तीनची वेळ घेतली. ठरल्याप्रमाणे समीर मोहितेंना कळवले.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

मला डहाणूला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन बाबूजींकडे जायचं होतं. सकाळी सात वाजता मी माझी पत्नी व मुलगा नाशिकहून निघालो. अंदाजे ११ वाजता डहाणूला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन दादरकडे निघालो. एवढ्यात बाबूजींचा फोन आला. "कब तक पहुँचोगे?" मी म्हटलं साडेतीन पर्यंत पोहचून जाईन. दादरला मोहितेंकडे पोहचल्यावर आम्ही सोबत जेवण घेतलं. तेव्हा जवळपास तीन वाजले होते. आम्ही बाबूजींकडे मलबार हिलच्या दिशेने निघालो. ट्राफिकमुळे थोडा वेळ लागत होता. बाबूजी आमची वाट पाहत होते. एवढ्यात परत त्यांचा फोन आला - "कहाँ तक हो?" मी म्हटलं रस्त्यातच आहे, लवकरच पोहोचतो. पुढच्या १५ मिनिटात आम्ही मलबार हिलच्या एका उंच इमारतीच्या पायथ्याशी पोहचलो. लिफ्टने २९ वा मजला गाठला. समोर लाकडी दरवाजा. आजूबाजूला मूर्ती बसविलेल्या. आम्ही बेल वाजवली. दार उघडलं ते बाबूजींच्या सेवेकर्यानं. हे सेवेकरी म्हणजे हरिभाऊ. बाबूजींच्या सेवेत आपलं संपूर्ण आयुष्य घातलेले. मी बाबूजींना पाहिल्यांदा बघितलं तेंव्हापासून हे त्यांच्या सेवेत आहेत. आत गेलो. पहिल्यांदा माँजी समोर दिसल्या. त्यांना नमस्कार करून आम्ही थोडं पुढे सरकलो. उजव्या बाजूच्या हॉलमध्ये बाबूजी खुर्चीत बसलेले. आमची वाटच पाहत होते. अंगात पांढरा पायजमा व पांढरा शर्ट. त्यावर लाल रंगाचा स्लीवलेस स्वेटर. याआधी मी बाबूजींना अगदी वर्कशॉप देताना पण ब्लेझरमध्ये बघितलं होतं. आम्ही बाबूजींना डोकं टेकून नमस्कार केला. बाबूजी मला पाहून म्हणाले, "आपका कॅरेक्टर तो पोर्ट्रेटके लिये और भी अच्छा हो गया।" कारण मी त्यांना मॉडेल म्हणून आवडायचो आणि आता केसही वाढवले होते.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

एकमेकांची ख्यालीखुशाली विचारून आमचं बोलणं सुरू झालं. मी, माझी पत्नी, मुलगा, मोहिते, माँजी आणि बाबूजी... आम्ही बोलत असताना मी बाबूजींच्या परवानगीने त्यांचे फोटो काढत होतो. हॉलला मोठी खिडकी होती. त्यातून डेलाईट येत होता. त्या खिडकीतून एका बाजूला समुद्र व दुसर्या बाजूला उंचचउंच इमारती असं छान लॅण्डस्केप दिसत होतं. ते टिपायचा मोह मला आवरला नाही. बाबूजींचे काही फोटोज मी काढले व त्यांना दाखवू लागलो. ते म्हणाले, "ये ठीक नही है। ये बाजूसे जरा अँधेरा आ रहा है। वो लगाना पडेगा." त्यांनी हरिभाऊला गोल हात फिरवून "वो लेकर आओ" असा आदेश दिला. तो जात असता ते म्हणाले, "दोनो लाना." मला दोन मिनिटं कळलंच नाही काय आणायला सांगितलं ते. हरिभाऊ आले तेव्हा त्यांच्या हातात दोन गोल बॅग्ज होत्या. एक छोटी, एक मोठी. एकात फोल्डिंग रिफ्लेक्टर व दुसर्यात फोल्डिंग बॅकग्राउंड होते. खिडकीतून येणार्या प्रकाशाचा अंदाज घेऊन त्यांनी हरीभाऊला दोन खुर्च्यांना टेकवून बॅकग्राउंड उभं करायला सांगितलं. त्यासमोर त्यांच्या वर्कशॉपमध्ये नेहमी असणारा, गोल फिरणारा व वर-खाली होणारा स्टूल ठेवला. नेहमीप्रमाणे मॉडेल म्हणून मला बसायला सांगितलं. बाबूजी सर्वाना पोर्ट्रेटबाबत टिप्स देऊ लागले. "देखो यूँ होना चाहिये; ये नहीं आना चाहीये; ये ऐसा अच्छा है; ये ठीक नहीं।" मधूनमधून मला मान थोडी इकडे-तिकडे, वर-खाली करायला सांगायचे. मोहिते व माझा मुलगा फोटो काढायचे. कोणी रिफ्लेक्टर धरायचे; त्यांनाही बाबूजी डिरेक्ट करायचे. त्यांनी कधी माझ्या मुलाला, कधी मोहितेंना, तर कधी माझ्या पत्नीला आळीपाळीनं मॉडेल म्हणून समोर बसवलं. प्रत्येकाचं पोर्ट्रेट काढलं. माझा कॅमेरा थरथरत्या हातात धरून स्वतःही आमची पोर्ट्रेट्स काढली. अशा प्रकारे हे सेशन एक तास चाललं. मध्ये टी, ब्रेकफास्ट घेताना माँजी म्हणाल्या, "बाबूजींना हे आज एक प्रकारचं टॉनिक मिळालं. त्यांच्यात उत्साह आला."


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

(बाबूजींनी काढलेलं चौथ्या वर्कशॉपमधील माझं पोर्ट्रेट)

मित्रांनो, हा सर्व प्रकार म्हणजे वयाच्या ९२व्या वर्षी मला दिलेलं एक वर्कशॉपच. माझ्याकरिता ते मी अटेंड केलेलं चौथे वर्कशॉप. पिक्टोरियल पोर्ट्रेट्स फोटोग्राफीच्या ज्ञानातील चौथी ज्ञानगंगाच. असा सुवर्ण योग जो सहजासहजी कुणाला अनुभवायला मिळणार नाही, तो मला अनुभवायला मिळाला. अंतर्मनात कोरला गेलेला हा प्रसंग जन्मभराच्या आठवणींची शिदोरी झाली. शेवटी निरोप घ्यायची वेळ आली, तेव्हा आम्ही म्हणालो, "बाबूजी, आपसे मिलने के लिये फिर आयेंगे।" ते म्हणाले, "जरूर आईये।" एवढ्यात मोहितेंनी विचारले, "आपका जनम दिन कब आता है?" तेव्हा माँजीकडून कळलं, की २ नोव्हेंबर. मग आम्ही २ नोव्हेंबरलाच यायचं ठरवलं. बाबूजींचा निरोप घेऊन तेथून निघताना माझं मन जड झालं. तेथून निघायची इच्छा होत नव्हती. आम्हा सर्वांच्या चेहर्यावर हास्य नव्हतं. बाबूजींच्या चेहर्यावरही मला हास्य दिसत नव्हतं. ते आमच्याकडे पाहत होते. मी त्यांना हात दाखवला त्यांनीही हात उंचावून आम्हाला निरोप दिला.


गुरू मिलिंद देशमुख, नाशिक

To Read in English मागील लेख पुढील लेख