1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

विषम चक्र

अंकिता वनगे
गेली


विषम चक्र अंकिता वनगे, ठाणे

एकदा असंच निवांत वेळी पूर्वी येऊरला टिपलेली काही माझी, काही सहकार्यांची प्रकाशचित्रं चाळत होते. त्यांतली खासकरून पानांची काढलेली प्रकाशचित्रं पाहिली आणि निसर्गासोबतच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. असं वाटलं, की त्या सर्वांसोबत शेअर कराव्या. या निमित्ताने पुन्हा एकदा लिहित आहे...

तसं बघायला गेलं तर मनुष्य आणि निसर्ग यांमध्ये घनिष्ठ असं नातं आहे. ते एकमेकांचे मित्रच आहेत म्हणाना. निसर्ग मानवजातीला सतत काही ना काही शिकवत असतो. गुरू होऊन मार्गदर्शन करत असतो, मानवाचे गुण अथवा अवगुण दर्शवत असतो. जसं आरश्यात बघावं आणि समजावं पेहराव व्यवस्थित झालाय की नाही, तसंच काहीसं निसर्गदेखील सांगत असतो.

एकदा येऊरला फेरफटका मारताना असंच काहीतरी घडलं. खूप आल्हाददायक वातावरण होतं. एका सुंदर ठिकाणी विविध झाडं आणि इतस्ततः विखुरलेली असंख्य पानं दिसली. जवळ जाऊन निरीक्षण करण्याचा मोह काही आवरताच आला नाही. नीट पाहिलं तर झाडांवरची पानं आणी त्यांचे विविध आकार नजरेस पडले. काही पानं लहान, काही मोठी, काही हिरवी, काही पिवळी, तपकिरी, काही गोल तर काही लांबट, काही काटेरी, काही मऊशार, काही टवटवीत तर काही वाळलेली, काही तर अक्षरशः जाळी झालेली, तर काही गळून मातीत एकरूप होत आलेली... आणि सुरूवात झाली एका संवादाची.


विषम चक्र अंकिता वनगे, ठाणे

एक एक पान हळू हळू बोलायला लागलं. नवीन पालवी फुटली होती; तिची हलक्या पोपटी रंगाची इवली इवली पानं म्हणजे जणू काही जगण्याची नवी उमेद होती. एक प्रकारचा उत्साहच संचारला होता त्यांच्या अंगात. एक नवी आशाच होती ती जगाला सामोरं जाण्याची, आव्हानं पेलण्याची, संकटांशी मुकाबला करण्याची! आपल्या आयुष्यातही असंच काहीस नसतं का? आपण मोठे होताना वाटत असतं, की काहीतरी करून दाखवण्याच्या संधी मिळणार; जोष असतो आपल्यात, चैतन्य असतं, उमेद असते. आपण आयुष्याची टप्प्याटप्प्याने येणारी सारी आव्हानं पेलण्यासाठी सज्ज होत असतो.

तीच पालवी कालांतरानं मोठ्या पानांत रुपांतरित होते. आता पानांचा रंग गडद हिरवा झालेला असतो. आव्हाने पेलत आपणही आता बर्यापैकी अनुभवी झालेलो असतो; दैनंदिन कामांमध्ये व्यग्र असतो; आपल्या नोकरी-व्यवसायात, खाजगी आयुष्यातही अनेक कसोट्यांना, संकटांना सामोरे जात असतो. आपल्याला जराही उसंत नसते. यात आपण कोठेतरी हरवून जातो, तणावग्रस्त होतो. असेच दिवस जात असतात; मग सुखाचे, उत्साहाचे, संधीचे दवबिंदू आपल्यावर पडतात आणि पुन्हा एकदा आपण मोहरतो; झालेल्या चुकांना सुधारण्यासाठी, हरवलेली संधी पुन्हा साधण्यासाठी तयार होतो.

काही झाडांचं वैशिष्ठ्य असं असतं, की हिवाळ्याची चाहूल लागली की पानं रंग बदलून रुक्ष वातावरणापासून स्वतःचं संरक्षण करतात. आपणही प्रसंगानुरूप आपल्यात बदल करून परिस्थितीवर मात करू शकतो, नाही का?


विषम चक्र अंकिता वनगे, ठाणे

काही वाळलेल्या पानांनी माझं लक्ष वेधून घेतलं. काहीसं मलूल झालेलं, हिरवा रंग हरपत चाललेलं ते पान...आव्हानं पेलून थकल्यासारखं, निवृत्त होऊ पाहणारं; उत्साह संपलेला, खांदे वाकलेले; मातीत एकरूप होण्याच्या दिशेनं त्याचा सुरु झालेला प्रवास... काही पानं हिरवी असूनही त्यांना बरीचशी छिद्रं पडली होती. मनात विचार आला, ऐन तारुण्यात ही वेळ यावी? नेमकं काय घडलं असेल? तर, कारण होतं, त्यांना लागलेली कीड. माणसात पण असतेच की व्यसनरूपी कीड! मग त्याचं आयुष्यही असंच संपुष्टात येतं!

काही जाळी झालेली पानं दृष्टीस पडली. त्यांतली काही झाडांवर अजूनही तग धरून असलेली होती, तर काही गळलेली होती. जणू काही सांगत होती - संपत आलं आता सारं. वाटलं, असंच का होईल आपलंही? अस्तित्वच नष्ट होईल का? मनामध्ये काहूर उठलं. कसं वाटत असेल त्यांना अखेरीस? बरंच काही राहून गेल्याची जाणीव, हुरहूर? खूप काही करायचं होतं, स्वतःसाठी जगायचं होतं, ते सारंच राहून गेल्याची जाणीव? पण तेवढ्यातच मी स्वतःला सावरलं. असंच तर होतं, आपलंसुद्धा; अस्तित्व हरवून जातं याच मातीमध्ये. आणि त्याच समृध्द मातीतून बहरतो पुन्हा एक नवा अंकुर, नवी पालवी आणि एक नवा जीवनप्रवास...


विषम चक्र अंकिता वनगे, ठाणे


विषम चक्र अंकिता वनगे, ठाणे


विषम चक्र अंकिता वनगे, ठाणे


To Read in English मागील लेख पुढील लेख