1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

मुलाखत

हरी महीधर
गेली

मुलाखतकार - स्वप्नाली मठकर


मुलाखत हरी महीधर, मुंबई

हरी महीधर ऊर्फ हरीभाई यांना भेटायला घाटकोपर इथल्या त्यांच्या स्टुडीयोमध्ये गेलो तेव्हा ते यायचे होते. त्यामुळे मी आणि वेदिका भार्गवे बाहेरच त्यांची वाट बघत थांबलो. थोड्याच वेळात आपल्या मॉडीफाईड कारने ते आले. त्यामुळे आधी आमचे या कारबद्दलच बोलणे झाले. त्यांनी त्यांची कार कशी बदलली, दरवाजे, विंडो ग्लास, लाईट्स कसे नवीन लावले याबद्दल अगदी आत्मीयतेने सांगितले. या विषयामधला त्यांचा अनुभव आणि माहिती प्रचंड आहे ते कळत होतेच; पण त्यांना प्रत्येक गोष्ट छान समजावून सांगता येते, त्यांचा उत्साह, नवनवीन गोष्टी जाणून घ्यायची इच्छाशक्ती अतिशय दांडगी आहे हे ही समजले.

हरीभाईंचे नाव इण्डस्ट्रियल फोटोग्राफीच्या क्षेत्रात अतिशय मानाने घेतले जाते. ते या वेगळ्या क्षेत्रात कसे आले, त्यांनी फोटोग्राफीची सुरूवात कशी केली याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचे होते.
लहानपणापासून मला पेंटींग शिकायचे होते. पण घरून थोडा विरोध होता. त्याऐवजी मर्चंट नेव्हीमध्ये जावे असे घरून सुचवले गेले. पण सुदैवाने त्या परिक्षांमध्ये माझी निवड झाली नाही आणि मी मुंबईला आलो. इथे सर जे जे कलामहाविद्यालयात मला प्रवेश घ्यायचा होता. मात्र मी आलो तेव्हा प्रवेशप्रक्रिया होऊन गेल्या होत्या. त्यामुळे मग मला संध्याकाळच्या फोटोग्राफीच्या वर्गांत प्रवेश घ्यावा लागला. फोटोग्राफीमुळे पेंटिंग करण्यासाठी रेफरन्स मटेरिअल मिळेल असा विचार करून मी तिथे फोटोग्राफी शिकायला सुरूवात केली. माझा पहिला कॅमेरा मला माझ्या लग्नात भेट म्हणून मिळाला.

त्यानंतर १९६७ साली मी प्रख्यात इण्डस्ट्रियल फोटोग्राफर मित्तर बेदी यांच्यासोबत काम करायला सुरूवात केली. त्यावेळी माझी शिकण्याची इच्छा इतकी तीव्र होती, की मी त्यांना शिकवायची फी द्यायला तयार होतो. त्यांच्याबरोबर काम करता करता खूप काही शिकायला मिळाले. इण्डस्ट्रियल फोटोग्राफीसारख्या वरवर रुक्ष वाटणार्या विषयातही किती सर्जनशीलता दाखवता येते हे मला तिथेच जाणवले आणि नकळत ही सगळी तत्त्वे मी आत्मसात करत गेलो.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

नंतर काही वर्षे जाहिरात कंपनीमध्ये काम केले. तिथे गोल्डस्पॉट, नायसिल, विआयपी सूटकेस यांसारख्या अनेक जाहिराती शूट केल्या. १९७८ साली मात्र मी माझे स्वतंत्र काम सुरू केले.

तुमच्या सध्याच्या कॅमेरा कलेक्शनबद्दल आणि हॅसलब्लॅड कॅमेरा घेतलात त्याबद्दल सांगू शकाल का? तुमचे कॅमेरा कलेक्शनही बघायचे आहे. तुम्ही सुरुवातीला हॅसलब्लॅड, निकॉन कॅमेरे, मग कॅनन कॅमेरे आणि आता सोनी कॅमेरे वापरता. असे बदल करण्यामागे काय कारणे होती?
तेव्हा इण्डस्ट्रियल फोटोग्राफीसाठी सगळ्यांना हॅसलब्लॅड कॅमेराच हवा होता. ऑर्डर मिळवायची तर त्यासाठी हॅसलब्लॅड कॅमेरा असणे आवश्यक होते. हा कॅमेरा प्रचंड महाग, पण तरीही मला तो घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. शेवटी मी नुकतेच घेतलेले माझे घर विकायचे ठरवले. खरंतर हे घर खूप छान लोकेशनला होते. ते विकायला काढल्यावर मला सगळ्यांनी वेड्यात काढले. पण माझा निर्णय पक्का होता. शिवाय मला खात्री होती, की नवीन कॅमेराने मला खूप चांगले काम करता येईल. घर ही माझ्यासाठी प्रायोरिटी नव्हती; पण कॅमेरा मात्र फार गरजेचा होता. त्यामुळे ते घर विकून मी हॅसलब्लॅड कॅमेरा विकत घेतला. त्यानंतर मला बर्याच ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी कामही केले.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

सुरवातीला मी हॅसलब्लॅड आणि निकॉन कॅमेरे वापरत होतो. डिजीटल कॅमेराचे युग आल्यावर सगळ्यांना शूटसाठी फुल फ्रेम कॅमेरे हवे होते. त्यावेळेस निकॉनचा फुलफ्रेम कॅमेरा उपलब्ध नव्हता. कॅननने मात्र त्यांचा फुलफ्रेम डिजिटल कॅमेरा आणला होता. त्यामुळे मी माझा निकॉनचा संपूर्ण किट काढून कॅनन कॅमेरे आणि लेन्स इत्यादी खरेदी केले. अलिकडे सोनीने मला संपर्क करून सोनी कॅमेराच्या वर्कशॉपसाठी त्यांच्याबरोबर काम करण्याबद्दल विचारले. सोनीच्या कॅमेरामधले डीएसएलटी (Digital Single Lens Translucent ) तंत्र आणि इतर गोष्टी मला खरेच उपयोगी वाटल्या आणि आवडल्या. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या सोनीच्या लेन्स कार्ल झेईस लेन्स आहेत. अनेक वर्षापासून कार्ल झेईस लेन्स वापरायची माझी इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली. त्यामुळे मी सोनी कॅमेरावर शिफ़्ट व्हायचे ठरवले.

बोलता बोलता हरीभाई उठले आणि एक कपाट उघडून त्यांनी त्यांचे कॅमेरा कलेक्शन दाखवायला सुरूवात केली. कॅनन कॅमेरे आणि त्याच्याबरोबरच्या लेन्सेस, इतर साहित्य, सिनार कॅमेरा आणि त्याचे लेन्स व सर्व असेसरिज, सोनीचे नवीन कॅमेरे अशा अनेक गोष्टी त्या खजिन्यामध्ये होत्या. प्रत्येक कॅमेरा आणि लेन्स ठेवायला त्यांनी चांगली सोय केली होती. कॅमेराचे कप्पे, इतर साहित्याचे कप्पे सगळे व्यवस्थित लावून ठेवलेले दिसत होते, कुठलीही हवी असलेली गोष्ट लगेच मिळेल याची खात्रीच!

तिथे स्टुडियोमध्ये नुसते कॅमेरे नव्हते, तर फोटोग्राफीसाठी उपयोगी असणार्या अनेक वस्तू होत्या. अद्ययावत टूलकिट होते. आणि कुठलीही गोष्ट स्वत: बनवून, गरज असल्यास दुरूस्त करून, रिफॉर्म करून पाहण्यासाठी लागणारी अवजारे आणि त्यांच्या वापरासाठीची इच्छाशक्तीही हरिभाईंकडे होती असं मला जाणवलं.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

इण्डस्ट्रियल फोटोग्राफीमध्ये काय चॅलेंजेस येतात, नेहेमीच्या फोटोग्राफीपेक्षा काही वेगळे आहे का? तुमचे या क्षेत्रातले काही अनुभव सांगू शकाल का?
लोकांना असे वाटते, की इंडस्ट्रीयल फोटोग्राफी म्हणजे फारसे काही क्रिएटिव काम नाही. पण ते खरे नाही. नीट विचार करून काम केले, क्लाएंटला काय हवे आहे याचा विचार करून फोटो काढले तर निश्चितच क्रिएटिव काम करता येते. एकदा मला कोळशापासून इलेक्ट्रिसिटी अशा संकल्पनेचा फोटो काढायचा होता. त्यासाठी मी अगदी साधी योजना केली. कोळसा ठेवला आणि त्यावर चालू बल्ब दाखवला. तेव्हा फोटोशॉप वगैरे नसल्याने ही अरेंजमेंट करूनच फोटो काढला. त्यातही मला त्या बल्बला होल्डर वगैरे काही दाखवायचे नव्हते. ते दाखवले असते तर पेटणार्या बल्बची काही मजा राहिली नसती. मग मी वायर्स बल्बला सोल्डर करून तो फोटो काढला.

न्युक्लिअर पॉवरप्लाण्टपासून ते पाईप्स, विमान कंपन्या, कार्स अशा अनेकविध प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये फोटो काढायच्या निमित्ताने मी फिरलो आहे. तिथले मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स कसे काम करतात, वेगवेगळे पार्ट कसे बनवतात हे सगळे स्वत: पाहिले आहे. अशा वेळी फोटो काढण्याच्या संधीबरोबरच नवीन काहीतरी बघायला मिळणे हे ही साध्य होते. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे काम बघून, त्याची फोटोग्राफी करून मी थांबत नाही; तर त्या प्रोसेस माझ्या कामात कुठे उपयोगी होतील याबद्दलही मी सतत विचार करत असतो.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

आणखी आव्हानात्मक म्हणाल तर या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये विविध कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते. जसे कॉपर-प्लाण्टमध्ये गेलो होतो तेव्हा गरम वितळणारे तांबे त्या मशिनमध्ये होते. तिथे त्या तापमानात उभे राहणे म्हणजे अतिशय भयानक! आपल्याला त्रास होतोच, पण कॅमेरावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही मिनिटे फोटो काढायचे, बाहेर यायचे, मग थोड्यावेळाने पुन्हा आत जाऊन काही मिनिटे शूट करायचे असे करावे लागते.

बऱ्याच वेळा उंच क्रेन वगैरेवर चढून, कुठेतरी वरचा अँगल मिळेल अशी जागा शोधून फोटोग्राफी करावी लागते किंवा हेलीकॉप्टरही वापरावे लागते. बोगदे खोदतानाचे, खाणीतले, सिमेंट, स्टिल प्लाण्ट इत्यादी ठिकाणचे फोटो काढताना असुरक्षित अशा वातावरणात जावे लागते. कधीकधी बोगदे / खाणी खूप खोल असतील, तर श्वास घ्यायला त्रास होतो. काही ठिकाणी तर पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावा लागतो. फार्मा लॅबमध्ये जायचे असेल तर त्यांचे प्रोटोकॉल सांभाळावे लागतात. मेडिकल फोटोग्राफी करताना ऑपरेशन बघावे लागते. अशा सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये इतर सगळे त्रास विसरून आपली सृजनशीलता टिकवून ठेवणे हे फार आव्हानात्मक आहे.

काही वेळेस इंडस्ट्रीयल उत्पादने खूप मोठी असतात. काही वेळेस ती जागची हलवून प्रकाशयोजना करता येत नाही. अशा वेळेस आपले डोके लावून प्रकाशयोजना करावी लागते. काही वेळेस पुरेसा प्रकाश योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष उपकरणे स्वत: बनवून घ्यावी लागतात.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

मागे मला एक ब्युटी डिश हवी होती. बाजारात मिळणारी ब्युटी डिश महाग होतीच, पण ती फक्त ठराविक कोनातूनच वापरता येते असे माझ्या लक्षात आले. अगदी खाली वळवायची असेल तर ती उपलब्ध डिश वळत नव्हती. मग मी माझे स्वत:चे एक डिझाईन बनवले, ज्यात यु हॅण्डलवर डिश बसवली होती. त्यामुळे ती कोणत्याही कोनात वळत होती. माझ्या ओळखीचे एक शर्मा म्हणून मॅन्यूफॅक्चरर आहेत. त्यांच्याकडे माझे डिझाईन घेऊन गेलो आणि मला हव्या त्या डिझाईनची ब्युटीडिश बनवून घेतली.

तसेच एकदा मला रिंग लाईट्स वापरायचे होते. पण उपलब्ध रिंग लाईट्स खूपच छोटे असतात. माझ्या कामासाठी ते पुरेसे नव्हते. मग मी लेन्ससह अख्खा कॅमेरा आत बसेल असा रिंग लाईट डिझाईन केला आणि तो माझ्या कामासाठी वापरला.

मागे जेव्हा लाईट पेंटिंग टेक्निक परदेशात आलं, तेव्हा काही भारतीय फोटोग्राफर्सनी ते परदेशातले मशीन आणून वापरून पाहिले. त्या मशीनची किंमत खूपच जास्त होती. एक उत्सुकता म्हणून मी त्या मशीनची माहिती शोधली आणि हे आपल्याला भारतातही करता येईल असे मला लक्षात आले. मी शर्मा या माझ्या मित्राबरोबर बसून डिझाईन केले आणि अगदी कमी खर्चात आम्ही लाईट पेंटिंगचे पूर्ण भारतीय बनावटीचे मशीन बनवले. त्यात सुधारणा करून बॅटरीवर चालण्याजोगे केले. त्यामुळे माझ्या आउटडोर शूटसाठीही मला ते वापरता यायचे.

माझ्या इंडस्ट्रीयल फोटोग्राफीच्या बॅकग्राउंडमुळे आणि निरीक्षण करून आपल्या कामात ते 'जुगाड' म्हणून वापरायच्या हौसेमुळे आजपर्यंत अशा अनेक वस्तू मी स्वत: बनवून घेतल्या आहेत. माझ्या स्टुडियोत असलेल्या बहुतांश वस्तू मी मला हव्या तशा, या जागेत बसतील अशा बदलून किंवा नव्याने बनवून घेऊ शकलो. मला हा एक वेगळा छंद आहे असे म्हटले तरी चालेल.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

तुम्हाला फोटोग्राफी शिकवायला आवडते आणि अनेकजण तुमच्याकडे फोटोग्राफीतले प्रश्न घेऊन येत असतात. त्यांना तुम्ही कसे गाईड करता?
माझ्याकडे फोटोग्राफी शिकायला अनेकजण येतात. मी त्यांना हातचे न राखता सगळे काही शिकवतो. बरेचजण मला विचारतात, की चार दिवसात मी कसे काय शिकवू शकतो किंवा काहीजण असा सल्लाही देतात, की मी सगळ्या गोष्टी सगळ्यांना शिकवू नयेत. पण मला वाटते, की फोटोग्राफी शिकवण्यापेक्षा माझ्याकडे येणार्यांना काय आणि कसे बघायचे ते मी शिकवतो. एखादे दृश्य पाहिल्यावर त्यांना विचार करायला सांगतो आणि काय दिसतेय याबद्दल विचारतो. बर्याच जणांना मी जे बघतो ते दिसतच नसते. त्यांचे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असते. त्यामुळे त्यांचे फोटो हवे तसे येत नसतात. फोटोग्राफी टेक्निक हे काही फारसे नवीन नाही. त्याबद्दलची माहिती पुस्तकात, इण्टरनेटवर सगळीकडेच उपलब्ध असते. समजा दोन-तीन फोटोग्राफर एकाच लग्नाला गेले तरी प्रत्येकाचे फोटो वेगळे येतात. कॅमेरे तर सगळ्यांकडेच चांगले असतात. त्यामुळे कॅमेरामुळे फरक पडतो असेही म्हणता येणार नाही. मग फरक पडतो तो फोटोग्राफरच्या दृष्टीमुळे. एखाद्याला एक कोन चांगला वाटेल, दुसर्याला दुसरा एखादा कोन, दुसरी एखादी घटना महत्त्वाची वाटू शकेल. एकदा ही 'बघायची' कला अवगत झाली, की तुमचे फोटो आपोआप वेगळे होत जातात. खूप पूर्वी कोडॅकने एक 'आर्ट ऑफ सीइंग' असे एक पुस्तक काढले होते. ते अतिशय सुंदर होते. मी स्वत: त्याची अनेक पारायणे केलीच, पण मी इतरांनाही ते वाचायला देत असे. लहान मुले नवीन गोष्टी कशा शिकतात हे तुम्ही बघितले आहे का? लहान मुले बोलायला, चालायला शिकताना आपल्या आईबाबांकडे बघतात; ते काय करतात, कसे करतात याची नक्कल करत राहून शिकतात. म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यासाठी उत्तम गोष्टी बघून त्या शिकल्या पाहिजेत असे मला वाटते. नुसते कॉपी करून मात्र होणार नाही. त्यातून प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे. एकदा का ते स्किल तुमच्याकडे आले, की मग तुमच्या पुढच्या कामात तुम्ही ते योग्य प्रकारे आणि सर्जनशीलतेने वापरले पाहिजे. तरच तुमचे काम वेगळे आणि क्रिएटीव म्हणून ओळखले जाईल.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

सध्या सोनीच्या वर्कशॉपच्या निमित्ताने मी अनेक ठिकाणी फिरतोय. मला बर्याच ठिकाणी असे दिसते, की तिथे फोटोग्राफर खूप आहेत, त्यांच्याकडे चांगले कॅमेरेही आहेत. पण त्यांना कॅमेर्याची, त्यातल्या तांत्रिक भागांची, एक्स्पोजर म्हणजे काय, याची काहीच माहिती नसते. नुसते कॅमेरा घेऊन कुणीतरी एकदा सांगितलेल्या सेटींगवर ते लग्न किंवा इतर कार्यक्रम शूट करत असतात. भारतात असे लाखो फोटोग्राफर आहेत. मला असे वाटते की कॅमेरा कंपन्यांनी आता पुढे येऊन हे ट्रेनिंग द्यायला हवे. त्यामुळे फोटोग्राफर्सना खूप काही शिकता येईल.

फिल्मकडून डिजिटलकडे - या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटते? डिजिटल कॅमेरा युग हे फोटोग्राफरच्या फायद्याचे आहे का?
डिजिटल फोटोग्राफी आल्यावर बर्याच गोष्टी सोप्या झाल्यात. एकतर आपला फोटो लगेच बघायला मिळतो आणि काय चुकले, काय दुरुस्त करायला हवे हे लगेचच ठरवता येते. पण नुसते चांगले कॅमेरे असून भागणार नाही, तर ते कॅमेरे योग्य प्रकारे वापरता यायला हवेत आणि नजर तयार हवी. लगेच फोटो बघता येणे हे शिकण्याच्या दृष्टीने आणि रिझल्टच्या दृष्टीने खूपच उपयोगी झाले आहे. पण त्याचा एक वेगळा परिणामही आहे.

पूर्वी फोटोग्राफरचे स्किल्स फार जास्त महत्वाचे होते. कारण फोटो काढल्यानंतर तो एडीट करणे फारसे सोपे नसायचे. जे काही एडीट करायचे ते सगळे डार्करूममध्ये टच अप करतानाच. त्याला वेगळे स्किल्स लागायचे, शिवाय त्यात फार लिमिटेशन्स होते. त्यामुळे चांगले फोटोग्राफ काढून घेण्यासाठी जाहिरात कंपन्या किंवा इतर कंपन्याही बराच पैसा खर्च करायच्या. फोटोग्राफरच्या स्किल्सवर आधारित भरपूर पैसा फोटोग्राफरला दिला जायचा.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

आता काय होते की एकतर कॅमेरे खूप जणांकडे आहेत. डिजिटल असल्यामुळे लगेच फिडबॅक घेत काम करता येते आणि अगदी साधा फोटो असेल तरी फोटोशॉपमध्ये खूप काही बदलता येते. त्यामुळे कंपन्या मोठ्या मान्यवर फोटोग्राफरना घेताना विचार करतात. एखादा ज्युनिअर फोटोग्राफर घेऊन काम होणार असेल तर कमी मोबदल्यात काम करून घेतात आणि डिजिटल एडिटिंगवर जास्त भर देतात. शिवाय बरेच फोटो स्टॉक एजन्सीमधूनही घेता येतात. त्यामुळे फोटोग्राफीमधला मोबदला कमी झालाय असे मला वाटते.

तुमचे फोटो खूप वेगळे आणि क्रिएटीव दिसतात. त्या कामामागची प्रेरणा कुठून येते? आपल्या कामाची क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही इतर फोटोग्राफर्सना काय सल्ला द्याल?
रेषा, ग्राफिकल पॅटर्न, समांतर आकार अशा गोष्टींकडे मी नेहेमी आकृष्ट होतो. असे ग्राफिकल फोटो काढायला मला फार आवडते. त्यामुळेच आर्किटेक्चरल आणि इण्डस्ट्रियल फोटोग्राफी हे माझे आवडते विषय आहेत. या कामातच इतकी आव्हाने आहेत, की त्यातूनच प्रेरणा मिळत जाते.

सतत काम करत राहणे, स्वत:ला घडवत रहाणे, चांगल्या गोष्टी आत्मसात करणे हे फार आवश्यक आहे. एकदा जर्मनीला गेलो असताना मी एका काम करणार्या माणसाला पाहिले. तो रस्त्यावरचे पेवर ब्लॉकस लावत होता. प्रत्येक ब्लॉक लावल्यावर तो सर्व बाजूंनी त्याची पातळी एकसमान आहे की नाही याची खात्री करून मगच दुसरा ब्लॉक लावायला घ्यायचा. ते पाहून मला खरेच आश्चर्य वाटले, की त्या माणसावर देखरेख करणारे कुणीच नाहीये. तरीही तो आपले काम इमानेइतबारे आणि नेटकेपणाने करत होता. मग कुणाशी तरी बोलताना मला जाणव्ले की असे नेटकेपणाने, परिपूर्ण काम करणे ही जर्मन लोकांची सवय आहे; इथल्या आयुष्याचा तो एक भागच आहे. त्यामागे 'मी जे काम करतोय ते परफ़ेक्ट असले पाहिजे, ते काम म्हणजे माझी ओळख आहे, माझ्या ऑर्गनायझेशनची, माझ्या देशाची ओळख आहे.' अशी एक भावना प्रत्येकाच्या मनात असते.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

अशा गोष्टी मला माझे काम परिपूर्ण करायला प्रेरणा देतात. डोळे उघडे ठेवून पाहिले, तर प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा मिळू शकते. मात्र भारतात या भावनेची कमतरता आहे असे मला वाटते. इथे मी एका कंपनीत इलेक्ट्रिक मोटर्स बघायला आणि फोटो शूट करायला गेलो होतो, त्यावेळी माझ्या लक्षात आले, की मोटर्सच्या आतल्या भागात रंग दिलेला नाही. तिथल्या माणसाकडे याबद्दल चौकशी केली असता तो म्हणाला की मोटरच्या आतला भाग कोणी बघत नाही त्यामुळे तिथे रंगवायची गरज नाही. ही वृत्ती चुकीची आहे असे मला वाटते. जर्मनी, जपान यांसारख्या देशातले लोक आपले काम नेटकेपणे आणि स्वत:चे कर्तव्य समजून पूर्ण करतात. त्यामुळे त्यांची प्रगती होते. या अशा गोष्टींकडून आपणही प्रेरणा घेतली पाहिजे असे मला वाटते. आपण मेड इन जर्मनी, मेड इन जपान गोष्टींसाठी जास्त पैसे द्यायला का तयार होतो? तर त्याचे कारण तिथले परफेक्शन. हेच परफेक्शन आपण आपल्यात बाणवू शकलो तर आपण आपल्या कामात मास्टरी मिळवू शकतो.

तुम्ही नर्मदा या विषयावरच्या पुस्तकावर काम करत आहात. त्याबद्दल काही सांगू शकाल का?
परदेशी प्रवाश्यांनी भारतात फिरून गंगेच्या काठावरील जीवनावर केलेले पुस्तक मी पाहिले आणि मला वाटले की अरे मी तर नर्मदेकाठचा छोरा! माझ्या आयुष्यातला कितीतरी काळ मी नर्मदेच्या काठी घालवला असेन. मग नर्मदेच्या काठावरच्या जीवनावर, नर्मदेच्या जीवनावर आपण फोटोग्राफिक पुस्तक करायला काय हरकत आहे? हे डोक्यात आले आणि मग मी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. माझ्याकडे आधी काढलेले फोटोही होतेच. शिवाय पुस्तकाचे ठरल्यावर मी अजूनही अनेक फोटो काढले.

बोलता बोलता उठून हरीभाईंनी "ही पुस्तकाची ड्राफ़्ट आवृत्ती" असे म्हणत 'Benevolent Narmada' हे आपले भलेथोरले पुस्तक हातात ठेवले. मुखपृष्ठापासूनच नजर खिळवून ठेवणारे फोटोग्राफ्स आणि सुंदर मांडणी बघत किती वेळ आम्ही पुस्तक चाळत होतो ते कळलेच नाही.


मुलाखत हरी महीधर, मुंबई

यानंतर हरीभाईंनी त्यांच्या आणखी काही पुस्तकांबद्दलही सांगितले. त्यांच्या सगळ्याच आगामी पुस्तकांची नावे इंग्रजी ‘बी’ या आद्याक्षराने सुरू होतात. 'Balancing Act', 'Boats of India', 'Baadal- clouds' , 'By Lanes of India' अशा अनेक पुस्तकांवर त्यांचे काम सुरू आहे. निसर्गात आणि आसपास दिसणारी प्रत्येक गोष्ट फोटोग्राफरच्या नजरेला किती महत्वाची वाटू शकते हे मला तेव्हा प्रकर्षाने जाणवले.

त्यांचा निरोप घेताना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी आणि खुल्या मनाच्या व्यक्तीला भेटले, त्यांच्याशी अगदी दिलखुलासपणे गप्पा मारता आल्या हा आनंद होताच; पण त्यांच्याशी मारलेल्या या गप्पांतून जी प्रेरणा मिळाली, नवीन अनुभवांविषयी ऐकायला मिळाले ते फार महत्वाचे होते.


मुलाखत हरी महीधर, मुंबई


मुलाखत हरी महीधर, मुंबई


मुलाखत हरी महीधर, मुंबई

To Read in English मागील लेख पुढील लेख