1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

आदरणीय सर

प्रवीण देशपांडे
गेली


आदरणीय सर प्रवीण देशपांडे, ठाणे

आदरणीय सर,
अगदी विश्वास बसणारच नाही असा एस.एम.एस. आला. ’अधिक शिरोडकर सर पासेस अवे.’ सर, खरंच कसा विश्वास ठेवावा कळत नव्हते. मन सुन्न होऊन गेले होते. परत दुसरा त्याच आशयाचा एस.एम.एस.आला. आणि तो होता फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडीयाच्या प्रसाद पावसकरांचा. मी तसाच उलट फोन लावला आणि त्याने मला घटनाक्रम सांगितला. सर, तरी सुद्धा वाटत होते की तुमच्याच नंबरवर फोन करावा आणि मग तुमचा नेहमीचा प्रेमळ आणि आश्वासक आवाज ऐकू येईल. "नमस्कार कसे आहात तुम्ही? नवीन काय उपक्रम हाती घेतलाय? मी कोणत्या प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो का?" तुमची ही नेहमीची वाक्ये कानात आणि मनात फेरा घालू लागली.. पण सर, तुम्हाला फोन करण्याचे धैर्य मला झाले नाही. सर, मला आठवतंय, ऐंशीच्या दशकाच्या उत्तराधार्त, मी एक नवशिका प्रकाशचित्रकार होतो. तुमचे नाव मी वर्तमानपत्रातून नेहमी वेगवेगळ्या गाजलेल्या खटल्यांच्या संदर्भात, त्यातही अनेक राजकीय आणि विशेषत: शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या खटल्याच्या बातम्यांच्या संदर्भात वाचून असायचो. त्यांच्या बाजूने खटल्यांचे वकीलपत्र तुम्ही घेतलेले असायचे आणि त्या आरोपांतून साहेब निर्दोष सुटलेले असायचे. आपल्या नावाचा दबदबा, आदर वकिली क्षेत्रात खूपच होता.

सर, पण त्याच सुमारास एका वर्षीच्या इंडियन एक्सप्रेस समूहाच्या वार्षिक प्लानरवर १२ निसर्गचित्रांचे फोटो छापून आले होते आणि त्यांच्याखाली प्रकाशचित्रकारांची नावं देखील छापलेली होती. त्यामध्ये तुमचे जवळपास पाच ते सहा फोटो होते. आणि सर, माझे देखील तीन फोटो होते. पण सर, मला त्यानंतर अनेक महिने माहित नव्हते, की ख्यातनाम वकील अधिक शिरोडकर हेच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अधिक शिरोडकर आहेत. पण त्या प्लानरच्या प्रकाशचित्रकार अधिक शिरोडकरांना एकदा भेटलेच पाहिजे ही जाणीव ती सुंदर प्रकाशचित्रे मला देऊन गेली.


आदरणीय सर प्रवीण देशपांडे, ठाणे

सर, पुढे मी दैनिक सांज लोकसत्ता आणि साप्ताहिक लोकप्रभा यांच्यासाठी फ्रीलान्स फोटोग्राफी करायचो. त्यावेळेस आजचे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि दैनिक सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे लोकप्रभा साप्ताहिकाचे मुख्य उपसंपादक होते. अनेक वेळा ते मला फोटोग्राफीच्या असाईन्मेंट्स देत असत. एकदा असेच बोलताना म्हणाले. "आज संध्याकाळी माझ्याबरोबर चल. आपल्याला एका मोठ्या माणसाला भेटायचे आहे." संध्याकाळी संजय राऊतांसोबत नरीमन पॉइन्टहून टॅक्सीने गिरगावात गेलो. जिना चढून वर आलो तेव्हा मला कळले, की अॅाड. अधिक शिरोडकरांच्या ऑफिसमध्ये आम्ही आलो आहोत. त्यांचे आणि तुमचे कामाविषयीचे बोलणे संपल्यानंतर राऊत सरांनी मला तुमच्याशी परिचय करून दिला. "हा प्रवीण देशपांडे, हा देखील फोटोग्राफर आहे. आमच्या लोकप्रभासाठी फ्रीलान्सिंग करतो." सर, ती पहिली भेट मला आजही आठवते. मी फोटोग्राफर आहे हे कळल्यावर तुमच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या. अॅाडव्होकेट अधिक शिरोडकरांचे फोटोग्राफर अधिक शिरोडकरांमध्ये रुपांतर झाले. अत्यंत आस्थापूर्वक तुम्ही माझी विचारपूस केलीत. कॅमेऱ्यापासून ते लेन्सेस, फ्लॅश, अगदी फिल्टरचा वापर करता की नाही इथपर्यंत. आपण दोघेही पेण्टॅक्स वापरणारे होतो. त्यामुळे आणखीनच जवळ आलो. बोलता बोलता तुम्ही म्हणालात, "चला, तुम्हाला गंमत दाखवितो." असे म्हणत तुम्ही तुमचा फोटोग्राफिक एक्विप्मेंटसचा खजिनाच माझ्यासमोर मांडलात. पेण्टॅक्सपासून ते लार्ज फोरमेट हजलब्लेड पर्यंत सर्व! ही आपली पहिली भेट मी माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षणांमध्ये जपून ठेवली आहे.

सर, त्यानंतर सन २००० साली तुम्ही आमच्या फोटो सर्कल सोसायटीच्या ‘आविष्कार’ या ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिला होतात. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून यावे ही विनंती मान्य करण्यासाठी मला खूपच हट्ट करावा लागला होता. तुम्हाला प्रदर्शन, प्रकाशचित्रे आणि त्यांची मांडणी खूपच आवडल्याचे तुम्ही सांगितलेत. त्यानंतर तुमच्या भाषणाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणाला होतात, "मला ठाण्यातील फोटोग्राफर्स आणि फोटो सर्कल सोसायटीच्या कामाबद्दल जास्त माहिती नव्हती. मला असे वाटत होते हे प्रदर्शन कुठेतरी लग्नाच्या हॉलमध्ये किंवा एखाद्या मंडपात असेल आणि मंडपाच्या कापडाला फोटो अडकवले असतील. पण गडकरी रंगायतनचा हा परिसर, प्रदर्शनाची उत्तम मांडणी आणि ती सुद्धा डिस्प्ले बोर्डवरती. प्रकाशचित्रांचा दर्जा, प्रदर्शन पाहणाऱ्या लोकांचा प्रतिसाद आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर प्रकाशचित्रकारांची उपस्थिती या सर्वच गोष्टींना मी आज इकडे आलो नसतो तर मुकलो असतो." सर, आपला प्रांजळपणा हाच आपला स्थायीभाव होता. जाता जाता फोटो सर्कल सोसायटीला देणगीचा धनादेश देऊन जाणारे आजवरच्या फोटो सर्कलच्या इतिहासातील तुम्ही एकमेव.


आदरणीय सर प्रवीण देशपांडे, ठाणे

सर, यानंतर आपला संबंध अनेक वेळा येतच गेला आणि आपले नाते निर्माण झाले, दृढही झाले. २०१२ साली फोटो सर्कल सोसायटीने पहिल्यांदाच ‘फ-फोटोचा’ हा ऑन लाईन दिवाळी अंक काढण्याचे ठरविले होते. या अंकासाठी आपली मुलाखत घेण्यासाठी मी अंजू, आकृती, मुलाखतकर्ती स्वप्नाली यांच्यासमवेत तुमच्या घरी आलो होतो. हसतखेळत गप्पा मारत आपण आपल्या आयुष्याचा जीवनपटच आमच्यापुढे सादर केलात. एखादी गोष्ट प्रथमच करताना असणारे आम्हा सर्वांच्या मनावरचे दडपण तुमच्याकडून खाली उतरताना अजिबात शिल्लक राहिले नव्हते. परळच्या तुमच्या घरापासून ठाण्याला पोहोचेपर्यंत आम्ही फक्त तुमच्या स्वभावाच्या विविध पैलूंविषयीच बोलत होतो. एक श्रेष्ठ प्रकाशचित्रकार, नामवंत कायदेतज्ज्ञ, राज्यसभेचे माजी खासदार आणि निसर्गावर प्रचंड प्रेम करणारा पर्यावरणवादी अश्या विविध रूपांतून व्यक्त होणारे आपले विचार प्रकट करणारी आपली मुलाखत आमच्या ‘फ-फोटोचा’ या केवळ प्रकाशचित्रण कलेसाठी वाहिलेल्या मराठीतील पहिल्यावहिल्या आणि एकमेव दिवाळी अंकाला एक वेगळा आयाम देऊन गेली.

सर, २०१३ साली महाराष्ट्रामध्ये भीषण पाणीटंचाईमुळे दुष्काळग्रस्त झालेल्या १० जिल्ह्यांचा मी, संजय नाईक आणि अर्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅठड. माधवी नाईक यांनी धावता दौरा केला. त्या वास्तवाचे प्रकाशचित्रण असलेले ‘पाणी-द स्टोरी ऑफ वॉटर’ हे प्रकाशचित्र प्रदर्शन जनजागृतीसाठी उभे केले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी तुम्ही, गोपाळ बोधे सर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे उपस्थित होतात. सर, प्रदर्शन पाहतानाचा आपला मूड मला आठवतोय. डोळ्यांत पाणी होते. हसतमुख आणि चेष्टेखोर अधिक शिरोडकर सर कुठेतरी हरवले होते. भाषणाचे वेळी आपला कंठ देखील दाटून आला होता. जाताना तुम्ही आम्हाला सांगितलेत, "काही निवडक फोटोंचा संच मुंबई न्यायालयाच्या सन्माननीय न्यायाधीशांना पाठवून सु-मोटो सारखे काही होते का हे पाहूया. फोटो प्रिंटिंगचा आणि अल्बमचा खर्च मीच करीन. अन पुढे कोर्टाचे काही मॅटर झाल्यास ते सुद्धा मीच सांभाळीन." सर, यात दुर्दैवाने पुढे काही करता आले नाही; प्रदर्शने होत असतानाच मुसळधार पाऊस सुरू झाला. पण सर, आपल्या संवेदनशील व्यक्तिमत्वाचे दर्शन आमच्या मनात कोरून राहिले आहे. सर, मला वाटते ‘डाऊन टू अर्थ’ याचं मी केलेलं भाषांतर म्हणजेच ‘अधिक शिरोडकर’.


आदरणीय सर प्रवीण देशपांडे, ठाणे

सर, ‘फ-फोटोचा’च्या पहिल्या दिवाळी अंकातील तुमच्या मुलाखतीचा शेवट करताना तुम्ही एक संदेश दिला होता. ‘प्रकाशचित्रण हे पर्यावरण संवर्धनासाठी शैक्षणिक साधन किंवा लोकांची जागरुकता वाढविण्याचे साधन म्हणून वापरा.’ “We have turned our back to nature. Now let us go back to nature for our own survival.”

सर, आपल्या शाश्वत विचारांसोबत आपले अस्तित्त्व, आपला आशीर्वाद आमच्या सोबत निरंतर असणारच आहेच आणि त्यानुसार मार्गक्रमणा करण्याचा आमचा प्रयत्न देखील.

आपला एकलव्य होऊ इच्छित,
प्रवीण देशपांडे.

To Read in English मागील लेख पुढील लेख