1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

मुलाखत

विक्रम बावा - फॅशन फोटोग्राफर
विक्रम बावा हे फॅशन आणि जाहिरात जगतातील एक प्रथितयश प्रकाशचित्रकार आहेत. लुएरझर आरकाईवनुसार अॅाडव्हर्टायझिंग क्षेत्रातील पहिल्या दोनशे प्रकाशचित्रकारांमधे त्यांचा समावेश होतो. तसेच गेली चार वर्षे भारतातील पहिल्या पाच प्रकाशचित्रकारांमधे त्यांची गणना होते. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमधे मास्टर्स कप, प्रिक्स डी ला फोटोग्राफी पॅरिस, इंटरनॅशनल कलर अवॉर्ड, दी स्पाइडर अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

मुलाखत - संदेश जाधव
अनुवाद - अव्दैत गाडगीळ


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

नवनवीन कल्पना व्यवहारात आणण्यात विक्रम यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कामामधे व्यवसाय उपयोजन आणि नीतीमत्ता यांचा अद्भुत मिलाफ दिसून येतो आणि म्हणूनच २०१० साली प्रकाशचित्र उद्योगातील सगळ्यात प्रभावशाली पाच व्यक्तींमधे त्यांना स्थान मिळाले. कल्पना आणि तंत्र यांना आपल्या अथक प्रयोगशीलतेची जोड देत आपल्या प्रकाशचित्रणाच्या कक्षा त्यांनी सतत रुंदावत नेल्या. ९०च्या दशकाच्या उत्तरार्धात त्याना "मास्टर ऑफ गिमिक्स" - क्लृप्त्यांचा धनी म्हणून ओळखले जाऊ लागले. 3-D प्रकाशचित्रणाचे ते प्रणेते आहेत. १९९८ सालीच, म्हणजे 3-D तंत्रज्ञान प्रचलित होण्यापूर्वी १० वर्षे, त्यानी पहिले 3-D मुखपृष्ठ तयार केले. अशा विख्यात प्रकाशचित्रकाराची मुलाखत ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करायची संधी मिळत आहे हे फोटो सर्कल सोसायटीचे भाग्य आहे.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

विक्रम बावा प्रत्येक फोटोमधून स्वत:ची वेगळी शैली पेश करतात. आपल्या सर्जनशीलतेने ते सर्व फॅशन डिझायनर्सच्या संकल्पनांना पूर्ण न्याय देतात. मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत समजावून सांगितली. आपला ग्राहक, त्याची शैली, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचा पेहेराव इत्यादी गोष्टी समजून घेणे ही त्यांच्या दृष्टीने पहिली आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्या मते कोणताही कलाकार किंवा डिझायनर हा तुमच्यासाठी कपडे कधीच तयार करत नाही; तो असेच कपडे निर्माण करतो जे त्याला स्वत:ला घालायला आवडतील. नंतर, तो लोकांसाठी निर्मिती करेलही, पण त्यातही तो स्वत:ची अशी छाप सोडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच जर प्रकाशचित्रणाची संकल्पना तयार करायची असेल तर आधी त्या डिझायनरला आणि त्याच्या कल्पनांना समजून घेणे जरुरीचे आहे.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

अनेक उदयोन्मुख प्रकाशचित्रकारांना पोर्टफोलिओ आणि फॅशन यांतला फरकच काळात नाही आणि हे समजावून सांगताना विक्रम म्हणाले:
पोर्टफोलिओ आणि फॅशन फोटोग्राफी यांना वेगळे करणारी रेषा जरी पुसट असली तरी ते कोणत्याच दृष्टीने सारखे नाहीत. पोर्टफोलिओ हा डिझायनरसाठी नाही तर मॉडेलसाठी केला जातो. म्हणूनच पोर्टफोलिओमधे त्याचा विषय म्हणजेच मॉडेलला सगळ्यात जास्त महत्त्व असते. त्याच्या विरुद्ध फॅशन फोटोग्राफीमधे कपडे, आभूषणे आणि शैली किंवा ठेवण यांना प्राधान्य दिले पाहिजे. फॅशन ही जीवनाची शैली आहे. म्हणून पोर्टफोलिओमधे तिचे प्रतिबिंब दिसते. तुम्ही जर फॅशन फोटोग्राफेर असाल तर पोर्टफोलिओ करणे सोपे जाते. पण पोर्टफोलिओ फोटोग्राफरसाठी फॅशन फोटोग्राफी जरा जड जाते.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

इनडोअर आणि आउटडोअर फोटोग्राफी मधील फरक विचारला असता विक्रम म्हणाले:
सुंदर निसर्ग ही माझ्या फोटोसाठी सजवलेली एक तयार चौकट बनते. निसर्ग स्वतःच एक मोठा कॅनवास आहे आणि तुमचा विषय किंवा मॉडेल त्यात चपखल बसवणे तुमची जबाबदारी असते. माझ्यासाठी नुसत्या मॉडेलपेक्षाही ती सगळी चौकट मह्त्त्वाची असते. पार्श्वभूमी फोकसमधे नसेल तर फ्रेममधे एका कोपर्यात असलेली मॉडेलसुद्धा सुंदर संरचना निर्माण करते. मॉडेल सुंदर असेल तर लोक नक्कीच तिला लक्षात ठेवतील, पण तुम्हाला जर त्यांनी तुमचा फोटो लक्षात ठेवावा असे वाटत असेल तर तुम्ही विशेष प्रयत्न करायला हवेत. "ही मॉडेल विक्रम बावाच्या फोटोंमधे अप्रतिम दिसली" असे लोकांनी म्हटलेले मला आवडते. आणि नुसत्या मॉडेलपेक्षा जर तुमचा संपूर्ण फोटोच सुंदर असेल तरच लोक असे म्हणतील.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

प्रकाशयोजना करताना काही ढाचा किंवा ठराविक प्राधान्य आहे का असे विचारले असता विक्रम उत्तरले:
मी नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश दोघांचाही मिलाफ करतो आणि मला गडद पार्श्वभूमी जास्त आवडते. माझे फोटो पाहताना तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की मला कपडे, स्टाइल आणि मॉडेल ठळकपणे दाखवायला आवडते. त्यामुळे मला पार्श्वभूमी जास्त शक्तिशाली घेता येत नाही. अर्थात असा काही नियम नाही. कारण शेवटी पूर्ण प्रकाशचित्र जास्त महत्त्वाचे असते. शेवटी चांगल्या फोटोची सगळे तारीफ करतात. जर तुमच्या मनात चांगले चित्र प्लान केलेले असेल तर तुमचा फोटोसुद्धा चांगलाच येणार.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

शूटिंगच्या आधी काही पूर्वाभ्यास करून प्लान ठरवता का? ह्या प्रश्नावर विक्रम म्हणाले:
मी सर्व काही ऑन द स्पॉट ठरवतो. आता हेच चित्र पहा. माझी त्या ठिकाणी पहिलीच भेट होती. मॉडेल तयार होऊन आल्यावर मी तिथल्या तिथे निर्णय घेऊन ठरवले की तिने कुठे उभे राहायचे, धुराचा वापर कुठे करायचा आणि पार्श्वभूमीवर एका बाजूने लाइट कुठे आणि कसा पडला पाहिजे. एकदा हे ठरवल्यानंतर मला फक्त कॅमेराचे बटन दाबायचे काम राहिले.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

ह्या सर्व अप्रतिम प्रकाशचित्रांचे रहस्य काय?
मनापासून हसत विक्रमनी उत्तर दिले "खरे सांगायचे तर हे माझ्या रक्तातच आहे. माझे वडील उत्कृष्ट फोटोग्राफर आणि तर्कशुद्ध विचारसरणीचे होते. अर्थातच नियोजनाचे कौशल्य मला त्यांच्याकडून मिळाले. तसेच मी खूप चौकस बुद्धीचा माणूस आहे. मी वेगवेगळे लाइट्स वापरुन फोटोग्राफी करू लागलो. म्हणूनच तुम्हाला अनेकविध प्रकारचे प्रयोग माझ्या फोटोंमधे पहायला मिळतील."


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

3-D फोटोग्राफीबद्दल काही?
"मला वाचायला आवडते. माझे फोटोग्राफीचे सर्व ज्ञान आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी मासिके आणि परदेशी लेखक ह्यांच्याकडून मिळवलेले आहे. त्यावेळी मी एक 3-D फोटोग्राफीबद्दल लेख वाचला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण 3-D फोटोग्राफी ही साध्या फोटोग्राफीपेक्षाही पूर्वीची आहे. 3-D माध्यमातून अनेक व्यक्तिचित्रे, रेखाचित्रे फार पूर्वीपासून बनवली गेली. तुम्हाला आठवत असेल तर ८०च्या दशकात 3-D शुभेच्छापत्रे प्रचलित झाली होती. दोन चित्रे एकावर एक ठेवून 3-D चित्र निर्मितीचे तंत्र ह्यात वापरले गेले होते. तसेच काही कॅमेरांमधे 3-D निर्मितिसाठी विशिष्ट प्रकारची काच/ भिंग वापरले जायचे.

जेव्हा मी वाचले की नासाने मंगळ-वारी साठी ३३ मिलियन खर्च करून कॅमरा बनवला आहे तेव्हा मी अचंबित झालो. ते वाचून चक्रावून गेलो. विज्ञानशाखेचा पदवीधर असल्याने त्यामागचे तंत्रज्ञान जाणून घ्यायला वाचन केले. माझ्या प्रयोगांचा पहिला विषय म्हणजे माझे वडीलच होते. जेव्हा फिल्म डेव्हलप झाली तेव्हा बरोबर 3-D फोटो मिळाला. पण मी जेव्हा दुसर्यांदा प्रयत्न केला तेव्हा तसे काही झाले नाही. अर्थातच माझे पहिले यश हा निव्वळ योगायोग होता. नंतर मी एक वर्ष परत परत प्रयोग करत राहिलो. धावती मोटर, सायकल यांचे फोटो काढले; किंवा असे म्हणा की प्रत्येक चलित वस्तूंचे फोटो मी काढले. ते तितकेसे सोपे नव्हते. बरेच पैसे आणि फिल्म्स ( पोलोरॉईएड) खर्च झाले. शेवटी मी माझे स्वतःचेच उपकरण बनवले जे यशस्वी ठरले. अथक परिश्रम आणि सहनशीलता कामाला आली.

विक्रम त्यांच्या लेखामधे किंवा ब्लॉगमधे एका परिभाषेचा नेहमीच उल्लेख करतात "प्रतिमा बनवणे" (Creating Image). त्या परिभाषेचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले:
फोटो कोणीही काढू शकतो पण फोटो बनवणे ही गोष्ट पूर्णतः वेगळी असते. स्वतःच्या सर्जनशीलतेला कमी का लेखायचे? तुम्ही फक्त फोटो काढलात तर कोणीच तुम्हाला गंभीरपणे घेणार नाही, पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या विचारांनी आणि सर्जनशीलतेने फोटोची निर्मिती करता तेव्हा त्याला महत्त्व येते.

कोणतीही व्यक्ती SLR कॅमेरा वापरुन किंवा अगदी मोबाइल फोन वापरुन फोटो काढून तुम्हाला देऊ शकेल. पण त्याला फक्त फोटो काढणे म्हणता येईल, ती फोटोग्राफी नाही होऊ शकत. मी असा फोटोग्राफर आहे ज्याला त्यामागचे कष्ट आणि व्यथा माहीत आहेत. एखाद्या कल्पनेची जोपासना करून त्यातून अद्भुत असे काही निर्माण करणे म्हणजे फोटोग्राफी. नुकतेच मी एक फोटो शूट पूर्ण केले. जवळ जवळ ९ महिने मी त्यावर काम करत होतो. अगदी कल्पना मांडण्यापासून ते संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्यापर्यंत आणि फोटो काढण्यापासून ते पोस्ट प्रॉडक्शन पर्यंत / त्याला अंतिम रूप देण्यापर्यंत सगळीकडे माझा सहभाग होता.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

सर्व प्रकाशचित्रकाराना मला अजून एक संदेश द्यायचा आहे - स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कामाबद्दल आदर बाळगा. आपल्याला स्वतःलाच जर आपल्या कामाबद्दल आदर नसेल तर आपण दुसर्याकडून काय अपेक्षा ठेवणार? कोणी म्हणेल चित्रकार किंवा शिल्पकार हेच खरे कलाकार आहेत; पण माझ्या मते फक्त माध्यमाचा फरक आहे. चित्रकार कागदावर चित्र काढतो तर मी फिल्मवर काढतो. मग मी कलाकार नाही होत? मी जे करतो ती सुद्धा एक कलाच आहे. ते परंपरागत चालत आलेले कलेचे आविष्कार आहेत तर फोटोग्राफी हा भविष्यातील आविष्कार आहे. परदेशात फोटोग्राफीला कलेचा दर्जा दिला जातो. एक प्रकाशचित्र ३३.३ बिलियन डॉलर्सला विकले गेले आणि हा रेकॉर्ड आत्तापर्यंत ३ वेळा मोडला गेला आहे. एका सुपर मार्केटचे सुंदर प्रकाशचित्र एवढ्या किंमतीला विकत घेतले गेले; आता सांगा, ही कला नाही होत का?

नवीन डिजिटल तंत्र विरुद्ध परंपरागत फिल्म रोल ह्याबद्दल विक्रम म्हणतात:
माझ्याकडे अजूनही ५०-६० फिल्म रोल आहेत आणि ते वापरण्यासाठी मी चांगल्या संधीची वाट बघतोय. मी कधीही फिल्म्सना प्राधान्य देईन. त्या काळात नंतरचे काम कमी होते. आम्ही स्लाइड प्रोजेक्टरमधे बघून चांगला फोटो निवडत असू. नवीन तंत्र कष्टप्राय आहे कारण आता हजारो फोटोंमधून आम्हाला सगळ्यात चांगला फोटो निवडायला लागतो.

आता पोस्ट प्रॉडक्शनसाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि लोकांची अशी अपेक्षा असते की आम्ही ते फुकटात करून द्यावे. भारतामधे काम करणारी एक परदेशी कंपनी आहे जी अशाप्रकारच्या कामासाठी एका फोटोचे १,००,००० रु. घेते. ते आणि त्यांचे ग्राहक, दोघांनाही ह्याची किंमत माहीत आहे / महत्व कळते.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

कॅमरा आणि तंत्र ह्याबाबत काही विशिष्ट पसंती?
विक्रम म्हणाले: आधी माझ्याकडे सिनार कॅमरा होता. मी तो विकून टाकला. आता मला त्याचा पश्चाताप होतो. पण फोटोग्राफर म्हणून तुम्ही व्यवहारी असायला हवे. सगळीच उच्च-तंत्रज्ञानयुक्त सामुग्री गोळा करायला तुम्हाला गर्भ-श्रीमंत घराण्यातच जन्म घ्यायला हवा. ईश्वरकृपेने मी स्वकष्टाने सगळे उभे केले आहे. कारकिर्दीच्या सुरूवातीला मुंबईच्या फोर्ट भागात रस्त्यावरून कॅमेरा घेतला, मला ह्या वस्तूंची किंमत कळते. मी अशीच साधन-सामग्री विकत घेतो ज्यामधे किंमत आणि दर्जा यांचा ताळमेळ असेल. सोनी कंपनीचा Alpha-900 हा २४ मेगा पिक्सलचा full frame कॅमेरा मी वापरतो. तसेच प्रकाशचित्राचा दर्जा हा तुमच्या प्रकाशचित्रणाचे कौशल्य, प्रकाशयोजना आणि प्रकाशचित्रावर केलेली नंतरची प्रक्रिया यावर अवलंबून असतो. तुम्ही साध्या पण महत्त्वाच्या अशा व्यावहारिक आणि तांत्रिक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. शेवटी कॅमेरा हे फक्त साधन आहे, फोटोग्राफर तुम्ही आहात हे महत्वाचे. तुम्हाला जर त्याच्या मर्यादा माहित असतील तर त्यावर मात कशी करायची हेसुद्धा तुम्हाला माहित हवे. तुमच्याकडे असलेले उपकरण हे तुम्हाला अधिक कुशलतेने वापरता येणे महत्त्वाचे आहे.

आता हाच फोटो बघा. फक्त १० मेगापिक्सल आणि ज्याचा सेन्सर फुलफ्रेमच्या अर्धा आहे, अशा कॅमेराने काढलेला आहे. विशेष म्हणजे ह्यावर काहीही प्रक्रिया केलेली नाही. हा परिणाम मिळवण्यासाठी मी माझे फिल्टर दगडावर घासून वेगळे फिल्टर बनवले.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

ह्या प्रकाशचित्रासाठी मी काही पूर्वतयारी केली. कपड्यांची निवड करताना त्याची चमक, पारदर्शकता आणि रंगसंगती ह्याचा विचार केला. गडद निळा-जांभळा रंग त्या मॉडेलवर कसा दिसेल ह्याची कल्पना मला आधीच आली होती. मग मी पडदे, गोल पलंग आणि जुन्या प्रकाशदाण्या वापरुन एक आलिशान देखावा निर्माण केला. मॉडेल्सना सुद्धा आपण काहीतरी विशेष करत आहोत याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांच्या भावना आणि संवेदना यांची काळजी आपण घेतली पाहिजे. शेवटी तुमचे प्रकाशचित्र तेच सुंदर आणि सरस बनवतात. आपल्या कामाचा दर्जा मोठ्या प्रमाणावर संवेदनशीलतेवर अवलंबून असतो. म्हणूनच मी आलिशान देखाव्याची योजना केली. शेवटी मॉडेल्स हेच तुमच्या प्रकाशचित्राचे नायक असतात, तेच चित्र घडवतात किंवा बिघडवतात.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

आता वेळ आली होती "पिरेली कॅलंडर" विषयी जाणून घ्यायची:
पिराली हे एक असे कॅलंडर आहे जे मॉडेल्सना नाही तर फोटोग्राफी या कलेला प्रोत्साहन देते. त्यांच्यासाठी आधुनिक तंत्र किंवा वेगळी शैली वापरून निर्माण केलेली प्रकाशचित्रे सगळ्यात महत्त्वाची असतात. हे अतिशय वेगळे आहे आणि म्हणूनच त्यासाठी काम करणे जास्त उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला काही तरी नवीन करायची संधी मिळते. ह्याच कारणासाठी मला पिरालीसाठी शूट करणे आवडते.

फॅशन फोटोग्राफीशिवाय अजून काय आवडते?
मला निसर्ग कॅमेरामधे बंदिस्त करायला आवडतो. शिवाय मला अमूर्त प्रकाशचित्र काढायला आवडतात. माझी प्रकाशचित्रे असलेले टि-शर्ट थोड्याच काळात बाजारात उपलब्ध होतील. एका तयार कपड्यांच्या कंपनीने माझ्या अमूर्त प्रकाशचित्रांची निवड केली आहे.

प्रथितयश आणि जगप्रसिद्ध व्यक्तींबरोबर काम करतानाचा अनुभव कसा असतो?
अशा व्यक्तींचे फोटो काढणे खूपच सोपे असते. शेवटी ती सुद्धा माणसेच आहेत. माझ्यासाठी त्या आधी व्यक्ती आहेत आणि व्यक्तिमत्त्व नंतर आहेत. तरीही ते विख्यात आहेत. त्यांनाही मोकळेपणा वाटायला हवा आणि तुम्हीसुद्धा मोकळेपणे वागायला हवे. ह्या प्रकाशचित्रासाठी, जो एकाच टेकमधे घेतलेला आहे, आम्ही ठरवले की प्रत्येकाचा बसायचा क्रम त्यांच्या महत्त्वानुसार असेल.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई

मी माझ्या फक्त दोन सहाय्यकाना घेऊन आधी कंपोझिशनची आखणी केली. त्या दोघांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी बसवून फोटो काढले आणि मग ते एकत्र केले. एकदा अंतिम रचना ठरवल्यानंतर मी सगळ्या स्टार मंडळींना त्या-त्या जागेवर बसवले. नंतर मला फक्त एकच शॉट पुरेसा होता हा फोटो काढायला.

हौशी आणि नवीन प्रकाशचित्रकारांसाठी काही संदेश देता येईल का?
पहिल्यांदा तुम्हाला फॅशन म्हणजे काय ते समजले पाहिजे. ते जर कळले नाही तर तुम्ही त्याचे चित्रीकरण करू शकणार नाही. एक लक्षात ठेवा, सुंदर कपडे घातलेल्या मॉडेलचे फोटो काढणे म्हणजे फॅशन फोटोग्राफी नव्हे. सर्व प्रकारच्या आणि शैलीच्या फॅशनची तारीफ करायला सुरवात करा. नवीन धाटणीचे येणारे कपडे, शैली ह्याचा सातत्याने पाठपुरावा करा, ते परिधान करणार्या लोकांचे परिक्षण करा. एकदा हा फॅशनचा अर्थ तुमच्या लक्षात आला की मग तुम्ही फोटोग्राफी सुरू करू शकता ज्याला फॅशन फोटोग्राफी म्हणता येईल. प्रकाशचित्रकलेमध्ये ज्यांना स्वतःचे भविष्य घडवायचे आहे अश्या सर्व नवीन प्रकाशचित्रकारांना माझ्या मनापासून शुभेच्छा.


मुलाखत विक्रम बावा, मुंबई


मुलाखत विक्रम बावा, मुंबई


मुलाखत विक्रम बावा, मुंबई


Click for English Edition मागील लेख पुढील लेख