1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

जंगल न्याहाळताना...

डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार
प्रकाशचित्रण

शब्दांकन - गार्गी गीध


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार

डॉक्टर जरी माणसांचा असलो तरी वन्यजीवन आणि प्राणी हा माझ्या आवडीचा विषय. त्यामुळे ताडोबा असो, काझीरंगा वा हाकेच्या अंतरावरचं येऊर, या प्रत्येक वनाशी माझी सातत्याने भेट होत असते. प्रत्येक जंगलाचं वैशिष्ट्य वेगळं, तिथे येणारा अनुभव वेगळा. तरीही अशा वैविध्यपूर्ण जंगलांमध्ये निसर्गातल्या प्राणीविश्वाची ताकद प्रकर्षाने जाणवल्यावाचून राहत नाही हे समजण्यासाठी मला तीन-साडेतीन वर्षांचा काळ पुरेसा पडला.

सुमारे ६-७ महिन्यांपूर्वी मी राजस्थानमध्ये भरतपूर येथे पक्षीप्रकाशचित्रणासाठी गेलो होतो. वाटेत चालताना प्रत्येक झाडाचं पान न् पान पाहत होतो. नेमकी तेव्हाच पाणवठ्याजवळ पांढऱ्या, चंदेरी अशा राखाडी बगळ्यावर (ग्रे हेरॉन?) आमची नजर गेली. त्याला पाहताच मी कॅमेरा सज्ज करू लागलो. थोडं आणखी निरखून त्याच्या आजूबाजूचा परिसर पहिला तर मागे रक्तबंबाळ, काळीज फाटलेलं त्याचं पिल्लू मरून पडलं होतं. कुणाच्या तरी पोटोबाची नुकतीच इच्छापूर्ती झालेली असावी कदाचित! हा सगळा प्रकार बघत असतानाच एक खंड्या ( white throated kingfisher ) येऊन राखाडी बगळ्याच्या शेजारी बसला. आम्ही आपले त्या बापड्याला पाहून सुखावलो. त्याला हेरण्यासाठी कॅमेरा उंचावलाही; पण तेवढ्यातच राखाडी बागळ्याने आपली चोच खंड्याच्या गळ्याभोवती आवळली. कोण-कुठला आणि सहज विसावलेला खंड्या पुढच्याच क्षणी तडफडू लागलेला. मग मात्र त्याला चोचीत पकडून बगळ्याने वेगळाच कार्यक्रम सुरु केला. तो खंड्याला टोमॅटो सॉसमध्ये बुडवल्यासारखा पाण्यात बुडवायचा आणि गिळण्याचा प्रयत्न करायचा. पण खंड्याची तडफड काही इतक्या सहज थांबली नाही. त्यासाठी बगळ्यालाच जमीन ते पाणी अशा ४-५ फेऱ्या घ्याव्या लागल्या. अखेरीस संपूर्णपणे गिळता न आल्यामुळे बगळ्याने खंड्याचे लचके तोडले आणि त्यावर ताव मारला. अर्थात्, बगळ्याचं हे वागणं खूपच कोड्यात टाकणारं होतं. त्याने असं काही का केलं हे त्या बगळ्यालाच ठाऊक. काही अंदाज आणि अनुमान आहेतच, पण सर्वांचं एकमत व्हावं असं उत्तर काही सापडलं नाही. ते अनुत्तरीत कोडं अजूनही डोक्याला त्रास देत असतं.


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार

जंगल परिसरात वावरताना आपण प्रकाशचित्रकार म्हणून सजग नसणं आणि कॅमेराची इत्यंभूत माहिती नसणं किती धोकादायक असतं हे आम्हांला कर्नाटकाच्या (राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान) नागरहोलेच्या जंगलात समजलं. नागरहोलेच्या जंगलात आम्ही २ जीप घेऊन सफरीसाठी निघालो होतो. तेव्हा जंगलाच्या आतील भागात सुमारे २५ मीटर्स वरच आम्हांला हत्तीणींचा कळप दिसला. आम्ही थांबलो. त्यांचे फोटो काढू लागलो. इतक्या जवळून जंगली हत्तीणींचा कळप पहायला मिळणं म्हणजे पर्वणीच होती. पण नेमकं त्याच वेळी एका चिमुरडीच्या हाती असलेल्या पॉइंट अॅंड शूटच्या कॅमेरामधल्या ऑटो सेटींग्समुळे फ्लॅश पडला. मळभ असल्यामुळे त्या अंधारात कॅमेराने फ्लॅश टाकण्याचा निर्णय घेतला आणि तो फ्लॅश पडताच गवत चरणाऱ्या हत्तीणींच्या काळपातली एक हत्तीण आमच्या दिशेने येऊ लागली. ती कळपातून बाहेर पडली तेव्हा तिथलं पिल्लू आम्हांला दिसलं. हत्तीण असं कळप सोडून का येतेय याचा सुगावा लागताच ड्रायव्हरने गाडी जंगलाच्या आतल्या भागात पळवली. हत्तीण आमचा पाठलाग करत होतीच..मग मात्र अचानक ती शेजारच्या झाडीत शिरली. आम्हाला कळेना, की ती अशी अचानक का निघून गेली. तरी आम्ही न थांबता पुढे जाऊ लागलो तोच गाडीने जायचा रस्ता संपला. मुख्य वाट संपून घनदाट जंगल सुरु होत होतं. सफारी असल्यामुळे खाली उतरायचा प्रश्नच नव्हता. आता मात्र ड्रायव्हरला हत्तीणीच्या झाडींत शिरण्याचं कारण उमगलं. त्याने गाडी जागीच उलटी फिरवली आणि भरधाव जंगलाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने पळवली. आम्ही तिथून बाहेर पडलो नसतो तर हत्तीणीने नक्कीच त्या 'डेड एंड'पाशी आम्हाला पायदळी तुडवलं असतं. त्यामुळे हत्तीण यायच्या आत तिथून निघता आलं हे नशिबचं! पिल्लू सोबत असताना कोणत्याही संकटाचा सुगावा लागला तर आई आणि तिच्या सख्या हत्तीणी किती आक्रमक होऊ शकतात याचा जिवंत प्रत्यय तिथे आला.


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार

कचाट्यात सापडण्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आम्हांला ताडोबाला दिसलं. मी ताडोबाला प्राणी-प्रकाशचित्रिकरणासाठी गेलो होतो. कॅमेरा घेऊन जीपने जात असतानाच रस्त्याच्या डावीकडे पाणवठ्यापाशी जाणारा एक बिबट्या दिसला. तसा तो बिनधास्त दिसत असला तरी त्याचं चौफेर लक्ष होतं. इतक्यात जंगली कुत्र्यांची एक टोळी त्याच्या जवळ येऊ लागली आणि पाहता पाहता त्याच्या मागे लागली. बिबट्या झरझर झाडावरच्या २० फुट उंच बेचकीत जाऊन बसला. तिथे स्थिरावल्यावर त्याचं गुरगुरणं सुरु झालं. काही वेळाने धोका टळल्याची चिन्हं त्याला जाणवली आणि त्यानं खाली येण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यातच जंगली कुत्र्यांचा गनिमी कावा त्याच्या लक्षात आला. तेव्हा कशीबशी धडपड करून तो पुन्हा बेचकीत जाऊन बसला. हे सगळं कमी म्हणून की काय, वरून माकडंही झाडांच्या फांद्या त्याच्यावर फेकू लागली. त्यामुळे बिबट्याचं वर पाहून गुरगुरणं अधिकच वाढलं. असा बराच वेळ तो अडकून पडला होता. अंधार होत चालला आणि आमच्या जंगलसफारीची वेळही संपत आली. उशिरापर्यंत जंगलात थांबण्याची अर्थात परवानगी नव्हती. त्यामुळे पुढे काय होईल याचा विचार करतच तिथून गाड्या फिरवल्या. दुसऱ्या दिवशी एका वनरक्षकाने 'दोन तासानंतर बिबट्या (सुखरुपच) पण जीव तोडून पळून गेला' असा वृत्तांत दिला तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. जगण्याची उदंड इच्छाशक्ती सर्व प्राणीमात्रांमध्ये असते असं म्हणतात ते खरंच!


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार

आपल्या क्षेत्रात कोणी अनोळखी घुसला, की एक असुरक्षितता जाणवते ती काही माणसांपुरती नव्हे. म्हणूनच तर बहुतेक हिंस्त्र प्राणी आपापल्या जागेची सीमा (territory) आखून घेतात. त्यात इतर कोणी हस्तक्षेप करू लागलं की मग थरारक अशा चकमकी घडतात. असंच एकदा ताडोबाच्या सफरीच्या वेळी एक अस्वल थबकत थबकत रस्त्याच्या दिशेने येताना दिसलं. अस्वलाला पाहून मी कॅमेरा सरसावला आणि फोटोफायरिंग सुरु केलं. इतक्यात आमच्या वाटाड्या (गाईड) अनिलने विचारलं, "साहेब, हे काय करताय?" म्हंटलं, "अरे, समोर अस्वल बघ!" तर तो पुढे दाखवून म्हणाला, "साहेब, खाली मोरीत बघा...टायगर!" मी अवाक्! पाचोळ्यात वाघीण बसलेली. अस्वल रस्ता ओलांडून डावीकडे आल्यावर ती वाघीण उठली आणि अस्वलावर हल्ला कसा करावा याचा अंदाज घेऊ लागली. अस्वलानेही त्याची नजर वाघिणीच्या नजरेला भिडवली. मग मात्र क्षणाचाही विलंब न करता ते उभं राहिलं आणि झाडाच्या बुंध्याला पकडून ५-६ फुटाचा आपला अवाढव्यपणा दाखवू लागलं. एवढा मोठा प्राणी म्हणजे 'अपने बस की बात नहीं' असा साक्षात्कार लवकरच वाघिणीला झाला आणि जरा नाराजीनेच आमच्याकडे एकवार जळजळीत कटाक्ष टाकून ती गाडीच्या बाजूने निघून गेली. परतल्यावर या घटनेचा विचार करताना 'गर्भवती असल्यामुळे तिने हल्ला करण्याचा धोका पत्करला नसावा' असा अनिलचं मत पडलं.

जंगलात अशा कित्येक गोष्टी रोज घडतच असतात. त्यातच जंगलाचं जंगलपण, त्यातलं गूढ दडलेलं असतं. आपली नजर शोधक असली की अशा घटना अनुभवताही येतात. भान हरपून, डोळे वटारून अचंब्यानं बघत रहावं असे क्षण तर कितीतरी असतात! आपण प्रकाशचित्रकार असल्यामुळे कॅमेराचे भान ठेवून कॅमेराला ती दृश्य दाखवणं आणि झरझर टिपण्याची मुभा देणं तितकंच गरजेचं. जंगलात प्रत्येक क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय असतोच! पण तो टिपण्याची जबाबदारी प्रकाशचित्रकाराची!


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार


जंगल न्याहाळताना... डॉ. सुधीर गायकवाड- इनामदार
To Read in English मागील लेख पुढील लेख