1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

अमेरिकन ड्रीमस्केप

तन्मय शेंडे
तन्मय शेंडे यांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्पुटर इंजीनियरची पदवी घेतली असून ते सध्या न्यू यॉर्क, अमेरिका येथे राहतात. फोटोग्राफीची कला ते छंद म्हणून जोपासत आहेत. अमेरिकेतली विविध ठिकाणांना भेट देऊन विविध ऋतुंमध्ये तिथले प्रकाशचित्रण करणे त्यांना मनापासून आवडते. ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धांमध्ये त्यांना काही पारितोषिकेही मिळाली आहेत.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

शाळेत असताना वर्षाला ४-५ ट्रेक्स होत असत. मग कॉलेजमध्ये गेल्यावर ते प्रमाण वाढून महिन्याला एक-दोन ट्रेक्स सुरू झाले आणि निसर्गाचा वेड वाढतच गेलं. पावसाळ्यात राजमाचीच्या पठारावरून जाताना दिसणारे ओढे-नाले, आहुपे-भीमाशंकरचं घनदाट जंगल, पन्हाळा ते विशाळगडचा थरार, इंद्रवज्र बघण्यासाठी तळपत्या वैशाखात हरिश्चंद्र गडावर केलेली चढाई, हिवाळ्यात माळावर फुललेली रानफुलं... हे सगळं जे बघतोय आणि अनुभवतोय ते कॅमेरात साठवायचा छंद आपसूकच लागला.

काही वर्षांनंतर अमेरिकेत जायची संधी मिळाली. नविन प्रदेश आणि निसर्ग बघायला मिळणार होता. त्यामुळे प्रचंड उत्सुकता होती. विमानात बसलो, खिडकीत बसून मलंगगड, नाणेघाट, हरिश्चंद्रगड असे एक-एक किल्ले बघत विमान उंचावर गेलं. मी सह्याद्रीचा निरोप घेतला खरा, पण मन मात्र खाली किल्यांवरच अडकल होतं. पण केव्हातरी पायलटनं "You can see grand canyon on your left” अशी घोषणा केली. डावीकडे दिसणारं अस्ताव्यस्त पसरलेलं ग्रॅड कॅनीयन पाहून हरखून गेलो. इथे असं स्वागत होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

अमेरिकेत थोड-फार स्थिरावल्यावर पहिला NIKON D7000 हा DSLR कॅमेरा घेतला. चुकत-माकतच तो वापरायला शिकलो. त्यातली वेगवेगळी सेटिंग्स कशी करायची, कुठल्या वेळी कुठली सेटिंग्स वापरायची हे सगळं स्वतःच वाचून शिकलो.

फोटोग्राफीमध्ये बरेच प्रकार आहेत - वाईल्ड लाईफ, वेडींग, पोर्ट्रेट, मॅक्रो, टेबलटॉप, इत्यादी. मला हे सगळच आकर्षित करत असल्याने काही प्रमाणात सगळ्याच प्रकारात मी रमलो. पण फिरण्याची आणि निसर्गाची आवड असल्यामुळे लँडस्केप आणि ट्रॅव्हल फोटोग्राफी जास्त होत गेली. तसं बघायला गेलं तर लँडस्केप फोटोग्राफी वर-वर सोपी वाटते, कारण फोटो काढायला मिळणारा पुरेसा वेळ, जो इतर प्रकारात फारसा मिळत नाही.

लँडस्केप फोटोग्राफीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कलात्मक दृष्टी. एक चित्रकार जेव्हा एखाद्या सुंदर देखाव्याचं चित्र काढतो तेव्हा समोरचा देखावाच त्याला प्रेरणा देत असतो. बऱ्याचदा चित्रकाराला हुबेहूब देखावा काढायचाच नसतो, तो फक्त एक कल्पना चित्रित करत असतो आणि यासाठी रंग आणि विविध ब्रशचा वापर करतो. चित्रकाराची कल्पना कॅन्व्हासवर उमटते, तर फोटोग्राफरची कॅमेरामध्ये. जसं चित्रकार वेगवेगळे ब्रश आणि पेन्सील वापरतो, तसेच फोटोग्राफर लेन्स, फिल्टर याचा वापर करतो.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कम्पोझिशन. एका लँडस्केपची असंख्य कम्पोझिशन्स करता येऊ शकतात. कम्पोझिशन थेट समोरच्याच्या मनाला भिडणारं असावं असं मला वाटतं. त्यासाठी फोटो कंपोझ करताना फक्त मेन ऑब्जेक्टवर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण फोटोच बघणाऱ्याला कसा खिळवून ठेवेल हे मी बघतो. म्हणजे आपण जेव्हा गणपतीची मूर्ती बघतो तेव्हा फक्त चेहरा न बघता मुकुट, वस्त्र, सजावट या गोष्टी देखील कळत-नकळत बघतो आणि या सगळ्याचा एकत्रित भाव आपल्यापर्यंत पोहोचतो. अगदी तसंच मला माझ्या फोटोत हवं असतं. मेन ऑब्जेक्टबरोबर इतर गोष्टींना देखील तितकंच महत्व दिल्याने बघणाऱ्याची नजर फोटोभोवती खिळती राहते. त्यामुळे तो फोटो जास्त पोहोचतो. जेव्हा मी एखादं लँडस्केप बघतो, तेव्हा ते फोटोत कसं असणार याची कल्पना मनात तयार होते, मग कॅमेरा आणि काही उपकरणं वापरून ती कल्पना फोटोत उतरवली जाते.

लँडस्केप आणि ट्रॅव्हल फोटोग्राफीमध्ये आपण जिथे जातोय त्या जागेचा अभ्यास अतिशय महत्वाचा असतो. त्या जागेचा, तिथल्या राहणीमानाचा अभ्यास असेल तर बर्याचदा वेळ वाचतो आणि चांगले फोटो मिळतात. संयम आणि चिकाटी यांशिवाय कोणतीही कला आत्मसात होत नाही, हा नियम फोटोग्राफीला सुद्धा लागू आहे.

बऱ्याचदा एखादं गाणं आपल्याला स्वप्नात घेऊन जातं, एखादी कविता शाळेत नेऊन बसवते, तर एखादा पदार्थ कॉलेज कॅन्टीनची आठवण करून देतो. तसंच एखाद्या फोटोतही आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जायची ताकद असते. प्रत्येक फोटो म्हणजे एक प्रवास आहे. त्या फोटोत साठवलेला असतो एक क्षण (टाईमलेस मोमेंट), जिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही थांबले असतात.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

आता थोडं अमेरिकन लँडस्केपबद्दल. सगळेच लँडस्केप ऋतूनुसार बदलतात, पण अमेरिकेतला हा ऋतूबदल अगदी डोळ्यांसमोर घडतो. साधारण ऑक्टोबर महिन्यात गीझ पक्ष्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास सुरु होतो. या प्रवासात ते गोंगाट करत ‘हिवाळा सुरू होणार-हिवाळा सुरू होणार’ हे सांगत जातात. थोड्याच दिवसांनंतर गार वारे वाहू लागतात आणि हिवाळा सुरू होतो. या कडाक्याच्या हिवाळ्यात तापमान नेहमी शून्याच्या खाली असतं. झाडांचे खराटे झालेले असतात. सगळीकडे कृष्ण-धवल दृष्य, बर्फच-बर्फ चोहीकडे अशी स्थिती. या ऋतूत लँडस्केप फोटोग्राफी करणं फार कठीण. स्नो-शूज, हातात ग्लोव्ह्स, जड जॅकेट्स यामुळे फोटोग्राफीचा वेग मंदावतो आणि त्यात १४-१५ तासांची रात्र. पण योग्य ती तयारी केली आणि इच्छेची शिदोरी बरोबर असली की सगळ सोपं होऊन जातं आणि समोरचा लॅंडस्केप आपल्याला एका वेगळयाच दुनियेत घेउन जातो. पण हा निसर्ग उत्साही न वाटता उदास, एकटा वाटतो. अश्या वेळेस उत्साह वाढवण्यासाठी सणाचे दिवस सुरु होतात. ख्रिसमस, थँक्स-गिव्हिंगमध्ये प्रत्येक घरासमोर केलेली रोषणाई, दुकानातली भेटवस्तूंची रेलचेल, रस्त्यावर केलेले देखावे हे सगळं उर्जा वाढवतं आणि ही उर्जा दोन महिने सहज पुरते. अचानक परत एकदा गीझ पक्ष्यांचा आवाज येतो, पण आता मात्र ते परतीच्या प्रवासाला निघाले असतात.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

मार्चच्या शेवटी शेवटी तापमान आल्हाददायक होतं, हळू-हळू बर्फ वितळू लागतो आणि हिरवंगार गवत डोकं वर काढतं. पक्ष्यांची किलबिल ऐकू येते, झाडांना कोवळे कोंब येतात. दिवस मोठा होत जातो. हे ऋतू बदलतानाचं रूप फारच विलक्षण असतं. आणि अचानक एका दिवशी वसंत ऋतू सुरु होतो. एकाच वेळी झाडं फ़ुलतात, गुलाबी चेरीची फुलं फार सुंदर आणि आकर्षक दिसतात. हिवाळ्यातला कृष्ण-धवल नजारा एक-दोन आठवड्यात रंगीत होऊन जातो.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

वसंत ऋतूनंतर सुरू होतो उन्हाळा, सगळीकडे हिरवीगार झाडं, त्यातून अलगद पडणारी सावली. मोठा दिवस म्हणजे बाहेर फिरण्यासाठी पर्वणीचा. उन्हाळ्यात सगळी मंडळी फिरायला बाहेर पडतात. कोणी फिशिंगसाठी, कोणी सर्फिंगसाठी, तर कोणी बायकिंगसाठी. शाळांना-कॉलेजला सुट्या असल्याने या सिझनमध्ये पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या सिझनमधे मी शक्यतो लांबच्या ट्रीप करायचं टाळतो.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

फॉल किंवा ऑटम (हेमंत) हा ऋतू शब्दात सांगणं फार कठीण आहे.निसर्गानेच चित्र काढून त्यात रंग भरून तुमच्या समोर त्यांचं प्रदर्शन मांडलेलं असतं. हे प्रदर्शन डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. कितीही पाहिलं तरी कमीच. जशी पणती विझताना सर्वात जास्त उजेड देऊन जाते तसं या ऋतूत सगळी पानं शुष्क होण्याआधी रंगांची उधळण करून गळतात. कोणी तरी म्हटलं आहे 'autumn is spring where every leaf is flower'. - जेव्हा प्रत्येक पान हे फूल होतं असा हेमंत ऋतू म्हणजे वसंतच! किती समर्पक वाक्य आहे हे. दोन-तीन आठवडे हा रंगाचा सोहळा सुरू असतो. झाडांची पानगळ होऊन नुसत्या फांद्या उरतात, परत एकदा गीझ पक्षी दक्षिणेच्या प्रवासाला निघतात आणि हिवाळा सुरू होतो.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

मी लँडस्केप फोटोग्राफीकडे आकर्षित होण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे अमेरीकेतील नॅशनल पार्क्स. अमेरीकेतली लँडस्केप बघायची म्हणजे इथली नॅशनल पार्क्स पालथी घालायची असं समीकरणंच झालंय.

एक नदी आणि तिचा प्रवाह ग्रँड कॅनीयन बनवू शकतो, हे पाहिल्यावर निसर्गाच्या भव्यतेचा आणि अद्भुततेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. ग्रँड कॅनीयनमध्ये ट्रेकिंग करायचं म्हणजे डोंगरावर न चढता आधी खाली उतरायचं आणि मग परत वर चढायचं असा उफराटा प्रकार आहे. उतरत असताना दगडांचे बदलणारे रंग, अखंड पसरलेल्या रखरखीत भागात मध्येच लागणारी हिरवळ, आणि ही एकंदरच तिथली विस्तीर्णता डोळ्यात साठवत वर चढून यायचं... हे सगळंच विस्मयकारकच!


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

ग्रॅन्ड कॅनीयनमध्ये फोटॉग्राफीसाठी बऱ्याच उल्लेखनीय जागा आहेत, पण "हॉर्स शू बेंन्ड" हा स्पॉट पार वेड लावतो. या जागी कोलोरॅडो नदी यू-टर्न घेते. समोर दिसणारी खोल दरी, लाल दगड, चिटपाखरू देखील फिरकू नये इतकी रखरखीत जागा. हे बघून जणू काही आपण अगदी वेगळ्या जगात आहोत असं वाटावं. मला हाच भाव माझ्या फोटोमध्ये हवा होता, पण तो प्रत्यक्षात आणणं फार कठीण होतं. मग मी लेयर्स फोटोग्राफीचं तंत्र वापरलं आणि मला हवा तसा "लॉस्ट वर्ल्ड"चा भाव फोटोला देता आला.

ग्रॅड कॅनीयनजवळ इतरही बरीच नॅशनल पार्क्स आहेत, जसं झीओन नॅशनल पार्कमधली वॅली आणि जगप्रसिध्द ‘द नॅरो' ट्रेल, ब्राईसी कॅनीयन मधले हूडूज, पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले अॅन्टेलोप कॅनीयनस जे "127 Hours" या चित्रपटात पाहायला मिळतात. प्रत्येक पार्क तितकंच सुन्दर आणि वैविध्यपूर्ण आहे.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

ग्रॅड टीटान नॅशनल पार्क म्हणजे तर नंदनवनच. हे पार्क उत्तर मध्य अमेरीकेत आहे. हे पार्क पाहिल्यावर ‘अजून काय हवं?’ असा प्रश्न निसर्ग विचारत असतो आणि आपल्याकडे उत्तर नसतं. हिमाच्छादित शिखरं, निळाशार ग्लेशिअर तलाव, घनदाट जंगल, कुरण, दलदलीचा भाग, वन्यजीव सगळं काही इथे आहे.

यलो स्टोन नॅशनल पार्क म्हणजे एक अनोखा भूगर्भीय आविष्कार. या भागात भूगर्भीय हालचाली अनुभवायला मिळतात. खनिजांमुळे इथले डोंगर पिवळे झाले आहेत. या पार्कचा परिसर खूप रंगीबेरंगी आहे. इथल्या जमिनीखाली असलेल्या सक्रिय ज्वालामुखीमुळे इथे गरम पाण्याचे झरे आणि फवारे आहेत. इथली गरम पाण्याची कुंडं आणि झरे बघताना आपण रसायनशास्त्राच्या प्रयोग शाळेत आहोत असा भास होतो, कारण सर्वत्र पसरलेला सल्फरचा वास.

यलो स्टोन वरून किस्सा आठवला. एकदा मी संध्याकाळी पार्कमध्ये भटकत होतो. दुपारभर तसं आकाश निरभ्रच होतं, पण अचानक तासाभरात वादळी पावसाचे ढग जमू लागले. वेळ संध्याकाळची असल्याने तांबडं आकाश आणि जमल्यास इंद्रधनुष्य देखील बघायला मिळेल असं वाटलं आणि मी धबधब्याकडे जायचा निर्णय घेतला. कारण तिथला धबधबा डोंगरावर आहे आणि तिथून सगळा परिसर दिसतो. पण तिथे जायला साधारण तासभार लागणार होता. मी मनाचा आवाज ऐकला आणि निघालो. काय बघायला मिळणार आहे याची खात्री नव्हतीच. पण आश्चर्य म्हणजे मी गाडीत असतानाच क्षितीजावर इंद्रधनुष्य उमटलं. मला पोहचायला अजुन दहा मिनिटं तरी लागणार होती. नशिबाची साथ म्हणून मी अगदी वेळेत पोहचलो आणि यलोस्टोनच्या डोंगरावरून दुधाळ धबधबा आणि मागे इंद्रधनुष्य असा स्वप्नवत वाटेल असा फोटो घेऊ शकलो.


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडे

उंच शिखरं, खोल दऱ्या, बदलणारे ऋतूरंग, सोनेरी सकाळ तर कधी तांबडी संध्याकाळ, स्तब्ध शिखरांवरुन वाहणारा चंचल पाण्याचा प्रवाह, मोहून टाकणारी उंची तर कधी घाबरवणारी खोली, लाटांचा आवाज, झाडांची सळसळ, जंगलातली शांतता, ढगांचा गडगडाट … निसर्ग असाच आहे, अनपेक्षित, टोकाचा, आणि थक्क करणारा. स्वर्ग कोणी बघितलाय का मला माहित नाही, पण मलातरी याच आपल्या पृथ्वीवर स्वर्ग दिसलाय.

https://www.facebook.com/Tanmay.Photography
http://500px.com/TanmayShende


अमेरिकन ड्रीमस्केप तन्मय शेंडेTo Read in English मागील लेख पुढील लेख