1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

ऑस्ट्रेलिया.... या सम हा...!

नंदिनी बोरकर, ठाणे


अनुवाद - बोरकर


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

गेल्या चार महिन्यांपासून आर्किटेक्चरच्या अभ्यासात मी आकंठ बुडूनच गेले होते. एक वेळ डोंगर पोखरणं सोपं पण हा अभ्यास नको असं मला वाटायचं. कित्येक रात्री मी अक्षरश: जागून काढत होते. एक सेमिस्टर झालं की दुसरं. सबमिशन्स करून करून माझी पुरती दमछाक झालेली होती. एप्रिल महिना संपेपर्यंत फक्त अभ्यास एके अभ्यास हाच माझा एकमेव दिनक्रम बनला होता. हा रुक्ष, कंटाळवाणा दिनक्रम बदलावा, पुस्तकांच्या बॅगा बंद कराव्यात आणि दूर कुठेतरी वेगळ्या वातावरणात निघून जावं असं मला तीव्रतेने वाटत होतं. नवं काहीतरी पाहण्याच्या अनिवार ओढीने जीव अगदी व्याकूळ झाला होता. आणि एका दिवशी अचानकच बाबांनी ऑस्ट्रेलियाच्या सफरीची तिकीटं हातात ठेवली. क्षणभर माझा विश्वासच बसेना. पण ते खरं होतं. ‘ऑस्ट्रेलिया’, या देशाला भेट देण्याची दुर्मिळ संधी मला मिळाली होती. या देशाबद्दल मी थोडंफार वाचलं होतं. आयुष्यात कधीतरी हा देश पाहायचा असं माझ्या मनानं तेव्हापासूनच पक्कं ठरवलेलं होतं. अर्थात तो योग इतक्या लवकर आणि इतक्या अनपेक्षितपणे येईल असं मात्र मला वाटलं नव्हतं. Truth is stranger than fiction असं म्हणतात ते काही खोटं नाही...!

ऑस्ट्रेलियाची सफर हा माझ्या तरुण वयातला एक अतिशय रोमहर्षक अनुभव आहे. इतका विलक्षण, की मी तो कधीही विसरूच शकणार नाही. तसं म्हटलं तर या देशाचा हवाई प्रवास कंटाळवाणा आहे. आमची कनेक्टिंग फ्लाईट जरा विलंबाने सुटल्यामुळे तर आमचा प्रवास जास्तच लांबला. विमानप्रवासात असा एखादा व्यत्यय येतो तेव्हाच त्या प्रवासाची मौज खर्या अर्थाने जाणवते म्हणतात ते मला या प्रवासात पटलं. मेलबर्नला पोहोचेपर्यंत आम्ही दिवसभर आकाशात उडतच होतो. हे शहर म्हणजे ऑस्ट्रेलियाची एकेकाळची राजधानी. ‘सिडनी’नंतरचं दुसर्या क्रमांकाचं मोठं शहर अशी त्याची ख्याती आहे. आता या शहराला ‘व्हिक्टोरिया’ या राजधानीचा दर्जा मिळाला आहे. इथे पोहोचल्यानंतर दुसर्या दिवशी सिटीराईड आणि साईट सीइंग असा कार्यक्रम होता.


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

ओल्ड पार्लमेंट हाऊस (जुनं संसद भवन) सेंट पॅट्रीक्स कॅथेड्रल, कॅप्टन कुक हाऊस अशी प्रेक्षणीय स्थळं पाहाण्यात सबंध दिवस गेला. शंभर वर्षं खर्च करून बांधलेलं सेंट पॅट्रीक्स कॅथेड्रल खूपच भव्य, प्रशस्त वाटलं. इ. स. १७७०मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीचा नकाशा तयार करण्यासाठी कॅप्टन जेम्स कुकनं कठोर परिश्रम घेतले. त्याची आठवण म्हणून तयार केलेलं कॅप्टन कुक हाऊस आणि त्याभोवतालचं उद्यान फारच रमणीय आहे. आजही इथले लोक मोठ्या कृतज्ञतेने कॅप्टन कुकची आठवण ठेवताहेत हे विशेषच म्हटलं पाहिजे. क्रिकेटविश्वात सतत गाजणारं मेलबोर्न क्रिकेट मैदान इ.स. १८०० साली अस्तित्वात आले. याबाबतीतही जेम्स कूकचं योगदान महत्वपूर्णच ठरलेलं आहे.

दुपार टळली; ऊन्हं उतरली. संध्याछाया पसरू लागल्या; आम्ही फिलिप आयलंडवर पोहोचलो. पेंग्विन्स पक्ष्यांचं स्थळ म्हणून या बेटाची ओळख प्रसिद्ध आहे. इथले देखावे कॅमेर्यात बंदिस्त करण्याची माझी तीव्र इच्छा होती. पण कसचं काय...! फिलीप बेटावर फोटो काढायला सक्त मनाई होती. तिथून ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणपूर्व किनारपट्टीला जोडणारा २४३ कि.मी.लांबीचा जो एक ‘ग्रेट ओशन रोड’ आहे, त्याच्या बाजूने आमचा प्रदीर्घ प्रवास सुरू झाला. हा संपूर्ण रस्ता अतिशय नयनरम्य आहे. दक्षिणेकडून प्रशांत महासागराचं विहंगम दर्शन घडतं, तर विरुद्ध दिशेनं खडकाळ पर्वत प्रदेशाचं दृश्य दिसत राहतं. त्यानंतर दिसू लागतो दक्षिण प्रशांत महासागराचा विशाल जलाशय आणि त्यातून नैसर्गिकरीत्या उभी राहिलेली पाषाणशिल्पं. समुद्रात आढळणार्या या दगडी शिल्पाकृती म्हणजे हजारो वर्षांच्या हवामानाचा आणि वातावरणातील बदलांचा एक अटळ परिणाम. समुद्रातळातल्या खडकांची हळुहळू झीज होत गेली; कडेकपारींना एखाद्या लेण्यासारखा, गुहेसारखा आकार प्राप्त होत गेला; खडकांचा मूळचा अस्ताव्यस्त बेढब आकार लोप पावून त्याजागी एक प्रकारचं सौष्ठत्व आलं आणि या पाषाणशिल्पांना येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांचं पवित्र स्वरूप प्राप्त झालं असं सांगितलं जातं.


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

काहीही असो, प्रशांत महासागरात उभी असलेली ही प्रेषित सदृश पाषाणशिल्पं (Twelve Apostles) पाहणार्यांचं चित्त वेधून घेतात यात काहीच शंका नाही. मेलबोर्नमधील हे एक लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे. जगभरातले पर्यटक इथे येण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. मुळातल्या बारांपैकी सध्या इथे फक्त आठ शिल्पं पहायला मिळतात. हेलिकॉप्टरमधून ही पाषाणशिल्पं पहाताना जे काही दृश्य दिसतं ना, त्याला तोड नाही.

पुढली ‘गोल्डकोस्ट’ शहराची भेट म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या नाना प्रेक्षणीय वस्तूंचं भांडारच म्हणायला हवं. या शहराच्या भेटीमध्ये काय पाहू आणि काय नको अशीच माझी अवस्था झाली. इथे गगनचुंबी इमारती आहेत, थीमपार्कस आहेत, प्राणीसंग्रहालयं आणि अफाट समुद्रकिनारा आहे. यातलं प्रत्येक स्थळ म्हणजे अविस्मरणीय व रोमांचक अनुभवांचा खजिनाच आहे. ही स्थळे अनेक वेळा पाहूनही मन तृप्त होत नाही.

या देशातलं एकंदर हवामान वर्षभर सतत बदलत असतं. मूळात ऑस्ट्रेलिया हा विशाल खंडप्राय देश असल्यामुळे इथल्या वातावरणात खूपच वैविध्य दिसतं. उत्तरेकडील राज्यात उष्ण हवा असते, तर दक्षिणेकडील प्रदेशात थंडी जाणवते. ऑस्ट्रेलिया हा एक असा खंडप्राय भूप्रदेश आहे, की जिथे काही भागात वैराण वाळवंट असून तिथे वर्षातून ६०० मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो. इथलं ऋतुचक्र उत्तरगोलार्धाच्या नेमकं विरुद्ध असणं हे इथल्या हवामानाचं वैशिष्ट्य आहे. ऑस्ट्रेलियातलं वर्षातल्या बाराही महिन्यांचं ऋतुमान वेगवेगळं असतं. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात इथे उन्हाळा जाणवतो. मार्च ते मे शरदऋतू असतो. जून महिन्यात हिवाळा सुरू झाला, की ऑगस्टपर्यंत थंडी असते. सप्टेंबरपासून नोव्हेंबर संपेपर्यत वसंतऋतू आपला मुक्काम हलवत नाही.


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

ऑस्ट्रेलियाची एकूण भौगोलिक स्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. जैवविविधतेने नटलेल्या अनेक प्रदेशांना सामावून घेणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला सहाव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. इथली लोकसंख्या मोजताना पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीची अशी एकत्रच मोजली जाते. या देशातून अन्य देशांत स्थलांतरित होणार्यांचं प्रमाणही जास्त आहे. जगातल्या मोजक्या श्रीमंत देशांमध्ये ऑस्ट्रेलियाची गणना होते. आर्थिक समृद्धीप्रमाणेच पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा देश संपन्न आहे. इथला काही भूप्रदेश नापिक, ओसाड आहे, तर दुसरीकडे दाट जंगलं आहेत. काही भागात तुफान पर्जन्यवृष्टी होते, तर काही भाग अगदी दुष्काळी आहे. थोडक्यात सांगायचं झालं, तर त्या-त्या ऋतुकालानुसार ऑस्ट्रेलियात निसर्गाचे बहुविध आविष्कार पहायला मिळतात.

ब्रिस्बेनपासून कायर्न्सपर्यंतच्या विमानप्रवासात खिडकीतून बाहेर नजर टाकल्यास विविध प्रकारची सुंदर दृश्यं दिसतात. लहान लहान बेटं आणि समुद्राच्या निळ्याभोर जलाशयातली ‘ग्रेट बॅरीअर रीफ’ लक्ष वेधून घेतात.

‘कुरंदा रेनफॉरेस्ट’ हे स्थळ कायम लक्षात रहावं इतके वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. इथे घनदाट अरण्यातील गर्द वृक्षराजीच्या माथ्यावरून केबलकार्सची वाहतूक सुरू असते. हा भाग एरवी निर्मनुष्यच असतो. फार पूर्वी इथे अबोरिजीन्स म्हणजे ऑस्ट्रेलियामधले मुळ रहिवासी किंवा आदिवासी यांचं वास्तव्य होतं. त्या अबोरिजीन्स लोकांबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने उभारलेलं एक आदिवासी कलाकेंद्र इथे कार्यरत आहे. या केंद्राद्वारे प्रदर्शित होणार्या विविध कार्यक्रमांतून आदिवासींच्या जीवनशैलीचं दर्शन घडतं.


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

ऑस्ट्रेलिया दौर्यात मी ‘Hot Air Balloon ride” नावाचा एक साहसी क्रीडाप्रकार अनुभवला. गरम हवेच्या बलू्नमधून हवाई उड्डाण करण्याचा हा प्रकार जितका साहसी तितकाच चित्तथरारक! एके दिवशी भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत हॉट एअर बलूनच्या स्टेशनवर गेलो. मोकळ्या मैदानातल्या गोलाकार बलूनमध्ये बसलो आणि काही क्षणातच बलूनने आभाळात उंच झेप घेतली. पहावं तिकडे पर्वतांची उत्तुंग शिखरं; खाली जमिनीवर लांबच लांब शेत-मळे; त्यातून हुंदडणारे कांगारूंचे कळप; दाहीदिशांतून दाटून आलेलं गडद धुकं आणि त्यात घोंगावणार्या सुसाट वार्याची भर. आणि अश्या सुंदर पार्श्वभूमीवर दूर पूर्व क्षितीजातून अलगदपणे वर येऊ लागलेला सूर्याचा तांबूस सोनेरी गोळा... अहाहा! डोळ्यांचं पारणं फेडणारा तो सूर्योदय पाहून मी आनंदाने शहारले! पर्यटकांना अश्या सूर्योदयाचं दर्शन घडवणे हाच या बलून राईडचा मुख्य हेतू होता. तुम्ही म्हणाल सूर्योदय तर रोजच होतो, मग त्यात वेगळं ते काय? तर, हे वेगळं काय आहे ते पाहण्यासाठी एकदा तरी ऑस्ट्रेलियात जायला हवं असं मला वाटतं.

अथांग सागराच्या तळाचा शोध घेणं हा ही एक विलक्षण अनुभव आहे. समुद्र वरून कसा दिसतो ते सर्वांनाच पाहता येतं. पण समुद्राचं अंतरंग पाहण्याची संधी फार थोड्यांना लाभते. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात मीही त्यातली एक भाग्यवान ठरले. इथे ग्लासबॉटम बोटीतून मी प्रवास केला. सेमी सबमरीन्सच्या साहाय्याने आम्हाला समुद्राचा तळ गाठता आला. त्या ठिकाणी असणारे ग्रेट बॅरीअर रीफ जवळून पहाता आलं. स्नोर्केलिंग करत म्हणजे शुद्ध हवेचा पुरवठा करणाऱ्या विशिष्ठ नळीच्या साहाय्यानं श्वसन करत पाण्यात डुबकी मारुन पाण्याखालचं अद्भुत जग न्याहाळू शकले. जे ग्रेट बॅरीअर रीफ चंद्रावरूनही दिसतं असं म्हणतात त्याला आज मी चक्क स्पर्श करू शकत होते! सकाळी आकाशात तरंगत सूर्योदय पहायचा आणि दुपारी पार सागराच्या तळाशी जाऊन तिथलं जग पहायचे हे दोन भन्नाट अनुभव एकाच दिवशी घेता येणं हे खरच अविस्मरणीय आहे.


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

या दौऱ्यातली मी पाहिलेली दोन मोठी शहरं म्हणजे सिडनी व कॅनबेरा. सिडनी हे दाट लोकवस्तीचं शहर आहे. इथला सर्वाधिक उंचीचा मनोरा, जो कुठूनही दिसू शकतो, त्याचं नाव आहे सिडनी टॉवर. तो ३०० फूट उंच असून त्यातील दिव्यांच्या प्रकाशकिरणांमुळे सिडनी शहर लख्ख उजळून निघतं. दररोज रात्री दिसणारं हे दृश्य पाहून डोळे दिपून जातात. पण मला जास्त उत्सुकता होती ती सिडनीतील ऑपेरा हाऊस पाहण्याची. मी स्वत: आर्किटेक्टची विद्यार्थिनी असल्यामुळे हे स्थळ पाहण्याचं मला फार कुतूहल होतं. जोर्न उत्झान नावाच्या एका डॅनिश आर्किटेक्टनं डिझाईन करून इ.स.१९७३ साली ऑपेरा हाऊसची इमारत पूर्ण केली. विसाव्या शतकातली जगातली एक नमुनेदार, प्रेक्षणीय इमारत म्हणजे इथले ऑपेरा हाऊस. या देखण्या ऑपेरा हाऊसची गणना आता युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारश्यातही होते. या इमारतीच्या सर्व पैलूंचं मी ‘आर्कीटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू’मधून सूक्ष्म निरीक्षण केलं आणि त्यातील कलात्मक सौंदर्यानं आणि वैशिष्ट्यांनी अतिशय प्रभावित झाले. हे ऑपेरा हाऊस म्हणजे अभिजात वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुनाच होय! या वास्तूची वेगवेगळी अंगं न्याहाळणे, वास्तूच्या प्रत्येक भागाला स्पर्श करणे आणि त्या स्पर्शांची स्पंदनं अनुभवणं हे सारंच माझ्यासाठी स्फूर्तीदायक ठरलं.

१९०८ सालापासून कॅनबेरा शहराला ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाला आहे. अवघ्या दोन तासांत सिडनीहून इथे मोटारनं पोहोचता येतं. तथापि सिडनीच्या तुलनेत सर्वच बाबतीत हे शहर पूर्णपणे वेगळं आहे. राजधानीचा दर्जा असल्यामुळे इथे पार्लमेंट हाऊस आहे. तसंच बहुसंख्य शासकीय इमारतींचं आणि कार्यालयांचं देखील हेच केंद्रस्थान बनलं आहे. इथल्या सर्व इमारती सुशोभित, भव्य आणि अंतर्बाह्य देखण्या वाटतात.


ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! नंदिनी बोरकर, ठाणे

ऑस्ट्रेलियातल्या युद्धकालीन स्मृतींचं संग्रहालय (War Memorial) सुद्धा आवर्जून पहावं असच आहे. ऑस्ट्रेलियातील सगळे विमानतळ जेवढे भव्य, प्रशस्त आणि वास्तूकलेच्या दृष्टीने अप्रतिम आहेत, तेवढेच ते सर्वच बाबतीत अत्याधुनिक आणि सुसज्ज आहेत. या दौर्यात मला मोटार,लक्झरी बस, हेलिकॉप्टर, विमान, आगबोट, एअर बलून आणि पाणबुडी अशा सर्व प्रकारच्या वाहनांतून प्रवास करायला मिळाला!

ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतण्याचा प्रवास जसा प्रदीर्घ, कंटाळवाणा तसाच तो शरीराची व मनाची दमवणूक करणाराच आहे. तरीही या प्रवासाच्या अनेक आठवणी अवीट आणि चैतन्यदायक आहेत. मला तर असं वाटतं, की प्रत्येकाने आयुष्यात निदान एकदा तरी ऑस्ट्रेलियाला भेट द्यावीच. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी म्हणेन एक सुंदर देश पाहून झाला असला तरी भविष्यात जगातली इतरही अनेक ठिकाणं मला पहायची आणि अनुभवायची आहेत.

तशी संधी मला मिळो हीच देवाला प्रार्थना...!

To Read in English मागील लेख पुढील लेख