1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

इमा बाजार

संघमित्रा बेंडखळे
फोटोजर्नालिझमचा कोर्स करुन नंतर एडीटोरियल आणि जाहिरातक्षेत्रात प्रकाशचित्रकार म्हणुन काम करणा-या संघमित्रा बेंडखळे या क्षेत्रातल्या खूप अनुभवी प्रकाशचित्रकार आहेत. त्यांना फुड फोटोग्राफी, लग्नसमारंभाची फोटोग्राफी याचाही खुप अनुभव आणि आवड आहे. सॅवी, शोटाईम यांसारख्या अनेक मासिकांतुन त्यांचे काम प्रकाशित झालेले आहे. पोर्टफोलियो आणि स्टॉक फोटोग्राफीतही त्यांनी बरेच काम केलेलं आहे.


इमा बाजार संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

आपला भारत देश इतका विस्तीर्ण आहे, की देशाच्या प्रत्येक भागात एक वेगळी संस्कृती, वेगळ्या प्रकारचं निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं. अगदी बर्फाळ पर्वतांपासून ते उबदार समुद्रकिना्र्यापर्यंत अनेकविध गोष्टी इथे अनुभवायला मिळतात. इथली विविध ठिकाणं त्या-त्या ठिकाणच्या विशेष गोष्टींसाठी प्रसिद्धही आहेत. ईशान्येकडचा पूर्वांचल हा भाग काहीसा दुर्लक्षिला गेला असं वाटत असलं, तरीही निसर्गसौंदर्यानं नटलेलं मणिपूर हे राज्य कायमच पर्यटकांचं खास आकर्षण राहिलं आहे.

मणिपूर, पर्वतराजींच्या कुशीत वसलेलं एक सुंदर छोटंसं राज्य. इम्फाळ हे मणिपूरच्या राजधानीचं शहर राज्याच्या मध्यवर्ती भागात पर्वतांच्या पायथ्याशी वसलेलं आहे. अनेक राजकीय आणि भौगोलिक कारणांमुळे हे शहर काहीसं अशांत असतं. इथे कायम लष्कर तैनात केलेलं असतं. असं असलं तरी इथे आसपास अनेक पर्यटनस्थळं असल्यामुळे जगभरातील पर्यटक आवर्जून या शहराला भेट देतात. इम्फाळपासून साधारण पंचेचाळीस किमी अंतरावर मोइरांग येथे सुप्रसिद्ध आणि अतिशय विस्तीर्ण असं गोड्या पाण्याचं लोकताक सरोवर आहे. तरंगणारी बेटं असणारं हे जगातील एकमेव सरोवर आहे. ही तरंगणारी बेटं प्रवाहाबरोबर आपली जागा बदलत राहतात. इम्फाळमधेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रथम तिरंगा फडकवला. त्या अर्थानं हे ठिकाण दुसर्या महायुद्धात आणि भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्वाचं मानलं जातं. इथेच एक वस्तुसंग्रहालयही आहे. जगातलं सर्वात जुनं पोलो ग्राऊण्डही इम्फाळमधेच आहे.


मणिपूर संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

शहराच्या मध्यवर्ती भागात इमा बाजार आहे. 'इमा' म्हणजे 'स्त्री' किंवा 'माता'. इम्फाळचा हा प्रसिद्ध इमा बाजार संपूर्णपणे स्त्रियाच चालवतात. इथल्या सर्व स्टॉल्सवर विक्रेत्या म्हणून स्त्रियाच असतात. अतिपूर्वेला असल्यामुळे इम्फाळमध्ये दिवस लवकर मावळतो आणि उजाडतोही. त्यामुळे इथला सर्व कारभार सकाळी लवकरच सुरू होतो. आपापले विक्रीयोग्य सामान घेऊन या स्त्रिया सकाळीच बाजारात येतात; अगदी निगुतीनं आपला स्टॉल सजवतात.

या बाजारचं दृष्य अगदी मनमोहक असतं. या महिला विक्रेत्या ओट्यावर किंवा पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या वस्तू विकत बसलेल्या असतात. इम्फाळ मुळातच थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे गरमागरम चहाचे घोट घेतघेतच या महिला विक्रेत्या आपला माल विकत असतात. तसंच इथली दगडी ओट्यावर मांडलेली छोटी छोटी हॉटेल्सही पाहायला छान वाटतात. खरेदीकरता येणार्या लोकांना नाश्ता करता यावा यासाठी ही हॉटेल्स स्थानिक आणि घरगुती खाद्यपदार्थ पुरवतात. आजूबाजूच्या गावातील लोकही इथे खरेदीला येतात.


इमा बाजार संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली

या बाजारात कपड्यांपासून ते बॅगांपर्यंत, पूजेच्या साहित्यापासून ते घरं सजवायच्या वस्तूंपर्यंत, स्थानिक भाज्यांपासून ते मच्छीपर्यंतच्या अनेक गोष्टी असतात. कधीही न पाहिलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या इथे पहायला मिळतात. वेगवेगळ्या पालेभाज्या, मोठी कंदमुळं, बांबू, गावठी भाज्या, कडधान्य, डाळी, चहाची पानं, दही, खायची पानं, सुपारीचे विविध प्रकार, ताज्या आणि सुक्या मासळीची दुकानं अशा नानाविध दुकानांनी हा बाजार सजलेला आहे. तसंच इथली मसाल्यांची दुकानंही खूप प्रसिद्ध आहेत. पूजेचं साहित्य, शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, कपडे, स्वेटर्स यांचीही इथे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. इथली सुपारी, उच्च प्रतीची हळद, काळा तांदूळ इत्यादी गोष्टींसाठीही हा बाजार प्रसिद्ध आहे.

या बाजारात सुमारे तीन हजार दुकानं आहेत. खूप पूर्वी जेव्हा वस्तूविनिमय पद्धत अस्तित्वात होती, तेव्हापासून हा बाजार सुरू आहे. काळाप्रमाणे या बाजाराचं स्वरूप बदलत गेलं. पण या बाजारातील स्त्रियांचं स्थान अजूनही अबाधित आहे. शहीद झालेल्या जवानांच्या विधवांना आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांना इथे प्राधान्यानं दुकानं दिली जातात. पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असलेला हा बाजार इतका वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे की एकदा या बाजारात शिरल्यानंतर रिकाम्या हाताने बाहेर पडणं अगदी अशक्य आहे.


इमा बाजार संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली


इमा बाजार संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली


इमा बाजार संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली


इमा बाजार संघमित्रा बेंडखळे, डोंबिवली
To Read in English मागील लेख पुढील लेख