संपादकांच्या लेखणीतून

नमस्कार,
दिवाळी अंकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या समोर येण्याची संधी लाभली आणि संस्थेचा गेल्या १६ वर्षांचा प्रवास एखाद्या चलतचित्रा प्रमाणे नजरे समोर दिसायला लागला….
या प्रदीर्घ कालावधीत संस्थेचा पाया रचणाऱ्या सहकारी स्नेह्यांच्या आठवणीने मन भूतकाळात गेले. आजच्या अनेक सभासदांना कदाचित अपरिचित वाटणार्या कै. प्रभाकर आठवले काका, शिरीष साने, चंद्रशेखर शिर्के, अरुण नेवासे, नयन तांबोटकर, अश्विन व्यास, निलेश मेहेता, अजूनही सक्रिय असलेले अन्जेलो डिसिल्वा,मनोज मुसळे, संजोग हाटे आणि संस्थेला यशस्वी स्वरूप देण्यात सिंहाचा वाटा असणारे प्रवीण देशपांडे या आणि अशा अनेक जेष्ठ प्रकाशचित्रकारांनी आपला अनुभव, वेळ आणि ज्ञानाचे संचित संस्थेच्या वाढीसाठी विनियोगीत केले. हे सारे सहकारी पायाचा दगड झाले म्हणूनच काळाच्या ओघात जोडल्या गेलेल्या ताज्या दमाच्या सदस्यांना संस्थेच्या यशाचे शिखर गाठता आले हे निर्विवाद सत्य आहे. अशा साऱ्याच सहकाऱ्यांचा उल्लेख शक्य नाही मात्र या संपादकीयच्या निमित्ताने त्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मोठ्या ठाणे जिल्ह्यामध्ये संस्थेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपला परीघ रुंदावत नेला आहे. प्रकाशचित्रणाचे तंत्र व कलात्मकता जोपासतानाच प्रकाशचित्रणाच्या माध्यमातून संस्थेने सामाजिक भानही जोपासले आहे. ठाणे शहरातील 'कमलिनी' या कर्णबधीर शाळेच्या १६ विद्यार्थ्यांना प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याचे आव्हान प्रवीण देशपांडे, अंजू मानसिंग व सहकार्यांनी लीलया पेलले. प्रवीण सोबत आता कुमार जयवंतने हा वसा पुढे चालवीत झवेरी ठाणावाला कर्णबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य सुरु केले आहे.

अत्यंत आनंदाने नमूद करण्याची बाब म्हणजे प्रत्येक उपक्रमाबरोबर संस्थेच्या आजीव सदस्यांची संख्या वाढत आहे आणि अभिमानाने सांगायचे तर यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिला सदस्यांनी यशस्वीपणे साकारलेले 'विद्युल्लता' प्रदर्शन म्हणजे संस्थेच्या शिरपेचातील मनाचा तुरा! वेगळ्या वाटेवर सामाजिककार्य करणाऱ्या हिरकणींचे अवघे व्यक्तिमत्व प्रकाशचित्रणात बंदिस्त करून त्यांच्या कार्याचा आलेख प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनातून मांडण्याचे शिवधनुष्य महिला प्रकाशचित्रकारांनी पेलले. समाजसेविकाना ८ मार्च या जागतिक महिलादिनी अशी मानवंदना देणे हे केवळ कौतुकास्पदच नाही तर अभिमानास्पदाही आहे ! प्रेरणेचा हा स्तोत्र महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित केला जातो. या वर्षीचे वैशिष्ठ्य म्हणजे पूर्वांचलातील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या चार राज्यातील १४ भगिनींच्या कार्याला 'विद्युल्लता'मध्ये सहभागी करण्यात आले होते आणि प्रदर्शनाचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशातील नामवंत समाजसेविका पद्मश्री डॉ. बिनी यांगा यांनी केले. याच निमित्ताने विद्युल्लतांच्या कार्याची माहिती देणारी इंग्रजी भाषेतील पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली.


संपादकांच्या लेखणीतून

नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून संस्था यशाची एक एक पायरी पादाक्रांत करीत होती. मात्र १६ व्या वर्षी संस्थेला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला. 'आविष्कार' ही ठाणे महानगरपालिका पुरस्कृत राज्यस्तरीय स्पर्धा ऑन लाईन झाली आणि दिवाळी अंकाने मराठी सोबतच इंग्रजीत पदार्पण केले!! या संपादकीयच्या निमित्ताने स्वप्नाली मठकरचे अभिनंदन केलेच पाहिजे. पर्यावरण संवर्धनाचा दृष्टीकोन ठेऊन 'आविष्कार' स्पर्धा ऑनलाईन होणे कसे गरजेचे आहे हे तिनेच आम्हा सर्व सभासदांना पटवुन दिले. तर संस्थेला जगाच्या नकाशावर पोहोचविण्याकरिता अंक मराठी सोबत इंग्रजीतही असावा अशी कल्पना अद्वैत गाडगीळ, नंदिनी बोरकर व संदेश जाधव यांनी मांडली. मुखपृष्ठाची जबाबदारी सायली घोटीकरने घेतली आणि संदेश जाधव व सहकार्यांच्या साथीने स्वप्नाली ने इंग्रजी अंकाची जबाबदारी लीलया पार पाडली. अर्थातच यात सिंहाचा वाटा आहे तो अनेक वर्षे संस्थेची कला व तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या संजय जाधव याचा!!

काळाबरोबर पावले टाकणाऱ्या कल्पक सदस्यांच्या बरोबरीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पावले लयीत पडली म्हणूनच संस्था प्रगती पथावर वाटचाल करीत आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रकाशचित्रकारांच्या या लहानशा संस्थेला आजचे हे स्वरूप देणारे कार्यकर्ते, देणगीदार, प्रत्येक कार्यक्रमाची दखल घेणारी वृत्तपत्रे आणि भरघोस प्रतिसाद देणारे नागरिक यांच्या उल्लेखाशिवाय हे संपादकीय अपूर्णच आहे….

धन्यवाद
संजय नाईक


मागील लेख पुढील लेख