छान किती दिसते.....

युवराज गुर्जर
सुमारे 26 वर्ष विविध जंगलात भटकंती करणारे श्री. युवराज गुर्जर वाइल्डलाईफ आणि नेचर फोटोग्राफर आहेत. मायक्रो फोटोग्राफी आणि इन्सेक्ट फोटोग्राफी हे त्यांचे महत्वाचे विषय. विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भारतातर्फे त्यांच्या फोटोंची निवड. विविध पुस्तके, फिल्ड गाईड्स, वेबसाईट्स अशा ठिकाणी त्यांचे फोटेंचा वापर. त्याशिवाय अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके. फुलपाखरांची माहिती देणारे मराठी पुस्तक, मराठी ब्लॉग आणि विविध प्रकाशनांमध्ये अनेक लेख त्यांच्या नावावर आहेत.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

हल्ली आपण निसर्गाबद्दल किंवा निसर्गसंवर्धनाबद्दल खूपच जागरूक झालेले आहोत. बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केले जाते; ‘नेचर कँपस्’ आयोजित केले जातात. बरेचजण पक्षीनिरिक्षण करायला आसपासच्या जंगलातून भटकताना दिसतात किंवा मोठ्या जंगलात सफारीकरता जातात. तरीसुद्धा निसर्गाच्या एका छोट्या घटकाकडे मात्र बऱ्याच जणांचे दुर्लक्ष झालेले आहे. हा घटक आहे फुलपाखरू. फुलपाखरू हा छोटासा, इवलासा घटक इतका रंगीबेरंगी, आकर्षक आणि सहज दिसणारा, तरी तो दुर्लक्षला गेलेला आहे.

आपल्याला शहरात कावळा, चिमणी, कबुतर, साळुंक्या, दयाळ, कोतवाल, पोपट, घार हे पक्षी नेहमी बघायला मिळतात. जिजामाता उद्यानात वाघ, सिंह, बिबळ्या, माकड, हरण, हत्ती, गवे इत्यादी वन्य प्राणी दिसतात. भारतात फुलपाखरे मात्र अशी सहजासहजी संग्रहालयात दिसत नाहीत. आपण फुलपाखरे बघतो ती फक्त चित्रात, कॅलेंडरवरती, जाहिरातीत अथवा एखाद्या कवितेत. आपण साहित्यामधे फुलपाखरांचा खूप उपयोग केला आहे. चिमुकलेपणा, नाजूकपणा, विविध रंग याकरता फुलपाखरांच्या उपमा दिल्या गेल्या आहेत. असा फुलपाखरांचा आणि आपला अप्रत्यक्ष संबंध कायम येत गेला असला, तरी त्यांच्याविषयी आपल्याला खरे तर खूपच कमी माहिती असते. आपल्या भारतातसुद्धा या फुलपाखरांच्या जवळपास १५००हून अधिक जाती आढळतात. यातल्या आपल्या मुंबई / ठाण्यामध्येसुद्धा १६८च्या आसपास जाती आपल्याला दिसू शकतात. तर याच फुलपाखरांविषयी ही थोडीफार माहिती, जी सहसा माहित नसते ती.....


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

आपण अगदी लहान मुलाला जरी विचारले, की फुलपाखरे काय खातात? तर तो पटकन सांगेल, की फुलपाखरे फुलातील मध पितात. हे जरी खरे असले, तरी पूर्ण खरे नाही. कित्येक फुलपाखरे जरी फुलांना मधाकरता भेट देत असली, तरी कित्येक फुलपाखरांना या फुलातील मधापेक्षा इतरच काही पदार्थ जास्त प्रिय असतात. या त्यांच्या ‘इतर’ पदार्थांची आपण कल्पनाही करू शकत नाही इतके ते विचित्र आहेत. गाईगुरांच्या मल-मूत्रावर बसणारे फुलपाखरू ही कल्पना मनाला न पटणारी असली तरीही ती सत्य आहे. कित्येक जातींची फुलपाखरे कधी चिखलातून तर कधी अतिपक्व, आंबलेल्या, सडलेल्या फळांमधून आपले अन्न मिळवतात. याखेरीज कुजलेला पालापाचोळा, झाडातून पाझरणारा डिंक, पशूपक्ष्यांचे मलमूत्र, मृत प्राण्याची शरीरे, इतकेच नव्हे तर दारूसारख्या अविश्वसनिय गोष्टींचाही फुलपाखरांच्या आहारात समावेश असतो. या किळसवाण्या वाटणाऱ्या पदार्थांमधूनच फुलपाखरांना पोषक द्रव्ये, क्षार मिळतात.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

फुलपाखरांच्या जीवनक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अवस्थांप्रमाणेच त्यांचा आहारही बदलतो. अंडयातून बाहेर आलेल्या फुलपाखरांच्या अळ्यांना पाने चावून खाता येईल असे तोंड असते, त्यामुळे त्या पाने खातात. पण याच अळ्यांचे कोषामध्ये आणि नंतर फुलपाखरामध्ये रुपांतर झाले, की ही फुलपाखरे आपले अन्न चावून खाऊ शकत नाहीत. कारण आता त्यांच्या तोंडाची रचनाच बदललेली असते. फुलपाखरांचे तोंड म्हणजे जणू हत्तीच्या सोंडेचा चिमुकला अवतारच. या नाजूक, लहानशा सोंडेतून फुलापाखरे आपले अन्न शोषून घेतात. इतरवेळी गुंडाळलेली ही सोंड अन्नग्रहणाच्या वेळी रक्तप्रवाह खेळवून ताठ केली जाते. तोंडाच्या या रचनेमुळे फुलपाखरे केवळ द्रवरुपातील अन्नच ग्रहण करू शकतात. यामुळे सहसा फुलपाखरे अनेक फुलांना भेटी देऊन त्यातील मधुर रस अथवा मध प्राशन करतात. पण याच जोडीला त्यांच्या शरीराला अनेक इतर क्षारांची गरज असते, जी त्या मधातून पूर्ण केली जाऊ शकत नाही. याकरता त्यांना मग इतर पदार्थांमधून ते क्षार मिळवायला लागतात. या फुलपाखरांचे नर जेव्हा चिखलपान अथवा mud puddling करतात तेव्हा त्यांना सोडियम आणि अमिनो आम्ले मिळतात. मादीबरोबर मीलन करताना ही पोषक द्रव्ये मादीला दिली जातात, ज्याचा फायदा त्यांची अंडी वाढण्याकरता होतो. बऱ्याच वेळेला जेव्हा ही फुलपाखरे अतिपक्व फळांवर ताव मारतात किंवा मेलेल्या प्राण्याच्या शरीरातून द्राव शोषतात तेव्हा त्यांना त्याच्यातून अमिनियम आणि कार्बोहायड्रेट मिळतात. याचा वापर त्यांना ऊर्जा मिळण्याकरता तर होतोच, शिवाय त्यामुळे त्यांच्या नविन पिढीकरता योग्य असे पोषणही मिळते.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

फुलपाखरांचे चिखलपान सहसा उन्हाळ्यात होते. पानगळी रानांमध्ये, उन्हाळ्याच्या कोरड्या दिवसांत ही फुलपाखरे मोठया संख्येने पहायला मिळतात. अतिशय जलदगतीने उडणारी ही फुलपाखरे तापमान वाढू लागले, की रानातील झऱ्याजवळ, ओढयाजवळच्या ओल्या जमिनीवर, चिखलावर बसलेली पहायला मिळतात. एका वेळी अक्षरश: शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे एकाच ठिकाणी अगदी एका ताटात जेवल्याप्रमाणे एकत्र बसलेली आढळतात. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन जे, ब्लू बॉट्ल, इमीग्रंट, कॉमन गल, झेब्रा ब्लू, ग्राम ब्लू, लेपर्ड, ग्रास ज्वेल, सनबीम अशी अनेक फुलपाखरे असे चिखलपान करताना आढळतात. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात इतर अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या जाती देखील असे चिखलपान करताना दिसतात. या वेळेला अर्थातच त्यांचे छायाचित्रण आपल्याला सहज करता येते आणि एकाच जागी अनेक वेगवेगळ्या जाती आपल्याला छायाचित्रणासाठी मिळू शकतात.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

स्थलांतर म्हटले, की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते. आज जगात बरेच पक्षी, मोठे प्राणी, मासे स्थलांतर करतात; पण अतिशय चिमुकली, नाजुकशी फुलपाखरेसुद्धा स्थलांतर करतात हे बऱ्याच जणांना कदाचित नवीन असेल. लहान आणि नाजूक असणारे हे कीटक प्रचंड लांब अंतराचेसुद्धा स्थलांतर सहजासहजी करतात. पण तरीसुद्धा पक्ष्यांचे स्थलांतर आणि फुलपाखरांचे स्थलांतर यात थोडा फरक आहेच. पक्ष्यांचे स्थलांतर दुमार्गी असते, तर फुलपाखरांचे एकमार्गी असते. फुलपाखरे पक्ष्यांप्रमाणे परत त्यांच्या जन्मस्थळाला भेट देत नाहीत. पण तरीसुद्धा ही नाजूकशी फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात एकदाच स्थलांतर करतात आणि हे अंतर अगदी २ कि.मी. ते ३००० कि.मी.पर्यंतचे असू शकते. तापमानातील आणि आर्द्रतेतील बदल, अन्नझाडांची कमतरता आणि अचानक वाढणारी संख्या ही फुलपाखरांच्या स्थलांतराची मुख्य कारणे असू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

पक्ष्यांमधे अथवा प्राण्यांमधे स्थलांतराचा अभ्यास करणे तसे सोपे असते; कारण एकतर ते आकाराने मोठे असतात, त्यांचे आयुष्य जास्त असते आणि दरवर्षी नित्यनियमाने ते त्याच त्याच जागी परत येतात. पण फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते. त्यांची पुढची पिढी परत उत्तरेकडे उडत येते. या स्थलांतराच्या उड्डाणाकरता ही फुलपाखरे सहसा एकाच दिशेने दोन भौगोलिक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सूर्यप्रकाश चांगला असेल त्यादिवशी होतात. सूर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती ऊर्जा मिळते. या स्थलांतराकरता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उडायचे हे कसे ठरवतात आणि जाण्याच्या ठिकाणी त्यांच्या अळ्यांना भरपूर अन्नझाडे उपलब्ध आहेत की नाही हे त्यांना कसे कळते याचे कोडे काही अजूनपर्यंत उलगडलेले नाही.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

भारतात फुलपाखरांचे दोन प्रकारचे स्थलांतर बघायला मिळते. पहिल्या प्रकारात एकाच जातीची हजारो फुलपाखरे एकाच दिशेने उडताना दिसतात. यामधे ‘मिल्कवीड’ आणि ‘व्हाईट्स’ जातीची फुलपाखरे जास्त असतात. हा उडण्याचा काळ किंवा हंगाम अनिश्चित असतो. दुसऱ्या प्रकारात हवामानात प्रतिकूल बदल झाल्यामुळे फुलपाखरे दुसरीकडे जातात. या प्रकारात सहसा त्यांची संख्या कमी असते आणि ही डोंगराळ प्रदेशातून खालच्या बाजूस उडतात. अतिथंड हवामान किंवा प्रचंड पाऊस हेच याचे मुख्य कारण असते. आज भारतात जवळपास ६० जातीची फुलपाखरे स्थलांतर करतात अशी नोंद आहे. यात प्रामुख्याने कॉमन क्रो, स्ट्राईप्ड टायगर, ब्लु टायगर, डार्क ब्लु टायगर, पी ब्लु, कॉमन अल्बाट्रॉस या जाती आहेत. परदेशात फुलपाखरांच्या स्थलांतराच्या वेळी फुलपाखरांचे तज्ज्ञ अक्षरश: ग्लायडर विमान घेऊन त्यांचा मागोवा घेतात. सध्यातरी आपल्याकडे अश्या सोयीही नाहीत आणि असे लोकही नाहीत. तरीसुद्धा अगदी अलीकडे दक्षिण भारतात यावर जोरात काम सुरू झाले आहे आणि लवकरच त्या अभ्यासाचा, नोंदींचा आपल्या सर्वांना फायदा होईल.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

आज भारतात फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यास न झाल्यामुळे त्यांची काही ठोस दिशा, वेळ आणि काळ आपल्याला माहित नाही. त्यामुळे या स्थलांतरचे छायाचित्रण म्हणजे मोठे कठीणच काम आहे. पण जर का तुम्ही हिवाळ्यात जंगलात फिरायला गेलात आणि तुम्हाला यदाकदाचित ही स्थलांतर करणारी फुलपाखरे दिसली तर मात्र त्यांचे छायाचित्रण करायला मजा येते. याचे कारण एरवी आपल्याला एखाददुसरे फुलपाखरू दिसते, पण यावेळी मात्र हजारो फुलपाखरे एकाच वेळेस त्या जागी आपल्याकरता उपलब्ध असतात. या हजारो उडणाऱ्या, बसलेल्या फुलपाखरांपैकी कोणाचे छायाचित्र काढू असाच प्रश्न कायम पडतो. एकाच झाडावर बसलेली अगदी शेकडो फुलपाखरे मी आंबोली, वेळास, फणसाड, येऊर, नागला, वसई येथे बघितली आहेत. त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर त्यातली बरीचशी उडतात, पण तरीसुद्धा तुमच्या ‘फ्रेम’मधे १०/१२ फुलपाखरे तरी हमखास येणारच.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

फुलपाखरे लहान, नाजूक आणि तशी अल्पायुषी असल्यामुळे त्यांना त्यांचा वंश पुढे वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो. या थोडक्या वेळातच नराला योग्य त्या मादीला शोधून, तिला स्वत:कडे आकर्षित करून मीलन करायचे असते. अर्थातच त्यामुळे त्याच्यासाठी हा काळ महत्वाचा असतो. आपल्या जातीच्या, योग्य आणि मीलनास तयार मादीला शोधण्यासाठी नर दोन मार्ग अवलंबतात. एक तर ते उंच फांदीवर जाऊन टेहेळणी करतात. यामुळे ते आजूबाजूने जाणाऱ्या माद्यांवर लक्ष ठेवतात आणि त्याच वेळेस दुसरा कोणी प्रतिस्पर्धी घुसखोर नर त्यांच्या या हद्दीत येत नाही ना हे सुद्धा पाहतात. दुसरा मार्ग म्हणजे नर आजूबाजूला जिथे त्याला माद्या मिळण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणांना भेटी देत राहतात. जर का या दोनही मार्गांमुळे त्याला मादी दिसली तर त्याचे पुढचे काम सुरू होते. मादी दिसली की त्याचे अर्धे काम झाले असले तरी त्याला मादीची योग्य जात, लिंग, मादी मीलनास तयार आहे की नाही याची शहानिशा करावी लागते. त्याचप्रमाणे मादीसुद्धा नर मीलनास तयार असेल तर तो योग्य आकाराचा, उठावदार रंगाचा आणि वासाचा आहे की नाही हे पडताळून बघते.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

नर प्रत्यक्ष बघून जरी मादी शोधत असला तरी बऱ्याच वेळेस त्यांच्या शरीरातून प्रसवलेल्या संप्रेरकांमुळे त्यांना योग्य तो ‘सिग्नल’ मिळतो. याकरता उडणारे नर आजूबाजूने जाणाऱ्या माद्यांच्या आसपास उडत राहतात. यामुळे मादीला संप्रेरकांचा वास येउन जर ती मीलनास तयार असेल तर थांबते आणि जवळपास उतरते. नर तिच्या आसपास उडत राहतो आणि तिच्या पंखांना, पायांना, स्पर्शिकांना स्पर्श करत रहातो. मादीने जर अनुकूल हालचाली केल्या तर तो तिच्या शेजारीच उतरतो. यानंतर त्यांचे प्रत्यक्ष मीलन घडून येते. मीलनाचा काळ अगदी अर्ध्या तासापासून ते २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. काही काही जाती सकाळी मीलन करणे पसंत करतात; तर काही जाती दुपारी मीलन करतात. जर का या मीलन जोडीला धोका जाणवला तर सर्वसाधारणपणे मोठी असलेली मादी तशीच त्या अवस्थेत नराला घेउन उडत जाऊन दूर सुरक्षित ठिकाणी बसते. या मीलनानंतर मादीचे मुख्य काम असते ते योग्य असे अन्नझाड निवडून त्यावर अंडी घालण्याचे. काही जातीची फुलपाखरे एकेकटे अंडे घालतात. त्यामुळे अर्थातच त्यांना बऱ्याच अन्नझाडांना भेटी द्याव्या लागतात. तर काही जातीची फुलपाखरे पुंजक्याने अंडी घालतात त्यामुळे त्यांचे एक-दोन झाडांवरच काम निभावून जाते.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

बऱ्याच वेळेस या अन्नझाडांच्या आसपासच या माद्या आढळत असल्यामुळे बरेचसे नर सुद्धा या झाडांच्या आसपास त्यांच्याभोवती पिंगा घालताना आढळतात. अश्या या फुलपाखरांच्या बाबतीत अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचे जेवढे आपण निरीक्षण जास्त करू तेवढीच आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. याच कारणासाठी मी फुलपाखरांच्या ‘आय लव्ह बटरफ्लाईज’ या अॅपची नविन कल्पना निसर्गाप्रेमींसाठी प्रत्यक्षात आणली आहे. आपल्या परिसरात सापडणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे १६८ जातींच्या फुलपाखरांची माहिती आणि छायाचित्रे या अॅपमधे देण्यात आली आहेत. मोबाईलमधे ‘आय लव्ह बटरफ्लाईज’ अॅप गूगल प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येते. ज्यांना फुलपाखरांची माहिती आहे ते फुलपाखरांच्या फॅमिलीवरून त्यांना शोधू शकतात; तर जे अगदी नवशिके आहेत ते फक्त रंगावरून फुलपाखरू शोधू शकतात. लवकरच महाराष्ट्रात आणि भारतात सापडणारी सर्व फुलपाखरे या अॅपमधे द्यायचा प्रयत्न सुरू आहे.


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे


छान किती दिसते..... युवराज गुर्जर, ठाणे

मागील लेख पुढील लेख