Marathi-Logo
Website Hits

.

Sitemap
‘फ’ फोटोविषयी

बहुतेकवेळा प्रकाशचित्रण या विषयावर काही लिहीले गेले तर ते प्रकाशचित्रणच्या तांत्रिक बाबींबद्दल असते. प्रकाशचित्रणात तांत्रिक बाबी खूप महत्वाच्या असल्या तरीही प्रकाशचित्रकार हा एक कलाकार आहे. कुठल्याही कलेची निर्मिती करताना त्यामागे काहीतरी भावना, कुठलातरी अनुभव, विचार याची एक बैठक नक्कीच असते. पण प्रकाशचित्रकारांच्या बाबतीत हे अनुभव किंवा विचार फारच कमी वेळा शब्दबद्ध होतात. किंबहुना ते शब्दबद्ध होण्यासाठी तसे व्यासपीठही सहज उपलब्ध नसते.

हा विचार करूनच 'फ' फोटोचा या दिवाळी अंकाची निर्मिती झाली आहे. प्रकाशचित्रकारांना त्यांचे अनुभव, त्यांचे विचार शब्दांकित करून लोकांसमोर सहज मांडता यावेत, मोठमोठ्या मान्यवर प्रकाशचित्रकारांशी मुलाखतीच्या रूपातून संवाद साधता यावा अशी यामागची भावना. त्याशिवाय प्रकाशचित्रणाच्या कलेतला तांत्रिक भाग सोडला तर इतर रसिकांनाही या कलेचा पुरेपूर आनंद मिळवून द्यायला हवा असेही मनात होतेच त्यामुळे अंकातले लेख घेताना तांत्रिकमुद्दे टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

मग हा दिवाळी अंकच का? तर मराठी मन आणि दिवाळी अंक यांचे एक सहज आणि जुने नाते आहे. दिवाळी जवळ आल्यावर जसे आपण इतर गोष्टींची तयारी करतो तसेच दिवाळी अंकांचीही आतुरतेने वाट बघतो. म्हणून कलेच्या रसिकांना साहित्य आणि कलेची मेजवानी दिवाळीतच देणं जास्त संयुक्तिक वाटलं. प्रकाशाच्या या सणाला प्रकाशाचे चित्रण करणाऱ्या कलेविषयी लिहीणं यासारखा चांगला योग तो कुठला!

आज 'फोटो सर्कल सोसायटी' प्रकाशचित्रणाला वाहिलेला पहिलावहिला मराठी दिवाळीअंक 'फ' फोटोचा तुम्हा रसिकांसाठी सादर करत आहे . प्रकाशचित्रण क्षेत्रातल्या एका नव्या व्यासपिठावर तुमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.

'फ' फोटोचा,
संपादक मंडळ,
फोटो सर्कल सोसायटी, ठाणे.